सूर्यग्रहण

Submitted by Asu on 20 June, 2020 - 23:22

सूर्यग्रहण

सूर्य पिता माता वसुधा
कुटुंबाची एका मंडळी
बालचंद्रा धरून हाती
खेळ खेळती नभांगणी

एकमेकांच्या भेटीसाठी
युगानुयुगे करती भ्रमण
अवसेला कधी अचानक
भेट होता घडे सूर्यग्रहण

बापलेकाचा भेट सोहळा
माय पहाते डोळे भरून
नयन भरता प्रेमजलाने
सूर्य दिसेना पृथ्वीवरून

वर्णिले इथे ना सत्य कधी
दृष्टीचा असतो नित्य भास
जगणे मरणे जसे आपुले
जगी आंधळ्यांचा प्रवास

वर्षानुवर्ष वाऱ्यावर फिरती
नशिबाच्या या उगा कल्पना
भविष्य असे अपुल्या हाती
ग्रहताऱ्यांच्या नको वल्गना

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults