मी आणि बिडाचा तवा

Submitted by ज्येष्ठागौरी on 18 July, 2020 - 00:55

मी आणि बिडाचा तवा.....
सध्याच्या सक्तीच्या सुट्टीच्या काळात बारीक बारीक कामं करायचा सपाटा लावलाय आणि तेच करताना स्वयंपाकघर थोडं आवरायला घेतलं आणि लॉफ्टवर एक जुना तवा दिसला,त्याचं रंगरुप जरा कठीण दिसलं आणि म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करुन बाकीचं आवरुन टाकलं.रात्री परत एकदा तवा डोळ्यासमोर आला. लग्नानंतरच्या काळात अनेक नवी भांडी घेतली गेली आधीची खूप असूनही.हा तवा का घेतला असावा? जमाना नॉन स्टिक भांड्यांचा असताना हा जडशीळ नग मी का घेतला असावा.आई अशीच बिडाची भांडी वापरायची ,मलाही वापरायला सांगायची.पण तेंव्हा नॉनस्टिक भांड्यांचा जमाना आला होता आणि मग लक्षात आलं की हा तवा खूप वर्षांपूर्वी कोल्हापूरहून येताना वारणानगरच्या अनवट रस्त्यावरच्या एका दुकानात अचानक मिळाला होता,तो आईला मनात आठवून घेतला होता.मोठया हौसेनं घेतला आणि नंतर तो मागे पडला.ह्या नवीन घरात येऊनही बारा वर्षं झाली. आजवर एकदाही वापरला नाहीये ह्या भावनेनं अस्वस्थ आणि अपराधी वाटलं.
सकाळी लगेच तो काढून नीट पाहिला तर धूळ आणि गंज चढला होता अगदी घट्ट.मग हात धुवून(आत्ताच्या दिवसात हा शब्द अगदी खरा आहे)त्याच्या मागे लागले.दोन तीनदा चांगला घासला, धुतला,पुसला तरी त्याचं रुपडं फार काही पालटेना. मग लिंबू मीठ लावून पाहिलं, पितांबरी लावली.थोडं उजळलं पण अजून मनासारखं नाही.दुसऱ्या दिवशी व्हिनेगर घालून ठेवलं मग गंज निघाला आणि त्याचं खरखरीत काळंकुळं रुप दिसायला लागलं. तसाच ठेवून दिला,अजून काही कमी आहे असं वाटत होतं. त्याच दिवशी योगायोगानं अचानक एक व्हिडिओ पाहिला.बिडाचा तवा कसा "तयार"करायचा!दाखवणाऱ्या काकू एकदम भारी होत्या, त्याला बिडं कसं करायचं ते सांगत होत्या,वर्षानुवर्षं अन्नपूर्णेप्रमाणे स्वयंपाक करणाऱ्या असाव्यात.अगदी साध्यसुध्या आणि खऱ्या, अभिनिवेश नसलेल्या! झालं त्यांच्या सल्ल्यानुसार दुसऱ्या दिवशी सुरुवात केली. पहिल्यांदा हा तवा चांगला सणसणीत तापवायचा मग त्यावर कुठलीही तेल घालून ठेवायचं.मग गार झाल्यावर ते पुसून टाकायचं. असं वारंवार करायचं.मी जवसाचं तेल घातलं, पाचंच मिनिटांत बाकी मेंबर डोळे चुरचुरताहेत म्हणून म्हणायला लागले मग गोडं तेल लावून काम पूर्ण केलं. दुसऱ्या एका क्लिप मध्ये तेल तापवून त्यात कांदा पार काळा होईपर्यंत परतायचा असं सांगितलं आणि एकात खोबरं काळं होईपर्यंत परतायला सांगितलं.खोबरं थोडं कमी होतं आणि सध्या मिळत नसल्यामुळे कांद्यावर काम भागवलं आणि दोनदा तेल लावून उन्हात ठेवल्यामुळे हा बीडाचा तवा एकदम काळा कुळकुळीत आणि छान गुळगुळीत झाला.असेच अनेक विडिओ परदेशातलेही आहेत."how to season cast iron pots"तेही बघितले त्यात जवसाचं तेल लावून तवा साध्या ओव्हनमध्ये बराच काळ तापत ठेवायचा असं सांगितलं, माझ्या ओव्हनमध्ये हा चांगला भल्या मोठ्या आकाराचा तवा काही मावेना पण त्यांचेही काही नुख्सें करून पाहून देशी विदेशी बरेच उपाय करुन,सात आठ दिवस त्याच्या मागे लागून त्याला पूर्ण तयार केलं किंवा आईच्या भाषेत "रुळवलं" आणि आज त्याच्यावर घावन घातलं आणि अहाहा काय जाळी पडली, काय खमंग चव आली की विचारता सोय नाही.आई सांगायची आणि आता सगळे सांगतात तसे revamp your kitchen, हे सगळं झटक्यात आठवलं.
मला ह्या सगळ्या प्रक्रियेत एकदम छान वाटलं,एकदम झेन फीलिंग म्हणतात तसं.काहीतरी नवीन चांगलं करतोय ही भावना मनात येऊन उत्साही वाटलं. खरंतर हात भरुन आले तरी त्यातून एक छान काहीतरी होतंय हे जाणवायला लागल्यावर जरा अधिक प्रयत्न केले.तव्याला खसखसून घासताना,गंज काढताना, त्याला रुळवताना एक शांतपणा, एक स्वस्थता आली आपोआप.काही गोष्टी अतिशय सावकाश, निगुतीनं कराव्या लागतात ह्याची प्रकर्षानं जाणीव झाली.ज्याचा त्याचा वेळ त्याला द्यायला लागतो. प्रयत्न केला तर हळुहळू एखाद्या गोष्टींमध्ये सुधारणा होत जाते हा समज अधिक पक्का झाला आणि आजच्या परिस्थितीशी तुलना करताना खूप काही हातात गवसलं.हे लक्षात आलं की आपली अवस्था बिडाच्या तव्यासारखीच झालीये.आपलं आत्मन खूप मागे पडलं आहे,दुर्लक्ष झालं आहे,गंजलंय! मुद्दाम नाही, अहेतुक, आणि आपल्या जाणीवा,आपली मूल्यं ,आपलं राहणीमान ह्या सगळ्यावर चांगलाच राप बसला आहे, काहीतरी घासून पुसून लख्ख करायची वेळ आली होती, आली.आपोआप आच लागली आहे आणि सगळी रंध्रं उघडली आहेत, आणि त्यावरअनेक स्निग्ध भावनांचा लेपही चढला आहे,एकदा आणखी एकदा,अनेकदाआणि परत सगळ्या जुन्या, खणखणीत, काळाच्या कसोटीला उतरेल, पिढ्यानपिढ्या टिकेल, काळाच्या कसोटीवर खरं उतरेल असं काहीतरी घणसर ह्या हाती गवसलं .पुन्हा बॅक टू बेसिक्स हा प्रवास सुरू झाला खरा!गुगलवर बॅक टू बेसिक्स म्हणजे 'मूलभूत गोष्टींकडे परत' असा शब्दकोशातला अर्थ दिसला आणि त्याचबरोबर हे कसं करता येईल त्याच्या काही मार्गदर्शक दिशाही वाचनात आल्या,त्या अशा...
Simple Living: Back to Basics
Know your values and vision
Be mindful of your mental space
Be intentional with your time.
Learn to say "No"
Question the stories you tell yourself
Implement systems and your routines.
Pause and Reflect.
Accept slow progress and let go of perfectionism..
आणि सगळे जुने दिवस आणि जुनी माणसं आठवली. महिन्याच्या सामानाबरोबर बांधून येणारा दोरा गुंडाळून ठेवणारी पिढी ती.किमान साधनांच्या मदतीनं उत्तम राहणारी,देशभक्तीसारख्या उच्च ध्येयानी प्रेरित झालेली आयुष्यं.स्वतःबरोबर दुसऱ्याचा विकास व्हावा असा विचार करणारी माणसं.जगातल्या चांगल्या गोष्टींवर आणि माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारी ,श्रद्धाळू माणसं आणि त्यांच्यालेखी शिस्तप्रियता, काटकसर, शारीर कष्ट, स्वास्थ्य ,नात्यांची घट्ट वीण ह्याला असणारं अनन्यसाधारण महत्व आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेलं सुखदुःखासकट पण तरीही साधं ,सुलझलेलं आणि चांगल्या पध्दतीनं व्यतित होणारं आयुष्य.आपण ह्याच वातावरणातून तर मोठे झालो,आणि पाहता पाहता झपाट्याने अमर्याद वेगाने बदलणाऱ्या विश्वात आपण स्वतःला लोटून दिलं. त्या प्रवाहात चक्क वाहून आलो.ऐहिक गोष्टींचा नको इतका मोह केला आणि स्वतःच स्वतःला विसरलो.असा एक समज निर्माण झाला की प्रवाहाबरोबर गेलो नाही,त्या वेगात राहिलो नाही तर मागे पडू, दुर्लक्षिले जाऊ.लुप्त होऊ पण त्यात माझं ते आत्मन कुठे गेलं ते कळलं नाही.ठीक आहे आता मात्र सावरायची संधी मिळाली आहे.तनहाईयां ह्या एका मालिकेत नायिका तिच्या धाकट्या बहिणीला सांगते"कुछ चिज़ें इनसान खुद सिखता हैं, कुछ जिंदगी सिखा देती है,खुदा न करे तुझे जिंदगी सिखा दे"पण बहुतेक धडे हे परिस्थिती देत असते,नियती देत असते आणि ते कडू वळसे गिळावे लागतात पण त्यातून काहीतरी खूप चांगलं हाती लागतं हे नक्की.
बिडाचा तवा चांगला रुळवला गेला आणि माझं निजत्व.बीडच्या तव्यासारखं रुळवायला कष्ट आहेत पण त्यात आनंद आहेच.तशीही चांगल्या वाईट अर्थानी निर्लेप तव्यासारखी माणसं आहेत आयुष्यात, असो!
ह्या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडताना मला थोडं आणखी माणूसपण गवसू दे म्हणजे झालं.Paulo Coelho म्हणतो तसं it's the simple things in life that are most extraordinary हे मला आत्ता जाणवतंय,ती जाणीव टिकू दे म्हणजे सगळं मिळालं. बिडाचा तवा रुळवायच्या आधी आणि नंतरचे फोटो काढले नाहीयेत पण मनात ती आधीची प्रतिमा आहे आणि ती कायम राहिली तर बरं आणि आत्ताची तर समोर आहे.हे खरंतर फार सोपं आहे. आणि आत्ताच्या संक्रमणाच्या काळात, एकांतवासात ,एक प्रकर्षानं जाणवलं की घरच्या प्रेमाच्या माणसांबरोबर दोन आणखी गोष्टीही बरोबर आहेत माझ्या साथीला.मी आणि बिडाचा तवा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेरी आहे बिडाचा तवा आहे.
आजी भिडं म्हणायची त्याला.
घावने, सेट डोसा आणि आंबोळ्या यांसाठी तेच पाहिजे.
Non stick वर केले तर खरपूस होतं नाहीत.

"रुळवणं" हा किती छान शब्द आहे ह्या तव्यासाठी.. आधी आडमुठा असलेला तवा हळूहळू गुळगुळीत, तुळतुळीत होत जातो आणि मग सुरुवातीची धिरडं काढायची झटापट थांबून सर्व धिरडी सुखरूप निघायला लागतात.

स्वस्ति, "भिडं" असं मी पण ऐकलंय.

Pages