इंडिकेटर

Submitted by तुषार पेडणेकर on 15 July, 2020 - 14:50

"साहेब, आम्ही सगळे चेक केले आणि काही प्रॉब्लेम दिसत नाही."
"अहो पण काल हा प्रॉब्लेम मी स्वतः पाहिला ह्यावर तुमचा विश्वास का बसत नाही? मागच्या महिन्यात गाडी विकत घेतली तेंव्हा तुम्ही अगदी गोडीगुलाबीने बोलत होतात आणि आता तुमचा रोख एकदम बदलल्यासारखा वाटतो." मन्या स्वतःच्या कामाईतून घेतलेल्या नव्या कोऱ्या गाडीबद्दल तावातावाने डीलरबरोबर वाद घालत होता कारण कालची गाडीच्या पार्टीची रात्र!

गाडीची पार्टी रंगात आली होती. कॉलेजच्या गप्पात चौघे बुडून गेले होते. थोडावेळ त्यांना माझी अनुपस्थिती जाणवली. जुन्या दिवसांच्या आठवणी काढत परत पैजा लागल्या आणि सगळे आले थेट स्मशानात!
ठरल्याप्रमाणे मन्या गाडीतून खाली उतरला. शांतपणे चालत चालत स्मशानात गेला आणि चिंचेच्या झाडाला तीन प्रदक्षिणा घालून घड्याळात बारा वाजायची वाट पाहू लागला. दोनच मिनिटे काढली की मन्या जिंकणार होता. पैशापेक्षा प्रश्न होता त्याच्या इभ्रतीचा! पण तेवढ्यात त्याला लांबून दोन दिवे संथ गतीने जवळ येताना दिसले. न डगमगता तो एकटक दिव्यांकडे पाहू लागला. दिवे जसे जवळ येऊ लागले तसा एक नेहमीच्या परिचयाचा आवाजही त्याच्या कानी पडला. "मन्या, लवकर ये इकडे, निघायला हवे, बहुदा पोलिस!" मित्र गाडीतून डोके बाहेर काढून मन्याला बोलवत होता. भुतापेक्षा "पोलिस" हे प्रकरण नक्की जड जाईल हे जाणून मन्याने पावले गाडीकडे वळवत ओरडला "पण पैज जिंकली, हां!". गाडीत तो बसायला आणि पोलिसांच्या गाडीने त्यांना गाठायला एकच वेळ आली. पोलिसी खाक्यात सगळ्यांना गाडीबाहेर काढले. ओळखपत्रे तपासली. प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने तोंडे जवळ आणून इतरही शंका मिटवून घेतल्या आणि चार शिव्या हासडत, दम भरत सगळ्यांना गाडीत बसवले.
मार पडला नाही हे मोठे; म्हणत मन्या पुढे आणि बरोबरचे दोघे घाईघाईत मागे बसले; पटापट दरवाजे लावले. काचा खाली करून "धन्यवाद, साहेब!" म्हणत गाडी चालू केली. मी ही गाडीत बसलो.
थोडे अंतर पुढे गेल्यावर पाठून दादू ओरडला "मन्या, पॅसेंजर सीट बेल्ट इंडिकेटर चालू का झाला?". नेहमीप्रमाणे दादूने नसत्या चौकशा सुरू केल्या. मन्यानेही ते पाहिले. सीटवर आणि डॅशबोर्डवर हाताने टकटक करून काही बदलते का ते पाहिले. पण इंडिकेटर बंद होईना. "येताना मी पुढे होतो सीट बेल्ट लावला नाही तेंव्हा चालू होता ते सहाजिक होते पण आता?" दादूच्या शंका संपेनात. शेवटी दादूने पुढे बसावे असे ठरले. मी गाडीतून उतरताना इतकेच ऐकले की "अरे, इंडिकेटर बंद झाला!". गाडी न थांबता पुढे निघून गेली.

-- राजो

Group content visibility: 
Use group defaults

दोन तीन वेळा वाचल्यानंतर मला वाटले गोष्ट सांगणारा हाच भूत असावा कारण गोष्टीत नायक वगळता तिघांचा चा उल्लेख आहे व शेवटी लिहिले आहे ' मी उतरल्यावर इंडिकेटर बंद झाला '