माया नावाची संकल्पना

Submitted by सामो on 22 July, 2020 - 14:09

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे. मायेचा कारक म्हणजे काय ते नक्की कधीच उलगडलेले नव्हते. तसेही माया म्हणजे नक्की काय हेदेखील कोणी कधी उलगडून सांगीतलेले माझ्या मर्यादित वाचनात आलेले नव्हते. वेदांतामधील ही एक फार महत्वाची संकल्पना आहे = 'माया' एवढेच, नीट वाचून वाचून माहीत होते. म्हणजे पुरुष-प्रकृती मधील पुरुष हे ब्रह्म तर प्रकृती ही माया. जीवाच्या अस्तित्वाला मायेच्या पटलाने वेढलेले असते. ज्यामुळे जीव, ब्रह्म जाणू शकत नाही. भल्या भल्या थोरामोठ्यांना मायेचे हे आवरण दूर करता आलेले नाही. अरे पण म्हणजे काय? कुठलं पटल, कुठलं धुकं, काहीही माझ्या पचनी पडलेले नव्हते. आता रामविजय ग्रंथातीलच मायेचे वर्णन घ्या ना. या ग्रंथात मूळमायेचे सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. अफाट वर्णन आहे.
_________

जैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||
की समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||
एक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||
जिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||
एवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||
विधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||
ब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||
चैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||
इने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||
हे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||
नानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस* कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||
कोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||

* या काव्याआधी, गाधी ऋषींची कथा येते.
____________
असो तर एवढे वाचूनही माया म्हणजे काय? हे कळलेच नव्हते.सॅम हा माता अमृतानंदमयी (द हगिंग सेंट) यांचा शिष्य आहे. सॅमने वरती उल्लेख केलेल्या 'चंद्र' विषयक व्हिडीओमध्ये फार सोप्या शब्दात हे मायेचे स्वरुप सांगीतलेले आहे.
तर थोडक्यात, माया म्हणजे 'लिमिटेड कॉन्शसनेस' आपला या जन्मी जे मर्यादित अस्तित्व आहे ते म्हणजे माया. माया = लिमिटेड एग्झिस्टनस, ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स.
आपले अनेकानेक जन्म झालेले आहेत त्यामध्ये आपण कित्येकदा कोणाचे भाऊ-बहीण-नवरा-बायको या भूमिका निभावलेल्या आहेत. आपल्याला अपत्ये झालेली आहेत पण आपल्याला ते आठवते का? तर नाही. या जन्मी मला, पूर्वजन्माची संपूर्ण विस्मृती झालेली असते. आणि हे जे विस्मृतीचे पटल आहे ते म्हणजे माया. चंद्राची, ज्योतिषातील भूमिका आपल्याला सुखात, आनंदात, भ्रमात व sane ठेवण्याची. उदा - मला या जन्मी कोणी उगीचच दुखावले तर मला आवडत नाही, विनाकारण कोणी माझी खोडी काढली आहे, त्रास दिला आहे असा भाव होतो. पण असे कशावरुन नाही की पूर्वीच्या एखाद्या जन्मी मीच काही दगाफटका केलेला असेल व त्याचे फळ मला आता मिळत असेल? काही व्यक्ती नको असतानाही आपल्या आयुष्यात येतात, रेंगाळतात याचे कारण कदाचित पूर्वजन्मातील आपल्याच वासना-आशांशी निगडीत असू शकते. तर ही आठवण न येणे , व आपण या जन्मी त्या अद्न्यानामध्ये सुखात असणे, ही आहे माया. आणि चंद्र त्याचा कारक आहे.

उदाहरणार्थ - गुरुचरित्रात एकदा नृसिंह सरस्वतींनी एकदा एका लाकूडतोड्याच्या तोंडून वेदांताची चर्चा घडवुन आणली व २ मदोन्मत्त ब्राह्मणांचा गर्व हरण केला ही कथा येते. या कथेत त्यांनी शिष्यांना सांगीतले की ७ रेघा वाळूत आखा व त्या लाकूडतोड्याला प्रत्येक रेघ ओलांडण्यास सांगीतली. प्रत्येक रेष ओलांडली की त्याला एकेक जन्म आठवत गेला. कधी तो वैश्य होता, कधी शूद्र तर कधी विप्र अथवा क्षत्रिय. ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म. व त्या लाकूडतोड्याला आताच्या (करंट) जन्मी जी लिमीटेड मेमरी आहे ते मायेचे पटल.

अजुन एका कथेत एक स्त्री आपला मुलगा गेल्याने अतिशय शोकाकुल आहे, तेव्हा गुरु तिला म्हणतात यापूर्वी अनेक जन्म तू आई झालेली आहेस मग तेव्हाच्या अपत्यांकरता तूशोक करत नाहीस आताच का शोक करतेस? याचे कारण तिला पूर्वजन्म आठवत नाहीत व ते न आठवल्याने, तेव्हाचा शोक तिला होत नाही. हे मायेचे पटल.

हे माझ्याकरता तरी नवीन होते. मला कळल्यानंतर खूप अचंबा वाटला व वाटले अरे कोणी इतक्या सोप्या शब्दात का नाही सांगीतले की -
माया = लिमिटेड एग्झिस्टनस (आत्ताचा जन्म), ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स (अनेकानेक जन्म). सर्व पुस्तकांमध्ये
सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः|| .वाक्यहा दृष्टांत तसेच दागिना व सोने हा दृष्टांत अनेकदा वाचलेला होता. की लाट म्हणजे समुद्र नाही पण समुद्र हाही लाटेहून वेगळा नाही. सोन्यापासून जसे विविध दागिने घडतात त्या सर्वांमध्ये, सोने हे अविचल, कायमस्वरुपी असते. वगैरे दृष्टांत परत परत वाचलेले होते. पण कधीही कळलेले नव्हते. ते सॅमच्या एका व्हिडीओने कळले ब्वॉ.

आय होप धिस इज मेकिंग सम सेन्स Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख व माहिती Happy
रामविजय माझाही आवडता ग्रंथ आहे, कित्येक वेळा पारायण केले तरी पुन्हा पुन्हा वाचन करावेसे वाटते Happy

धन्यवाद किल्ली. हनुमंत जन्माचे वर्णन श्रीधरस्वामींनी कसले सुरस केलेले आहे त्या ग्रंथात. पण मला ते वनवासाचे वाचवत नाही Sad स्पेशली सीताहरण वाचवणार नाही म्हणुन मी कधीच तो ग्रंथ पूर्ण करत नाही.

लेख खूप आवडला. It does make sense to some extent ! कारण पूर्ण समजणे अशक्य आहे.
माया या शब्दाचा अर्थ मी असा समजते.
It is something that limits us / keep us away from our full potential as a soul. A soul has everything it needs to conquer the human limits and be the supreme one, since it is a part of that supreme one which is complete within itself. (जे पिंडी ते ब्रह्मांडी )
क्षमता नेहमीच असते ती न ओळखणे म्हणजे 'माया'. खरं तर आपले मन हेच आपल्यापुरती 'माया' आहे. तेच आपण मर्यादित आहोत हा भास निर्माण करते आणि आपण पुन्हा पुन्हा जन्माला येऊन त्या आभासाला आपले अस्तित्व समजतो. मायेचे अस्तित्व तेवढेच जेवढे मनाचे अस्तित्व. जेव्हा तुम्हाला खरोखरच वाटायला लागते की तुमचे अस्तित्व या मर्यादित शरीरापेक्षा जास्त आहे तेव्हाच हळूहळू ते आवरण ढिले व्हायला लागते.
मनुष्य म्हणून सुख- दुःख, आशा -निराशा , स्वप्ने -अपेक्षाभंग अशा गोष्टींशी अविरत झगडत (त्याला पर्याय नाही पण त्रागा न करणे किंवा गुंतून न पडणे) बसण्यापेक्षा चांगले कर्म करत रहाण्याने आपण अधिक चांगले मनुष्य तर होऊच आणि आत्मा म्हणूनही प्रगती करत राहू. आकाशीचा चंद्र मिळवण्याची क्षमता असताना गोट्या हरल्या म्हणून निराश का व्हायचे !
मला ज्योतिषात विशेष रस/गती नाही म्हणून चंद्र कारक वगैरे कळले नाही. Happy

>>>>>>>खरं तर आपले मन हेच आपल्यापुरती 'माया' आहे. >>>>>>
अस्मिता, खूपच मस्त मुद्दा मांडलास. चंद्र हाच मनाचाही कारक आहे Happy
.
>>>>>>>>मनुष्य म्हणून सुख- दुःख, आशा -निराशा , स्वप्ने -अपेक्षाभंग अशा गोष्टींशी अविरत झगडत बसण्यापेक्षा चांगले कर्म करत रहाण्याने आपण अधिक चांगले मनुष्य तर होऊच आणि आत्मा म्हणूनही प्रगती करत राहू.>>>>>>
__/\__

मायेच्या संदर्भात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वनवास यात्रेचे रूपक वाचल्याचे स्मरते.
वनवासाला निघालेले श्रीराम पुढे चालत आहेत, रामाच्या मागे सीता आणि तिच्या मागे लक्ष्मण असे एका ओळीत चालत आहेत.
श्रीराम म्हणजे परमात्मा, सीता म्हणजे माया तर लक्ष्मण म्हणजे जीवात्मा.
जीवात्मा रुपी लक्ष्मण हा श्रीराम रुपी परमात्म्याला पाहू शकत नाही कारण मध्ये सीता रुपी माया आहे. ह्या मायेने परमात्म्याला झाकून टाकले आहे त्या मुळे सोबत चालत असून देखील तो जीवात्म्याला दिसत नाही.
म्हणूनच सामान्य मनुष्यास जीवन जगताना परमात्मा दिसत नाही.

प्रत्येक रेष ओलांडली की त्याला एकेक जन्म आठवत गेला. कधी तो वैश्य होता, कधी शूद्र तर कधी विप्र अथवा क्षत्रिय. ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म. >> माया या संकल्पनेत जाति व्यवस्थेवर विश्वास अंतर्भुत आहे का? आता जाति व्यवस्थे मुळे उद्भवलेले अन्याय सोसणार्‍या व्यक्तीला ह्या संकल्पने तून काय मिळेल?

जी ए कुलकर्णीं ह्या भारतीय लेखकाने एक सुरेख कथा लिहीली आहे जी इंग्रजी कथेचा ब भावानुवाद आहे. त्यात जीवन म्हणजे माया हे फार छान व्यक्त केले आहे. हर्मन हेस च्या चार कथांचा अनुवाद आहे त्या पुस्तकात आहे.

राम निरंजन न्यारा रे अंजन सकल पसारा रे ह्या निर्गुणी भजनात पण ही संकल्पना मांडली आहे. कुमार गंधर्वांचे भजन अप्रतिम आहे.

छान लेख, सिम्युलेशन म्हणजेच माया. समजा आपण ज्या दुनियेत राहतो ती A आणि ज्या डायमेन्शनमध्ये राहतो ती पकडली तर आपण A - 3D दुनियेत वावरतो. अशा अनेक डायमेन्शन आहेत हे मॅथेमॅटेकली सिद्ध झालंय. म्हणजेच A - 4D, A - 5D, A - 6D अँड सो ऑन. याव्यतिरिक्त आपण ज्या दुनियेत राहतो (A) तिला पॅरलल अशा दुनिया असू शकतात म्हणजे B - 3D, C - 3D, D - 3D अँड सो ऑन या आपल्या पॅरलल दुनिया झाल्या. तर या इतर पॅरलल दुनियेत आपणसुद्धा म्हणजेच आपल्यासारखी दिसणारी, आपल्यासारखी विचारसरणी असणारी एंटीटी आहे. पण आपले रोल वेवेगळे आहेत. या दुनियेत तुम्ही डॉक्टर असाल तर त्या दुनियेतही तुम्ही डॉक्टरच असाल असं नाही. तुमचं प्रोफेशन, नातेवाईक, राहणीमान हे पूर्णतः वेगळं असेल. हे सगळे एंटीटी एकमेकांसोबत कुठेतरी कनेक्टेड असतात. आपण एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर बोलतो अरे आपण याला कुठेतरी पाहिलंय, किवां एखाद्या जागेवर गेलो कि वाटतं आपण यापूर्वीही कधीतरी इथे आलोय हे सगळं या कनेक्शनमुळे होत असतं. तसंच एका मितीतून दुसऱ्या मितीत जाण्यासाठी काही छुपे रस्ते आहेत पण ते समजण्याइतपत आपलं विज्ञान विकसित झालं नाही.

@चामुंडराय - होय मीही ती संकल्पना वाचलेली/ऐकलेली आहे.
@अमा - अनेक जन्म ही संकल्पना आहे. जातीव्यवस्था जस्ट बाय & बाय तेव्हाच्या चालीरीतींप्रमाणे.
>>>जी ए कुलकर्णीं ह्या भारतीय लेखकाने एक सुरेख कथा लिहीली आहे जी इंग्रजी कथेचा ब भावानुवाद आहे. त्यात जीवन म्हणजे माया हे फार छान व्यक्त केले आहे. हर्मन हेस च्या चार कथांचा अनुवाद आहे त्या पुस्तकात आहे.>>> पुस्तकाचे नाव माहीत असल्यास कृपया सांगावे.
@बोकलत - बाप रे!!! काय विचित्र खेळ आहे हा.

वाचून पहा, सामो पूर्ण पोथी एकदा
खूप रसाळ आहे, लंका दहन आणि पुढच्या सर्व कथा विशेष आहेत Happy
तो विजय ग्रंथ आहे, मी खात्री देते तुमची निरशा नाही होणार Happy

मला समजलेली मायेची व्याख्या म्हणजे जे जे काही अनुभवाच्या कक्षेत येते (दृश्य, अदृश्य सर्व), मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव झालेला असो व नसो, ती माया.
जोपर्यंत आपण एखादी गोष्ट अनुभवतो तोपर्यंत ती अनुभवली जाणारी गोष्ट, जो अनुभवतोय तो, आणि प्रत्यक्ष अनुभव ही त्रिपुटी कायम वेगळी राहते आणि आपल्याला वेगळेपण जाणवते. जेंव्हा ह्या तिन्हीमधील भेद पूर्ण नाहीसा होऊन केवळ एकच अविच्छिन्न भाव कायम राहील जे अनुभवाच्याही परे असेल ते ब्रह्म.
मला वाटते ब्रह्म सोडून जे जे काही आहे ती माया. त्यामुळे ब्रह्माचा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळी फक्त माया आणि एकदा बोध झाला की सगळेच फक्त ब्रह्म.