उपजते आहे

Submitted by रोहितकुलकर्णी on 13 July, 2020 - 05:42

पुन्हा भेटूया पहाट म्हणते आहे
दवबिंदूंशी किंचित रडते आहे

विचार सिग्नल तोडत नव्हते काही
आठवणींशी गाडी अडते आहे

पंखांना आभाळ खुणावत होते
पायामध्ये माती रुतते आहे

मी नाळेच्या मुळास बघतो आहे
नक्की नाते कुठे जखडते आहे

खाचा पडल्या भिंतीला धरणाच्या
उद्वेगाने लाट धडकते आहे

किरकिर करते आहे दार घराचे
बीजगरीशी बहुदा लढते आहे

दे देवा दमदार जराशी दुःखे
आतडी भुकेने चळवळ करते आहे

तारेवरती पक्षी बसला आहे
फांदी व्याकुळ होऊन रडते आहे

व्रत वैकल्ये उपास दिवसा करतो
संध्याकाळी मटण शिजते आहे

धुतलेला सात्विक सदरा शोभून दिसतो
सावली तिरस्काराने पळते आहे

काचेच्या घरट्यात सजवला खोपा
अंडे स्वतःस निरखून बघते आहे

क्षणभर मीच गवसलो माझ्यामध्ये
बघ शेराला धार उपजते आहे

- रोहित कुलकर्णी

Group content visibility: 
Use group defaults

बापरे!!
कसली सुंदर गझल लिहिली आहे तुम्ही रोहीत दादा :{
ही कोणत्या वृत्तातील आहे ?