ब्रह्म

Submitted by आर्त on 23 June, 2020 - 04:30

ब्रह्म होता पहिला,
त्याने ओमकार केला,
उसंत असता, निमिषात
ब्रह्मांड बाहेर खोकला.
.
वळले त्याने सूर्य, चंद्र,
ग्रह, नक्षत्र, तारे,
वळली त्याने पृथ्वी,
भरले पशू- पक्षी, फुले झाडे.
.
पृथा थोडी त्याला भावली,
म्हणून माणूस नामक बाहुली
बनवून, कल्पकतेची
शर्थ त्याने लावली.
.
माणूस राहिला गुणी,
परी बनू लागला कुटील,
षड्रिपूंच्या आहारी गेला,
बनला हवालदिल.
.
एका रात्री भेदरून उठला,
घामाने थपथपलेला,
बिथरलेले मन साठवून,
ब्रह्म ब्रह्म ओरडला.
.
"अरे देवा, ह्या पृथ्वीचं
काय केलं रे मी?"
असं म्हणून तो तडक
निघाला ब्रह्माच्या दारी.
.
पण ना होतं दार तिथे,
ना ब्रह्म होता कोणी,
फक्त होता बोलबाला
आणि स्वरचित परिकहाणी.
.
- आर्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults