करू

Submitted by रोहितकुलकर्णी on 25 July, 2020 - 13:27

आभाळाला झुकवू आधी पंखांना बळकट बनवू
हे मृत्यू आयुष्याची चिमणी नंतर दोघे उडवू

रात्रीपुरता विचार करतो आणि निघून जातो ना
कधीतरी चादरीत माझ्या स्वप्ना आपण स्वप्न बघू

अबलख इंद्रधनूचा घोडा उधळण रंगांची करतो
खोगीर त्याचे काढ पावसा, मुक्तपणाने दे उधळू

वळणदार बनवूच नको नात्याचा रस्ता टोकाशी
दोघांमध्ये धूसर सीमा आधीच आहे ती उखडू

बर्फाच्या अस्तरात खाली पाणी शापित पहुडले
चल किरणांचा खंजीर घेऊन प्रवाहास ह्या मुक्त करू

Group content visibility: 
Public - accessible to all site users