चिमणी

Submitted by अरिष्टनेमि on 11 July, 2020 - 17:02

माझ्या लहानपणी सुदैवानं पोकेमॉन वगैरे जन्मले नव्हते आणि असतील तरी भारतात अवतरले नव्हते. त्यामुळं लहानपणी असंख्य सुंदर गोष्टी ऐकता आल्या, चष्मे न लागता वाचता आल्या. जवळ-जवळ सगळ्या गोष्टीत चिमणी-कावळा असायचेच अन् या गोष्टीतल्याच हजारो चिमण्या गावभर असायच्याच. अगदी कधीही दिवसभरात एक मिनीट चिमणी नाही असं नाही. बघता-बघता अचानक चिमणी हा पक्षी कधीकाळी इतका दुर्मिळ होईल असं वाटलं नव्हतं.

रस्तो-रस्ती दाणे टिपणा-या, खेडो-पाडीच्या गोष्टीतल्या या चिमणीचा आंतरराष्ट्रीय दिवससुद्धा साजरा होऊ लागला आणि एकदमच हा किरकोळ पक्षी महागड्या इंग्रजी गुळगुळीत मासिकांची-पेपरांचीसुद्धा पानं भरु लागला, थेट गो-या लोकांच्या सभांत जाऊन थाटात बसला. या चिमणीच्या मागं लहानपणी गलोल घेऊन धावणारी पोरं संपली पण अवघं जग धावू लागलं. भले-भले डोकं खाजवू लागले. निष्कर्ष निघू लागले. पीकांवर विषारी कीटकनाशकांची फवारणी, मोबाईल टॉवर्सची उभारणी, इत्यादि सारं तोलून, तपासून पहायला सुरुवात झाली.

आता मला याचं काय बुवा? मी काही संशोधक नाही, मोठा शास्त्रज्ञ नाही. मोठा सोडा, पण किरकोळात मोजावा इतकाही शास्त्रज्ञ नाही. अजिबात, थोडासुद्धा नाही. पण .... चिमण्या पकडून त्या पाळणे हा माझा एक लहानपणीचा जिव्हाळ्याचा छंद होता. लबाडीनं पकडलेल्या चिमण्या आणि शिताफीनं फाशात पकडलेले उंदीर हे माझे यशस्वी पाळीव प्राणी. दीडशहाण्या वयात विंचू पाळले. पण त्यातल्या त्यात ब-या चिमण्याच. घरात कोणाच्या शिव्या खाव्या लागणार नाहीत अशा पद्धतीने शक्यतो खास ठिकाणी सतत माझ्याकडं चार-दोन चिमण्या असायच्याच. म्हणून चिमणीबाबत बोलावं एवढा अधिकार एकाच गोष्टीमुळं; मी चिमण्यांत वाढलो, चिमण्या खेळलो, चिमण्यांच्या गोष्टी ऐकत झोपलो. त्यामुळं माझी आपली एक भोळी समजूत की माझी चिमणी कोणाला समजो की न समजो, मला जराशी समजली.

चिमणी का कमी झाली याची जी बरीच कारणं देतात त्यातल्या त्यात जास्त रोख असतो मोबाईल टॉवर्सकडे. यावर काही तरी शास्त्रशुद्ध अभ्यास झालाच असेल. पण जर यामुळं चिमण्या नष्ट झाल्या तर शहरात राहणारे बुलबुल, शिंजीर, पारवे, कावळे, होले, घारी, कोकीळ, दयाळ, पोपट, हे कसे टिकले? यांच्यावर का परीणाम झाला नाही? मला नशास्त्रज्ञाला असं आपलं वाटतं की पूर्वीपासून शहरं आणि खेड्यात आढळणा-या इतर पक्ष्यांच्या बाबतीत अधिवासात मोठ्या प्रमाणात बदल झाला नाही. फरक पडला तो चिमणीला.

चिमणीची घरटी नेहमी कुठं? तर मातीच्या घराच्या भिंतींना पडलेल्या भोकांमध्ये, वळचणीला, घरातल्या ट्यूबच्या पट्टीवर, पंख्याच्या वाटीवर, फोटोफ्रेमच्या मागे वगैरे. आता घरंही मातीची राहिली नाहीत अन् माणसंही. त्या घरांबरोबर चिमण्यांची घरटीही गेली. घरं सिमेंट-काँक्रीटची आली, माणसाची मनंसुद्धा सिमेंटची झाली; ऊन, वारा, पाणी, पाऊस, भावना, दया काहीच त्यात जाऊ शकत नाही. घरात कोणाला चिमण्यांची घरटी नको आहेत. ट्यूबची पट्टी, पंख्याची वाटी, फोटोफ्रेम सगळं साफ, स्वच्छ. खिडक्यांना जाळ्या, दरवाजे बंद. चिमणीनं एखादी काडी आणलीच, तर भयंकर चिडचिड करुन दुस-या मिनीटाला सगळं कचऱ्यात फेकून देणार. चिमणीची पिल्लं वाढावीत कुठं? कशी पुढची पिढी जन्माला यावी? चिमण्यांना घर हवंय, घर.

अशातच एकदा शेजारी फर्नीचरचं काम सुरु झालं. मी म्हटलं ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’. चला एक रिकामा उद्योग करुन पाहू. शेजारच्या चालू कामातून उरलेले टाकाऊ प्लायवुडचे तुकडे सुतारदादा रोज कच-यात फेकून देत. मी एक दिवस हे फेकून दिलेले तुकडे गोळा केले आणि बायकोची जालिम नजर सहन करीत घरी आणले. छोटे खिळे आणले. हातोडी घरात होतीच. संध्याकाळी शेजारचं काम संपवून सुतारदादा निघाले, मी पाळतीवरच होतो. त्यांना पटवून त्यांची छोटी करवत आणली.

हॉलमध्ये बसून प्लायवुडचे तुकडे समोर पसरले अन् मी समस्त अवजारांसह स्थानापन्न झालो. बायकोचा पत्नीधर्म तिला सांगू लागला, “अशी भिकार कामं करण्यापेक्षा घरातला पसारा आवरून ठेवायला काय होतं याला एखाद्दिवशी?” चोहो दिशांनी येणा-या नकारात्मक लहरी मीही पतीधर्म पाळून गेंड्याच्या कातडीनं अडवून धरल्या. प्लायवूडचे ते तुकडे जुळवून त्यावर पेन्सिलनं रेषा मारल्या. पण बुद्धी गटांगळ्या खात होती. मग रेषा मारुन पेन्सिल आधी कानावर अडकवली. जश्शी पेन्सिल कानावर अडकवली, तस्सा मग एकदमच खट्टकन् फॉर्मात आलो. आदर्श सुताराच्या कर्तव्याधीन मुद्रेत बसून प्लायवुड पायात पकडलं. कराकरा करवत चालू लागली. फराफरा लाकडाचा भुसा उडू लागला. तरातरा मग बायको साक्षात उभी ठाकली. करवतीबरोबर बायकोची जीभ चालू लागली. इतकं सुंदर सर्जनशील काम तिनं चक्क थांबवलं आणि मला चंबूगबाळासह थेट मागच्या बाल्कनीत हाकलून दिलं. या देशात प्रज्ञावंत लोकांची किंमतच नाही. ठीक आहे. हाकलेना का! त्याचं काय वाईट नाही. “स्त्री ही क्षणाची पत्नी आणि ‘अनंत काळा’ची माता आहे.” आता हे कोणी म्हटलंय माहीत नाही. पण तो ‘अनंत काळा’ सापडला तर त्याला सुनावणार आहे एकदा.

काम थांबवायला हरकत नाही हो. घटनेच्या कोणत्यातरी कलमानं सर्व पत्न्यांना असा अधिकार दिलाय असं पेपरात कधी कधी वाचल्यासारखं झालंय. पण चक्क ‘हॉल झाडून घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही’ असा दम निशस्त्र नव-याला देणं हा काय न्याय झाला का? तिची अशी ही धारदार जीभ करवतीनं कचकन् कापून टाकावी असा रास्त पण अघोरी विचार मनात आला. पण करवत दुस-याची. बायकोनं जीभेनं मोडली तर भरून द्यावी लागेल म्हणून गप्प बसलो. मीही म्हटलं, “ही घराची शेवटच्या टोकाची बाल्कनी. याच्यापुढं कुठं हाकलशील? जागाच नाही.” अखेरीस माझ्या कुशल कामगिरीच्या सर्व खुणांवर माझ्या हातानं झाडू फिरवून त्या सा-या खुणा कचरापेटीत शहीद झाल्या. बाकी साहित्य गोळा करून बाल्कनी गाठली.

नव्या ठिकाणी जम बसायला वेळ लागला नाही. उचित पोझिशन घेतली आणि कार्यास सुरुवात केली. प्लायवुड आखणीनुसार कापून हव्या तशा छोट्या फळ्या केल्या. काही पट्ट्या काढल्या. खिळे, हातोडीनं त्याची दोन खोकी बनवली. “वा! सुंदर.”

चिमणीला आत जायला एका बाजूनं दोन्ही खोक्यांना छिद्रं केली. तरी सुतारकामात बुद्धी कमी पडल्यानं एक खोकं मापात झालं, एक झालं लांब. लांब खोक्याचं छत मग उचकून काढलं. पुन्हा तंतोतंत मापं घेतली आणि त्यात मधोमध एक पार्टीशन अचूक ठोकून दोन भाग केले. दुस-याही बाजूनं एक छिद्र केलं. हे एक छानपैकी डुप्लेक्स तयार झालं. एक बि-हाड इकडून, एक तिकडून. तिकडं स्वयंपाकगृहात कांदा चिरणा-या पत्नीला माझ्या दैदीप्यमान कर्तबगारीची खबरबात नव्हती. मी फटाफट बाल्कनी झाडून चकाचक स्वच्छ केली. सतत बायकोनं आदेश द्यायचे आणि आपण पाळायचे. त्यापेक्षा तिनं आदेश देऊच नये याचा पक्का बंदोबस्त. हो, पुरुषार्थ म्हणून काही आहे की नाही!

दोन्ही अंतिमत: तयार खोक्यांना वर तारा बांधल्या. छोटं खोकं बाल्कनीत छताजवळ लटकवलं. जे दोन खोल्यांचं होतं, ते हॉलच्या खिडकीत बाहेरच्या बाजूनं लटकवलं. बायकोला दाखवून दिलं. ती खूष झाली आणि तिनं बोलून पण दाखवलं की बाबा, बरं झालं संपलं एकदाचं. आता परत घरात कचरा नाही करणार ना!

घरटी लावून चार-दोन दिवस झाले होते. चिमण्या येऊन बसू लागल्या खिडकीत. बायकोलाही आनंद वाटू लागला. एक दिवस चिमणराव सौ.ना घेऊन आले. चिमणराव तंतोतंत आमच्यासारखे. घर बाहेरुन पाहिलं, जरासं दारात बसून आत डोकावून पाहिलं. चार भिंती जागेवर आहेत. वर छत आहे. बस झालं. सौ. तशा नव्हत्या. चिमणी झाली म्हणून काय? जातीची बाईच ती. सौं.नी जरासं बारीकच पाहिलं. दोन-दोनदा आत जाऊन फिरुन आल्या. वर बसून वाकून आत पाहिलं. बाहेर बसून डोकं आत घालून पाहिलं. मग थोडी चिवचिव झाली आणि दोघंही परत गेले. काय निर्णय झाला काही समजलं नाही. घरांचं इंटेरिअर आम्ही केलं नव्हतं. बायको म्हणाली, "तेवढा चॉईस चिमणरावांच्या मंडळींना ठेवू. नाही तर उगीच डोक्याला चिव-चिव करतील.”

आम्हाला हौस होती; ग्राहकाला गरज आणि घाई दोन्ही. मग काय! पहिल्याच आठवड्यात जाहिरातीविना दोन्ही स्कीम्स बुक झाल्या. दोनेक दिवस त्यांनी घर तपासून, फिरुन पाहिलं. लोकेशन, शेजार, रुम्स, प्लॅन वगैरे आवडलं आणि मग निर्णय घेऊन गृहप्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लगेचच घर सजवायला घेतलं. रोज त्यांच्या घराखाली काडी-कचरा जमू लागला. मला आणि विशेष म्हणजे साक्षात माझ्या बायकोला रोज येणारा तो काडी-कचरा उचलण्यात धन्य-धन्य वाटायचं. पहिल्यांदाच उद्योग केला आणि सुपरहीट झाला! डुप्लेक्स आणि एकाकी घर, तीन जोड्यांनी दोन्ही नांदते केले.

रोज घरसामान आणायला श्री. आणि सौ. बाहेर पडले की येता येता खिडकीत पडलेली भाताची शीतं चोचीखाली धरुन डुप्लेक्सवाले दोन चिमणे बायकांच्या नजरा चुकवून घटकाभर चिवचिवत. मी टी.व्ही. पहात असलो की त्यांच्या पोटात दुखे. मग एक दुस-याला सांगे, "काय आयुष्य आहे पहा आपलं! बायका घरात बसू देईनात. सारखं सुरुच आहे, गवत पाहिजे, काड्या आणा, कापूस संपला. पलीकडच्या गवताच्या मैदानात किडे आहेत छान टप्पोरे. परवाच गवत आणायला गेलो तेंव्हा दिसले होते. पण एक पकडायला वेळ नाही. कंटाळा आला यार तीन दिवस नुसता भात आणि बाजरी खाऊन. या माणसाचं बरंच आहे म्हणायचं. बायको मस्त गरमागरम स्वयंपाक करुन वाढते. हा मस्त लोळून टी.व्ही. पाहतो.” तितक्यात घरातून डोकावून एखादी चिमणी ओरडेच, "अहो! कित्ती वेळ झाला? गवत आणायला म्हणून पाठवलं तर तिथं बसलाय चकाट्या पिटत. इथं माझे मेलीचे पंख दुखले सतरा हेलपाटे घालून. तुम्हाला काही नाहीच वाटत बायकोचं.” अशी तणतण झाली की चपळाईनं दोघं दोन दिशांना सूर मारुन निघत, पंखाचा आवाजसुद्धा होऊ देत नसत.

अशा टेन्शनमध्येच त्यांचे संसार फुलले आणि एका सकाळी हॉलच्या खिडकीत लावलेल्या डुप्लेक्सच्या एका घरातून नाजूक ट्याहां ऐकू आलं. पाच-सात दिवसाच्या अंतरानं तिन्ही घरं खेळती झाली. बाळांचे लाड पुरवता पुरवता आई-बाबांची दमछाक होऊ लागली. आमच्या घरात शांतता नावाला राहिली नाही. तिन्ही घरांत पोरांचा आरडा-ओरडा, बडबड. पोरं रांगती झाली. आई-बाप बाहेर गेले की पोरं दारातून डोकं बाहेर काढून बाहेर बघत. खाली जमीन किती खोल आहे, शेजारी हॉलमध्ये माणसं कशी बिनपंखाची राहतात आणि बिनचोचीची जेवतात! पण अजून घराबाहेर पडायची त्यांची हिंमत होत नव्हती. हळू-हळू ती जाणती झाली आणि एक दिवस डुप्लेक्समधलं एक पोर हॉलच्या खिडकीत उतरुन "आई-आई" करुन ओरडायला लागलं. धाकटी पोर लगोलग घराबाहेर निघून त्याच्यामागं येऊन गुपचूप बघत बसली. आई-बाप चोचीत घास घेऊन भरवत राहीले.

एखादा दिवस घराच्या परिसरात हा सुखसोहळा पाहिला. मग पोरांच्या पंखात चांगलंच बळ आलं आणि ती घर सोडून कायमची गेली. घर शांत शांत झालं. करमेना. राहून राहून घराजवळ जाऊन आम्ही कानोसा घेत असू; घरात कोणी आलंय का? दिवस सुने सुने जाऊ लागले. एकदम एका सकाळी बाल्कनीत लावलेल्या घराजवळ गडबड ऐकू आली. हॉलमधून उठून गेलो. पाहिलं तर सौ. चिऊताई घराच्या दारात बसून, मान वाकडी करुन खिडकीच्या गजावर बसलेल्या चिमणरावांना सांगत होत्या, “अहो, मला तर बाई वाटतं इथंच हलवावं बि-हाड. दुसरे कोणी येण्याआधी आपलं सामान लावून घ्यावं म्हणते मी. त्या डुप्लेक्सपेक्षा हे बरं मोकळं मोकळं, स्वतंत्र. तिथं मेलं जरासं चिव-चिव करायची म्हटलं तर ती शेजारची बसलेलीच असायची भिंतीला कान लावून.”

चिमणरावांनी एकदा पंख उघडून मिटवले. एक डोळा मिटून, डाव्या पायाच्या नखानं चोचीचा शेंडा खाजवला आणि भुर्र करुन पतीधर्मानं काड्या गोळा करायला उडून गेले.

चिमणी.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप छान...
आमच्या अंगणात आज केवळ 30-40 चिमण्या येतात काही वर्षांपुर्वी मोजता पण येत नसत इतक्या असत.

मस्तच !!

श्री. किरण पुरंदऱ्यांच्या 'पक्षी: आपले सख्खे शेजारी' पुस्तकात त्यांनीही चिमण्या कमी होण्याची हीच कारणं सुचवली आहेत. घरांची बदललेली रचना, खरकटं बाहेर न टाकण्याची सवय वगैरे.
पण कोकणात आमच्या गावातूनपण चिमण्या मधली बरीच वर्षं नाहीशा झाल्या होत्या. आता क्वचित दिसतात. असं का? तिथे तर नवीन प्रकारची, बंद घरं बांधली गेली नव्हती.
आणि इथे चक्क बंगळूरच्या विमानतळावर भरपूर चिमण्या दिसायच्या सुरुवातीला (विमानतळ नवीन होता तेव्हा)
दोन वर्षांपूर्वी नारायणगावला एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो तेव्हा तिथल्या अंगणात चिमण्या होत्या भरपूर. मुलांनी तेव्हा पहिल्यांदाच इतक्या जवळून चिमण्या पाहिल्या.

मस्त लेख आणि छान वर्णन
फक्त - ((एक दिवस डुप्लेक्समधलं एक पोर हॉलच्या खिडकीत उतरुन "आई-आई" करुन ओरडायला लागलं. धाकटी पोर लगोलग घराबाहेर निघून त्याच्यामागं येऊन गुपचूप बघत बसली. आई-बाप चोचीत घास घेऊन भरवत राहीले.)) हे जर प्रत्यक्ष अनुभवले असेल तर खरेच मला तुमचा हेवा वाटू लागलाय.
IMG-20200712-WA0007.jpg
इकडे गेल्या वर्षी एक पुठ्ठयाचा खोका वापरून मी बनवलेले आणि साधारण महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर त्यात राजा राणीने संसार थाटला आणि आपल्या छोटुश्या राज्याला राजकुमार राजकुमारी सुद्धा दिले. ३ पिल्ले होती आणि घरटयाच्या तोंडाशी आलेल्या त्यांच्या चोची आणि डोके फक्त दिसायचे बाकि ते मोठे होऊन काही खिड़कीत बसले नाहीत की आई बाबा त्यांच्या मागे मागे घास भरवायला आलेले दिसले नाही. पिल्ले आमची सेंड ऑफ़ पार्टी न घेताच उडून गेली.
आता ही पिल्ले मोठी होऊन त्यांच्या रिवाजात बसत नसलेले लव्ह मैरेज करून आले आणि त्यांना आई बापाने घरात घ्यायला नकार दिलाच तर त्यांच्यासाठी महिन्याभराने एक नवीन फ्लॅट आमच्या दुसऱ्या बाल्कनीमध्ये तयार ठेवला.
IMG-20200712-WA0008.jpg
थोडा कार्पेट एरिया वाढवला आणि इतर एमिनिटीज सुद्धा Happy जसे की त्यांना घराचे इंटीरियर करताना कोवळे गवत लागते म्हणून त्या घरट्याखालीच खिड़कीत दूर्वा लावून ठेवले एका ट्रे मध्ये आणि त्यांच्या फ्लॅटच्या गच्चीत सुके गवत आणि पिंजलेला कापूस ठेवून दिला.
IMG-20200712-WA0009.jpg
दोन्ही घरांचा हा २रा पावसाळा सुरुय आणि पुट्ठा असूनही काही त्रास जाणवला नाही. अर्थात गच्चीचा पत्रा आहेच त्याची काळजी घ्यायला. पण मला आधी वाटलेले की दमट पणाने कदाचित दर वर्षी नवीन कन्स्ट्रक्शन करावे लागेल Wink
गेल्या वर्षभरात ३ प्रसूती सुखरूप पार पडल्यात.

धन्यवाद दयानंद बरगे, मामी, pravintherider , मी चिन्मयी, चंद्रा, पाथफाईंडर , मऊमाऊ , वावे, अज्ञानी, धनुडी, धनवन्ती

@चंद्रा, मऊमाऊ - दोन्ही घरांचे फोटो आता नाहीयेत माझ्याकडं. जिथं ही घरटी लावली तिथून दुसरीकडं राहायला गेलो.

@ वावे - मला वाटतं निसर्गात काय घडतं आहे हे समजायला आपली बुद्धि खरंच तोटकी आहे. चिमण्या कशा कमी होत गेल्या आणि परत आल्या हे प्रत्यक्ष पाहिलं असल्यानं याचं उत्तर तुम्हालाच कदाचित सापडेल. नारायणगाव, जुन्नर, ताम्हीणी वगैरे पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात खरंच चिमण्या ब-याच दिसतात अजून.

@ अज्ञानी - Happy रास्त शंका आहे.
झालं असं की ते घरटं होतं हॉलच्या खिडकीत. घर लहान असल्यानं बसायला हॉल हीच बरी जागा होती. म्हणून बराच वेळ हॉलमध्ये जायचा. चिमण्यांच्या हालचाली अगदी दिसायच्याच. त्या दिवशी एकदमच हे दिसलं.
तुम्ही केलेलं पुठ्ठ्याचं घर छानच आहे. पक्ष्यांनी स्विकारणं हीच अचूकतेची मोठी पावती असते. पण मला वाटतं त्याचं दार थोडं मोठं झालंय. त्यामुळं ते पुढंमागं साळुंक्या बळकावू शकतात. शिवाय कावळे, भारद्वाज अशा घरट्यांचा धांडोळा घेत फिरत असतात. त्यात घुसून दुस-या टोकाशी असलेली पिल्लं ओढून नेणं त्यांना सोपं होतं. चिमण्यांना साधारणपणे दीड-दोन इंच व्यासाचं दार पुरतं. साधारण २-३ वेळा पिल्लं घातल्यानंतर घरटं भरून जातं. चिमण्या आतल्या आतच २,३,४ मजली घरटं करतात. मग ते रिकामं करून परत लावायचं असेल तर वरून उघडायची काही तरी सोय हवी.
माफ करा आगाऊ सल्ल्याबद्दल. Happy

वरुन उघडायची सोय ठेवलीय पण नक्की कधी गरज लागते ते नव्हते माहीत. आताच्या प्रसूती नंतर साफ़ सफाई करून घेईन त्यांच्या फ्लॅटची नक्कीच. बाकी इतर पक्ष्यांपासून काहीही त्रास झालेला नाहीये अपवाद बुलबुल फक्त. कारण त्यांना मीच नेहमी एक दिवसाआड़ पिकलेले केळे खिड़कीत ठेवायचो अणि रोज ४ वेळा किमान पाचेक बुलबुल ते खावून जायचे. (दोन दिवसात एक केळे साफ़ व्हायचे). नेमके चिमणी आणि बुलबुलसाठी ती खिड़की कॉमन असल्याने घरट्यात पिल्ले असताना खाली कठड्यावर बुलबूल आले की चिमणा चिमणी आरडा ओरडीने घर डोक्यावर घ्यायचे. म्हणून मग तेवढे दिवस बुलबुलसाठी खानावळ बंद असा बोर्ड लावून दोन्ही गटामध्ये यशस्वी तह करण्यात आला.

काही वर्षांपूर्वी, असे एक लाकडी घरटे विकत घेतले होते.ग्रीलमधे वरच्या भागात ठेऊन दिले होते.बर्‍याच चिमण्यांनी तपासणी केली,पण पसंत पडले नाहीसकदाचित साळुंक्यांनी केलेली पहाणी आवडली नसावी.काही वर्षे तसेच ठेवले.मग काढून टाकले.
लाकडी घर घ्यायच्या आधी एका आडव्या पडलेल्या रिकाम्या कुंडीत चिमणीने घरटे केले होते.म्हटले काय ही लग्बग चालली आहे? शेवटी कळले की घर बांधत आहेत.माझा पीसी,अगदी खिडकीच्या बाजूला असल्याने मला त्यांच्या हालचाली दिसायच्या.चिमणीच्या डोळ्यात मुर्तीमंत अविश्वास दिसायचा.चिमणा मात्र खिडकीवर ठेवलेले चपातीचे तुकडे न्यायचा.समाधान वाटायचे. आता तर आम्हीच जाळीत आहोत कबुतरकृपेने!
कालपासून मात्र साळुंक्याची जोडी येतेय.छान वाटते त्यांचा आवाज ऐकून.