©संततधार! - भाग १२

Submitted by अज्ञातवासी on 23 June, 2020 - 14:47

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग ११ - https://www.maayboli.com/node/75201

मनू हळूहळू गाडी चालवत होता.
शांतपणे, संथपणे...
त्याला आज कुठलीही घाई नव्हती. कुठेही जायचं नव्हतं.
काहीही कमवायचं नव्हतं. काहीही गमवायचं नव्हतं.
गाडी त्याने बंगल्याच्या पार्किंगमध्ये लावली, आणि तो दाराजवळ आला.
त्याने बेल वाजवण्याच्या आतच दार उघडलं गेलं.
पर्वणीने त्याला मिठी मारली, आणि ती रडू लागली. अगदी हमसून हमसून.
"शांत हो माऊ... शांत हो..."
आज कित्येक वर्षांनी त्याने तिला माऊ म्हणून हाक मारली होती.
"शांत हो, काही वाईट नाही झालेलं. आपण आहोत बरोबर, शांत हो..."
तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबतच नव्हतं.
"मनू... मनू..." तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता.
मनूचा शर्ट पूर्ण भिजला होता. पर्वणी त्याच्या घट्ट कुशीत होती. कितीतरी वेळ. खूप वेळ...
तो काहीही बोलत नव्हता. काहीही.
कितीतरी वेळ गेला.
"परु, तू झोपलीस का?"
"नाही. असच राहू दे..."
मनू हसला.
"चल आत जाऊयात."
पर्वणी मनूचा हात धरूनच आत गेली.
मनूने तिला सोफ्यावर बसवलं. तो तिच्या पायाजवळ बसला.
"मनू, मी आयुष्यात खूप छळलय ना तुला?" ती अजूनही मुसमुसत होती.
"हो, पण इट्स ओके." मनू हसला.
पर्वणी पुन्हा ढसाढसा रडायला लागली.
"तू शांत होशील, तर मी बोलू..."
पर्वणी मुसमुसत म्हणाली.
"बोल ना..."
"पर्वणी, मी वेडा आहे का तुझ्यावर जीवापाड प्रेम करायला? जीव टाकायला? तू ना, खूप साधी आहेस, सरळ आहेस. तुला आयुष्यात सगळं चांगलं हवंय. आपण भेटलो तेव्हापासून तू तशीच आहेस.
माझ्या पर्वणीने आयुष्यात कधीही नाती अर्धवट ठेवली नाहीत, की कुठलंही काम.
माझी पर्वणी कधीही मनात एक बाहेर एक असं सांगत नाही. माझी पर्वणी कधीही कुणासोबत खेळत नाही."
"मनू, तुझी पर्वणी चुकली रे यावेळी."
"पर्वणी, नाही चुकलीस ग. नाही चुकलीस. फक्त तू ना, देत राहिलीस.
तू आयुष्यात किती अपयश बघितलय, मला माहितीये. आयुष्यात किती रडलीये, मला माहितीये, आणि तुझ्या स्वप्नातला परफेक्ट मॅन, अटलिस्ट तसं दाखवणारा मॅन तुला सापडला असल्यावर तू प्रेमात पडलीस, आणि प्रत्येक गोष्ट शेवटाला नेण्याच्या निर्णयामुळे, तू झुरत राहूनही फक्त आशेपायी सहन करत राहिलीस. पण एके दिवशी तुटलीस.
प्रेम असच असतं ग माऊ. ते ओरखडे पाडतं, जीव घेतं पण तरीही हवंहवस वाटत...
...आणि आपल्या जुन्या प्रेमाची अशी अवस्था आपल्यामुळे झालीये, असं कुठल्याही सहृदयी व्यक्तीला कळलं असतं, तरी त्याने तेच केलं असतं, जे तू केलंय. कारण आठवणी नाही पुसल्या जात. आणि कालांतराने माणूस प्रेमाच्या फक्त चांगल्या आठवणी ठेवतो.
सो फॉर ओल्ड डेज सेक. यु डिड दॅट...
आणि मला माझी पर्वणी अशा अवस्थेत भेटली असती... तर मीही तेच केलं असतं. मग भलेही मी एमडी असो. किंवा सीइओ... कळलं... तू नाहीस चुकीची."
"मनू, का इतकं चांगलं वागतोस रे माझ्याशी. मला शिक्षा दे. खरंच मी खूप वाईट आहे."
"जगातलं कुठलंही कोर्ट तुला वाईट ठरवायला टपलं ना, तर लक्षात ठेव. तुझा वकील मीच असेन. मग तो यमाचा दरबार का असेना, आणि इतकं भांडेन... त्यांना मान्य करावंच लागेल.
पर्वणी चुकली नाही... ती फक्त परिस्थितीनुसार सहृदयतेने वागली."
पर्वणी फक्त उसासे टाकत होती.
"आता फक्त दोन प्रॉमिस कर मला. आणि हे तू उद्याच करशील. तुझ्या जबाबदाऱ्या परत घे एम डी म्हणून. मी थकलोय आता, आणि मला आराम हवाय. आणि उद्याच एड्स ची टेस्ट करून घे."
"मनू तुझी शपथ, तसं काही झालेलं नाही. अगदी खरं."
"एड्स फक्त त्यानेच पसरत नाही परू.... तसा माझ्या मनात विचारही नव्हता. फक्त तुझं आरोग्य माझ्यासाठी महत्वाचं आहे.... आतातरी विश्वास ठेव."
पर्वणीने फक्त मान हलवली.
"तुला समजू शकेल असा अँटीक पीस मीच आहे." मनू हसला.
कितीतरी वेळ तो पर्वणीचा हात हातात घेऊन थोपटत होता.
◆◆◆◆◆
इतकी प्रसन्न सकाळ पर्वणीला कधीच वाटली नव्हती.
ती आळस देतच उठली. मात्र आज तिला लवकर आवरायचं होतं.
मनू मात्र केव्हाच उठून आरशासमोर उभा होता.
मनू...
सहा फूट उंच, कमावलेलं शरीर, गोरापान, लांब नाक, संपूर्ण क्लीन शेव, व्यवस्थित बसवलेले केस, त्यामध्ये समोर आलेली एकच पांढरी बट तिचं स्थान अबधितपणे मिरवणारी. काळेभोर डोळे.
कितीतरी दिवसांनी ती त्याला निरखत होती.
काळीभोर ट्राउजर, त्यावर पांढरा शर्ट, आणि पुन्हा काळा वेस्टकोट...
त्याचा फेवरेट लूक...
"आवरा पर्वणीजी, निघायचंय आज लवकर..."
पर्वणी झटकन उठली, व आवरू लागली.
◆◆◆◆◆
मीटिंग रूममध्ये सगळे जमले होते. सगळे आश्चर्यचकित झाले होते.
सकाळी आजपर्यंत शार्प नऊ वाजता कधीही मीटिंग झालेली नव्हती.
...आणि त्याहीपेक्षा पर्वणी आज मिटींगला होती...
मनू उठला. तो जेव्हा जेव्हा उठत असे, तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वामुळेच तो सगळ्यांच लक्ष वेधून घेत असे.
त्याने बोलायला सुरुवात केली.
"आज इतक्या सकाळी सगळ्यांच्या झोपेचं खोबरं करून मीटिंग बोलावली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. बघा स्नेहलचे अजून डोळेसुद्धा उघडले नाहीत."
आणि एकच खसखस पिकली.
स्नेहलने मोठ्या मुश्किलीने जांभया आवरल्या.
"आणि त्यात तिचीही काही चूक नाही, कारण सगळ्यात जास्त काम तीच करते."
यावर स्नेहल खळखळून हसली.
"तर, आज एक आनंदाची आणि एक दुःखाची अश्या दोन बातम्या आहेत. आनंदाची बातमी म्हणजे, मी एम डी पद सोडतोय. आता तुम्हाला कामातून रिलीफ मिळेल...
...आणि दुःखाची बाब म्हणजे, पर्वणी आजपासून पूर्णवेळ एम डी म्हणून काम बघेल. सो आता रिलीफची अपेक्षाही करु नका."
सर्वजण प्रचंड आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले.
मात्र त्याचं पुढचं वाक्य ऐकून सर्वात मोठा धक्का स्नेहल आणि पर्वणी दोघींना बसला...
"सीइओ स्नेहलच असेल. मी पूर्णपणे सुट्टीवर चाललोय. डिसमिस..."
सगळेजण उठून बाहेर गेले. स्नेहलला मनूशी काहीतरी बोलायचं होतं, पण तो पर्वणीशी बोलू लागला. म्हणून ती बाहेर गेली.
"पर्वणी, तुझ्या मनात काहीही असेल, तू विचारू शकतेस."
पर्वणी हसली.
"मनू मी चिडले असते तुझ्या निर्णयावर... पण आता मला विश्वास आहे सगळ्यांवर."
"दॅटस माय एमडी. स्नेहल ही खूप मोठी असेट आहे. तिला कधीही गमावू नकोस."
"वेल, मी एक चांगली बॉस बनण्याचा प्रयत्न करेन." पर्वणी हसली.
दोघेही बाहेर आले.
सर्वजण पर्वणीला 'वेलकम बॅक' करायला उत्सुक होते.
स्नेहल मात्र मनूकडे बघत होती.
मनूने केबिनवरून हळूच स्वतःच्या नावाची पाटी काढली, व पर्वणीच्या नावाची पाटी लावली.
"पर्वणी..." त्याने आवाज दिला.
पर्वणीने त्याच्याकडे बघितले.
"एन्जॉय. आणि सगळ्यांनी फाईव इयर्स प्लॅन लक्षात ठेवा. एम डी मॅडमनाही समजावून सांगा... थिंकलॅबशिवाय लोकांच्या मनात काहीही विचार यायला नको."
"येस..." सगळे जोशात म्हणाले.
"चलो बाय. मी सुटीवर जातोय. मला प्लिज पुन्हा बोर करू नका."
सगळे हसले.
मनू हळूहळू बाहेर जाऊ लागला.
तो लिफ्टजवळ पोहोचला.
"वेट..." मागून आवाज आला.
त्याने मागे वळून बघितले. स्नेहल त्याच्याकडे येत होती.
"मनू..."
"बोल ना... "
"तू परत येणार आहेस ना??? आय वॉन्ट माय बॉस बॅक..."
"वेल, आय डोन्ट नो." मनू विषण्ण हसला.
स्नेहलच्या काळजात चर्रर्रर्र झालं.
मनूचा चेहरा, देहबोलीच सगळं सांगून जात होती...
तिला समजून चुकलं.
तो कधीही परत येणार नव्हता...
"मनू मला तुझ्याइतका चांगला बॉस नाही रे मिळणार आयुष्यात. त्याहीपेक्षा, मला माझा एक चांगला मित्र नाही गमवायचाय." तिच्या आवाजात कंप होता.
"वेल स्नेहल, मी जरा लहान आणि इमॅच्युरच आहे. सो जस्ट वॉन्ट टू लर्न न्यू थिंग्स इन लाईफ. आणि मी कधीही तुझा बॉस नव्हतो स्नेहल, पण येस, पण एक विनंती करू?" मनू म्हणाला.
"बोल ना."
"पर्वणीची काळजी घे. तिला तुझी खूप गरज आहे. किंबहुना थिंकलॅबलाच तुझी गरज आहे."
"आणि माझी गरज संपली तर."
"तर तू सुटलीस असं समज..." मनू हसला.
स्नेहलही हसली.
"जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत मी कधीही कमी पडणार नाही."
"थँक्स," मनू हसला.
थोडावेळ दोघेही शांत झाले.
"तुझ्याबरोबर काम करताना मी प्रत्येक क्षण एन्जॉय केला स्नेहल, आणि ते कायम माझ्या मेमरीज मध्ये राहतील. बाय स्नेहल." मनू म्हणाला.
"बाय मनू..." स्नेहल आवंढा गिळत म्हणाली.
"डोन्ट क्राय... यु आर क्वीन ऑफ थिंकलॅब ओके. एक अतिशय स्ट्रॉंग वूमन. तू कायम माझ्यासाठी रोल मॉडेल असशील." मनू तिच्याकडे बघून म्हणाला.
"येस आय एम क्वीन." ती मोठ्या मुश्किलीने अश्रू आवरत म्हणाली.
"दॅटस माय सीईओ." मनू म्हणाला.
लिफ्ट वर आली. मनू तिच्याकडे बघत आत शिरला. लिफ्ट बंद झाली.
क्षणभर ती सुन्न झाली.
हळूहळू ती आत आली.
पर्वणी तिच्या केबिनमध्ये बसलेली होती.
तीसुद्धा तिच्या केबिनमध्ये गेली.
केबिनच्या काचेवरच एक वाक्य कोरलेलं होतं...
'जेव्हा तुमच्या आयुष्यातली अतिशय जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, तेव्हा तुमच्यातील एक अंशही तुम्हाला सोडून जातो!'
तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, व ती कामात गढली...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम..… लवकर पोस्ट केली हे उत्तम झालं.... शुक्रवार पर्यंत वाट पाहावी लागली नाही.... यश अनुभवत असतानाच शांत आणि सुस्वभावी कसं असावं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून मनू परफेक्ट वाटतो.... शेवटाकडे जाताना अनेक प्रश्न उभे राहिले..... त्याकरिता पुढील भाग शक्य तितक्या लवकर प्रकाशित करावा

पुन्हा एकदा निःशब्द!
नववा भाग बेस्ट होता, पण हा भाग त्याच्याही वर गेला.
या भागात ही दोन नाती रंगवलीत ना, तोड नाही.
अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे मिळालीत. पर्वणी अशी का वागली, या सगळ्यात जुन्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा.
एका उंचीवरच हा भाग सुरू झाला, आणि संपताना जी उंची गाठली ना, खरंच हॅट्स ऑफ.
मन जिंकलं स्नेहल आणि मनूने. त्यांचं नातं इतकं तरल, इतकं सुंदर रेखाटलं ना, माझ्या डोळ्यात शेवटी पाणी आणलंच तू.. मला स्नेहल आता जास्तच आवडायला लागली आहे. पर्वणी कायम असते कथेत, पण स्नेहल आणि मनू जेव्हा एकत्र असतात ना, ते कथेला एक वेगळीच उंची देतात. खूप सुंदर नातं दाखवलय त्यांचं.
आता शेवट काय होईल, याचा विचार नाही. फक्त वाचतेय, आणि गुंतत जातेय.
प्लिज कायम असंच सुंदर लिहित रहा!

ग्रेट !!!!

लगेच पुढचा भाग आला, खरच आनंद झाला. आधी वर "पुढील भाग ......" दिसले नाही, म्हंटले खल्लास.....
पण शेवटी क्रमशः दिसले, चला म्हणजे शुक्रवार पर्यंत थांबायला हरकत नाही. Biggrin

कथा छान नोटवर आणली आहेस. फार काही अनपेक्षित घडणार नाही, पण बघूया आणखी धक्का तंत्राने काही घडवू शकशील का?
पुभाप्र आणि शुभेच्छा

@सुहृद - धन्यवाद Happy
@तुषारजी - धन्यवाद Happy
@महाश्वेता - धन्यवाद. नक्कीच ट्राय करेन. Happy
@पाफा - धन्यवाद Happy
@स्नेहलता - धन्यवाद Happy

आता प्रत्येक रात्री एक एक भाग टाकायचं बघतोय. शेवटचे दोन भाग उरलेत.

हा भाग रात्रीच वाचला.. पण लगेच कमेंट पोस्ट करावी अस वाटलं नाही.. वाचल्यानंतर येणार फिलिंग स्वतःपाशीच जपुन ठेवाव अस वाटल.. आता फक्त 2च भाग वाचायला मिळतील याच वाईट वाटतंय.

अज्ञा, मला मनू कुठेच जायला नको. अस वाटतंय.. पण माहिती नाही तु शेवट नेमका कसा करशील या कथेचा.. (अंदाज बांधलाय पण तो टिपीकल आहे.) तुझी ही कथा कधी संपुच नये. अस वाटत असलं तरी. पुभाप्र! Happy

अज्ञातवासी अभिनंदन तुमचं. तुम्ही ह्या कथेत गुंतायला लावलं हे तुमचं लेखक म्हणून मोठं यश आहे. पुढील भागास शुभेच्छा.

.

छान !

मस्त झालाय हा भाग..आता वाटतंय कि पर्वणी अगदीच काही चुकीचं नाही वागली. आपल्या मुळे एखाद्याच वाईट झालं असेल हि फीलिंग च खूप वेगळी आहे. कथा लवकर संपणार आहे याच मात्र खूप वाईट वाटतंय.

पुन्हा एकदा speechless!
मनू सारख्या व्यक्ती अतिशय दुर्मिळ. स्नेहल आणि मनूची मैत्री खूपच सुंदर, हळूवार. साधारणतः सुरवातीला चांगली पकड घेतलेल्या कथा अनेक वेळा शेवटाकडे जाताना भरकटतात, पण अज्ञात तुमचं अभिनंदन, मनू, पर्वणी आणि स्नेहल ला तुम्ही प्रत्येक वेळी वेगळ्या उंचीवर नेलंत, त्यांच्यावर पकड कायम ठेवली. पर्वणी जरा selfish वाटतेय का?

@प्रज्ञाजी - धन्यवाद.
सेल्फीश नाही म्हणू शकणार. ती फक्त आता एन्जॉय करतेय... Happy
दोन भाग राहिलेत. माझ्यामते आता सगळी कोडी सुटली असतील, फक्त शेवट बाकी आहे.

विलन मनु बनेल तर भारी ट्विस्ट मिळेल.. एम् डी असताना कायकाय अफरातफर केली असलीच मनुने तर ते आता पर्वणीला निस्तरावे / भोगावे लागेल. कोल्ड ब्लडेड मर्डर ऐसाइच होयेंगा बिझिनेस में। मान मर्यादा रूतबा खत्म ... आदमी (पर्वणी) खत्म ।

मस्तच..छान झालाय हा भाग.... मी सविस्तर प्रतिक्रिया शेवटच्या भागावरच देईन कारण आता प्रत्येक भागात कॅरेक्टरविषयी मते बदलतायेत..