आता ही गोष्ट आहे हॉलंडच्या फ़ॅनी ब्लॅंकर्स कुह्नची..... एकाच ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदक विजेते ऍथलीट म्हणुन आपल्याला कार्ल लुइस(१९८४ लॉस ऍंजलीस ऑलिंपिक्स) व जेसी ओवेन्स(१९३६ बर्लिन ऑलिंपिक्स) यांचे पराक्रम ठाउक आहेतच पण स्त्रियांमधे हा मान फ़ॅनी ब्लॅंकर्सने १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्समधे मिळवला हे आजच्या पिढीला कदाचित ठाउक नसेल.( त्यानंतर अमेरिकेच्या मेरिअन जोन्सने तसा पराक्रम केला आहे पण उत्तेजीत पदार्थांच्या सेवनामुळे तिची पदके काढुन घेण्यात आली आहेत)
फ़ॅनी ब्लॅन्कर्सने आपली सुरुवात १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्समधे केली. हॉलंडच्या संघात असताना तिने रिलेमधे व उंच उडीमधे पाचवे स्थान मिळवले होते. पण त्या स्पर्धेत तीसुद्धा सर्व जगासारखीच जेसी ओवेन्सच्या चार सुवर्णपदक मिळवण्याच्या अलौकीक कामगीरीने भारावुन गेली होती. आपल्याला चार सोडा पण एकतरी सुवर्णपदक मिळाले असते तर आपण किती खुष झालो असतो असे तिला वाटत होते. तिने जेसी ओवेन्सची स्वाक्षरी मिळवली व एखाद्या अनमोल भेटीसारखी ती स्वाक्षरी जपुन ठेवली.
त्यानंतर दुसर्या महायुद्धामुळे पुढची २ ऑलिंपिक्स रद्द झाली. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्समधे फ़ॅनीने परत भाग घेतला. पण आता ती लग्न झालेली व २ मुलींची आई झाली होती. पण दरम्यानच्या १२ वर्षात तिने तिच्या नवर्याच्या मदतीने आपला सराव चिकाटीने चालुच ठेवला होता... तिचा सराव म्हणजे एक फ़ॅमीली अफ़ेअर असायचे.. मुलीबरोबर दोरीच्या उड्या मारणे,नवर्याबरोबर धावणे वगैरे...
१९४८ च्या ऑलिंपिक्समधे तिने चार स्पर्धेत भाग घेतला होता. १०० मिटर्स स्प्रिंट, ८० मिटर्स हर्डल्स, २०० मिटर्स व ४ बाय १०० मिटर्स रिले...
१०० मिटर्समधे तिने सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकुन सुवर्णपदक पटकावले. ८० मिटर्स हर्डल्स्मधे पण तिने त्याची पुनरावृत्ती केली. एव्हाना सगळ्या हिट्समधे,सेमीफ़ायनल्स व फ़ायनल्समधे धावुन तिची पुरी दमछाक झाली होती व ती नवर्याला म्हणाली आता माझ्यात त्राण उरले नाही.... पण नवरा म्हणाला... अग अशी चार सुवर्णपदके मिळवायची संधी तुझ्या आयुष्यात परत परत येणार नाही... जेसी ओवेन्सच्या पराक्रमाची बरोबरी करायची तुला हिच सुवर्णसंधी आहे. तुला २ सुवर्णपदके तर मिळालीच आहेत.... अजुन थोडी कळ काढ... त्या प्रोत्साहनाने स्फुर्ती घेउन ती चौथ्या दिवशी २०० मिटर्समधे फ़ायनल्सला पोहोचली. फ़ायनल्समधे तिला कडवी स्पर्धा होती इंग्लंडच्या क्राउड फ़ेव्हरेट महिलेची.... फ़ायनल खरच फोटोफिनिश झाली पण फ़ॅनीला माहीत होते की तिच फोटोफिनिशमधे जिंकली आहे.. पण लगेच अचानक God save the king हे इंग्लंडचे राष्ट्रगीत वाजायला सुरुवात झाली... ते ऐकुन फ़ॅनीला वाटले.. अरेरे! खरच इंग्लंडची आपली प्रतिस्पर्धी विजयी झाली व आपण सुवर्णपदकाला मुकलो... पण तिने जेव्हा स्कोरबोर्डकडे पाहीले तेव्हा त्यावर तिचे नाव पहिले म्हणुन झळकत होते.. ती क्षणभर गोंधळुन गेली.. पण तिच्या लक्षात आणुन दिले गेले की ती खरच सुवर्णपदक जिंकली आहे व ते राष्ट्रगीत वाजवले गेले कारण त्याक्षणीच King George the 6th स्टेडिअममधे पदार्पण करत होता म्हणुन ते राष्ट्रगीत....
पाचव्या दिवशी ४ बाय १०० मिटर्समधे ती हॉलंडसाठी ऍन्कर लेगमधे धावणार होती... पण हॉलंडच्या तिसर्या लेगमधल्या महिला ऍथलिटने फ़ॅनी ब्लॅंकर्सला जेव्हा बटान हातात दिले तेव्हा फ़ॅनी जवळजवळ १० मिटर्सनी... जी पहीली होती तिच्या मागे होती. पण पहिल्या ५० मिटर्समधे फ़ॅनीने तिला गाठले व नंतर तिला सहज मागे टाकुन हॉलंडला सुवर्णपदक मिळवुन दिले. अशा रितीने एकाच ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदके मिळवणारी एकमेव महिला ट्रॅक ऍंड फ़िल्ड्स ऍथलिट म्हणुन फ़ॅनीने आपले नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात अजरामर करुन ठेवले.
तळटिप... लंडन ऑलिंपिक्समधे फ़ॅनीने तिच्या दोन फ़ेव्हरेट शर्यतीत.. लांब उडी व उंच उडी... (ज्यात ती जिंकेल असे भाकीत होते...)त्यात भागच घेतला नाही ज्यात तिच्या नावावर रेकॉर्ड होता!...
मुकुंद , छान आहेत तुमचे सगळे
मुकुंद , छान आहेत तुमचे सगळे लेख. बरं झालं इथे आणताय ते.