वारकरी संप्रदायाचे महत्त्व

Submitted by Asu on 30 June, 2020 - 15:08

वारकरी संप्रदायाचे महत्त्व
वारी आणि वारकरी-
वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून पंढरपूरला केलेली सामुदायिक पदयात्रा. विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती वारी, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. एकादशीला किंवा इतर पवित्र दिवशी जो नियमित वारी करतो, त्याला ‘वारकरी’ किंवा ‘माळकरी’ म्हणतात. आणि वारकरी जो धर्म पाळतात त्याला ‘वारकरी धर्म’ किंवा ‘भागवत धर्म’ म्हणतात.
वारकऱ्यांची लक्षणे-
विठ्ठलाला (भगवान विष्णूला) प्रिय असलेल्या तुळशीची माळ गळ्यात घालणे, स्नानोत्तर कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावणे, दररोज गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल दर्शन घेणे, हरिपाठ म्हणणे, संत साहित्याचे वाचन करणे, भजन कीर्तनात सहभाग घेणे, सात्विक आहार घेणे, सदाचार, एकादशी व्रत करणे अशी वारकऱ्यांची साधारण लक्षणे असतात.
वारकरी संप्रदायाचा उगम व प्रवाह-
विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांच्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायाचा आद्यप्रवर्तक भक्त पुंडलिक समजला जातो.
साधारणतः बाराव्या शतकात पंढरपुरास तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त होऊन पांडुरंगाचे भक्त पंढरीची वारी करू लागले. संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा होती. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ महाराज, भानुदास, तुकाराम महाराज, निळोबा, नारायण महाराज, इत्यादींनी हाच प्रवाह पुढे चालू ठेवला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्यांची परंपरा आहे. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, सावता माळी, रामदास स्वामी यांच्या पालख्याही पंढरपुरास येतात. ज्ञानोबा-तुकारामांच्या नामाचा जयघोष करत, अभंग म्हणत, पारंपारिक खेळ खेळत या पालख्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पंढरपूरला जातात.
वारकरी संप्रदायाचे कार्य-
१) अध्यात्मिक सुखाचा मार्ग-
आयुष्यात मोक्ष मिळण्यासाठीच्या अनेक मार्गांपैकी भक्तिमार्ग हा सगळ्यात आचार विचारांच्या दृष्टीने सोपा मार्ग आहे. वारकरी संप्रदायाने सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी हा मार्ग उपलब्ध करून दिला. आपले नित्य कर्तव्य निष्ठेने करत असतांनाच पुण्य मिळवण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करणे, हे या संप्रदायाचे मुख्य तत्त्व. भगवंताचे सतत स्मरण रहावे म्हणून वारकरी संप्रदायाचे भक्त गळ्यात सतत विष्णुप्रिया तुळशीची माळ घालतात. तिचा जपासाठीही उपयोग करता येतो. सात्विक आहार, सदाचरण आणि परोपकाराबरोबर परमार्थ ही या संप्रदायाची किंवा भागवत धर्माची शिकवण आहे. संसारातील बंधनातून, मोहमायेतून हळूहळू दूर होऊन, भजन-कीर्तनात रमून, नामस्मरण करीत पांडुरंगाशी एकरूप व्हावे, असा हा वारकरी संप्रदायाचा साधा सोपा भक्तिमार्ग आहे.
२) भेदभाव व जातिभेदाविरुद्ध शिकवण व आचार-
वारकरी संप्रदायात भेदभाव विरहित सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात. संपूर्ण वारीच्या काळात जातीभेद विसरून एकत्र राहतात, खातात, पितात, एकमेकांची सुखदुःख जाणून घेतात. त्यांच्यात आचार-विचारांचे अभिसरण होते. यामुळे नक्कीच जातीभेद नष्ट व्हायला मदत होते. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाची पताका हाती धरून सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्र करून वारीत सामील करून घेतले व अध्यात्मिक लोकशाही आणली. तत्कालीन समाजरचनेतील तळागाळातील लोकांनाही विकासाची संधी मिळावी असे ज्ञानेश्वर आदी सर्वच संतांना मनापासून वाटत होते. हीच व्यापक परंपरा इतर संतांनीही पुढे चालू ठेवली. वारीतून या संप्रदायाची समाजाभिमुखता दिसून येते. ज्ञानेश्वर, नामदेव शिंपी, तुकाराम वाणी, एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, चोखामेळा, सेना न्हावी, नरहरी सोनार,जनाबाई अशा वेगवेगळ्या जाती-धर्माच्या व समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या संतांची परंपरा वारकरी संप्रदायात दिसून येते.
संत तुकाराम, संत एकनाथ आणि इतर संतांचे जातिभेदाविरुद्धचे कार्य आपल्याला विविध घटनांतून माहीत आहे, तसेच ते त्यांच्या अभंगातून व भारूडातूनही प्रकट होते.
३) समाज प्रबोधन-
सर्वच संतांनी त्यांच्या आचरणातून व साहित्यातून समाजातील वाईट चालीरितींविरुद्ध व अंधश्रद्धेविरुद्ध प्रहार केलेले आहेत. सनातन्यांनी केलेला छळ सोसूनही संत एकनाथ महाराज व संत तुकाराम महाराजांनी समाज प्रबोधनाचे कार्य सतत चालू ठेवले. वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी सनातन्यांनी चालविलेल्या सर्वसामान्य प्रजेच्या धार्मिक व आर्थिक शोषणाविरुद्ध प्रखर लढा दिलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या या कार्याचे महाराष्ट्रावर मोठे उपकार आहेत. वारकरी संप्रदायाने निरक्षर कष्टकरी प्रजेच्या समाज प्रबोधनाचे मोठेच कार्य कीर्तनातून केले आहे. वारकरी संप्रदायाचा अविभाज्य भाग असलेल्या कीर्तनासारखा लोक शिक्षणासाठी परिणामकारक असा दुसरा मार्ग नाही.
४)धार्मिक पर्यटन-
एरवी धकाधकीच्या आयुष्यातून केवळ फिरण्यासाठी वेळ काढणे गरीब जनतेला कठीणच. कष्टकरी जनतेला त्यांच्या नेहमीच्या कष्टमय जीवनातून थोडावेळ मोकळीक मिळून तेवढाच विरंगुळा मिळतो. पुढील कष्टमय आयुष्य जगण्याचे बळ मिळते. वेगवेगळा भूभाग पहायला मिळतो. त्या ठिकाणचा भूगोल, इतिहास आणि पर्यावरणाची ओळख होते. समजुतीच्या कक्षा रुंदावतात. वेगवेगळ्या चालीरीतींची आणि लोकजीवनाची ओळख होते. त्यामुळे मन विशाल होते. निश्चिंतपणे भगवंत भक्तीत लीन होता येते. हे एक प्रकारचे धार्मिक पर्यटनच आहे.
५)धर्मरक्षण-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज यांनी सर्वसामान्य प्रजेला भक्तिमार्गाची गोडी लावून व वारकरी संप्रदायाचे संघटन करून म्लेंच्छांपासून धर्म संरक्षणाच्या कार्यास मोठाच हातभार लावला. मोगली आक्रमणाने सैरभैर झालेल्या समाजाला जगण्याची दिशा व बळ दिले. अन्यथा बर्‍याच लोकांचे धर्मांतरण झाले असते.
वारकरी संप्रदाय हा भोळ्याभाबड्या लोकांचा, विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्यांचा पण अंधश्रद्धा नसणाऱ्यांचा आहे. हा संप्रदाय सन्मार्गाने विहित कार्य करीत विठ्ठलाचे नामस्मरण करीत शेवटी पांडुरंग चरणी लीन होऊन मोक्ष मिळविण्याचा साधा सोपा मार्ग वारकऱ्यांना दाखवतो. चला तर मग, आपणही वारकऱ्यांबरोबर जयघोष करू या-
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम |
पंढरीनाथ महाराज की जय!

******
-प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

थोडक्यात पण चांगला आढावा घेतलाय. या संदर्भात सुधीर महाबळ यांच्या मुलाखतीचे दोन विडिओज पहाण्यात आले. या धाग्यावर आलेल्या चाहत्यांना ते आवडतील अशी आशा करतो. सुधीर महाबळ हे गृहस्थ गेली १५+ वर्षं सातत्याने पंढरीची "परतवारी" करतात. वारी मागचा उद्देश केवळ पांडुरंगाचं दर्शन हा नसतो हे त्यांनी या मुलाखतीतुन सुंदररीत्या मांडलेलं आहे. आवर्जुन बघा...

क्लिप-१
क्लिप-२

लेख चांगला आहे.
फक्त एक बारकासा मतभेद.
वारी किंवा वार म्हणजे पुन्हा, पुन:पुन: .
हिंदीत 'बार बार देखो' किंवा 'बिछडे सब बारीबारी अशी गाणी आहेत. किंवा मराठीत 'एक वार पंखावरून फिरो तुझा हात'. आपण दुबार पीक म्हणतो तेव्हा ते दोन वार म्हणजे दोन वेळा घेतलेले पीक असते. दोनदा तीनदा यामधला 'दा' पुनरावृत्ती दाखवतो. तसाच वारी हा शब्दही पुनरावृत्ती दाखवतो. एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणे म्हणजे त्या ठिकाणाची वारी करणे. पूर्वी शालान्त परीक्षेला मॅट्रिक्युलेशन असे नाव होते. एखादा मुलगा त्या परीक्षेला पुन्हा पुन्हा बसतोय आणि नापास होतोय, तेव्हा तो मॅट्रिकच्या वाऱ्या करतोय असे म्हटले जाई.

वारी आणि वारकरी-

यामधला भगवंत हे एक निमीत्त आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत कुणा एकाच्याच हाती सत्ता आणि पैसा असायचा. बरेचदा म्हातारमंडळीच. हे किंवा कुणी तरूण मंडळीना भगवंताच्या नावाने पंधरा वीस दिवस विरंगुळा मिळायचा. गोठ्यात जनावरे म्हणजे सर्वच जण एकावेळी जाऊ शकत नाही.
आतासारखे त्या काळात आर्थिक स्वातंत्र्य नव्हते.