‘रफाल’ येतंय!

Submitted by पराग१२२६३ on 25 July, 2020 - 11:39

फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक 36 ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने जुलै 2020 च्या अखेरीस भारतात दाखल होणार आहेत. त्याआधी भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.

भारतात येताना भारतीय लढाऊ वैमानिकच या विमानांचे सारथ्य करणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाच ‘रफाल’ भारतात दाखल होणार असून ती सर्व विमाने ‘मोहिमेसाठी सज्ज’ अशीच असणार आहेत. यापैकी काही विमाने ‘रफाल बी’ आणि काही ‘रफाल सी’ प्रकारची असणार आहेत. ही विमाने भारताच्या दिशेने निघण्यापूर्वी वैमानिकांना आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतुकीसंबंधीच्या सर्व बाबींचीही माहिती करून दिली जाणार आहे. कारण भारतात येताना या विमानांना नागरी हवाईमार्गांचाच वापर करावयाचा आहे.

भारताच्या दिशेने उड्डाण करताना भारतीय हवाईदलाचे मालवाहू विमान आणि फ्रेंच हवाईदलाचे इंधनवाहू विमान ‘रफाल’ विमानांसोबत असणार आहेत. या मालवाहू विमानांमधून भारतीय हवाईदलाचे अभियंते, तंत्रज्ञ, ‘रफाल’चे सुटे भाग आणि अन्य काही साहित्य भारतात आणले जातील. आंतरराष्ट्रीय नागरी हवाईमार्गांवरून जात असताना ‘रफाल’ विमानांवर कोणत्याही प्रकारचे शस्त्र बसवता येणार नाही.

भारतात येताना वाटेत ही सर्व विमाने एकच थांबा घेण्याची शक्यता आहे. हा थांबा संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीजवळच्या अल धाफ्रा हवाईतळावर असेल. फ्रान्सहून निघाल्यावर साधारणतः चार तासांनी ही विमाने अल धाफ्राला पोहचतील. दरम्यानचा प्रवास विनाथांबा असल्यामुळे तसेच हे मध्यम पल्ल्याचे लढाऊ विमान असल्यामुळे या ताफ्यासोबत असलेल्या फ्रेंच इंधनवाहू विमानातून भारतीय ‘रफाल’ विमानांमध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरले जाईल. सुमारे साडेपाच हजार किलोमीटरचे उड्डाण करून अल धाफ्राला पोहचल्यावर या ताफ्यातील सर्व जण विश्रांतीसाठी काही काळ तेथे थांबतील. पश्चिम आशियातील आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणाच्या उद्देशाने फ्रान्सने या हवाईतळावर आपली ‘रफाल’ विमाने तैनात केलेली आहेत. भारतीय 'रफाल' विमानांची या तळाला दिली जात असलेली ही भेट व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाची असणार आहे. तसेच त्रिपक्षीय सामरिक संबंधांच्या दृष्टीनेही या भेटीला महत्व असणार आहे.

अल धाफ्राहून भारतीय भूमीच्या दिशेने निघाल्यावर वाटेत परत एकदा 'रफाल'मध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरावे लागणार आहे. मात्र यावेळी भारतीय हवाईदलाच्या ‘आयएल-78 एमकेआय’ इंधनवाहू विमानातून ‘रफाल’मध्ये इंधन भरले जाईल. भारतीय हवाईदलात ‘रफाल’ची पहिली तुकडी हरियाणातील अंबाला येथील हवाईतळावर तैनात केली जाणार आहे. त्यामुळे अल धाफ्राहून निघालेली ‘रफाल’ थेट अंबालामध्येच दाखल होतील.

‘रफाल’चा ताफा भारतात येत असताना वाटेत ज्या-ज्या देशांच्या हवाई हद्दीतून त्याला जावे लागणार आहे, त्यात्या देशांकडून विशेष परवानाही या ताफ्याला काढावा लागेल आणि शुल्कही भरावे लागेल. हे कोणत्याही विमानाला करावे लागतेच. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने (आयसीएओ) तयार केलेल्या नियमावलीनुसार आणि संबंधित देशांच्या नियमांनुसार ही प्रक्रिया पार पडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. लेख वाचला नसता तर हे असे डिटेल्स कळलेच नसते.

लेख 3-4 वेळा डोळ्यासमोर आला, पण स्क्रोल करून पुढे गेले, कारण रफाल म्हणजे नेहमीची धुमश्चक्री, आरोप प्रत्यारोप, राजकारणाचे गट आणि नेहमीची उणीदुणी काढून समाप्ती. पण शेवटी उघडला, ते बर झालं, वेगळं काही वाचायला मिळालं.

---- कारण रफाल म्हणजे नेहमीची धुमश्चक्री, आरोप प्रत्यारोप, राजकारणाचे गट आणि नेहमीची उणीदुणी काढून समाप्ती. -----

हो त्यामुळंच जरा वेगळ्या पद्धतीनं लिहिलं. कारण त्या वादात रफाल आणि हवाई दल बाजूला पडतं.

छान माहिती...

एवढा खर्च करून उडवत आणण्यापेक्षा बोटीने का आणत नाही. वेळ जास्त लागेल पण बराच खर्च वाचेल ना ? माझ्यामते फ्रान्सहुन येथे चार दिवसात बोट पोहोचायला हवी..

एवढा खर्च करून उडवत आणण्यापेक्षा बोटीने का आणत नाही. वेळ जास्त लागेल पण बराच खर्च वाचेल ना ? माझ्यामते फ्रान्सहुन येथे चार दिवसात बोट पोहोचायला हवी..

नवीन Submitted by योगी९०० on 26 July, 2020 - 14:47
>>>>

भारत चीन तणावामुळे विमाने लवकरात लवकर आणणे गरजेचे आहे असे कुठेतरी वाचले..

एवढा खर्च करून उडवत आणण्यापेक्षा बोटीने का आणत नाही. वेळ जास्त लागेल पण बराच खर्च वाचेल ना ? माझ्यामते फ्रान्सहुन येथे चार दिवसात बोट पोहोचायला हवी..
नवीन Submitted by योगी९०० on 26 July, 2020 - 14:47
<<

सहमत !
विमाने उडवत आणण्याऐवजी भारतातून आय एन एस विक्रांत, फ्रान्सला पाठवणे स्वस्त पडेल विमाने आणायला.

भारत ही रफाल विमानं fly-away condition मध्ये विकत घेतली जात आहेत. जहाजातून भारतात येण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ती विमानं वेगवेगळे भाग करून आणावी लागली असती. परत भारतात आल्यावर त्या विमानांच्या वेगवेगळ्या भागांची पुन्हा जुळणी करत बसावं लागलं असतं. हवाई दलाची तातडीची गरज म्हणून ही खरेदी होत आहे.

हे विमान फोर्थ जनरेशन आहे,या पेक्षा रशियाचं सुखोई ५७ हे स्टेल्थ व पाचव्या पिढीतलं विमान जास्त चांगलं व फ्युचरप्रुफ आहे असे वाटते.पण आपल्या हवाई दलाने विचार केला असणारंच.सध्याच्या काळात राफेल विमान येणं ही पॉझिटिव्ह बातमी आहे.धन्यवाद.

रफाल 4++ श्रेणीचं आहे. रफाल आणि सुखोई-57 दोन्ही वेगवेगळ्या गटातील आहेत. रफालप्रमाणेच भविष्यात सुखोई-57 भारतीय हवाई दल विकत घेतलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खूपच माहिती पूर्ण लेख !!
काल पासून मीडिया मध्ये राफेल येणार म्हणून वाचण्यात आले पण व्यवस्थित माहिती भेटली नव्हती ......
शिवाय का कोणास ठावूक पण राफेल भारतात उतरे पर्यंत या घडामोडी तील प्रत्येक जबाबदार व्यक्ती ला दडपण असणार च !
रस्त्यात काही घात पात होतोय का ? किंवा मार्गात कुठे नादुरुस्त होईल का ?.
राफेल म्हटले की राजकुमार ची आठवण येतेच !
या लेखातील किमान इतकी तरी माहिती भावी पंत प्रधान ना असेल का ? शंका येते !!

छान,

काल कारगिल दिन साजरा झाला, त्यात वाजपेयींनी राजीवजी गांधीजी ह्यांनी आणलेले बोफोर्स वापरले होते.

आता हेही खरोखर वापरावेत , नैतर आज अंबानीच विकणार आणि उद्या अंबाणीनेच बाय बॅक केले आणि मधला माणूस झोला घेऊन फरार , असे नको व्हायला

एवढा खर्च करून उडवत आणण्यापेक्षा बोटीने का आणत नाही. वेळ जास्त लागेल पण बराच खर्च वाचेल ना ? माझ्यामते फ्रान्सहुन येथे चार दिवसात बोट पोहोचायला हवी..
>> मला वाटते की ३६ विमाने आणायला १०/ १२ युद्ध नौका लाग्तील. अशा बारा युद्ध् नौका सुएझ कॅनल मधुन जाउ देतिल?
कल्पना नाही.

राफाल आणण्यासाठी खर्चापेक्षा सुरक्षा महत्वाची. हवाई मार्गे वेळ कमी लागेल, तसेच हवाई मार्गा बद्दल गुप्तता बाळगता येते. एकापेक्षा अधिक गुप्त मार्ग असू शकतात आणि आयत्या वेळी त्यात बदल करता येऊ शकतो.

आकाश मार्गे हल्ला झालाच तर आकाशात ती विमाने स्वतः चे रक्षण बोटीवर असण्यापेक्षा चान्गल्या रीतीने करू शकतील. त्याच कामासाठी ती घेतलेली आहेत.

त्याउलट समुद्र मार्ग एक्दम फिक्स् आहे. सुएझ कनाल किन्वा नोर्थ साउथ अटलाण्टिक समुद्र मग इन्डिअन समुद्र करत अरबी समुद्रा मार्गे भारतात याव लागेल. तसेच प्रवासात जास्त वेळ घालवल्यामुळे शत्रूला घातपात करायला देखील जास्त वेळ मिळेल. प्रवासात हल्ला झालाच तर विमानाबरोबर युद्ध नौकान्ची देखील हानी होऊ शकते. थोडक्यात हवाई मार्गाने आणण्यापेक्षा जास्त हानी समुद्र मार्गे होऊ शकते.

राहिला मुद्दा खर्चाचा तर १०-१२ युद्ध नौका भारतातून फ्रान्स आणि तिकडून परत आणण्यासाठी माझ्यामते ३६ राफाल फ्रान्स वरून ऊडवून आणण्या पेक्षा जास्त इन्धन लागेल.

Pages