अप्रिय आठवणींपासून सुटका

Submitted by शाम भागवत on 6 July, 2020 - 00:04

मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.

मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या. मी ही अचंबित झालो. असा विचार करणे बरोबर नाही असे एकीकडे वाटत होते. जपाचा जोरही अचानक वाढला होता. पण त्याच बरोबर सूडाचे मानसिक समाधानही मिळत होते. विशेष म्हणजे जप चालू असल्याने ह्या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेने पाहणेही चालू होते.

खरे तर आदला सगळा दिवस चांगला गेला होता. झोप पण चांगली लागली होती. त्रास देणाऱ्या माणसाची सावलीसुद्धा बरेच दिवस शिवली नव्हती. पण आज पहाटे त्या माणसाच्या विचाराने माझा कब्जा घेतला होता. मी सोडून आजूबाजूचे जग शांतपणे झोपले होते. मनात असा विचार आला की, तो माणूसही आता स्वस्थ झोपला असेल आणि मी मात्र इकडे तळमळतोय. रागाने तडफडतोय.

सद्गुरू पैंच्या तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे, सकारात्मक विचाराचे महत्त्व माझ्या लक्षात आलेले होते. तसेच नकारात्मक विचारांनी नुकसान होते हेही लक्षात आले होते. तसेच यासगळ्यासाठी मनात येणाऱ्या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवायची आवश्यकता नव्याने कळली होती.

अप्रिय घटना किंवा आठवणी नव्याने मनात साठणार नाहीत याची काळजी घेणे हा फक्त निम्माच भाग समजला पाहिजे. कारण भूतकाळातील आठवणी अजून त्रास देऊ शकतात हे आज लक्षात आले होते. त्या आठवणींचा बीमोड हा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे याची आज खात्रीच पटली होती. कारण ह्या आठवणींवर माझा काहीही ताबा नाही, उलट त्याच माझा ताबा घेताहेत याचा नुकताच अनुभव आला होता. त्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे होता. विचार चालू झाला. आणि वर उल्लेखलेल्या ग्रंथातील एका वाक्याची आठवण झाली.

जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.

अंघोळ व पूजा झाल्यावर शांतपणे बसलो. वर दिलेल्या वाक्याच्या आधारे उपाययोजना करायचे निश्चित केले आणि तो माणूस समोर आहे असे समजून, त्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे वगैरे कल्पना करायला लागलो. पण अजिबातच जमेना. उलट संताप वाढायला लागला. तरीही प्रयत्न वाढवत राहिलो. तरीही मला ते जमत नव्हते. एकवेळ अशी आली की, माझ्या मुठी घट्ट वळल्या गेल्या, सर्वांगाला घाम फुटला. तरीही मला त्या माणसाचे शुभचिंतन करता येईना. भले किंवा कल्याण हे शब्द सुद्धा आठवेनात. तरीही जे शब्द सुचतील ते वापरून मी पुढची पाच मिनिटे प्रयत्न करत राहिलो. गंजीफ्रॉक घामाने ओला झाला होता. शरीरपण थोडेसे थरथरत होते. पण शेवटी कसेबसे शुभचिंतन करायला जमले होते. त्यावेळी एक लक्षात आले की, मनावरचा ताण हलका झाला आहे. मोकळे मोकळे वाटत आहे.

शांतपणे डोळे मिटून बसलो. तर थोड्या वेळाने आणखी एका अप्रिय माणसाची आठवण आली. ही जरा जुन्या काळातील आठवण होती. परत वरील प्रमाणे त्याच्यासाठीही शुभचिंतन केले. त्रास झाला पण फारसा झाला नाही. विचार करता असे लक्षात आले की, ही आठवण पहिल्या आठवणी इतकी त्रासदायक नव्हती त्यामुळे शुभचिंतन करणे त्यामानाने सोपे झाले.

पुढचे अनेक तास थांबून थांबून अशाच जुन्या जुन्या आठवणी एकामागोमाग येत होत्या व मी शुभचिंतन करायचा प्रयत्न करत होतो. मात्र शुभचिंतन करायला त्रास फारसा होत नव्हता, कारण या आठवणींत तेवढा कडवटपणा भरलेला नव्हता. एव्हाना भावासहित शुभचिंतन करण्यासाठी विश्वप्रार्थना ही खूप उपयोगी पडते आहे हे लक्षात आल्याने तिचाच वापर करू लागलो होतो. यासगळ्या प्रकारात शब्द महत्त्वाचे नसतात तर भाव महत्त्वाचा असतो. अन्यथा मनापासून शुभचिंतन करणे शक्य होत नाही.

शुभचिंतनामध्ये आपल्याला जे हवेहवेसे वाटते तेच समोरच्या व्यक्तीला मिळते आहे ही भावना धरायची असते. त्या दृष्टीनेही विश्वप्रार्थना उत्कृष्ट आहे.

या जुन्या जुन्या आठवणी मनांत येत असताना, मधूनच पहिल्या माणसाची परत आठवण यायची. पण ती प्रत्येक वेळेस आणखीनच सौम्य झालेली जाणवत असे. त्यामुळे शुभचिंतन करण्यांस सहज जमत असे. दातओठ खाऊन किंवा मुठी वळायची कधीच आवश्यकता भासत नव्हती. मलाच माझे आश्चर्य वाटत होते. असे हळूहळू सगळ्याच अप्रिय आठवणींबद्दल व्हायला लागले होते.

माझा हा प्रयत्न ३ दिवस चालू होता. आता कुठलीच आठवण त्रासदायक वाटत नव्हती. एकदाच शुभचिंतन करूनही किंवा शुभचिंतन करायच्या नुसत्या विचारासरशी त्या आठवणीतून आरामात मुक्त होतो येत होते!

काही दिवसांनी मला त्रास देणारा त्या माणसाला मी लांबून पाहिले. पूर्वी माझ्या मनांत या माणसाच्या फक्त दर्शनाने तात्काळ तिडीक उठत असे. पण यावेळी असे काही झाले नाही. मी शांतपणे माझ्या मनातल्या प्रतिक्रियांकडे पाहत होतो. मन खूपच शांत होते. अगदी त्रयस्थपणे त्या माणसाकडे पाहत होते. आपल्याला कोणत्याही प्रकारचे अशुभ चिंतन करायचे नाहीये हे मन स्वत:लाच शांतपणे समजावत होते!!. मी त्या माणसाच्या त्रासातून मुक्त झालो होतो. खूप हायसे वाटत होते.

यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता.

असेच अनुभव इतर बऱ्याच जणांबद्दल आल्याने हा योगायोग नाही हे स्पष्ट झाले. वर दिलेले व ठळक केलेल्या वाक्याने त्याची सत्यता पटवली होती.

त्यानंतर नकोशा वाटणाऱ्या आठवणींवर हाच उपाय मी वापरू लागलो व आजपर्यंत निर्भेळ यश मिळाले आहे. ज्यांना ज्यांना मी हा उपाय सुचवला व ज्यांनी ज्यांनी तो वापरला त्यांना फायदा झाला. अर्थात ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनाच मी हे सांगितले आहे. त्यामुळे "शंकाविरहित वापराचा परिणाम", हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच.

याबाबतीत माझ्या मनांत जे विचार वेळोवेळी आले ते, मी मांडतोय. मी आजपर्यंत कोणतेही मानसशास्त्राचे पुस्तक वाचलेले नसल्याने मी शास्त्रीय पद्धतीने या सगळ्याचे विवेचन करू शकणार नाही. हे जे मी लिहितोय ते सर्व अप्रिय, त्रासदायक अथवा नकारात्मक गोष्टींबद्दलच्या आपल्यातल्या साठवणीबाबत लिहीत आहे. त्याला फक्त स्वानुभवाचा आधार आहे.

१. आपल्या आयुष्यात जे काही घडत असते त्या सर्वांची नोंद होत असते. घडलेली घटना, काळ, वेळ त्यावेळच्या भाव व भावना, याचबरोबर या सगळ्याची तीव्रता पण नोंदवली जात असते.

त्यामुळे ती आठवण होताच आपले मन परत सर्वार्थाने ती घटना जशीच्या तशी परत अनुभवू शकते. साधारणत: आपण कसे बरोबर व दुसरा कसा चुकीचा हाच उहापोह आपले मन यावेळी करते. तसेच काही जमलेली नवीन माहिती किंवा मुद्दे यांचा उहापोह होऊन, ही नवीन माहिती पण मग जुन्या माहितीच्या शेजारी साठवली जाते. मूळ माहितीत भर घातले जाणारे हे नवीन मुद्दे साधारणत: रिव्हर्स इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असण्याची शक्यताच जास्त असते. थोडक्यांत जुन्या आठवणींवर आणखीन एक घट्ट व भक्कम वीण घातली जाते. ती आठवण आणखीन धष्टपुष्ट होते.

२. घडलेल्या घटनेची कोणतीही नोंद पुसली जाऊ नये किंवा ती आमूलाग्र बदलली जाऊ नये यासाठी काही एक यंत्रणा काम करत असते.

याच कारणामुळे आठवणीतला कडवटपणा निघून जाईल असे (शुभचिंतन) जर आपण काही करायला लागलो तर त्याला सुरवातीला विरोध होतो. मात्र हा विरोध मावळेपर्यंत जर आपण प्रयत्न चालू ठेवले तर मात्र हे शुभचिंतनही स्वीकारले जाते व या आठवणींच्या जवळ साठवले जाते.

पुन्हा जेव्हा ही आठवण होते, तेव्हा त्या आठवणीतील कडवटपणा बरोबरच हे शुभचिंतनही अंतर्भूत असल्याने ही आठवण सौम्य झालेली असते. तसेच नव्याने शुभचिंतन केले गेल्यास त्याला फारसा विरोध होत नाही. ते कुठे साठवायचे हा प्रश्न मागच्या वेळेसच निकालात निघालेला असतो.

३. सर्व नोंदींची प्रतवारी केलेली असते व सर्वात जास्त वेटेज असलेली आठवण सर्वात वर व त्याचपध्दतीने बाकीच्या आठवणी त्याखाली साठवलेल्या असतात.

याच कारणामुळे एखादी सर्वोच्च अप्रिय घटना त्यात मिसळलेल्या शुभचिंतनाने जेव्हा सौम्य होते तेव्हा तिची प्रतवारी तात्काळ घसरते. थोड्यावेळाने त्या खाली असलेली दुसऱ्या क्रमांकाची अप्रिय घटना आपोआप वर येते. अशा रीतीने आपण आणखी आणखी भूतकाळात शिरायला लागतो. अशा रितीने भूतकाळातील जुन्या जुन्या आठवणी हळूहळू वर यायला लागतात.

४. वर सांगितलेला क्रम सदैव अद्ययावत केला जात असतो.
एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर तिचा वापर वारंवार होणे साहजिकच असते. पण ;
एखाद्या अप्रिय घटनेची जर बराच काळ उजळणी झाली नाही तर त्याची फेरप्रतवारी करण्याची गरज भासायला लागते. त्यामुळे ती आठवण परत स्मृतीतून किंवा जिथे कुठे साठवलेली असेल तिथून मनांत प्रक्षेपित केली जाते. या आठवणीबाबत, मनाच्या मिळालेल्या नवीन प्रतिक्रियेवरून मग तिचे फेरमुल्यांकन केले जाते व त्याप्रमाणे ती योग्य क्रमाने परत साठवली जाते.

५. या फेरप्रतवारी करण्याच्या अंतर्गत आवश्यकतेमुळे, एखादी जुनी आठवण अचानक आठवते व काही कारण नसताना आपल्याला हे मध्येच कसं काय आठवतंय? याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. प्रत्यक्षात हीच वेळ असते या अप्रिय आठवणीवर हल्ला करण्याची.

६. कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते. त्यासाठी जिथे ही आठवण साठवलेली आहे तिथेच शुभचिंतन साठवले जावे हा आपला हेतू असायला लागतो. पण कोणती अप्रिय गोष्ट नक्की कुठे साठवलेली असते हेच आपल्याला नीट माहीत नसते.

७. त्यामुळेच अचानकपणे मनांत येणारी ही आठवण, म्हणजे जणू आपला एखादा लपलेला शत्रू बिळातून अचानक बाहेर आलेला असतो व तो परत बिळात लपायच्या आत त्याच्यावर हल्ला करायची संधी असते. इथे आपले शस्त्र असते शुभचिंतनाचे. आपल्या या शस्त्राचा वार झाल्यावर, हा शत्रू गोंधळून जातो व हा घाव अंगावर वागवत, जखमी होऊन परत मूळ जागी परततो. काही काळाने हा शत्रू आपली ओली जखम घेऊन परत मनात अवतीर्ण होतो. त्याची अपेक्षा असते, अशुभ चिंतनाच्या औषधाने आपण बरे होऊ. गमावलेली ताकद परत मिळवू. पण परत शुभचिंतनाचा हल्ला झाल्यास तो आणखीनच नाउमेद होतो. त्यांचा क्रमांक आणखीनच घसरतो व अप्रिय आठवणींच्या साठ्यामध्ये गलितगात्र व क्षीण होऊन आणखीनच तळाशी जातो.

८. या सर्व नोंदी आपल्यातच होत असतात. मग त्याला अंतर्मन म्हणा किंवा चित्त म्हणा किंवा अंतरंग म्हणा किंवा स्मृती म्हणा. कोणी त्याला मेंदू म्हणेल. साठवणीच्या जागेचे नाव काहीही असले तरी, ती जागा आपल्या शरीरातच कुढेतरी असते. थोडक्यांत कोणत्यातरी पेशींद्वारेच सगळे कार्य चालू असते. आपल्या शरीरातील पेशी म्हटल्यावर, त्या पेशींची भरणपोषणाची जबाबदारी आपण उचलत असतो हे मान्यच करायला लागते. त्यामुळे आपलेच नुकसान करणाऱ्या अशा अप्रिय गोष्टी व त्यांचा कडवटपणा टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रसंगी तो कडवटपणा वाढवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करणे हा किती आतबट्ट्याचा व्यवहार आहे याची कल्पना येईल.

९. पण जर या अप्रिय गोष्टींमधील कडवटपणा आपण सौम्य करू शकलो तर या साठ्याची वाढ होण्याचे ताबडतोब थांबते. अप्रिय व्यक्तींची मनातल्या मनात उजळणी करणे, त्यांना शिव्याशाप देणे, म्हणजे आपल्याच शरीरातील काही पेशी त्या अप्रिय व्यक्तीला आंदण देणे होय. इतकेच नव्हे तर त्यांची पालनपोषणाची जबाबदारी उचलणे व भविष्यांत त्यांना जागा पुरेनाशी झाली तर आणखी जागा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यासारखे आहे.

१०. जर घटना एकदा घडली व नोंदही एकदाच झाली तर सगळं ठीक चालले आहे असे म्हणता येईल. जी घटना प्रिय अथवा अप्रिय नाही अशा गोष्टीच्या बाबतीत असेच घडते. मात्र प्रिय व अप्रिय गोष्टी याला अपवाद असतात.

११. असे म्हटले जाते की, आपला केला गेलेला मान, सन्मान फार काळ लक्षात राहत नाही, पण आपला झालेला छोटासा अपमान शेवट पर्यंत लक्षात राहतो. आपली झालेली फसवणूक आपल्याला कायम त्रास देते. विशेष करून ज्याच्यावर आपण उपकार केलेले आहेत, त्याने जर त्या उपकाराची परतफेड अपकाराने केली असेल तर मात्र अशा घटना फार खोलवर घर करून राहतात. साधारणत: अशा घटना सात्त्विक संताप निर्माण करतात. तिथे फार फार जपायला लागते. अशा प्रसंगात या कडवट आठवणी किंवा त्यातील अप्रिय व्यक्ती अत्यंत वेगाने आपल्या शरीरातील जागा बळकावत असतात. स्मृती साठवणाऱ्या पेशी या खूप महत्त्वाच्या व दुर्मिळ समजल्या पाहिजेत. नेमक्या त्याच पेशी आपल्या शत्रूला देणे हा आपणच आपल्यासाठी केलेला घोर अपराध समजला पाहिजे.

१२. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अप्रिय घटनेतील अप्रिय व्यक्ती आपल्याशी अयोग्य रितीने वागून आपल्या अंतर्मनात प्रथम जागा व्यापते. त्यानंतर मात्र त्या घटनेच्या प्रत्येक उजळणी बरोबर ह्या व्यापलेल्या जागेवर ही अप्रिय व्यक्ती इमारत बांधायला लागते. आपण जितक्या वेळेस उजळणी करू तितकी ही इमारत आणखी भक्कम व मोठी व्हायला लागते. साधारणत: प्रत्येक उजळणीत, आपण कसे बरोबर होतो व ती व्यक्ती कशी चूक होती हेच आपण आपल्यालाच समजावून सांगत असतो व वाढत्या श्रेणीत त्या व्यक्तीला शिव्याशाप देत असतो. आपल्याला असे वाटत असते की आपण देत असलेले हे सर्व शिव्याशाप कोठेतरी बाहेर जात आहेत. वास्तविक हे सर्व शिव्याशाप आपण आपल्याच शक्तीने आपल्यातच नोंदवून ठेवत असतो व आपले चित्त दूषित करत असतो.

१३. आपण आपल्या जीवनात जे काही निर्णय घेत असतो, ते नेहमी आपण आपल्यात साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून घेत असतो. त्यामुळे आपण आपल्यात साठवत असलेली माहिती ही नेहमी सकारात्मक राहील याची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे.

१४. अप्रिय घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतच असतात. त्याची नोंद होणे अपरिहार्य असते. पण या नव्याने घडणाऱ्या अप्रिय घटनांची काही कारण नसताना उजळणी केली जाऊन या नोंदीची वाढ होणार नाही एवढेच आपल्या हातात असते. ते जर जमू शकले तर आपले चित्त नव्याने मलिन होऊ शकणार नाही. तसेच शुभचिंतनाचे हत्यार वापरून भूतकाळातील नकोशा किंवा नकारात्मक आठवणी सौम्य करून, तीही साफसफाई आपण करू शकतो.

१५. नामस्मरणासारख्या किंवा इतर कोणत्याही अंतरंग शुद्ध करणाऱ्या पद्धतींमुळे मनाला सूक्ष्मता येते. त्यामुळे मन खूप संवेदनशील बनते. पण म्हणून विकार संपलेले नसतात. त्यामुळे त्यांचे उद्दीपन लवकर होते. त्यामुळे या जुन्या आठवणी जेव्हा जागृत होतात तेव्हा त्या मनाला पूर्वीपेक्षा खूपच जास्त ताकदीने व्यापतात. यामुळे बऱ्याच दिवसांची साधना खर्ची पडते. यासाठी साधनी माणसाने नेहमी या जुन्या आठवणींच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे.

१६. प्रत्येक माणसात गुण व दोष दोन्हीही असतात. पण अप्रिय माणसांत फक्त दोषच आहेत अशी आपली भावना असते. ह्या अप्रिय माणसांबद्दल कलुषित झालेले आपले मन त्या माणसातील चांगले गुण टिपायलाही नकार देते. कोणी दाखवायचा प्रयत्न केला तरी त्यातही आपण नकळत खुसपटच काढत बसतो. पण हा नकारात्मक भाव गेल्यावर मात्र त्या माणसातले गुणही हळूहळू दिसायला लागतात.

१७. माणूस जितका सज्जन असेल त्याप्रमाणात त्याने याबाबतीत सावध राहायला लागते. आपण सज्जन असल्याचा त्याने अभिमान बाळगला तर मात्र त्याच्या हातून नकोश्या घटनांची उजळणी फार मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता बळावते. त्यामुळे सज्जन माणसाला सर्वात जास्त दु:ख भोगायला लागते असे दिसून येते. यास्तव सज्जन माणसाने अशा आठवणीतून मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणावेसे वाटते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय उत्तम लेख.

जीवनविद्याचे श्री. वामनराव पै यांची विश्वप्रार्थना आमच्या घराजवळ २ ठिकाणी बोर्डवर लिहीलेली आहे. येताजाता नजरेस पडते. अतिशय सोपी व अर्थपूर्ण असल्यामुळे लक्षातही राहते.

कधी कधी व्यक्ति अप्रिय नसते पण आठवणी अप्रिय असतात.त्या व्यक्तिचे असोसिएशन आठवणीशी असते.>>
एकदम बरोबर.
त्याला काहीच हरकत नाही. किंबहुना तसंच असलं पाहिजे.
तसं ते नसेल, तर ते कसं साधायचं, त्यासाठीच लेख लिहिला आहे.

अप्रिय घटना आठवत असताना त्यातील व्यक्तिंचा राग येत असेल तर ते बरोबर होईल असे वाटत नाही. तो रागाचा भाग काढून टाकला की, राहते ती फक्त आठवण व त्यात भाग घेणाऱ्या व्यक्ति.

इथे घडलेली घटना विसरायचा प्रयत्न नाहीये. कारण तसं करायला गेलं तरी काहीकाळानंतर ती आठवतेच.

चांगला लेख.
अप्रिय आठवणींमुळे मनाच्या शक्तीचा अपव्यय होतो. त्याबद्दल दृष्टिकोन बदलणं हा सतत चालणारा अभ्यास आहे.

खूप छान लेख. अनायसे वाचायला मिळाला. प्रत्येकाने अवश्य करून पहायला हवे असे काहीसे. विश्लेषण सुद्धा खूपच छान.

खूप छान लेख ..

मला वाटत प्रत्येक वेळी एकाच उपाय लागू पडत नसावा कधी कधी निचरा झालयावर सुद्धा बरे वाटते
उदाहरणार्थ पूर्वी अमिताभ ला पडद्यावर मारामारी करताना पाहून लोक आपली चीड पॅसिफाय झाल्याचा अनुभव घ्यायचे
कधी कधी उपाय - जसे कि त्या व्यक्ती ला पत्र लिहून , किंवा आपण त्या व्यक्ती ने काय त्रास दिलाय ते त्यालाच बोलून दाखवतोय आणि तो ऐकतोय आणि त्याला कळतंय कि त्याचे काय चुकले होते असे इमॅजिन करून सुद्धा भावनांचा निचरा होण्यास मदत होऊ शकते ...

अजून एक महत्वाचे म्हणजे ओव्हरऑल आपले आरोग्य कसे आहे ह्यावर सुद्धा हे अवलंबून असते , healthy व्यक्ती ला इतका त्रास होणार नाही , शारीरिक कष्ट , व्यायाम करत असणाऱ्याला एवढा त्रास होणार नाही , ज्या व्यायाम प्रकारांनी आनंद होत असेल (उदा पोहोणे , पळणे , डबल्स , ऐरोबिकस काहीही) ते काही दिवस केले तरी फायदा होऊ शकतो ...

लेख आवडला , खूप विचार करून लिहिलंय तुम्ही ....

आवडला लेख . धन्यवाद.
एक शंका. अप्रिय व्यक्ती त्रासदायक / धोकादायक असेल तर शुभचिंतन करण्यासाठी तरी आठवण कशाला काढायची ?

बरोबर बोलताय.
मुद्दामहून नको त्या आठवणी काढत बसायचं नाहीच.
पण मुद्दा क्रमांक ७ प्रमाणे जर एखादी आठवण आपणहून आली तर काय करायचे त्याचा सगळा उहापोह येथे स्वानुभवाच्या आधारे मांडलाय.
हे कोणाला वैचारिक वाटू शकेल. पण मी फक्त मला आलेला अनुभव व त्या अनुभवामागची मला समजलेली कारणमिमांसा सांगितलेली आहे.

कितीही बिझी ठेवा स्वतःला.. वर्क हॉलिक बना
यायची ती आठवण येतेच. थोडा काळ जाऊ देणे हा पण एक उपाय कामी येतो.

थोडा काळ जाऊ देणे हा पण एक उपाय कामी येतो>>>>>> कधी कधी कालान्तराने कटु स्मृती अधीक तीव्र होतात

वर्क होलिक बनून स्वत:ला गुंतवून घेणे असा एक पर्याय दिला जातो.

कशात तरी गुंतवून घ्यायचं, व विसरायचं असा मुद्दाच नाही आहे. हे न कळल्याने काही जण स्वत:ला व्यसनात गुंतवून घेतात. पण कधीतरी व्यसनाची धुंदी उतरली की ती आठवण दत्त म्हणून हजर होते.
वर्कहोलिकपणासुध्दा कालपरत्वे, वयपरत्वे खंडीत होतो व सगळा खटाटोप वाया जातो.
म्हणून काही विसरायचं किंवा आठवायच्या फंदात पडायचंच नाही. तर त्या आठवणीतला आपल्याला त्रास देणारा कडवडपणा मुद्दा क्रमांक ७ प्रमाणे क्षीण करत न्यायचा. आपण आपल्या स्मृतीच्या पेशीमधे साठवलेली माहीती शुध्द करत न्यायची.
असो.

<< मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. >>
अप्रिय आठवणींपासून सुटका हवी असेल तर तत्त्वज्ञानाचा अभ्यास बंद करा, असे सुचवतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची गरज नसते. आयुष्यात जशा चांगल्या आठवणी महत्त्वाच्या आहेत, तशाच कटू आठवणी पण गरजेच्या आहेत. जसे पदरात पडेल, तसे आयुष्य जगावे. अति चिंतन करत बसू नये.

मी आज जाल मित्र सायकियाट्रिस्ट डॉ सचिन केतकर यांना परत आठवण केली आहे. व यावर लिहायला प्रवृत्त केले आहे. मला माझ्या अप्रिय आठवणीकडे कसे पहावे हा जो मुद्दा मी आत्मचिंतनासाठी ( खर तर चिरफाड) नेहमी घेतो त्यात स्वत:चे विश्लेषणासाठी मला किती दृष्टीकोन मिळतात हे मी पहात असतो मला हा व्यक्तिमत्व विकासाचाच भाग वाटतो.

सामो, लाटेवर स्वार होताना लाटेने गिळंकृत केले तर? हे भय असतेच ना? मग भयावर मात करण्यासाठी कधी विद्रोही मार्ग अवलंबले जातात. मग विद्रोही मन व विवेकी मन यांचा संघर्ष चालू होतो.