धागा

Submitted by रोहितकुलकर्णी on 3 August, 2020 - 05:17

चरख्यामध्ये फिरत राहतो एकच तागा
आयुष्याचा विणत राहतो तुटका धागा

मी शब्दांना ओळींमध्ये बसवत होतो
स्वल्पविरामाने बिघडवली सगळी जागा

विचार घोड्यागत चरतो सगळ्या विषयांना
लीदेने बरबटली आहे मनात पागा

जहरी नव्हता दंश तुझा हा अजिबातही
सुळ्यात कसला साठा आहे बघ रे नागा

पक्षी, भुंगे, मधमाश्यांना कर्फ्यु लागला
सुन्या सुन्या आहेत फुलांच्या सगळ्या बागा

परब्रह्मधामी निजला तो सगुण भक्तीने
सदरेवरती मोकळी आहे त्याची जागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users