स्पर्श 3

Submitted by मुक्ता.... on 28 June, 2020 - 14:30

स्पर्श :भाग 3 (जाणीव तिसरी)

आधीच्या दोन लेखात आपण मानवी भावभावना, कुटुंब ,समाज यांच्याशी निगडित स्पर्शाचा प्रभाव आणि परिणाम ,त्यातून उठणारे तरंग यावर चर्चा केली. त्यातून आपण आपले स्वानुभव व काही नवीन मुद्दे सुचवले. फार सुरेख संवाद आहे तो. आपण त्याला मनाला मनाचा स्पर्श म्हणू शकतो. स्पर्श जाणीव दुसरी याच्या शेवटी मी म्हटलं होतं की थोडा अध्यात्मिक स्पर्शाचा विचार करूयात. त्या अनुषंगाने काही विचार मांडते. अध्यात्म आणि त्याच्या अनुभूती हा फार मोठा अनु व्यापक विषय आहे. अनेक जेष्ठ,अनुभवी मंडळी इथे आहेत. मी माझ्या बुद्दीच्या कुवतीनुसार इथे व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. आपले मौलिक मार्गदर्शन मिळेलच असे गृहीत धरते.
लहानपणी आई, बाबा कुणालाही जेष्ठ व्यक्तीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला सांगत असत. ती व्यक्तिदेखील आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असे. तळव्यांचा स्पर्श असा मस्तकाला झाला की निराळं वाटत असे। खूप काही गवसल्यासारखं. आज आपण आपल्या मुलांना तेच करायला सांगतो. आपण आशीर्वाद देतो. आपल्या संस्कृतीत जेष्ठांबद्दल आदर रुजवणारा हा महत्वाचा संस्कार आहे. या स्पर्शातून आपलेपणाच्या पलीकडे एक नवे बळ मिळते. सद्विचार,सद्भावना याची एक लहर या स्पर्शातून मिळते. एक बळ, एक उर्जालहर जीचे मापन आपण नाही करू शकत. बहुतांशी एक अध्यात्मिक ऊर्जा असावी. अर्थात हे सहज सुचलेले उदाहरण आपल्या सर्वांच्या जवळचे आहे. आज थोडा संस्कारांचा आधार घेणार आहे. आपल्याला आपली आजी,आई संध्याकाळी रामरक्षा आणि तशा अनेक प्रार्थना म्हणायला सांगतात. त्यामागचा उद्देश केवळ शिस्त हा असेल का , का केवळ दंटवून ठेवणे हा असेल? का काही दुसरा सूक्ष्म विचार असेल? नक्कीच त्यामागे या स्तोत्रातून निर्माण होणारी जी निर्मळ,सात्विक कंपने आहेत त्यातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरी आहेत त्याविषयी ,त्यांच्या स्पर्शाविषयी विचार असणार. ही एकाने म्हटलेली स्तोत्रे दुसऱ्याला एक शांतीचा अनुभव देतात. शांत समई समोर जेव्हा आपली दृष्टी आपण एकाग्र करतो तेव्हा आपले आप मन एकाग्र होते. आणि एक निराळे द्वार खुले होते. या अनुभूतीच्या जगात शिरताना आपल्याला स्पर्शरहित स्पर्शाची जाणीव होते. एक सखोल शक्ती कदाचित आपले अंतर्मन ,कदाचित मेंदूची निरनिराळी दालने ,कदाचित आनंद, काहीही असेल. जेव्हा आपण आपल्या गुरुचे स्मरण करतो तेव्हाही ही शारीर स्पर्शरहित जाणिवेच्या स्पर्शाची अनुभूती आपल्याला नक्कीच होते,एकरूप चित्तवृत्ती मात्र हव्यात इथे. आपल्या अंतरातम्यांचा स्पर्श नक्कीच जाणवतो.
काही प्रार्थनास्थळे खूप प्रसिद्द नसतात, खूप मोठी नसतात.पण आपण रस्त्याने जाताना अचानक थांबतो आणि नमस्कार करतो. मन अचानक उचंबळून येते. भाबनाप्रधान होते. हे काय असेल? आणि कधी कधी काही मोठीमोठी देवालये त्यांच्या भम्पकपणामुळे मनात स्थान निर्माण करत नाहीत. या स्पर्शरहित ,शरीराच्या अनुभूती पलीकडच्या जाणीवा आहेत.
आपल्या इतिहासातील अनेक उदाहरणे देता येतील.अर्जुनाला श्रीकृष्णाच्या विचारांचा स्पर्श. श्रीकृष्णाने जेव्हा विश्वरूप दर्शन दिले त्यावेळेस कुठल्या पातळीचा स्पर्श अर्जुनाच्या आत्म्याला झाला असेल. अध्यात्मिकच ना? भौतिकतेची जाण ठेऊन या अध्यात्मिक वलयाबरोबर वावरता आणि जगता येते. स्पर्शदीक्षा हा एक आणि मोठा विषय आहे, त्याबद्दल मी एवढी खोलात लिहू शकणार नाही. पण उल्लेख मात्र आवश्यक होता. स्पर्श चिकीत्सा हाही एक तसाच गहन विषय आहे. अनेक थेरपी यावर अनेक देशात अवलंबल्या जातात. हिलींग ट्रीटमेंट तीच असावी. चीन,जपान,भारत,या पुरातन संस्कृती असलेल्या देशात भावना,अध्यात्म यांसारख्या तत्वानुसार दिल्या जाणाऱ्या थेरपी आजही प्रचलित आहेत.
थेरपी देणाऱ्याला ध्यान साधना करावी लागते. आणि मगच ती ट्रीटमेंट शुद्ध पध्दतीने देता येते. यात सूक्ष्म आणि अति सूक्ष्म अशा तत्वाचा विचार केलेला आहे. या लहरी या देहातून त्या देहात जातात तेव्हा त्या शक्य तेव्हढ्या विशुद्ध स्वरूपात जाणे आवश्यक असते. अन्यथा ठासाजे सूक्ष्म नकारार्थीं परिणाम होऊ शकतात असे ते शास्त्र मानते. या चिकित्साबाबतीत माणसागणिक मत मतांतरे आहेत. तो इथला मुद्दा नाहीच. असो.

आपण सर्व हाही लेख मनापासून वाचाल आणि प्रतिक्रियाही द्याल अशी खात्री आहे.

हा भाग शेवटचा म्हटलं पण त्यावर काही वैज्ञानिक बाबतीत चर्चा करायला आवडेल आपणा सर्वांशी.

रोहिणी बेडेकर
२९/०५/२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users