भाकरीचे भन्नाट कॅरमल पुडींग

Submitted by म्हाळसा on 29 July, 2020 - 00:32

भाकरीचे भन्नाट कॅरमल पुडींग -

लागणारा वेळ - दिड तास

लागणारे साहित्य -
दूध - ३ कप
ज्वारीची भाकरी - २-३
साखर - दिड वाटी
कॅरमल साठीची साखर - १ वाटी
अंडी - ४
वॅनिला इसेन्स

नाव ऐकून उत्सुकता वाढेल पण खायची हिम्मत होणार नाही अशी ही रेसिपि वाटत असली तरी माझ्या फार आवडीची.. आणि असायलाच हवी कारण ही रेसिपि मी माझ्या पहिल्या बाॅयफ्रेंडच्या आईकडून शिकले होते..
तो ख्रिस्ती धर्माचा होता त्यामुळे त्याच्या डब्यात वरचेवर बेक केलेले पदार्थ यायचे..एकदा त्याने डब्यात हे भन्नाट पुडींग आणलं होतं.. सगळ्यांनी अगदी मिटक्या मारत मारत संपवलेलं आठवतंय.. ह्यावर विचारल्यावर कळालं कि ते ज्वारीच्या भाकरीचे ग्लुटन फ्री पुडींग आहे .. सगळेच क्षणभर आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले..
म्हणजे फ्राॅक घातलेली त्याची आई किचन मधे उभी राहून भाकऱ्या थापते ही कल्पनाच वेड लावणारी होती .. मी त्याला म्हटलं “तुझ्या आईला सांगशील का ही रेसिपि लिहून द्यायला “..त्यावर तो म्हणाला “आई सहसा रेसिपिज् शेअर करत नाही .. तुला हवं असेल तर घरी येऊन प्रत्यक्ष तीच्याकडून शिकून घे” .. ह्याला म्हणतात नेकी और पूछ पूछ... मी माझ्या हातचे कांदेपोहे त्यांना खाऊ घालेन तेव्हा घालेन पण त्याच्या घरी जायची संधी आणि त्याच्या आईच्या हातचे पुडींग, ह्या दोन्ही गोष्टी सोडायच्या नव्हत्या.. मी लगेचच होकार दिला आणि त्याच आठवड्याच्या रविवारी सकाळी त्याच्या दारात प्रकट झाले.. मी विचार केल्याप्रमाणेच त्याच्या आईने एक छानसा फ्राॅक परिधान केला होता.. घरी जातात त्याची आई मला किचनकडे घेऊन गेली.. भाकरी थापायची सगळी तयारी करून ठेवली होती .. त्याचे बाबा कुठलीही कुरकूर न करता एका बाजूला भांडी घासत आणि मस्त खुसखुशीत जोक्स मारत उभे होते..आपले भविष्य असं असणार ह्या विचाराने माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या .. एकंदरीत वातावरण अगदी कुल होते.. त्याच्या आईने लगेचच भाकऱ्या थापायला घेतल्या.. ह्यापूर्वी मी माझ्या सहावारीतल्या आईला आणि नऊवारीतल्या आज्जीलाच भाकऱ्या थापताना पाहिले होते.. पण हे असं फ्राॅकमधे भाकरी थापत बघताना मला त्यांच फार कौतुक वाटलं.. गरमागरम भाकऱ्या त्यांनी हाॅटपाॅट मधे ठेवत त्या मऊ राहण्यासाठी झाकून ठेवल्या.. त्यानंतर म्हशीचे दूध जे उकळून तयार होतं त्यात भाकरीचा चूरा घातला.. नंतर त्या बॅटरमधे इसेन्स घालून फेटलेली अंडी व साखर घालून मिश्रण एकजीव केले.. एका पॅनमधे साखरेचं कॅरमल बनवून साच्यात ओतून घेतलं.. ते थंड होताच त्यात बॅटर ओतलं आणि एका मोठ्या टोपात पाणी गरम करून त्यात एक लहान टोप पालथा ठेवत त्यावर हा साचा ठेवला.. टोपावर झाकण ठेऊन १ तास असेच वाफेवर शिजू दिले..
ते शिजेपर्यंत सगळ्यांसोबत काही वेळ पत्ते कुटले गेले.. मी आवर्जुन पत्त्यांना कैंची मारण्याचे माझे कौशल्य दाखविण्याचा मोह आवरला.. कैची मारून दाखवली असती तर त्याच्या आईच्या स्वप्नात मी रोज पीसत राहिले असते हे जाणून होते .. काही डाव मुद्दाम हरले देखिल.. असो, तर तासाभरानंतर पुडींग शिजून तयार होतं.. ते टोपातून बाहेर काढत सेट होण्यासाठी फ्रिजमधे ठेवले गेले..तेवढ्या वेळात आईने आदल्या दिवशी बनवलेली चिकन बिर्याणी मला खाऊ घातली .. ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, धर्म कोणताही असो सूनेला सगळीकडे अशीच वागणूक मिळते.. पण मला शीळीच बिर्याणी जास्त आवडते असं म्हणत मी ती चांगलीच हाणली.. काही वेळात फ्रिजमधे सेट झालेलं पुडींग बाहेर काढत ते एका ताटात पालथं केलं आणि लगेचच तळाशी असलेले कॅरमल पुडींगवरून ओथंबून वाहू लागलं.. छान मऊ, लुसलुशीत पुडींग खाण्यासाठी तयार होतं..पहिला घास तोंडात घालताच एखाद्याची ब्रम्हानंदी टाळी लागले अशी अप्रतिम चव.. त्यानंतर पुडींगचे आणि त्याच्या आईचे जोरदार कौतुक करत व काही पुडींग डब्यात ढकलत मी तिथून निघाले.. घरी येताच रेसिपि जशीच्या तशी वहीत उतरवली..

बरं झालं तेव्हाच्या तेव्हा लिहिली होती नाही तर आता पुन्हा जाऊन विचारायची सोय नव्हती..

Jokes apart .. भाकरीचे कॅरमल पुडींग असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही.. कृपया हा प्रयोग करून बघू नका.. उगाच बनवाल आणि माझ्या नावाने खडी फोडाल Happy

खालचा फोटो ब्रेड कॅरमल पुडींगचा आहे .. भाकरीला ६ लादी पाव किंवा ८ ब्रेडच्या स्लाईसेस ने रिप्लेस करा आणि रेसिपि पुन्हा एकदा वाचा.
ओवन मधे बेक करायचं असल्यास ३५०F वर ५० मिनिटे बेक करा.
07B83441-9D1A-41C2-B99B-37C3DE523FA5.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages