पत्रास कारण कि .......

Submitted by डी मृणालिनी on 20 July, 2020 - 09:56

आज भल्या सकाळी पोस्टमन काका आले. आज नेमके सगळे कामात होते ,त्यामुळे पत्र माझ्या हाती पडलं . लिफाफा छोटा होता . त्यावरचं अक्षर तर फारच सुरेख होतं . अगदी सुंदर आणि वळणदार . याअर्थी सरकारी पत्र नाही याची खात्री पटली .लिहिणाऱ्याचा पत्ता पाहिला आणि मी तीनताड उडाले !
खालचा वाडा ,गावडे वाडीत जाताना येणारी चिंचोळी वाट ,त्या वाटेवरून पुढे गेल्यावर आजू बाजूला 'मी ' असतो ,धामापूर ,ता:मालवण ,जि : सिंधुदुर्ग - ४१६६०५
ह्यो कोणतरी आमचोच गावातलो हा ! काय चक्रम माणूस आहे . असा कधी पत्ता लिहितात. कोण असेल बरं ?? ... असा विचार करत करतच लिफाफा फाडला . माझी उत्सुकता तर प्रचंड शिगेला पोचली होती. ते मोतीदार अक्षरांचं 'बोलकं पत्र ' मी वाचलं आणि सुन्न झाले. त्यात लिहिलं होतं -
''प्रिय मृणालिनी ,
कदाचित तू मला ओळखलं नसावं . साहजिकच आहे ,एका मळ्याने तुला पत्र लिहावं ही तुझ्यासाठी किती अकल्पित गोष्ट असेल ,हे मला माहितीये . गेल्या कित्येक वर्षांपासून भरघोस पीक देण्याचं माझं कर्तव्य मी आनंदाने करत आलोय . आज काही बोटावर मोजण्याइतकी लोकच माझ्यावर शेती करतात . पण तरीही तुझ्या गावातला प्रत्येक माणूस त्याच्या दिनक्रमातला काही वेळ माझ्यासोबत घालवतोच . काही फिरायला येतात ,काही गाई -गुरांना घेऊन येतात ,काही तर नुसते गप्पा मारायला येतात तर काही मासे पकडायला ! पण ते येतातच . माझे कित्येक वर्षांचे ऋणानुबंध आहेत तुमच्याशी. तुम्हा प्रत्येकाच्या आठवणी मी सोन्यासारख्या जपल्या आहेत. तुला आठवतंय का गं ? एकदा तू तुझ्या दादासोबत तुमच्या बलाढ्य गाईला चरण्यासाठी घेऊन आली होतीस आणि कोणातरी दुसऱ्याच्या बैल तुझ्यामागे धावत सुटला ! तू इतकुशी होतीस पण तरीही कसली धूम पळालीस ! एकदा तू माझ्या चिखलामध्ये चिंगूळ पकडत होतीस आणि इतक्यात तुझ्यामागे माकड लागले ! मी तर हसून हसून पार वेडा झालो होतो. कमरेभर पाण्यात उभी राहून चिंगूळ पकडताना तुला किती मज्जा यायची नं ! पायाखाली काहीतरी गुळगुळीत सरपटल्यासारखं वाटलं कि पाणघणसाच्या भीतीने टुणकन उडी मारायचीस ! अशा कितीतरी गमतीदार आठवणी आहेत माझ्याकडे . फक्त तुझ्याच नाही ,तर गावातल्या प्रत्येक माणसाच्या ! गुडग्याभार पाण्यात तासन तास उभे राहून तरवा लावणाऱ्या बायका ,हॅक -हुक करत ढोरं हाकणारे आजोबा ,मासे पकडणारी छोटी -छोटी पोरं यांना वर्षानुवर्षे पाहत आलोय . गाई -म्हशीचं तर विचारूच नका ! सकाळी त्यांचे पालक त्यांना माझ्या सुपूर्द करतात आणि दिवसभर मी त्यांची जणू babysitting च करतो.
पावसाळ्यात कर्ली नदीच्या पाण्याने मी तुडुंब भरतो आणि मग जणू याच क्षणाची वाट पाहणारी मंडळी आपापल्या होड्या बाहेर काढतात . हिवाळ्यात भल्या पहाटे धुकांची शाल पांघरून मी माझ्या दिशेने येणाऱ्या ,उबदार लोकरीचं टोपलं घातलेल्या आजोबांकडे पाहत बसतो. उन्हाळ्यात भातकापणीनंतर तर माझ्या वाटेवर असंख्य भाताची तुसं लोळत पडलेली असतात. प्रत्येक ऋतुमानानुसार माझं बदलणारं रूप पाहून तू मला 'बहुरूपी ' हीच उपाधी देशील . धामापूरच्या बहुरूपी मळा ! Happy
पण ही रूपे घेण्याचं मला भविष्यात स्वतंत्र आहे का गं ? खरंतर ,हेच विचारायला मी हे पत्र लिहिलं होतं . पण गप्पांच्या ओघात मुख्य तेच राहुल गेलं . तुमच्या कायद्यांमध्ये मी कुठे बसतो हे मला माहित नाही आणि मला ते जाणून घ्यायची इच्छादेखील नाही. कारण ते समजण्याइतपत मी हुशार नाही. ती बुद्धी निसर्गाने तुम्हा मानवांनाच दिली आहे. पण कुठेतरी मला याची जाणीव होते आहे कि माझं अस्तित्व धोक्यात आहे. हे बघ मृणाल , तुम्हा मानवांची मुख्य अन्नाची गरज मी भागवतो . या व्यतिरिक्त मी भूजल पातळी प्रभारित करतो ,नदीच्या पुरावर नियंत्रण आणतो आणि बरंच काही ... ! मी माझं मोठेपण सांगत नाहीए . पण मी जे हे सगळं करतो ते तुमच्यासाठीच आहे . जर तुम्ही माणसं माझ्या अस्तित्वाला धोका पोहचवत असाल ,तर त्याचा विपरीत परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल. कारण माझ्यामुळेच तुम्ही आहात . माझ्या विस्तीर्ण पसरलेल्या शरीरावर 'विकास ' करण्याआधी दहा वेळा 'विचार ' करा. आज माझ्यामुळे तुम्हाला मिळणारे ताजे -ताजे चिंगूळ महिना -महिनाभर फ्रिजमध्ये पडलेल्या शिळ्या डब्यात मिळतील. माझ्या चिंचोळ्या वाटेवरून ,गवतावरून फिरायला हजार -हजार रुपयांचे पॅकेज बुक करावे लागतील. शिवाय एक कृत्रिम जग आहेच. पण हाच जर तुमचा 'विकास ' असेल, तर खुशाल करा. पण लक्षात असू द्या कि तुम्हाला निसर्गाने जन्म दिलाय आणि त्यामुळे तोच तुमचा तारणहार आहे.
एवढंच सांगायचं होतं . थोडंसं कठोर भाषेत बोललो तुझ्याशी ,मला माफ कर. पण यावर नक्की विचार कर आणि इतरांनाही करायला लाव .

तुझा
धामापूरचा बहुरंगी मळा Happy ''

आणि बरं का , मी अजूनही याच पत्राचा विचार करते आहे. तुम्हाला काय वाटतं ? आता मी तुमच्या पत्रांची वाट बघते आहे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users