इथे आसवांना कुठे भान होते

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 18 July, 2020 - 09:05

उरी पेटलेले जरी रान होते
कसे काय ओठी हसू छान होते

पुसावे कशाला उगा गाल कोणी
इथे आसवांना कुठे भान होते

कुणी लाजले का गळे कापतांना
कुणी फार कोणा दिले मान होते

लिहू लागलो मी जरी भावणारे
खरे सांगणारे रिते पान होते

कशी धार झाली कमी लेखणीची
कुठे शब्द माझे अता म्यान होते

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- भुजंगप्रयात
(लगागा लगागा लगागा लगागा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"लिहू लागलो मी जरी भावणारे
खरे सांगणारे रिते पान होते" ----> घेऊन टाक यार माझ पण चार पाच वर्षांच आयुष्य आणि लिहीत रहा ... लिहीत रहा...

बापरे बेफि तुमचा प्रतिसाद तोही दाद म्हणून.
मी गझल तुमचे लेख वाचून शिकतो आहे अजून.
तुमची वा म्हणजे गुरुजी वा.
भरून पावलो मी आज