'स्पॅथोडिया'

Submitted by ज्येष्ठागौरी on 1 August, 2020 - 02:25

आमच्या ऑफिसच्या आवारात खूप झाडं आहेत.पिंपळ ,बहावा, जॅकरंडा पण मला आवडणारं एक विशेष झाड त्यात आहे ते म्हणजे स्पॅथोडियाचं.विशेष अशासाठी की ते आमच्या जिन्याला लागून आहे.आणि जिन्याच्या सज्ज्याला अगदी लागून.त्या सज्जात लोक जा ये करताना अगदी हाताला लागेल एवढ्या अंतरावर.ती जागा खूप खास आहे.तिथे"स्ट्रॉंग रेंज "येते म्हणून लोकं फोनवर बोलत असतात.खूप थंडीच्या दिवसात तिथं चहाचा कप घेऊन घटकाभर ऊन खातात. वळवाच्या पाऊस आला की तो पहिला पाऊस बघायला पाच मिनिटं येऊन जातात, सगळी याच एका चौकोनात. दुनिया दिसते तिथून.शिवाजीनगरची तुफान रहदारी,शेजारच्या शाळेत जाणारी मुलं. खाली लावलेल्या गाड्या, आजूबाजूची झाडं, पिंपळाच्या पानांची सळसळ, स्पॅथोडियापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या उंबरावरची वटवाघळे,क्वचित कधी जॅकरंडावर बसणारा रॉबिन किंवा वेडा राघू, भारद्वाज, पिंपळावर बसलेला ,न दिसणारा पण ऐकू येणारा कोकीळ. ह्याच्या समोर उभं राहून लोकं फोटो काढतात.या स्पॅथोडियाच्या खाली एक जनसेट आहे.त्याचा आणि वाहनांचा धूर आणि उष्णता खातो हा.तरी ताठ उभा आहे,काळाच्या थोड्या खुणा वागवत एखाद्या प्रौढपणा आनंदानी स्वीकारलेल्या व्यक्तीसारखा.
माझ्या मैत्रिणीचाही फार लाडका आहे हा स्पॅथोडिया. ती 'चल दोन घटका स्पॅथोडियापाशी' असं अगदी मनापासून , हटकून निदान महिन्यातून एकदा तरी म्हणतेच.मग मी आणि ती ,जेवणाच्या सुट्टीत, दोन प्रहरी किंवा लंचोत्तर स्पॅथोडियापाशी जातो.कधी एखादी कविता आठवते कधी सिनेमातल्या संवादाची आठवण, कधी विनोद ,कधी खूप हसू येतं असतं विनाकारण, कधी चेष्टा . पण बहुतेकवेळा ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर न बोलता येणारं काहीतरी जे असतं ते इथं बोललं जातं.हा स्पॅथोडिया अशा कित्येक चर्चांना साक्षीदार आहे."चल स्पॅथोडियापाशी"हा आमचा परवलीचा शब्द आहे.कोणाला काही विशेष share करायचं असेल तर इथं जायचं, तसंच काही विशेष नसेल पण आपल्या बोलण्यात कोणी फार लुडबूड करत असेल तरी स्पॅथोडियापाशी जायचं हा अलिखित करार आहे. 'स्पॅथोडियावर बसून झोके घे 'असं म्हणणं म्हणजे काहीतरी वैयक्तिक~ व्यक्तिगत चर्चा कर असा एक चहाटळ वाक्प्रचार आमच्या आमच्यात प्रसिद्ध आहे.
असा हा स्पॅथोडिया अगदी मूकपणे काय काय ऐकत असेल देवास ठाऊक. स्थितप्रज्ञपणे घरच्या तक्रारी, समस्या, दुःख, आनंद, गुपितं, कल्पना, सल्ले, सुचलेल्या कविता, जोडलेली मनं, दुभंगलेली स्वप्नं , गुणगुणलेली गाणी काय काय! पण तो आपला शांत उभा आहे कित्येक वर्षं.
मैत्री अशीच असते नाही का.वर्षानुवर्षं आपल्यावर माया करणारी ,मूकपणे तर कधी बोलकेपणाने ऐकून घेणारी.खरंतर प्रत्येकानं आपला सूळ स्वतः वहायचा असतो पण हे आपल्याला समजवायला एक मैत्र लागतं. या लढाईत मी तुझ्याबरोबर आहे हे सांगायला सख्य लागतं. माझ्या आयुष्यात नक्कीच माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे ,असणार खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या.वयाच्या तिसऱ्या वर्षी शिशुविहारपासूनअसेल किंवा आईबापू असतील ते शाळा, कॉलेज पर्यंत ,नाटकात आणि नंतर अर्थातच ऑफिसातआणि आयुष्याच्या वाटेवर, प्रत्येक टप्प्यावर किती मित्र मैत्रिणी भेटल्या.किती वेगळ्या स्वभावाची माणसं.ह्या सगळ्यांनी माझ्याभोवती आपल्या दोस्तीचं रिंगण केलं कायम. ह्या मैत्रिणीचं आणि आपलं का जमत असावं हे अनेकदा मला न सुटलेलं कोडं असतं.कोणाचं कोणाशी कसं(काय) जमेल हे शब्दातीत आहे. दहावीनंतर वाटा वेगळ्या झाल्या तरी शाळेतली मैत्री अगदी तशीच अबाधित राहिली आणि शाळेनंतर तशी मैत्री होत नाही ह्या भाकड कल्पना उडवून लावणारी खणखणीत मैत्री नंतरही झाली, टिकली आणि वाढतेय. जीवनाच्या साथीदारात, मुलांच्यात तर अगदी सहज,पण कधी रक्ताच्या नात्यात तर कधी जोडलेल्या नात्यात,कधी चार पायांच्या प्राण्यांत मैत्री कशी जडली नाही सांगता येणार.पण ती श्रीमंती मोजता नाही येणार.
मैत्रीचं नातं कमी जास्त करता येत नाही, त्याला परिमाणही नाही.ह्या हृदयीचं त्या हृदयी पोचायचे ते पोचतंच. वय ,शिक्षण,सांपत्तिक स्थिती, तुलना या सगळ्या पैल असणारी भावना म्हणजे निखळ मैत्री हे इतक्या सुंदरपणे विधात्याने समजावलं आहे मला.माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या मैत्रिणी उभ्या राहिल्यात.माझ्यावर विश्वास दाखवलाय,प्रसंगी खडसावलं आहे ,माझ्या निर्णयात होणारे भलेबुरे परिणाम माझ्याजवळ खंबीरपणे उभं राहून निरखत आल्यात,मी पडू नये याची काळजी घेत.माझ्या आनंदात त्यांना खरं हसताना पाहिलं आहे आणि माझ्या अश्रूंमध्ये त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचं प्रतिबिंब मला दिसलंय.थातूरमातूर नकारात्मक भावना ,ईर्षा ,स्पर्धा यांच्या परे असणारी एक किरण शलाका. शांताबाई शेळके यांनी म्हणल्यासारखी आपल्यापुरती खाजगी बरसात!मैत्री दिन एक असेल कदाचित पण निष्पाप मैत्रीचा एहसास हर दिन आहेच आहे.खूप दिवस न भेटूनही जेंव्हा भेट होते तेंव्हा मधलं अंतर नसतं, ती खरी मैत्री.ही मैत्री कोणाला जाहिरात करुन सांगावीशी वाटत नाही.
स्पॅथोडियाच्या फुलांसारखी ती ज्याला दिसायची,कळायची त्यालाच कळते.आणि तेच पुरेसं असतं.
रुद्रापलश, रगतूर किंवा आकाश शेवगा ह्या नावांनी स्पॅथोडिया ओळखला जातो.वर्षातून त्याला एकदा पूर्ण बहर येतो.त्याला लाल फार सुंदर फुलं येतात.आधी मोठ्या मोठ्या कळ्या येतात मग उमलून ,स्पर्शायला अतिशय मुलायम आणि मन उजळवून टाकेल असा लाल रंग असणारा स्पॅथोडियाची फुलं अगदी कायम लक्षात राहतात.मनातून खाली उतरत नाहीत आणि कशी उतरणार.तो मला कधीच अंतर देत नाही.माझ्या सगळ्या आनंदाच्या क्षणांना तो साक्षीदार असतो,माझ्या काळज्या तो चूपचाप निमूटपणे ऐकतो,कधी गदगदतो,कधी मी मूर्खपणानी वागलेलं स्थिरचित्तानं ऐकतो, माझ्या खट्याळपणाला हसून दाद देतो,माझी गुपितं ऐकतो,आणि मुख्य म्हणजे त्याची माझ्याकडून काही म्हणजे काही अपेक्षा नसते.कित्येकदा माझं त्याच्याकडे दिवसेंदिवस लक्ष जात नाही,तरीही त्याची तक्रार नसते.जेंव्हा मी त्याच्याकडे बघते आधारासाठी, काही सांगायसाठी, तो तिथेच असतो शांत उभा माझ्यासाठी .मनापासून माझं स्वागत करतो.अगदी तसाच भेटतो.
खूप पूर्वी सुचूनी मला फोटो फ्रेम दिली होती ,अजूनही आहे ती,त्यात लिहिलं आहे"Friendship is a relationship ,we all need to help us through our other relationships"किती खरं आहे.सगळं असतं पण सांगायला ,ऐकायला कोणीतरी आपलं लागतं.listening tree! स्पॅथोडियाशी उभं राहून आपली सुख दुःख वाटणाऱ्या मला किती भरभरुन मिळालं आहे ही गोष्ट आत आत झिरपते. स्पॅथोडियाचा बहर तसा थोडेच दिवस टिकतो म्हणजे खरंतर आपल्याला दिसतो! पण खरंतर आतून वर्षभर अगदी हिरवंगार झाड डवरलेलं असतं की.कोणाला दिसो अथवा नाही पण स्पॅथोडिया आतून कायम फुललेला असतो, अगदी मैत्रीसारखा ,उमललेला.
।।मैत्रीदिन शुभचिंतन।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलं आहे नेहमीप्रमाणेच!
गूगल करून पाहिलं. या झाडाचं आफ्रिकन ट्युलिप ट्री किंवा पिचकारीच्या फुलांचं झाड ही नावं माहिती होती Happy

छान लिहिलंय.. मनाला भिडेल असे..
आमच्या सोसायटी मध्ये आहे हे झाड.. झाडाखाली लाल .. अबोली रंगाचा flower bed तयार झालेला असतो.. त्यावरून चालताना निसर्ग आपल्याला रेड कार्पेट ट्रीटमेंट देतोय असे वाटते..