**काऱ्हळाची चटणी**

Submitted by मी_अस्मिता on 10 July, 2020 - 17:06

काऱ्हळाची चटणी

तुम्ही कदाचित याला काऱ्हळे म्हणत असाल , मग ही काऱ्हळ्याची चटणी होईल.

साहित्य

दोन मध्यम वाटी काऱ्हळं, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, चार चमचे तिखट, दोन चमचे जिरे, एक चमचा मीठ, थोडे तेल.

भाजण्यासाठी टिप...

सगळ्यात आधी काऱ्हळं भाजून घ्या. "मंद आचेवर " हे फारच महत्त्वाचे आहे कारण हे काळे असल्याने कळत नाही रंग बदललेला , मग आपण जास्त भाजतो आणि चटणी कडू होते. स्वानुभव Sad . चक्क फेकून द्यावे लागले एकदा मला मगं कानाला खडा लावला.
काऱ्हळाची चव अगदी nutty/earthy का काय असते तर तिची तीव्रता थोडी कमी करून तरीही ती appreciate करण्यासाठी थोडे भाजणे आवश्यक आहे. एकदा दोन वाटी काऱ्हळं वाया घालवल्यानंतर माझा आत्मविश्वास गेला मगं तर मी microwave मध्येच ताटात पसरवून भाजले तरी चांगली चटणी झाली. यामुळे गेलेला आत्मविश्वास परत आला तर आता मी पुन्हा gas वर कढईत भाजते आहे . Happy

पाककृती

१. काऱ्हळ भाजून घेणे. पटकन भाजतात आणि मूळचा काळा रंग चमकदार दिसायला लागतो. चुट् चुट् आवाजही येतो लगेचच आच बंद करा. व कढई उचलून थंड ठिकाणी ठेवा.

(यात आताच जिरे ही टाकू शकता मी विसरते नेहमीच !)

२. थंड झाल्यावर सगळे साहित्य टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या , मगं पुन्हा थोडे तेल टाकून एकदा फिरवून घ्या. व्यवस्थित भुकटा दिसतो काळा -गडद तपकिरी.

*****खाण्यासाठी टिप...*******

चटणी तयार. तेल टाकल्याने ..पोळीसोबत कोरडी खात असाल तर कमी "ठोठरा" (कित्ती दिवसांत हा शब्द बोलला वा लिहिला नव्हता.) बसतो , थोडी जास्त टिकते व चवही चांगली लागते. दहा पंधरा दिवस टिकते. हवेत आर्द्रता कमी असेल तर जास्तही टिकेल.

वरून तेल किंवा फोडणी घेऊन खाऊ शकता. छान लागते. मुलांना वाढताना तेलाची विहीर -तेलाची विहीर खेळता येते Happy !

******************************
फोटो
१.Image-9591.jpg
*
२. Image-2204.jpg
*
३. Image-4392.jpg

*
४. Image-4678.jpg

* तेलाची विहीर Happy

५. Image-4054.jpg

********************************

वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खावेत म्हणून अस मी काही नेहमीच करत रहाते. अशीच जवसाची चटणीही करता येते, मी करते सध्या भारतातंन आणलेले काऱ्हळं आहेत तर त्यावर तुटून पडलेय. जवस अमेरिकेत मिळतं पण काऱ्हळं कधी दिसलं नाही. त्यामुळे याचे जरा अप्रुप आहे.
माझे आजोळ लातूर जिल्ह्यातील असल्याने आमच्याकडे आजन्म कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी ही लोकप्रियतेत नंबर एक !. शिवाय तीळ, खोबरे, तीळ-खोबरे, जवस, काऱ्हळं, पूडचटणी ही तिच्या खालोखाल. बहुतेक घरात एकावेळी शेंगदाण्याच्या चटणी सोबत ह्यापैकी एक कोरडी चटणी असतेच असते. याचा फायदा म्हणजे कधी भाजी किंवा वरण यापैकी काही विशेष झाले नाही तर चटणी saves the day.....!

रूची वाढविण्यासाठी वरणभातासोबत , खिचडी सोबत किंवा सकाळी शिळ्या चटणीपोळीचा रोल करून मगभर coffee / चहा पिऊन कामाला लागण्यासाठी !! आम्ही घरात लोणच्याच्या आधीचा अधिक चांगला पर्याय म्हणून कायम चटण्या तयार ठेवतो. मी तर नको उगीच जास्तीचे मीठ म्हणून लोणचं खाणं जवळपास बंदच केलय. अशात वेगवेगळ्या बीयांचा वापर करण्याबाबत चांगले-चांगले वाचण्यात आले आहे. त्यामुळे आवर्जून करते. खरं तर आहाराचा भाग नेहेमीच होता पण आता approval मिळाल्याने महत्त्व कळलेय.
माझा रोजचा स्वयंपाक हा अगदी मराठवाडी पद्धतीने बनवलेला शाकाहारी आणि साधा असतो. त्यामुळे रोजच्या खाण्यात तीळ, जवस , खोबरं (सुकं) , शेंगदाणे, खसखस यापैकी काहीतरी असलेल्या भाज्या आणि काळा मसाला चिंच गूळ घातलेले वरण वगैरे असते. कधीतरी वेळ खाऊ पंजाबी भाज्या किंवा दाळी करते पण त्याचा लवकरच कंटाळा येतो हे निरिक्षण आहे.
मुलगी मागे लागली आहे पूडचटणी कर म्हणून पण खूप पसारा होतो म्हणून पुढे ढकललेय. त्याचीही रेसिपी नक्कीच टाकीन. Happy

*************************************
धन्यवाद Happy !
अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही इकडे कारळे म्हणतो. 'काऱ्हळं' पहिल्यांदाच ऐकलं. मी कधी जिरं घातलं नव्हतं. आता अशी करून बघेन . जरा जास्त भाजलं गेलं की कडू होते अगदी अगदी. 'ठोठरा' ला 'तोठरा' म्हणतात इकडे. बोलीभाषा लगेच थोडी वेगळी होते. पूडचटणी ऐकून आहे. नक्की लिहा रेसिपी.

छान

शेजवान चटनी , सॉस असल्यापेक्षा ह्या चतन्या हेल्दी आहेत

कुणीतरी मला सांगाल का प्लीज
"पुभाप्र" आणि "पुलेशु" काय आहे?
काहीच कळेना Sad
इथे विचारल्याबद्दल माफी असावी.
पण अ‍ॅक्टिव्ह होते लोकं म्हणून विचारलं

कुणीतरी मला सांगाल का प्लीज
"पुभाप्र" आणि "पुलेशु" काय आहे?
काहीच कळेना Sad
इथे विचारल्याबद्दल माफी असावी.
पण अ‍ॅक्टिव्ह होते लोकं म्हणून विचारलं

नवीन Submitted by प्रगल्भ on 11 July, 2020 - 09:26
पुढील भागाच्या प्रतीक्षेत, पुढील लेखनास शुभेच्छा

चटणी छान दिसतेय हे सांगायचंच राहिलं गं अस्मिता Happy
आणि वरती लिहीलय कि साबा चटणी करायच्या, म्हणजे त्या आता बेडरिडन आहेत काही करू शकत नाहीत.

माझि पण फेवरेट चटणी, बरोबर भाकरि असेल तर अजुनच भारी, तेल किवा दह्यात कालवुन खाते मी!
आम्ही पण कारळच म्हणतो.

आम्ही पण कारळंच म्हणतो. चटणी तेल भाकरी आ हा हा !
मी आजच केली पूड चटणी फोटो गल्लीवर टाकलाय..... मी त्यात भ र पू र कढीपत्ता घालते.... माझ्या डायटीशियन मित्राने सांगितल्यापासून !

मी ही चटणी नेहमी करते फक्त त्यात मी थोडं किसलेलं सुकं खोबरं भाजून किंवा हिवाळ्यात तीळ भाजून ते काऱ्हाळासोबत मिक्सरमधून काढते.
छान लागते चव.
भाकरी, आणि काऱ्हाळाची चटणी म्हणजे अगदीच आहाहा..
तुझी छान झालेली दिसतीय.
अस्मिता तुला विपू केलाय.

मस्त रेसिपी आहे. आधी मला हे काळे चोखे तिळच आहेत असं वाटलं. काळ्याभोर चोख्या तिळाची सेम अशीच चटणी करतात. थोस सुख खोबरं वरवर भाजून त्यात घातल जात.

मस्तच आहेत विविध चटण्या. आमच्या घाटावर लसणाची चटणी बनविली जाते. शेंगदाणा चटणी सुद्धा असते. बाजरीची भाकर आणि चटणी तोपासू.

भारीच
खुप दिवसात झाली नव्हती आता करावी लागेल असं दिसतंय.. ही चटणी मलाही खूप आवडते Happy

'मीठभुरका' ह्याचा उल्लेख करायचा राहिला..

पूडचटणी ची पाकृ मी दिलीये येथे पाहून घे
https://www.maayboli.com/node/68309

तुझी वेगळी आहे का ह्यापेक्षा?

वा मस्तच झालीय कारळ्याची चटणी.

मला वेगवेगळ्या चटण्या, लोणची खूप आवडतात. डाव्या साईडची तोंडीलावणी खूप हवीत, भाजी एकच चालते.

धन्यवाद मी चिन्मयी, वर्णिता, माझेमन, Black cat, धनुडी, प्रगल्भ, जुई, VB, प्राजक्ता, मंजुताई, मोहिनी१२३, मी रूचा, सिद्धी, किशोर मुंढे, किल्ली, अन्जुताई.

VB करून बघा Happy !
धनुडी साबा Sad .
प्राजक्ता मी दह्यात कालवून लहानपणी खायचे. Happy
मंजुताई कढीपत्ता घातल्याने चव बदलेल ना पूडचटणीची.
मी रूचा विपु ला उत्तर दिले आहे Happy
किल्ली बघते तुझी पूडचटणी.
अन्जुताई मलाही वेगवेगळ्या चटण्या खूप आवडतात. माझ्या साबाही हैद्राबाद माहेर असल्याने अप्रतिम ओल्या आणि कोरड्या चटण्या करतात. एकदम वेगळ्या पद्धतीने.
किल्ली ..थोडी वेगळी आहे गं कारण चिंच टाकते मी आणि पुन्हा तेलात परतते. बाकी सेम दिसतेय, प्रमाण लिहून ठेवले आहे ते आता लक्षात नाही.

आमच्याकडे पण आवडते ही चटणी. आम्ही मराठवाड्यातलेच. पण ह्याला 'कारळ' म्हणतो. माझे वैदर्भीय सासर ह्याला 'कराळ' म्हणते. चटणी करायची पद्धत तशीच आहे.

कारळ घालून केलेलं आंब्याचं लोणचं सुद्धा अति-महान लागतं.