ऑनलाईन शाळेचा एक दिवस

Submitted by mi_anu on 12 July, 2020 - 00:10

(हा दिवस आहे इंग्लिश मध्ये.पण लिहिणारीला तितकं फाडफाड इंग्लिश येत नाही त्यामुळे आपण मराठीतच वाचूयात.ही शाळा आणि मुलं पूर्णपणे काल्पनीक आहेत.असं करणारी खरी मुलं तुमच्या आजूबाजूला असल्यास तो योगायोग समजावा).

टीचर गोड आवाजात: "हॅलो मुलांनो.न्यू इंडिया ग्लोबल कॉम्पिटिशनल इंटरनॅशनल स्कूल च्या ऑनलाईन वर्गात मी मिथिला मॅम तुमचे स्वागत करते. आजचा क्लास मी घेणार आहे.क्लासवर देखरेख आणि तुम्हाला मदत करण्यासाठी पूर्ण क्लास भर शकुंतला मॅम मॉनिटर म्हणून हजर असतील.आपण चारही तुकड्यांचा क्लास एकत्र घेतो.मुलांनी त्यांचे व्हिडीओ चालू करू नये, आणि चॅट बॉक्स मध्ये काहीही लिहू नये.हे कळलं असेल तर आपण आता मुख्य विषयावर जाऊया ना?"
120 मुलं: (सर्व सूचना विसरून आवाज ऑन करून खच्चून ओरडतात) हो...........
टीचर(त्यांच्या जागी बसल्या बसल्या कपाळावर हात मारून घेतात.)
मॉनिटर टीचर कडक आवाजात: "कोणीही आवाज चालू करायचा नाहीये.कॅमेरा चालू करायचा नाहीये.क्लास चालू असताना समोर नाश्ता खायचा नाहीये.तुमच्या आजूबाजूला जर क्लास ऐकायला बघायला पालक बसले असतील तर त्यांनी सभ्य कपड्यात असायचं आहे.कोणीही मूल पूर्ण क्लास ला त्रास देत असेल तर आम्हाला त्यांना आजच्या वर्गातून बाहेर काढावं लागेल आणि आजची हजेरी लागणार नाही."

गाण्याचा क्लास चालू.
टीचर गोड आवाजात: "तर मुलांनो, आज आपण दिल है छोटासा हे हिंदी गाणं गायला शिकलो.मी गाऊन दाखवते.(इथे 2-3 पालकांनी 'हॅ हॅ हॅ.. आज गाऊन घातलाय होय मॅम नी' असा चिकट झालेला जोक मारला.)
"तर मुलांनो, आता तुम्ही गा बरं."
120 मुलं(आवाज ऑन करून तारस्वरात): "दिल है छोटासा...छोटी सी आशा..."
मॉनिटर मॅम(या आता कॉम्प्युटरमागे दीर्घ श्वास घेतायत)
"तुम्ही सगळ्यांनी आपापलं गायचं आहे.आवाज ऑन करून नाही.हेच सगळं मी काल पण सांगितलं होतं.आज परत सांगतेय"
(इथे 3-4 पालक आसुरी हास्य करून 'आम्हाला सांगत असता ना, मुलं नाजूक असतात, त्यांच्या अंगावर ओरडू नका, परत परत सांगू नका.आता गं लबाडे.. स्वतः ओरडतीयस ती?' असे पुटपुटतात.)

योगा क्लास चालू.
टीचर: "तर मुलांनो.आता आपण योगासने शिकणार आहोत.तुम्ही तुमचे कॅमेरा ऑन करा.आणि माझ्यामागे योगासनं करा.श्लोक पासोडकर,तुझे फक्त पाय दिसतायत, कॅमेरा नीट फिरव."
(श्लोक पासोडकर कॅमेरा ऍडजस्ट करता न आल्याने गरागरा फिरवतो आणि 120 मुलं आणि 2 टीचरांना गंजीफ्रॉक आणि 3 इंच बॉक्सर मध्ये टीव्ही बघत सोफ्यावर लोळत पडलेले त्याचे बाबा दिसतात.)
मॉनिटर टीचर(अतिशय कौशल्याने हसू आवरत): श्लोक पासोडकर, तुमच्या पालकांना ड्रेस कोड पाळायला सांगा."
(इथे श्लोक पासोडकर च्या बाबांना शाळेच्या व्हॉटसप ग्रुप वर याबद्दल 100 मेसेज येऊन त्यांचा अब्रूचा पुरता फालुदा झालेला असतो.ते टीव्हीचा मोह सोडून आत पळतात.)
"आयुषी सिन्हा, तुझ्या व्हिडीओत अंधार आहे.लाईट लाव."
(इथे आयुषी सिन्हा ची आई वायूवेगाने पळत येऊन मागच्या टेबलावरचा पसारा उचलून आत पळते.)

कराटे क्लास चालू.
कराटे सर: "मुलांनो आज आपण बेसिक किक शिकणार आहे."
मॉनिटर मॅम: "आणि विशेष गोष्ट अशी की आज सरांचा आणि आपल्या वर्गातल्या उज्वल मेहरा चा वाढदिवस आहे."
120 मुलं: (चॅट बॉक्स मध्ये आणि आवाज चालू करून हॅप्पी बड्डे उज्वल! हॅप्पी बड्डे सर!!" ओरडतात.)
मॉनिटर मॅम(आता या कॉम्प्युटर मागे एक स्ट्रेस बॉल दाबतायत): "कोणीही उज्वल मेहरा ला आणि सरांना हॅप्पी बड्डे करायचं नाहीये.मी केलंय ना?तुम्हाला हे मी काल आणि परवा वैभवी आणि वेद च्या बड्डे ला पण सांगितलं होतं.तुम्ही लक्षात का ठेवत नाहीये?120 जणांनी मेसेज चालू केले तर आपण वेळेत क्लास कसा संपवणार?"

आता सामुदायिक जीवन(याला सध्या evs म्हणतात) चा वर्ग चालू.
टीचर: "तर मुलांनो,साप अंडी देतात.पाल अंडी देते.सर्व पक्षी अंडी देतात.ज्यांना कान असतात ते पिलांना पोटातून जन्म देतात आणि ज्यांना कान नसतात ते अंडी घालतात.अंडी उबवायला त्यावर बसावं लागतं.पण मासे अंड्यावर बसत नाहीत कारण पाण्यात बसता येत नाही.शनया पाटील,आवाज का ऑन केलायस?"
शनाया: "मॅम, घुबड काय करतं?अंडी देतं का प्रेग्नन्ट होतं?त्याला कान आहेत."
टीचर:"शनाया, नीट ऐकत का नाहीस?मी सगळे पक्षी अंडी देतात म्हटलंय ना?"
मॉनिटर मॅम: "शनाया आणि बाकी सगळे, टीचर काय सांगतात नीट ऐकून मग प्रश्न विचारत जा.धैर्य सक्सेना, तू चॅट बॉक्स मध्ये काय लिहिलंयस?"
(इथे सगळे चॅट बॉक्स वाचतात.धैर्य सक्सेना ने 'आय वॉन्ट टू किस हर' लिहिलंय.)
मॉनिटर मॅम(आता यांचा हल्क व्हायलाच आलाय): "धैर्य सक्सेना, तुझा आवाज आणि व्हिडीओ चालू कर.पालकांना बोलाव.तू काय लिहिलंयस?कुठून शिकता हे सगळं?मागे टीव्ही चालू आहे का?तुला मला क्लास मधून आताच्या आता बाहेर काढावं लागेल."
धैर्य सक्सेना:"सॉरी मॅम, मी मित्राशी बोलत होतो.चुकीच्या विंडोत लिहिलं."
(इथे धैर्य सक्सेना चे आईबाबा 'धरणी गिळेल तर बरं' असे चेहरे करून त्याच्या आजूबाजूला उभे आहेत.धैर्य सक्सेना चे टीव्ही राईट्स किमान 1 महिना जप्त होणार आहेत.)

टीचर(आता यांचा पण धीर सुटत आलाय):"बरं मुलांनो, आपण विषयाकडे वळू. उद्या मला नॅचरल आणि मॅन मेड फायबर च्या सगळ्या प्रकारचा एक एक नमुना दाखवायला आणायचा आहे."
मॉनिटर मॅम:"मुलांनो, नीट ऐका. कपड्याचे नमुने दाखवून परत पालकांना द्यायचे आहेत.कोणीही काहीही कापायचं नाहीये.कागदावर फेव्हीकोल ने चिकटवायचं नाहीये.पूर्ण नमुने आणायचे आहेत.नमुने योग्य डिसेंट कपड्याचे हवेत.अंडरवेअर्स चालणार नाहीत."(या मॅम 120 चोरांना एकदम चांगल्या ओळखणाऱ्या अलिबाबा आहेत.)

मध्येच काही मुलांच्या घरातले लाईट जातात.
मॉनिटर मॅम:"मुलांनो, मला 'लाईट गेलेत' वगैरे मेसेजवर सांगू नका.नेटवर्क वेगळं बॅटरीवर चालणारं वापरायचा प्रयत्न करा.नेटवर्क आलं की गुपचूप 'मी आलो' वगैरे चॅट बॉक्स मध्ये न लिहिता परत या."
टीचर:"तर मुलांनो, तुम्ही काल आणलेले वेगवेगळ्या पानांचे नमुने मला कॅमेरा ऑन करून न बोलता दाखवा."
(इथे कॅमेरा ऑन केल्यावर दिव्या शहाणे आणि तिचा मोठा भाऊ बॅटरी मॉडेम ची खेचाखेची आणि मारामारी करताना 120 मुलं आणि टीचर ना दिसतात.)
मॉनिटर मॅम:"दिव्या शहाणे,बिहेव्ह युवरसेल्फ.मी तुला आणि तुझ्या दादाला दोघांनाही दादाच्या मॉनिटर मॅम ना सांगून क्लास मधून बाहेर काढीन.मॉडेम मध्ये ठेवा.दोघांना सारखी रेंज येईल.आणि गुपचूप क्लास मध्ये लक्ष द्या."

इथे कॅमेरा ऑन करून सात्त्यकी बॅनर्जी ची आई येते.
आई:"मॉनिटर मॅम,12.30 वाजले?क्लास कधी संपणार?आम्हाला जेवायचंय.सात्त्यकी च्या बाबांना आणि मला मीटिंग आहेत."
मॉनिटर मॅम(मनात:"एक नंबरची चोंबडी स्नॉब मेली!!") जाहीरपणे गोड आवाजात: "तुम्ही सगळे जेवायला जाऊ शकता.आम्ही क्लास वेळेत संपवायचा प्रयत्न करत असतो.मुलं उशीर करतात. तर मुलांनो, तुमची जेवायची वेळ झाली की तुम्ही काहीही न सांगता, बाय न म्हणता निघून जाऊ शकता.तुम्हाला जेवतानाही टीचर काय म्हणतात ऐकता येईल.इथे आवाज ऑन करून विचारायची गरज नाही."
आई:"थँक्स मॅम."(मनात: काहीही केलं तरी ओरडता ना तुम्ही आमच्या मुलांना.म्हणून विचारावं लागतं.)
टीचर:"तर मुलांनो, आता आपण पौष्टिक अन्न आणि अन्न दर्जा पिरॅमिड याबद्दल शिकूया."

1.00 दुपार
(आता मुलं भूक लागली म्हणून समोर बाकरवडी, शेव,चिप्स घेऊन बसली आहेत.)

मॉनिटर मॅम:(आता यांचा धीर सुटत आलाय.)"मुलांनो, आजचा क्लास संपला आहे.सर्वांनी उद्या वेळेवर, आधी नाश्ता तयारी आवरून क्लास ला बसायचं आहे.क्लास मध्ये डिसेंट कपडे घालायचे आहेत.लोळत क्लास अटेंड करायचा नाहीये.पालकांनी डिसेंट कपडे घालून ड्रेसकोड पाळायचा आहे.कोणीही चॅट विंडो चालू करून फी बद्दल, नेटवर्क बद्दल प्रश्न विचारायचे नाहीयेत.तुम्हाला प्रश्न विचारायला वेळ दिला जाईल त्यातच, शिकवलेलं नीट ऐकून जे कळलं नाही तितकेच प्रश्न विचारायचे आहेत.हॅप्पी बड्डे विश करायचं नाहीये.स्टे होम स्टे सेफ."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिलारीयस आहे.
आजच 3 मुलांनी चित्रं, 2 मुलांनी पी पी टी दाखवलयात टीचर ना.
टीचर ना 3 तास ऑनलाईन शाळा झाल्यावर नक्की एक रक्तदान केल्याचा थकवा येत असेल.
कुकर च्या शिट्ट्या Happy
आमच्याकडे साहेबांच्या मीटिंग मध्ये संध्याकाळी वाजतात कुकर च्या शिट्ट्या.आता दूरदेशी साहेबाला पण माहितीये.त्याला 'डॅटस माय राईस कुकर ' असं सांगीतलंय
कॉल चं भारुड सकाळ ते संध्याकाळ चालू असेल तर कुकर चा आवाज येणारच.मिक्सर चे पण येतात.दुपारी दाणदाण भांडी लावल्याचे आवाज पण येतात.पार्ट ऑफ लाईफ यु नो Happy

खूप हसले लेख वाचून, स्पेशली हे 'पालकांनी डिसेंट कपडे घालून ड्रेसकोड पाळायचा आहे'.
अगदी असच चालते ऑनलाइन क्लासमध्ये.
मुलाचा पहिलाच क्लास होता, मुलगी लहान असल्यामुळे, तीने मुलाला डिस्टर्ब करु नये म्हणुन दुसऱ्या रुममध्ये बसवले होते. तास संपताच त्याच्या टिचरचा मला कॉल, रेहान तास चालू असताना स्क्रीन वर लिहितोय, गाणे गुनगुनतोय.
आम्हाला हसावं की त्याला रागवावे समजेना.

Pages