शब्दोत्सव

Submitted by pkarandikar50 on 2 August, 2020 - 02:40

शब्दोत्सव
तसे काही फुटकळ पुरस्कार माझ्याही
उनाड खात्यात अपसूक पडतात, पहातो.
यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
चर्चेत, माझंही नाव आहे, ऐकून होतो.

माझे प्रकाशक तर तयार होते कंबर कसून.
‘हे व्हायलाच हवं’ त्यांचा निश्चय पक्का.
‘पुढची पायरी, पद्मश्री. लिहून ठेवा, हवं तर.’
‘त्याने काय माझं लेखन आणखी सकस होणारे?’
'प्रश्न तो नाहीच्चे मुळी. जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या,
त्यांच्यावर नाटकं, मग पटकथा, उदंड खप...'
'पण नवीन लिखाणाचं काय? डोक्यात खूप आहे.'
'ते सगळं नंतर. आधी अध्यक्षपद,
आता माघार नाही. येतो मी.'

मला लिहायच्या होत्या, खूप सार्‍या कविता,
कधी कागदावर उमटल्याच नव्हत्या.

उजाड माळरानावर, कपाळाला हात लावून
वांझोट्या आभाळाकडे म्हादबा टक लावून
बसलेला, मला दिसला नव्हता, असं नाही.
मी लिहायला बसलो, कागद घेतला,
लेखणी टेकवली, पण . . .
अक्षरं मला वाकुल्या दाखवून
दुसर्‍याच कागदावर पसार झाली
त्यांना मी खेचू लगलो तशी,
गळफास लावून ती आढ्यालाच लटकली.

अवघं पाच-सहाशे मैलांचंच तर अंतर.
पायी तुडवत निघालेला सुखन,
त्याच्या मागे फरपटत लज्जो, गुड्डी आणि लालू.
उघड्या डोळ्यांनी मी पडद्यावर पहात होतोच ना?
शब्द गोळा झाले, अनावर दाटले, पण . . .
हातातून निसटले, दिसेनासे झाले.
रेल्वेच्या रूळांवर त्यांची फाटकी पायताणं झाली.
त्यांचे टप्पोरे डोळे माझ्यावर वटारलेले.
ओळींच्या चुकार चिमटीत नाहीच सापडले.

निरुपद्रवी लेखणीला मी टोपण लावलं.
अर्धवट मिटून ठेवलेलं पुस्तक, पुन्हा उघडलं.
संमेलनाच्या माजी अध्यक्षांची भाषणं.
वेळ आलीच तर काय उचलायचं,
त्यांवर खुणा करत राह्यलो.
मग टिपणं करायला घेतली.
अक्षरं, शब्द, वाक्यं, एका पाठी एक,
झरझर, सरसर, हसत, खेळत, नाचत आली.

-प्रभाकर (बापू) करंदीकर.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम !
प्रतिमांची ओघवती मांडणी फारच सुरेख व परिणामकारक !!

भेदक...