जागतिक व्याघ्र दिनानिमित्त - वाघीण (एका आईची गोष्ट)

Submitted by अरिष्टनेमि on 29 July, 2020 - 13:22

वाघीण – एक आई

२०१० सरत आलं होतं. थंडीचा जोर वाढू लागला. झाडांची पानगळ सुरु झाली. ताडोबातल्या तळ्यात विदेशी पाहुणे येऊन मुक्त संचार करु लागले. याच वेळी पांढरपवनीची गर्भार वाघीण दिवस भरत आले म्हणून अस्वस्थ होऊ लागली. माहितीतल्या सुरक्षित ठिकाणांना वारंवार भेटी देऊन पिल्लांसाठी सुरक्षित ठिकाण शोधू लागली. अखेरीस एक ठिकाण तिनं नक्की केलं. त्याच्या आसपासच दोनेक दिवस ती रेंगाळली. फार दूर गेली नाही. एके दिवशी कळा सुरु झाल्या आणि आडोसा शोधून तिनं चार बच्चांना जन्म दिला; तीन माद्या आणि एक नर. डोळे मिटलेल्या गुलाबी गोळ्यांना ती प्रेमानं चाटू लागली.

ताडोबा म्हणजे वाघ हमखास दिसणारं ठिकाण. म्हणजेच पर्यटकांची सतत वर्दळ. हे पर्यटक आणि त्यांच्या गाड्या पहात पहातच ही चार भावंडं; पी-१, पी-२, पी-३ आणि पी-४ वाढत होती. आपल्या लडिवाळ खेळांनी त्यांनी सा-या पर्यटकांना भुरळ घातली. घराण्याच्या जातिवंत राजेशाही रुबाबात चालणारी आई अन् पाठीमागं मस्ती करत चालणारी ही गोड पोरं.

पांढरपवनीच्या कुरणात हरणा-डुकरांना तोटा नाही. गवताच्या आडोशानं दबा धरुन वाघीण बसे. नेमकं सावज हेरुन त्याला पंजानी लोळवून नरडीचा घोट घेई. अशा वेळी ही चारी पिल्लं चूपचाप लपून बसून दुरुन आईचं शिकार कौशल्य निरखत. शिकार पडल्यावर हळूच आउंघ असा आवाज तिनं केला की गवतात, बांबूच्या रांझीत दडलेली ही चारी बहिण-भावंडं धावत येत आणि शिकारीवर तुटून पडत. मग उरलेली शिकार झुडपात लपवून माय-लेक थंडगार पाणी लपा-लपा पिऊन तळ्यात डुंबत. हे दृष्य मोठं मनोहारी असे. ताडोबात येणारे पर्यटक पांढरपवनी आणि ताडोबा तळ्याच्या परिसरात या चार गोंडस व्याघ्रबालकांच्या प्रतिक्षेत वेळ घालवू लागले.

याशिवाय ताडोबात इतरत्रही एव्हाना व्याघ्रदर्शन ब-यापैकी होऊ लागलं होतं. चहू अंगांनी अनुकूल परिस्थिती असल्यानं ताडोबा आणि परिसरात नवीन वाघ येऊन त्यांनी जम बसवला होता. ताडोबात वाघांची संख्या वाढू लागली होती.

या अशा बहु आनंदी वातावरणात आपले चार बच्चे घेऊन जगणा-या पांढरपवनी वाघीणीचा एक दिवस अचानक घात झाला. भल्या-भल्या जनावरांना एका झडपेत लोळवून पंजाची ताकद दाखवणा-या या शूर वाघिणीला २०१२ मध्ये ध्यानी मनी नसताना एकाएकी साप चावला आणि चार वेड्या वयातल्या बाळांना पोरकं करुन तिनं जगाचा कायमचा निरोप घेतला. आई गेली तेंव्हा ही पोरं जेमतेम शिकार शिकू लागली होती. जे काही आईनं जाण्यापूर्वी शिकवलं ते थोडंफार ज्ञान वापरुन चारही पोरं शिकार करु लागली आणि या आडदांड रानात जगली, वाढली, मोठी झाली.

वय वाढतं तशा उपजत जाणीवा बळ धरु लागतात हा निसर्गाचा नियमच आहे. ही वाघाची पोरं तरी त्याला अपवाद कशी ठरावीत? स्वत:चं राज्य असावं ही खुमखुमी त्यांच्यात येऊ लागली आणि लहानपणापासून दांडगट असणा-या पी-२ नं आईच्या राज्यावर आपला हक्क प्रस्थापित केलाच. मोठं सुंदर जंगल तिला मिळालं. कोणत्याही वाघाच्या राज्यात असावेत असे एक सोडून तीन बारमाही तलाव तिच्या राज्यात होते. धीटाईनं फिरणा-या या लहान बच्चाचं रुपांतर आता धाडसी वाघीणीत झालं आणि स्वतःच्या आईचा ‘तळ्याची राणी’ हा किताब पी-२ मोठ्या रुबाबात मिरवू लागली. जन्मापासून पर्यटन पहात आल्यामुळं तिला पर्यटक आणि त्यांच्या गाड्यांची भिती अशी कधी वाटलीच नाही. तिचं रोजचं हिंडणं-फिरणं, शिकार करणं, उन्हाच्या वेळेला सावलीतला आराम हे सगळं पर्यटकांच्या साक्षीनं बिनदिक्कत सुरु होतं. तिच्या या धाडसी वागण्यानं लवकरच ती पर्यटकांच्या गळ्यातला ताईत बनली. आतापावेतो तिचं नामकरण टी-१२ असं झालेलं होतं.

इकडं ताडोबातले वाघ वाढत होते. नवे-नवे वाघ दिसत होते. पण टी-१२ ची जादू ओसरली नाही. पाहता-पाहता ही अल्लड पोर वाढली होती, अंगापिंडानं मजबूत भरुन पांढरपवनीची अनभिषिक्त साम्राज्ञी झाली होती. पर्यटक तिच्यासाठी ताडोबात येतच राहीले. तीच ताडोबाचं पर्यटन चालवते असं लोक गमतीनं म्हणू लागले.

या पर्यटकांच्या लाडा-कौतुकातच २०१४ उजाडलं आणि एक दिवस ती वयात आली. वयात आल्यावर तिचंही काळीज जोडीदारासाठी झुरु लागलं. ती रात्रंदिवस रानात वाटा-आडवाटा फिरुन जोडीदार शोधू लागली. त्याला साद घालू लागली. रात्री- अपरात्री अवचित घुमणा-या नवख्या वाघाच्या डरकाळीला प्रतिसाद देऊ लागली. खाण्या-पिण्यावरची तिची वासना उडाली.

तिच्या स्वयंवराच्या शुभ मुहूर्तावर एक दिवस अचानक तिला तिचा राजकुमार भेटला. तो होता राकट टी-३७. दोघं जंगलात मजेनं फिरु लागली, जोडीनं शिकार करु लागली. घासात घास वाटून घेऊ लागली. एकाच जांभळीखाली तळ्याच्या काठाला लाडानं अंगाला अंग घासत बसू लागली. त्यांचा मधुचंद्र लवकरच संपला आणि निसर्गानं सोपवलेली जबाबदारी पार पाडून टी-३७ जसा आला तसाच परत त्याच्या राज्यात एक दिवस एकाएकी निघून गेला.

टी-१२ पुन्हा एकटी झाली. पण तिचं एकटेपण तिला बोचत नव्हतं. ती आता दोन जीवांची होती. तिचं अस्वस्थपणे फिरणं बंद झालं होतं. ती आता पुन्हा शांत झाली होती. तीन एक महिने उलटले आणि टी-१२ परत अस्वस्थ झाली. ती फिरुन-फिरुन चांगला आडोसा शोधत होती. ती गर्भार होती. पण पहिलटकरीण होती. पिल्लं वाढवायचा अनुभव नव्हता. बरासा आडोसा बघून तिनं अखेरीस पिल्लांना जन्म दिला. एखादा महिना झाला असेल नसेल, तिनं चक्क दिवसाढवळ्या पर्यटकांसमोरुन इवलीशी गोजिरी पिल्लं उचलून दुसरीकडं नेली. पर्यटकांसाठी हा एक अतिशय दुर्मिळ योग होता. पहाडासारख्या धिप्पाड गव्याचं नरडं काडकन फोडणारे हे उग्र सुळे, कापसासारख्या पिल्लांना मात्र बिलकूल लागत नव्हते. तिनं मोठ्या हळूवारपणानं पिल्लं दुसरीकडं हलवली.

पण या साज-या संसाराला नजर लागली आणि या पिल्लांचे प्राणहीन देहच वनविभागाच्या गस्ती पथकाला पुढच्या आठवड्यात सापडले. हे कृत्य मुंगसाचं असावं असा काहींचा तर्क होता, तर काही पर्यटकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्या भागात रानकुत्रे त्या सुमारालाच पाहिले होते. म्हणजे हे काम त्यांचंच. असो. कोणी का असेना, पण टी-१२ च्या दृष्टीनं हा जंगलचा कायदा होता. सगळं संपलं होतं. टी-१२ वर याचा चांगलाच आघात झाला. पर्यटकांसमोर मोठ्या हिमतीनं वावरणारी टी-१२ आता लपून राहू लागली. पुढचे कित्येक महिने तिचं दर्शन दुर्मिळ झालं.

याच सुमाराला त्या पिल्लांचा बाप, टी-३७ च्या राज्यात घुसून दुसरे वाघ ललकारु लागले होते. लढाईला आव्हान देऊ लागले होते. एक असाच नव्या रक्ताचा मजबूत हाडापेराचा वाघ पांढरपवनीच्या उत्तरेला, नवेगावला पक्का तळ ठोकून होता. या वाघांची दहशत टी-१२ ला होतीच. चहू दिशांनी वाघांच्या आक्रमणामुळं टी-१२ ला अस्तित्वासाठी पूर्ण कौशल्य पणाला लावावं लागलं. तिच्या बालपणी हे असं नव्हतं. वाघ थोडे होते, राज्यासाठी इतक्या मारामा-या नव्हत्या. आता वाघ वाढले, जंगल तेवढंच राहीलं. अतित्वाची लढाई अतिशय कठीण होऊन बसली.

तरी दिवस बरे चालले होते. सारं आबादीआबाद म्हणावं असंच होतं.

एकदा कुरणात दबा धरुन टी-३७ नं पाण्यावर जाणारं सांबर पाडलं. ओढून बांबूच्या रांझीत नेलं आणि मऊ लुसलुशीत मांस तोडून खाऊ लागला. पोट भरल्यावर जरा चार पावलावर दाट सावलीत आराम केला. उठून मग पाण्यात बसला. सूर्य कलला उन्हं हलकी झाली. आता गस्तीची वेळ झाली होती. चारी पाय ताणून उग्र सुळे विचकून त्यानं एक मोठा आळस दिला. कान झटकून उत्तरेला पाहिलं आणि चालू लागला.

पुढं धुळवाटेच्या काठच्या ऐनावर त्याला वेगळासा वास आला. त्यानं नाकाड उंचावून तो वास पुन्हा पुन्हा घेतला. चिडून तो उभा राहिला आणि साताठ फुट उंचीवरची ऐनाडीची साल मजबूत नखांनी ओरखडली. यावेळी त्यानं घशातल्या घशात केलेला मंद गुरगुराट झाडावरच्या कलकल करणा-या सातभाईंनी स्पष्टच ऐकला. टी-३७ ला दाट संशय होता की त्याच्या राज्यात घुसखोरी झाली आहे. चौफेर नजर टाकत तो धुळवाटेनं घटकाभर चालून गेला अन् त्याची शंका खरी ठरली.

नवेगावचा नर संधीच्याच शोधात होता. त्यानं राज्याच्या हद्दीची तपासणी करणा-या टी-३७ ला या वळणावर अवचित गाठलं. हृदयाचं पाणी होईल असं गर्जून दोघंही एकमेकांवर तुटून पडले. अटीतटीची लढाई झाली. दोघंही कसलेले अनुभवी योद्ध्ये. माघार कोणी घेईना. दोन्ही पायांवर उभे राहून आपल्या मजबूत पंजांनी एकमेकांवर ते वार करीत होते. मजबूत दातांनी एका-दुस-याचा गळा ते फोडू पहात होते. घोर गर्जनांनी रानातली जनावरं घाबरुन पळू लागली. लढाईची हद्द झाली. पायाखाली रान रौंदळून गेलं, झाडा-झुडूपाची खोडं मोडून जमीनीला लागती झाली. रक्ताच्या धारा लागल्या. अखेरीस नवेगावच्या नरानं आक्रमक डाव साधून टी-३७ ला वर्मी घाव घातला. अनुभवावर चापल्याचा विजय झाला. भयंकर जखमी झालेला टी-३७ स्वतःचा जीव कसाबसा वाचवून तिथून पळाला. त्याचा पाठलाग करण्याची ताकद तशीही नवेगावच्या नरात उरली नव्हती. आपला प्रतिस्पर्धी मैदान सोडून नजरेआड होऊस्तोवर तो पहात राहीला आणि तो नजरेआड झाल्याबरोबर खाली बसून स्वत:च्या जखमा चाटून स्वच्छ करु लागला.

एकेकाळी एकहाती सत्ता गाजवलेला टी-३७ आता जीव वाचवण्याच्या धडपडीत होता. तो रात्रं-दिवस इतर वाघांपासून दूर, सुरक्षित ठिकाणी ताडोबा तळ्यातल्या एका बेटावर दडून राहीला. त्याचा दिनक्रमच पूर्ण बदलला होता. वाटेल त्या रानात बळजोरीनं घुसून शिकार करणारा हा बलशाली वाघ नंतर रानाच्या बाहेरच्या बाजूने फिरु लागला. गावाच्या बाजूनं पाळीव जनावरं चराईला येत. त्यांच्या मागं हा राहू लागला. लपून, दबा धरुन टप्प्यात आलेलं एखादं दुबळं जनावर, एखादं नवखं पिल्लू पाहून हा शिकार साधू लागला. यात जंगली जनावर मारण्याइतके कष्ट नव्हते. शिकार नक्की आणि थोडक्यात साधत होती. इतर वाघ सूर्य उतरणीला लागला की निवारा सोडून फिरतीला निघत आणि उन्हं तापायच्या आत पुन्हा सावलीला बसून आराम करीत. ते डुलक्या घेऊ लागले की सकाळी १०च्या पुढं टी-३७ बाहेर पडून दुपारी चार वाजेस्तोवर परत आडोसा जवळ करी. इतर वाघांना अंगावर घेऊन लढायची आता त्याची तयारी नव्हती. त्यामुळं तो बाकी वाघांच्या फिरतीची वेळच हुशारीनं टाळत होता.

हळू-हळू जखमा भरु लागल्या. स्नायू मजबूत होऊ लागले, फडफडू लागले. रक्त उसळ्या मारु लागलं. एक दिवस स्वतःची ताकद पुन्हा आल्याची खात्री पटली आणि २०१५ मध्ये टी-३७ पुन्हा त्याच्या रानात आला.

इकडं नवेगावच्या नव्या वाघानं त्याचं राज्य तर काबीज केलंच होतं पण टी-१२ ला स्वतःच्या जनान्यात दाखल केलं होतं. एव्हाना परतलेल्या टी-३७ नं पुन्हा त्याला ललकारलं. पु-या ताकदीनिशी तो मैदानात उतरला आणि पराभवाचा वचपा काढला. जोरदार धुमश्चक्रीत प्रतिस्पर्ध्याला पळवून लावून टी-३७ नं स्वतःच्या राज्यावर पुन्हा ताबा मिळवला. राज्यासोबतच त्याची टी-१२ त्याला परत मिळाली.

तिकडं नवेगावचा वाघ पुन्हा नवेगावच्या जंगलात स्थाईक झाला. पण तरीही तोसुद्धा टी-३७ च्या अनुपस्थितीत टी-१२ वर हक्क दाखवत होताच.
त्यामुळं आता टी-१२ ला झालेले बच्चेसुद्धा या दोघांपैकी नक्की कोणाचे होते हा प्रश्नच होता. कोणत्याही क्षणी ते दोघांपैकी एका नराचे बळी ठरु शकत होते. स्वतःची पिल्लं जगवायची असतील तर कोणत्याच नर वाघाला दुखावून चालणार नव्हतं. दोन क्विंटलच्या नराशी झुंजून ती जिंकू शकत नव्हती. कोणाही एका नराला मीलन करायला नकार देण्याचे परिणाम तिला ठाऊक होते. बच्चेवाली वाघीण नराला लगट करु देत नाही म्हणून स्वतःचे नसणारे बच्चे सापडले तर नर वाघ त्यांना मारुन टाकतात. म्हणजे ती वाघीण पुन्हा मीलनाला आणि प्रजोत्पादनाला तयार होते. बच्चांचा असा मृत्यू टाळण्यासाठी अखेरीस टी-१२ मधल्या मादीवर आईनं मात केली. तिनं दोघांनाही मीलनाला नकार दिला नाही. पिल्लांच्या बचावासाठी तिनं शोधलेला हा कदाचित एकमेव उपाय होता.

टी-१२ चे बच्चे स्वतःचे आहेत असं समजून टी-३७ कायम त्यांचं रक्षण करीत आला आणि नवेगावचा वाघ अनेकदा टी-१२ च्या राज्यात घुसला, पण बच्चे स्वतःचे आहेत असं समजून तोही कधी त्यांच्यावर धावला नाही. ही लढाई डोक्यानं खेळून टी-१२ नं तिची तिन्ही पिल्लं वाचवली. पुन्हा पांढरपवनीत टी-१२ आणि तिच्या ३ बच्च्यांची मस्ती पर्यटकांना आकर्षित करु लागली. या वेळेपर्यंत टी-१२ चा प्रवास जगात सर्वात जास्त फोटो काढलेल्या वाघीणीच्या किताबाच्या दिशेनं सुरु झाला होता. चहू बाजूंनी दांडग्या वाघांची आक्रमणं झेलून, पर्यटनाच्या धबडग्यात, अंतरीचं बालपण जपूनसुद्धा तिनं तिची पिल्लं जगवली आणि वाढवली.

तिची तिन्ही पिल्लं, आता आईपासून स्वतंत्र होण्याच्या टप्प्यावर होती. यावेळी पुन्हा एकदा या कुटूंबावर आघात झाला. एक नवीन घुसघोर वाघ, टी-४९ हा जामनीच्या कुरणात फिरत होता. अधून-मधून तो ताडोबा तळ्याकडं टी-३७ च्या राज्यात घुसण्याची आगळीकही करत होता. तो एकदा काटेझरीकडं रानात फिरत असताना टी-१२ ची पिल्लं त्याच्या नजरेला पडली आणि तो त्यांच्यावर धावला. तीनपैकी दोघी बहिणी घाबरुन काळ्या आंब्याच्या रानात पळाल्या, तर त्यांचा भाऊ आईसोबत ताडोबा तळ्याकडे धावला. इथं त्यांची ताटातूट झाली. दुर्दैवानं काळ्या आंब्याच्या रानात गायब झालेल्या त्या दोघी न कळत्या वयाच्या बहीणी परत कोणालाच दिसल्या नाहीत. जंगल त्यांना खाऊन बसलं. पुढं काही महिने अधून मधून कोणी ना कोणी सांगे की ‘मला अमूक भागात आज दोन वाघ दिसले.’ अशा बातम्या येत राहील्या आणि त्या दोघी कधी तरी परत दिसतील या आशेची दोरी बळकट करीत राहील्या.

इकडं टी-१२ बरोबर राहिलेलं नर पिल्लू दोनेक महिनं आईबरोबर दिसलं आणि त्यानंतर तेही दिसेनासं झालं. ही तीन पिल्लं पुढं ताडोबाच्या जंगलाबाहेर जाऊन स्थिरस्थावर झाली की आधीच्या पिल्लांप्रमाणेच एखाद्या वाघाने त्यांचा बळी घेतला याचा पत्ता कधी लागलाच नाही. या तिघांचं पुढं काय झालं हे गूढ आजही या घनदाट रानाच्या पोटात कायम आहे.

पिल्लं वाढवण्याचे टी-१२ चे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. तिला आणि तिच्या पिल्लांनासुद्धा लहानपणापासून पाहणा-या प्रत्येकाचं हृदय हळहळलं. एव्हाना टी-३७ आणी टी-४९ एक-दोनदा आमनेसामने येऊन गेले होते. टी-३७ नं स्वतःची ताकद जोखली होती. नव्यानं आलेल्या मजबूत हाडाच्या जवान टी-४९ शी लढण्यात काही हशील नाही हे त्यानं ओळखलं आणि हळूच एके दिवशी टी-४९ च्या हवाली आपलं राज्य करुन टी-३७ बाजूला झाला. तो गेला थेट काटेझरी आणि नवेगावकडे. इथं त्याच्या आधी नव्यानंच आलेल्या दोन्ही अननुभवी पोरांना त्यानं लढाईत लोळवलं आणि त्यांना पळवून लावून स्वतः तिथं राज्य स्थापन केलं.

इकडं टी-३७ ला हरवून टी-४९ ला हे अनपेक्षित यश मिळालं. इथं टी-१२ बरोबरच जामनीतली टी-७ सुद्धा त्याच्यावर भाळली. दोन्ही वाघिणींबरोबर टी-४९ च्या सुखाच्या संसाराची घडी बसली आणि ताडोबात एक नवा अध्याय सुरु झाला.

२०१६ मध्ये टी-७ ला टी-४९ पासून दोन बच्चे झाले. दोन्ही नर होते. तर २०१७ मध्ये टी-१२ ला टी-४९ पासून २ बच्चे झाले; एक नर, एक मादी. टी-१२ च्या याही दोन पिल्लांमध्ये पांढरपवनीच्या पाण्याचा गुण आला होता; खोडकरपणा. टी-४९ तसा जरी उग्र आणि अक्राळ विक्राळ होता, तरी त्यानं आपल्या पोरांचे खूप लाड केले आणि त्यांना भरपूर जीव लावला. दिवसातला खूप वेळ तो आपल्या पोरांशी खेळण्यात घालवत होता.
दोघंही बहीण-भाऊ मस्ती करत, खेळत मोठे होत होते.

_MG_3436.jpg

टी-१२ ला तीन पोटं भरायची होती. चितळ-डुक्कर एकेका दिवसात सरत होतं. मोठं सांबर पाडलं तर दोनेक दिवस चाले. गवा मिळाला तर मग एका शिकारीवर आठ दिवस निघून जात. पण गवा मारणं म्हणजे ऐ-यागै-याचं काम नव्हे. ८-१० क्विंटलचं साडेपाच-सहा फुटी धुड ते. पण खाती तोंडं वाढलेली. पोरांची पोटं भरायची तर हा धोका पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. कधी कधी संधी पाहून कळपातून बाजूला पडलेला गवा पाहून टी-१२ त्यालाही ओढत होती. पोरं हे पहात. जनावर पडलं की आईच्या मदतीला धावत. ती आता उणीपुरी दीड वर्षांची झाली होती. तीक्ष्ण सुळ्यांनी हरणाचा गळा घोटायचं कौशल्य त्यांना ब-यापैकी जमलं होतं.

पोरं स्वतः शिकारीचे प्रयत्न करत होती आणि साधतही होती. दोघंही एकेकटे म्हणा किंवा जोडीनं म्हणा, आईशिवाय जवळपासचं जंगल फिरु लागले होते. अशातच ऑक्टोबर २०१९ मध्ये टी-१२च्या पोरीचा गव्याशी सामना झाला. आईचा, आजीचा धीटाईचा गुण त्यातल्या त्यात भावापेक्षा बहीणीत जास्त उतरला होता. तिनं याआधी गव्याच्या शिकारीत आईला साथ दिली होती. या अनुभवाच्या जोरावर दबा धरुन तिनं बेसावध आलेल्या गव्यावर झेप टाकली. गव्याच्या पुष्ट मांडीवर नखं रोवून त्याला खाली पाडून नरडीचा घोट घ्यायचा ती प्रयत्न करत होती. पण अजून गव्याच्या शिकारीला जी ताकद आणि जे कौशल्य हवं ते तिच्याकडं नव्हतं. ती तितकी अनुभवी शिकारी नव्हती. डाव फिरला आणि गव्यानं तिला फेकून दिलं. त्याची सरशी झाली. ती उठून सावरेस्तोवर गवा धावला अन् तिला मातीत घोळसलं. आपल्या मजबूत, तीक्ष्ण शिंगांनी तिला पोटात, कुशीत, पाठीवर भोसकल्यानं ती जबर जखमी झाली. तशाही स्थितीत मोठ्या चापल्यानं तीनं उसळी मारली अन् गव्याला गुंगारा दिला. गवा फुसांडत धावला पण वाघीण नजरेआड गेलेली. दोन मिनीट त्या दिशेला नाक फेंदारून तो वास घेत राहिला अन् मग परत फिरला.

ती रस्त्यावर आली आणि गस्तीवरच्या वनाधिका-यांच्या नजरेला पडली. सुरक्षेसाठी त्यांनी तिच्यावर नजर ठेवली. पण ती रात्रीच्या अंधारात, जिथं माणूस सहजा-सहजी जाऊ शकणार नाही अशा घनदाट झुडूपांच्या जाळीत घुसली. तिला तिची मरणवेळ जणू कळाली. त्या झुडूपातच डाव्या कुशीवर पडून रात्रीच केंव्हातरी तिनं प्राण सोडले. दुस-या दिवशी तिचा निष्प्राण देहच हाती लागला.

काळानं पुन्हा डाव साधला. टी-१२ साठी पांढरपवनी जणू शापित भूमी ठरली. तरी तिच्या पोटी आलेल्या आधीच्या दोन्ही वेळच्या पिल्लांपेक्षा ही पिल्लं जास्त जगली. टी-१२ चा दुसरा नर बच्चा मात्र व्यवहारी होता. काटेकोर काळजीनं तो राहिला. त्यानं अनुभवलं की एकट्याच्या जीवावर राज्य चालवावं अशी परिस्थिती ताडोबात नाही. आपल्याला जिवंत राहायचं असेल तर नवीन, कमी स्पर्धा असणारं ठिकाण शोधायला हवं. एका संध्याकाळी तो चालत निघाला. रान संपलं तरी चालणं थांबलं नाही. रस्ते, शेतं, नाले ओलांडून तो चालतच राहिला. दिवस उजाडताना त्यानं एका मोठ्या नाल्याच्या काठच्या दाट झाडो-याचा आसरा घेतला. जसा दिवस मावळला तसा तो पुन्हा यात्रेला निघाला. नाल्यांतून लपत-छपत मिळेल ते खाऊन गुजराण करत एके दिवशी त्याला नवं रान दिसलं. इथं स्पर्धा नव्हती. चितळं-सांबरं मुबलक. त्याचा जीव तिथं रमला. तो तिथंच स्थायिक झाला. ते रान होतं उमरेड - क-हांडल्याचं.

टी-४९ च्या राज्यात एका बाजूला नियतीचा हा खेळ सुरु असताना, दुस-या बाजूला टी-७ चे दोन्ही नर बच्चे यशस्वीपणे मोठे झाले हा चमत्कारच. या दोन्ही बच्चांनी जिवंत राहण्याचा एक मार्ग शोधला होता. ते नेहमी एकत्र रहात. त्यांचा बापही त्यांच्याबरोबर असे. अंगा-पिंडानं मजबूत दोन्ही भाऊ आणि अनुभवी बाप असे शेजारी-शेजारी उभे राहिल्यावर त्यांच्याशी झुंज द्यायची कोणत्याही वाघाची काय बिशाद! बहुधा त्यांच्या या स्वभावामुळंच त्या परिसरात घुसून टी-१२ च्या बच्चांवर हल्ला करण्याची हिंमत कोणत्याच वाघानं केली नाही. त्यांच्यात आपापसात किरकोळ भांडणं-तंडणं होत, ती फार गंभीर कधीच नव्हती. त्यामुळंच टी-७ बरोबरच टी-१२ चे बच्चेसुद्धा सुरक्षित राहीले आणि टी-४९ नं अनेक वर्षे पांढरपवनी-जामणीवर राज्य केलं.

सध्याच्या परिस्थितीत ताडोबात वाघांची प्रति चौरस कि.मी. घनता जास्त आहे. जन्माला येणा-या अनेक बच्चांपैकी प्रत्येक सुमारे वर्षी २०-२५ बच्चे प्रौढत्वापर्यंत पोहोचतात. जवळजवळ १३०० चौरस कि.मी.चं अखंड जंगल असल्यानं पांढरपवनीसारख्या उत्तम अधिवासात चहू दिशांनी नवीन वाघ येत राहतात. क्षेत्रावरुन आपापसात जीवघेण्या लढाया होत राहतात, एकमेकांची पिल्लं मारुन टाकली जातात. जो बलवान असेल तोच राज्य करतो, अन्य वाघांना हा राजमुकूट शिरोधार्य नाही. पण यामुळंच जंगलात वाघांच्या संख्येवर नियंत्रण राहतं. कुठल्या जंगलात कोणत्या आणि किती वाघांनी रहावं यासाठी अंगिकारलेलं हे या जीवसृष्टीचं एक कटू वास्तव आहे. जिथं वाघांची घनता जास्त असते, तिथं बच्चे मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण जास्त असतं हे सत्य आहे. टी-१२ ची ही कथा भलेही रडवेली आणि हृदयद्रावक असेल, पण वाघांच्या जगात काय चालतं हे यातून लख्ख दिसून येतं. याच ज्ञानाचा व्याघ्र संवर्धनासाठी उपयोग होतो. यातून व्याघ्र व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्नही उभे राहतात आणि पर्यटक, अभ्यासक, प्रसार माध्यमे यातून तेच जुने वाद पुन्हा झडू लागतात; आपली प्राथमिकता काय?- एक लाडका, प्रसिद्ध वाघ की पूर्ण व्याघ्र प्रजाति?

T-12.jpg

टी-१२ पुरतं म्हटलं तर ती आजही पांढरपवनीवर राज्य करतेच आहे. चौथ्यांदा ती पुन्हा गर्भार असल्याचे संकेत होते. आता तिनं बच्चेही दिलेत. कोळशावरुन आलेला एक नवीन वाघही तिच्या साम्राज्यात दिसू लागला आहे. जंगलातलं आयुष्य असंच चालत राहील, या जंगलराजमध्ये टी-१२ पुन्हा नव्या उमेदीनं पिल्लांना वाढवील, त्याच हिमतीनं त्यांचं रक्षण करील हेही नक्की. ती, तिचा जोडीदार, पिल्लं आणि घुसघोरी करणारे वाघ हे चक्र असंच चालू राहील. आता ती यावेळी काय क्लृप्ती वापरते? तिची पिल्लं जगतील का? मोठी होतील का? या हातघाईच्या लढाईत टिकून राहून आपलं राज्य स्थापित करतील का? याचं उत्तर येणारा काळच देईल.

माहितीचा स्त्रोत - भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती. हे इतके सारे माहीत नव्हते.

पण वाघ जगावा, टिकावा व वाढावा म्हणून प्रयत्न करताना आधी त्याचा अधिवास जगावा, टिकावा व वाढवा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे याची जाणीव हे लिखाण वाचताना सतत होत राहिली. नव्या वाघांना राहायला जंगले हवीत.

वाह्! किती सुंदर लिहिलंय! 'सत्तांतर' ची आठवण झाली.

मागे एक ऑनलाइन लेक्चर ऐकलं होतं. संशोधिकेचं नाव लक्षात नाही. पण त्यांचा मुद्दा असा होता की नुसती वाघांची संख्या वाढणं उपयोगाचं नाही. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी वाघांना सुरक्षित मार्ग (कॉरिडॉर्स) असले पाहिजेत, ते जोपासले गेले पाहिजेत. नाही तर एखाद्या जंगलात वाघांची संख्या वाढली की जास्तीचे वाघ जाणार कुठे आणि कसे?

मला वाटतं श्री. किरण पुरंदऱ्यांनी 'सखा नागझिरा' पुस्तकात असं लिहिलंय की दुर्दैवाने नागझिऱ्यात वाघ जन्माला तर भरपूर येतात, पण ते तिथून बाहेर पडले की त्यांचा काही थांगपत्ता लागत नाही Sad

अतिशय इंटरेस्टिंग माहिती. पुन्हा पुन्हा वाचावा असा झाला आहे लेख. मला पण सत्तांतरची आठवण झाली.
अभ्यासू लेख आहे, पण उत्कृष्ट लेखनशैलीमुळे वाचनीय झाला आहे. नाही तर नुसतेच आकडे आणि डिटेल्स वाचून मी तरी कंटाळुन गेले असते.

वावे, मला वाचताना सेफ कॅरिडॉर्सबद्दल अंधुक विचार आला होता, तू मात्र तो सुस्पष्ट मांडलास.

सुरेख समयोचित लेख! वाघ जंगलातील apex predators पैकी मुख्य प्राणी आहे. त्यामुळे वाघांची संख्या ही त्या जंगलाची परिसंस्था सुदृढ असल्याचे द्योतक आहे.
सेफ कॉरिडॉरच्या मुद्द्यासाठी वावे यांना +१११

आवडलं

ईंटरेस्टिंग.
टी १ कोण असेल उगीच उत्सुकता वाटली.
बघतो हुडकून

आवडला लेख. इतर प्राण्यांच्या आपापल्या प्रदेशात वर्चस्वासाठी होणाऱ्या झुंजींविषयी वाचले होते बरेचदा. वाघांविषयी ही माहिती पाहिल्यांदाच मिळाली! मला वाटायचे की वाघ हा प्राणी तुलनेत संख्येने कमी आणि अधिक संरक्षित असल्यामुळे त्यांच्यात वर्चस्वासाठीची चुरस दुर्मिळ असेल.

या आठवड्यात पहिल्या सफारीत T12चे दर्शन घडले, बच्चे आत होते. ती पाण्यावर आली होती. पलीकडच्या काठावर आमच्यासारखे अनेक दर्शनोत्सुक डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते आणि अनेक जण
छोट्या तोफेएव्हढे कॅमेरे सरसावून तिची झलक टीपण्यासाठी सज्ज होते. ती जवळपास तासभर इथें तिथे फिरून इथे स्थिरावली होती. तिच्यामागे आम्हीही. ती बाहेर आली आणि कुजबुज सुरू झाली. मागच्या बसमधली अतिउत्साही महिला अक्षरशः किंचाळली- मला दिसली, मला दिसली.
त्याच क्षणी T12 माघारी वळली आणि झाडीत दिसेनाशी झालीPSX_20210221_125137.jpg

सुरेख लेख. फोटो.थोडे अजून हवे होते. आणि फोटो खाली तो कुणाचा आहे ते लिहिलं असतं तर बरं झालं असतं.
<<टी ४९ च्या राज्यात....या पॅरात टी १२ च्या बच्च्यांचा उल्लेख कसा?>> उमा_ +१

वाह अप्रतिम लेख. मी १२ सफारी केल्यात २ वर्षात पण अजूनही T -१२ ने हुलकावणी दिली आहे :(. बघू कधी नशीब आहे ते.

तुमचे लेख येत नाहीये खूप दिवस झाले परत लिहायला सुरुवात करा एकडे हि विनंती

माफ करा, या माझ्या लेखाकडं मी वर्षभर पाहिलंच नाही. त्यामुळं आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादांबद्दल आभार मानू शकलो नाही. आपले असे अभिप्राय आले की लिहायची अजून स्फूर्ती येते. धन्यवाद.

टी ४९ च्या राज्यात....या पॅरात टी १२ च्या बच्च्यांचा उल्लेख कसा? असा एक प्रश्न दिसला. त्याचं असं आहे की टी-४९ आणि त्याला टी-७ पासून झालेले दोन बच्चे. हे तिघं बलदंड होते. टी-१२ च्या आजूबाजूच्या क्षेत्रात ते फिरत. त्यामुळं तिथं नवीन वाघ आला तर हे त्रिकूट त्याला भारी पडे आणि पळवून लावी. त्यामुळं त्या क्षेत्रात नवीन वाघ येऊ शकला नाही आणि तिकडं घुसून टी-१२ च्या बच्चांपर्यंत पोहोचू शकला नाही.

अर्थात पुढं टी-७ च्या एक बच्चाचा माणसानं बळी घेतला. दुसरा दिसतो फिरताना. भलता मोठा आणि सामर्थ्यवान झाला आहे.

दरम्यान टी-१२ ची चौथी पिढीपण पहायला मिळाली. Happy Happy Happy

t-12.jpg

Pages