मोती.

Submitted by पूर्वी on 2 July, 2020 - 14:09

आज सकाळी सकाळीच पाऊस सुरू झाला.
सुर्य ढगांनी झाकोळला म्हणून सात वाजले तरी अंधारुन आलेले वातावरण झाले. पावसाची सुरुवातीची संथ रिपरिप आता वेग घेत आसने झाल्यानंतर विश्रामासाठी शरीर शिथिल झाले पण मन?ते पावसाच्या वाढणाऱ्या वेगासोबत धावायला लागले. आवडत्या/नावडत्या आठवणींभोवती फुलपाखरासारखे भिरभिरायला लागले.
अन् पावसातच अचानक एक सुर्यकिरणाची तिरीप आली. त्याचा परिणाम लगेच मनावरही झाला. मनाने खुदकन हसुन आठवणींच्या खजिण्यातील एक आठवण समोर सादर केली.

सात आठ वर्षे वयाची मी, खूप पाऊस येतोय म्हणून शाळेला बुट्टी मारली होती. घरात आई आणि आत्या आपापल्या कामात गुंतल्या होत्या.
एखादा तासभर आराम घेतलेल्या पावसाने अचानक पुन्हा बरसायला सुरुवात केली. तडतड आवाज येत होता. माझी कुतुहलाची नजर अंगणात रोखली गेली. अन्.... आनंदाने, आश्चर्याने मन उचंबळून यायला लागले. कारण पावसाच्या रुपाने गोल, चमकदार, दुधी खडे... मोतीच जणू अंगणात बरसायला लागले. त्यांचा मनमोहक सडा दाट दाट होत होता.
आई-आत्या "गारा पडत आहेत"असे म्हणत होत्या. मनाला लुब्ध, धुंद करणारे ते टपोरे मोती म्हणजे गारा होत्या तर!!
पावसात जायचे नाही ही ताकीद घरातुन दिली असतानाही मी धावत धावत अंगणात गेले.
गारांना ओंजळीत भरभरुन साठवायचे होते मला. ईवल्याश्या ओंजळीत गारा फारशा मावत नाहीत हे ध्यानी येताच फ्राकचा ओचा केला अन् त्यात गारा भरायला लागले. डोक्यावर खडे मारल्यासारखे गारांचे बरसने चालू होते. थंडीने शरीर काकडत होते. तरीही ते गारांचे लोभस रुप शरिराला त्यापासून दूर होऊ देत नव्हते.
आईने मला भिजताना पाहून पळत येऊन घरात घेतले. त्या गरबडीत मी जमेल तेवढ्या गारा ओच्यात, हातात भरुन घेतल्या. त्या मोहक मोत्यांपासून मला दूर करणार्या आईचा खरे तर राग येत होता. मी आजारी पडू नये म्हणून मला कोरडे करण्यासाठी तो प्रेमाचा सागर झटत होता.अन् कपडे बदलून होईपर्यंतच जिकीरीने, उत्साहाने आणलेल्या गारांचे पाणी झालेले मी डोळ्यांनी पहात होते. ते पाणी पाहून माझेही डोळे पाण्याने भरून आले. आईला कळले. जवळ घेऊन डोळे पुसत म्हणाली "हत् वेडाबाई, ते कधी ना कधी पाणी होणारच. कारण मुळात ते खडे पाण्याचेच तर असतात."

आज 40 ---45 वर्षांनंतर अनुभवतेय....
घर, संसार, practice साठी केलेली जिवापाड मेहनत.....साsरी भौतिक सुखे ही त्या ब्रम्हस्वरुपातील गारांसारखीच तर रुपे आहेत.
आरोग्याचा, कधी शरीर मनाच्या विश्रामाच, अंतिम श्रेयसाचा विचार कळत नव्हता म्हणून.... आत्यंतिक त्रास सहन करत करत जे जे मिळवण्यासाठी हा जीव धरपडला ते साsरे अखेर विरुन जाणारेच तर आहे.
आता जानवतेय.... म्हणून भौतिक सुखाच्या मोहक रुपाला फसायचे नाही. सारे सारे ब्रम्हस्वरुप आहे हे समजून घ्यायचे.
अन् एवढेच समजण्यासाठी वयाची 50 वर्षे घालवावी लागली ना??हत् वेडाबाई!

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users