गाभारा भकास उरतो

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 July, 2020 - 01:43

चढण पुढे की उतरण, कोठे कयास उरतो?
धुके निवळल्यावरती निव्वळ प्रवास उरतो

कानच नसतो शाबुत, धडका असतो त्याचा
कान धराया धडका, फुटक्या कपास उरतो

म्हणण्यासाठी शिल्लक काही उरो ना उरो
लिहून झाल्यावरती कोरा समास उरतो

अपूर्णतेची गोडी कोठे पूर्णत्वाला?
इप्सित प्राप्तीनंतर कोठे प्रयास उरतो

जुन्यापुराण्या आठवणींना हुसकावे मन
प्राणप्रतिष्ठेविण गाभारा भकास उरतो

अफवेच्या वणव्यातच निर्णय धुमसत ठेवू
सत्य जाळल्यावरती कुठला तपास उरतो

सहचर्याविण जगणे म्हणजे जगणे कसले?
रहदारी असते पण रस्ता उदास उरतो

नात्यातिल अन निर्माल्यातिल साम्य असे की
चुरगळल्यावरसुद्धा हाती सुवास उरतो

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सुरेख!
अपूर्णतेची गोडी कोठे पूर्णत्वाला?
इप्सित प्राप्तीनंतर कोठे प्रयास उरतो ---विशेष आवडलं Happy