मिरगाचा पाऊस

Submitted by 'सिद्धि' on 7 July, 2020 - 01:22

"निमा! तांदळाची भाकरी करते ना गं? आणि हो... थोडं सुक्या करदीच कालवण, त्याबरोबर खाऱ्या बांगड्याच तोंडीलावणं पाहिजेच. नाहीतर जेवायची नाही हो ती." आप्पांनी हसत-हसत फर्मान सोडला होता.

"होय. आप्पा सगळं करते." निमाही रोजच्याच सवयीप्रमाणे बोलून गेली.

"आणि ते ..."

"हो. हो... समजलं आप्पा. करदीच्या कालवणात कच्या कैरीच्या चार फोडी टाकायच्या, कोकम नाही. त्याने चव बिघडते. बरोबर ना?"
तिच्या या वाक्यावर दोघेही मनसोक्त हसले.

"कैरी नसेल तर आंब्याची वाळलेली दोन आमसूल टाकायची. झकास बेत होईल." म्हणत आप्पा उठून पडवीत आले. अंगणातून समोरच्या बेड्याची टेहळणी करत त्यांनी नकारार्थी मान डोलावली.

जेमतेम अर्धी घटिका सरते न सरते तोच त्यांनी पुन्हा थरथरत्या पावलांनी स्वयंपाक घरात डोकावत कानोसा घेतला. "निमा! उद्याच किश्याला चढणीचे मासे सांगून ठेवतो. दोन दिवसात आणून देईल तो. करशील ना?"

"हो आप्पा करेन. माईंना मासे खूप आवडतात ना... माहीत आहे मला."

"तिच लुगडी-चोळी आणि गोधड्या वगैरे सगळं चांगलं धुवून ठेवलंस काय?"

"आप्पा अहो सगळी तयारी झाली... सकाळपासून दाराला डोळे लावून आहात. आत्ता येईल..आत्ता येईल म्हणून, थोडं आराम करता का?"
निमाने आराम खुर्ची समोर करत, आपल्या हातांचा आधार देत त्यांना बसवले. त्यांच्या हातातील लाकडी काठी खाली ठेवून खांद्यावचा छोटासा हातरुमाल घेऊन कपाळावरचा घाम पुसला. आप्पांचे मात्र त्यांच्या जाडजूड चष्म्याच्या कडेतून दाराकडे लक्ष होते. "बघ जरा पंचांगात... मिरग चालू झालं ना? उद्या नक्षत्र बदलतंय. आज आलीच पाहिजे ती.... आलीच पाहिजे."

नेहमीप्रमाणे त्यांची एकट्याचीच बडबड चालू होती. सारखं-सारखं दाराकडे बघून त्यांची बेचैनी वाढत चालली. ते पाहून निमाचे डोळे पाणावले. त्यांच्या नकळत तिने पदराने डोळ्याचा कडा टिपल्या आणि ती स्वयंपाक घराकडे वळली.

'आज दोन आठवडे हे असच चालू होत. झालं उद्या पासून सगळं ठीक होईल. कसबस अजून एक दिवस ढकलायचा होता. माईंचं लुगडी-चोळी, दोन जाडजूड गोधड्या आणि पानांची चंची सार साहित्य उचलून लाकडी पेटाऱ्यात भरत तिने पेटारा बंद केला.
"व्यवस्थित घडी करून ठेवलं पाहिजे हो. परत पुढच्या मिरगात काढावं लागेल." स्वतःशीच पुटपुटत तिने दोन ताटं वाढायला घेतली. आणि बाहेर पावसाची रिपरिप चालू झाली. खिडकीतून पावसाकडे बघत तिने एक समाधानाकारक उसासा दिला. " वेळेवर आलास रे बाबा! नाहीतर माझ्यावर धर्मसंकट कोसळले असते." असे मनातल्या मनात म्हणत तिने चौरंगावर एक ताट लावून आपांना आवाज दिला.

"आप्पा चला जेवून घ्या."

"जेवायला काय वाढ़तेस. ती येईल एवढ्यात मग एकत्र बसुया ना."

"आप्पा त्यांना उशीर होईल. त्या संध्याकाळीच येतील बहुतेक. बाहेर पाऊस बघा काय आहे तो." बाहेरच्या पावसाकडे बोट दाखवत निमाने त्यांची समजूत काढली.

"असं कसं? 'यंदाच्या मिरगात तिला सोडायला येतो. 'असं बोलला ना बाळ्या. मग यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. घेऊन कशाला गेला? का घेऊन गेला? तेही मला न विचारता." आपांचा पारा अचानक चढला होता. वाढलेले ताट बाजूला सारून ते अचानक उठून दाराच्या दिशेने निघाले.

"आप्पा शांत व्हा. येतील ते संध्याकाळी माईंना घेऊन. पाऊस जास्त आहे आणि आपल्या गावाला यायला एक रस्ता. त्यावरील लाकडी साकव देखील डळमळीत झालाय. थोडा पाऊस वाढला तरीही तो बंद करून ठेवतात. त्यामुळे उशीर झाला असेल."
निमाने त्यांना हाताला धरून पुन्हा आत आणले. पण आप्पा मात्र आता खूपच चिडले होते. त्यांची थरथर वाढली. कपाळावर भर पावसात घाम फुटला होता. श्वसनाचा वेगही वाढू लागला होता.

"संध्याकाळी येईल म्हणतेस. अजून राखण द्यायची बाकी आहे ना. आज मिरगाचा शेवट ग. काहीही करून आजच संध्याकाळी राखण द्यावी लागेल. आलाच पाहिजे.... आलाच पाहिजे. कोंबडा कोण कापणार ? आणि रसरशीत काळ्या वाटणातली गावठी कोंबडी खावी तर माईच्या हातचीच. वर्ष सरले ना? तिच्या हाताचा रस्सा चाखून................."

असबंध बडबड करून आप्पा पुन्हा भूतकाळात शिरले. आणि नेहमीप्रमाणे त्याच गोष्टीचा फायदा घेऊन निमाने त्यांना ताटातले चार घास भरवले देखील. नाहीतर जेवणाची आणि त्यांची गाठ पडणे मुश्किल व्हायचे. त्यांचे रिकामे ताट आणि स्वतःचे रिकामे पोट, तरीही ती समाधानाने आत वळली. मिरग आले कि तिच्या कितीतरी आठवणी जाग्या व्हायच्या. कितीतरी जखमांच्या खपल्या निघायच्या. पंधरा दिवसाच्या या नक्षत्राने तिला आयुष्यभर पुरेल एवढा पाऊस दिला होता. त्यात होते ते काठोनकाठ भरलेले दुःख, ओसंडून वाहणाऱ्या वेदना, आणि भळभळणारी जखम. याच विचारांत ते रिकामे ताट तिने घासून टाकले, जसे आपले रिकामे आयुष्य ती रोज घासायची, पुन्हा नव्याने चकचकीत करण्यासाठी.

एवढ्यात कसल्याश्या धाड धाड आवाजाने तिची तंद्री भंग झाली. हातातले भांडे तसेच टाकून तीने माजघराच्या दिशेने धाव घेतली, आणि समोरच आप्पांना जमिनीवर कोसळलेले पाहून तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले.

"आप्पा...आप्पा उठा! काय झालं?"

कसेबसे उठवण्याचा प्रयत्न करत तिने बाजूच्या तांब्यातील थोडे पाणी त्यांचा तोंडावर शिंपडले. परत हृदय विकाराचा झटका आला की काय? या विचाराने तिच्या पोटात गोळा आला होता. नक्की काय करावे तिला कळेना म्हणून शेजारच्या तात्यांना आवाज द्यायाला ती उठली, एवढ्यात आपांनी तिचा हात घट्ट पकडला होता. त्यांचे पांढरेफट डोळे तिच्यावरतीच रोखलेले होते.

"निमे, बाळ्याने तुझ्या आयुष्याची माती केली पोरी. माझा लेक असला म्हणून काय झालं ग. शहरात दुसरा संसार थाटून मोकळा झाला... आणि तू इथेच राहिली आमची सेवा करत. एवढं करून त्याच समाधान होईना की काय, ते त्याच्या पोराला सांभाळायला माझ्या माईला घेऊन गेला... भाड्???"

एक सणसणीत शिवी हासडून आप्पा पुन्हा शांत झाले.

"मी मिरगाची वाट बघत बसलो अन कळलं की चार महिने झाले, माई केव्हाचीच मला सोडून गेली. कायमचीच. नालायकाने कळवलं पण नाही... शेवटची भेट पण होऊ दिली नाही." आप्पा बोलता बोलता रडू लागले. त्यांना दोन वर्षापूर्वीचे सारे काही आठवले होते. ते ही स्वतःहून...

'निदान पुढच्या मिरगात तरी माईच्या येण्याची आस धरून बसणार नाहीत ते. आणि मला पण आता खोट बोलण्याची गरज नाही.' या विचाराने निमाला हायसे वाटले.

"पोरी बाळ्याला देव कधीच माप करणार नाही.कधीच..." म्हणत आप्पा पुन्हा मूर्च्छित पडले.

*****
दुपारपासून आप्पांची तब्येत बिघडत चालली होती. रात्रभर निमा त्यांच्या बाजूला बसून राहिली. सकाळी केव्हातरी निमाचा डोळा लागला होता. उठायला खर तर फारच उशीर झाला, पण सतत कोs, कोss, कोss, कोssss करून ओरडणाऱ्या कोंबड्यांच्या आरवण्याने ती उठली. चुलीवर चहासाठी पाण्याचे आदन ठेवून ती परसात वळली, तिला आश्चर्य वाटले कारण समोर आप्पा आपल्या थरथरत्या हातानी पाण्याच्या बंबाखाली सरपणाचा जाळ करत होते. धुराचे लोट हवेत वरती विरून जात होते.

"आप्पा लवकर उठलात? कसं वाटतंय आता ?" निमा दोन सुकी लाकडं पाण्याखाली सरकवत त्यांच्या बाजूला जाऊन बसली.

हातातील मिसरी बोटाने चोळत आप्पांनी नकारार्थी मान डोलावली. "यंदाच्या वर्ष्याला पण बाळ्याने फसवलं ना ग. काल संपला मिरग... पण माझ्या माईला घेऊन आला नाही तो."

त्यांचे शब्द ऐकताच ती मिनिटभर सुन्न झाली. स्वतःला सावरत, "येतील हो पुढच्या मिरगात." म्हणत तीने डोक्याला हात लावला.

"काय झालं ग?" तिचा तो उतरलेला चेहेरा पाहून आप्पांनी प्रश्न केला.

"काही नाही हो. आज सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झाली बघा." म्हणत तिने बाहेर छपरावरून खाली मागीलदारी पडणाऱ्या जलधारांकडे बोट दाखवले. स्वतःचे दुःख बाजूला सारून ती पुन्हा एकदा पुढच्या मिरगाच्या प्रतीक्षेसाठी सज्ज झाली. कारण माईला भेटण्याची आप्पांची आस काही केल्या सरेना. त्यामुळे आता परत पुढच्या मिरगाची वाट बघणे आलेच.

समाप्त
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वप्रसिद्धी - "रेशिमधारा" पावसाळा ई विशेषांक २०२०
https://drive.google.com/file/d/1axoKzr6csU5YUmYhOGrm7wk_BtzyCjvM/view?u...
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही ग्रामीण शब्द -
मिरग-मृग नक्षत्र.
पानांची चंची- खाऊचे पान व सुपारी कात हे ठेवण्याचा डब्बा.
बेडे- अंगणाबाहेर बांबूचे कुंपण असते त्यावरील बांबूचा गेट.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी.., अनघा, विनिता, एस, वावे - प्रतिसादासाठी धन्यवाद.
अनघा रेशिमधारा विशेषांक वाचुन जी काही चांगली वाईट प्रतिक्रिया असेल ती नक्की कळवा. मी वाट पहाते.

अप्रतिम..... सगळ्या गोष्टी कोकणातील सफर घडवून आणतात...... कथा उत्तमच आहे त्याला तोड नाही..... संवाद जर मालवणी भाषेत असते तर भन्नाट मजा आली असती

Atishay sunder lihilay... Vachl nahi lvkr.. halli yet nahi mi maybolivr.. 10 days zale aaj pappa off zalet ... So kshatch laksh ny lagat g siddhi.. khup aathvn yete

My deep condolences Urmila. T.c.
आयुष्यात अश्या गोष्टी होतच असतात. माझे बाबा तर माझ्या लहानपणीच गेले. So I can understand ur fillings.

तरीही माझी कथा वाचून प्रतिसाद दिलास त्यासाठी मनापासून धन्यवाद.

रूपाली विशे - पाटील, urmilas, तुषार विष्णू खांबल, anjali_kool सगळ्यांचे प्रतिसाद वाचून बरं वाटलं. धन्यवाद.

Pages