माझे!!

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:14

रुचले नाही लढणे माझे?
पण पचले अवघडणे माझे?

कोसळताना वीज म्हणाली
सांभाळून घ्या पडणे माझे

रुसतो का तू चिडल्यावर मी
ऐक एकदा म्हणणे माझे

रक्ता! आवर धाव जराशी
जाईल जड धडधडणे माझे

बीजगरीला दार म्हणाले
खुपते का रे अडणे माझे!

डोंगर चढताना दमलो मी
शिणले बघ अडखळणे माझे

मिसळून जा अत्तरासवे तू
दरवळेल अन उटणे माझे

मातीच्या मडक्यात दिसू दे
पक्के आता घडणे माझे

अग्निपरीक्षा देते रामा
व्यर्थ न होवो जळणे माझे

पंचमहाभूतात हरवलो
सुंदर झाले जगणे माझे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच मस्त रोहीत दादा.

"मिसळून जा अत्तरासवे तू
दरवळेल अन उटणे माझे"

(ती) अत्तरासारखी उडून जाईल, पण उटण्याचे दरवळणे उरेल(तुमचेच)
एपिक!!

"बीजगरीला दार म्हणाले
खुपते का रे अडणे माझे!"

मान्य करतो! हेवा वाटला इथे. या शब्दांचा आणि हे शब्द सुचलेल्या तुमचाही! Happy