©संततधार! - भाग १०

Submitted by अज्ञातवासी on 20 June, 2020 - 00:07

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग ९- https://www.maayboli.com/node/75131

पुढील भाग मंगळवार दिनांक २३ जून रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

मनू घरी पोहोचला. त्याने गाडी बाजूला लावली.
तो दाराजवळ आला, तो बेल वाजवणार इतक्यात दरवाजा उघडला.
समोर पर्वणी उभी होती.
"झाली पार्टी मनू???" तिने अतिशय अस्पष्ट आवाजात विचारले.
"परु, आज तू जास्त घेतली आहेस का?" मनू आश्चर्यचकित झाला.
"नाही," तिचा आवाज अजूनही अस्पष्ट होता. "बिलकुल नाही. मी नेहमी कन्ट्रोलमध्ये घेते."
"हो कळतंय. मला आत तर येऊ दे."
"जिथून आला आहेस, परत जा ना तिच्याजवळ. हसीन राते, रंगीन सपने!"
"परु," मनू चमकलाच.
"यायचं नाही, माझ्या घरात. बिलकुल नाही. जिथून आलास, तिथेच परत जा."
"परु, इट वॉज जस्ट अ पार्टी, तिने सीइओ झाल्यामुळे दिली."
"हो, यासाठीच तुझा अट्टाहास चालू होता ना, मला काढण्याचा. असं मला नाही जमलं कधीच. मीही आधीच ऑप्शन शोधायला सुरुवात करायला हवी होती."
"ऑप्शन..." मनू विषण्ण हसला.
"हो, जसं आता पर्वणीला ऑप्शन आलंय, स्नेहल नावाचं."
"पर्वणी, मला प्लिज आत येऊ देशील? प्लिज.
इथेच थांबायचं. मी परत येईपर्यंत. इथेच. माझी आज्ञा समज. आपल्या नात्यात अंतिम निर्णय माझा असतो. आजही मीच निर्णय लावेन. थांब..."
ती आत गेली.
मनू सुन्नपणे बाहेर उभा होता.
ती काही कागदपत्रे घेऊन आली.
"हे घे, डिओर्स पेपर्स. मला कुठलीही कोर्टकचेरी नको. लवकर मोकळा हो, मीसुद्धा होते, आणि जा आयुष्यभर स्नेहलकडे. सी इ ओ आणि एम डी, नवरा बायको, एन्जॉय."
"पर्वणी तुला कसं कळलं मी स्नेहलकडे होतो ते?" मनूने हताशपणे विचारले.
"जसं तुला कळलं, मी कुठे जाते ते. आपल्या सगळ्या गाड्यांना इतकं नवीन जीपीएस यासाठीच लावलं होतंस ना?"
"अग, याआधी मला तिचा पत्ताही माहिती नव्हता."
"मला माहित होता, मी फक्त वाट बघत होते, तू या पत्त्यावर रात्री कधी जातोस ते."
"परु," मनू हताशपणे म्हणाला. "दिवसेंदिवस मी कोलमडत चाललोय."
"आणि मी संपलीये... हळूहळू संपताना पूर्णपणे संपलीये. माझं नॉलेज, माझी प्रतिष्ठा, पद, माझा नवरा सगळं गेलंय. हे पेपर्स आताच्या आता साइन कर. सगळ्या इस्टेटीत मला अर्धा वाटा, आणि मी पन्नास टक्के प्रॉफिट शेरिंग मध्ये स्लीपिंग पार्टनर. बस, तू मोकळा."
"परु, आधी शांत हो. प्लिज? आपण यावर उद्या बोलायचं? चल मला आत येऊ दे."
"बाहेर थांबायचं... माझा हा अंतिम निर्णय आहे, आणि तुला मान्य करावाच लागेल. कळलं. आत आलास तर बघ." तिने रौद्रवतार धारण केला होता.
ती अडखळत आत गेली, आणि सोफ्यावर जाऊन पडली.
तो सुन्नपणे आत आला.
त्याच्या डोळ्यात अचानकपणे अश्रू आले.
तो वर गेला. तिथून एक ब्लॅंकेट घेतलं व ते घेऊन तो खाली आला.
पर्वणीच्या अंगावर शांतपणे ब्लॅंकेट टाकून तो सरळ बाहेर निघून गेला.
◆◆◆◆◆
सकाळी अगदी पहाटेच पर्वणीला जाग आली. तिला डोकं प्रचंड जड झाल्यासारखं वाटत होतं.
इतक्या पहाटे मनू तिच्याजवळ नाही, हे बघून तिला धक्काच बसला.
ती सुन्नपणे बसून राहिली. तिला कालच्या घटना हळूहळू आठवल्या.
आता मनू कुठे गेला असेल?
तिने मनूला फोन लावला.
तिकडून आळसावलेला आवाज आला. "हॅलो..."
"मनू...कुठे... कुठे आहेस..." ती अडखळत एवढंच बोलू शकली.
"खाली येऊन बघ," तो म्हणाला.
तिचा आळस कुठल्या कुठे पळून गेला. ती खाली धावतच आली, व तिने दार उघडलं.
गार्डनमध्ये ठेवलेल्या चार खुर्च्यांचे कुशन काढून मनू त्यावर निवांत झोपला होता.
"मनू, अरे हे काय?" ती प्रचंड खजील झाली.
"तू मला बाहेर काढून आतून दरवाजा लॉक करायचं विसरलीस. मग मी राहिलो राखणदार."
"आत ये प्लिज." तिने त्याला आत बोलावले. तो आळस देतच आत गेला.
थोड्या वेळाने दोघेही टेबलवर कॉफी घेत होते.
"मी सॉरी म्हणायला हवं मनू तुला." पर्वणी म्हणाली.
"मग म्हण ना." मनू कॉफीचा घोट घेत म्हणाला.
"मी तुझ्याशी वाईट वागले म्हणून. पण मी जे सांगितलं, ते मला अजूनही वाटत. मी त्यावर अजूनही ठाम आहे."
मनूची कॉफी घशातच अडकली.
"पर्वणी, मला कायम गुन्हेगार ठरवणार आहेस का?"
"नाही. खरं सांगायला गेलं तर यात तुझीही चूक नाही. हळूहळू मी म्हातारी होतेय आणि ते मलाही कळतंय. यात तू कुणा एखाद्या सुंदर, तुझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलीकडे अट्रॅक्ट होऊ शकतोस."
"एक मिनिट, ती माझ्याच वयाची आहे. तिला एक मुलगा होता. पण हा विषयच नाहीये पर्वणी. प्लिज."
"ओके, तिने स्वतःला चांगलं मेंटेन ठेवलंय मग. आणि मी स्वतःकडे कधी लक्षच दिलं नाही. खरच. म्हणून मनू, तुला स्वतंत्र करायचं मी ठरवलंय. तू पेपर साइन केलेस?"
"मला थोडा वेळ देशील?"
"तू MD पदावरून काढताना मला वेळ दिलास?"
मनू आता पूर्णपणे निरुत्तर झाला.
"उद्या केले तर चालतील?" तो एवढंच बोलू शकला...
"नक्की, एवढा वेळ तर मी तुला देऊ शकतेच."
मनूने कॉफीचा मग ठेवला, आणि तो तिथून उठून निघून गेला.
◆◆◆◆◆
ऑफिसमध्ये आज प्रचंड गडबड चालली होती. पुढच्या पाच वर्षात थिंकलॅब्जच्या वाढीचा फॉरकास्टिंग प्लॅन मनूने आखला होता. सकाळपासून सगळे त्याच मीटिंगमध्ये होते. मनू लोकांना स्वप्ने दाखवत होता... बजावत होता... उज्वल भविष्याची हमी देत होता.
कुणी असो वा नसो, थिंकलॅब कायम असेल... त्याने सगळ्यांना बजावले, व सांगता केली.
मनू त्याच्या केबिनमध्ये जाऊन पुन्हा कामात गढला.
मनूच्या दरवाजावर टकटक झाली.
"कम इन!"
"तू प्रचंड काम करतोय, असं तुला वाटत नाही?" स्नेहल आत येत म्हणाली.
"नाही स्नेहल, उलट बरच काम बाकी आहे असं वाटतंय."
"आय थिंक तुला विश्रांतीची गरज आहे."
"थोडे दिवस काम, आणि मग विश्रांती घेईन." मनू हसला.
"ओके. जस्ट वरीड अबाउट यु."
"थँक्स स्नेहल. मीही आता आवरतोय आणि घरी निघतोय."
"ओके, सी या!" ती उठली.
"सी या स्नेहल."
◆◆◆◆◆
आजही शांतारामला घरी सोडून पर्वणी त्या गल्लीत आली होती.
सवयीच्या बीभत्स नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या. मात्र ती सरळ खोलीच्या दिशेने निघाली.
खोलीचं दार सताड उघडं होतं. जराशा आश्चर्यानेच ती आत गेली.
हेमल कॉटवर नव्हता!
"हेमल," तिने आवाज दिला.
प्रतिसाद नाही.
ती हळूहळू आत गेली, तिथे तिला एक अतिशय कृश आकृती उभी दिसली.
"अरे, उठलास का?"
तो मागे वळला.
"पर्वणी, आज देवाने मला ताकद दिली."
"काय?" ती म्हणाली.
"कालचं राहिलेलं काम पूर्ण करायला."
"हेमल?" पर्वणी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली.
...आणि एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे त्याने तिच्यावर झेप घेतली.
त्याची पकड एखाद्या मगरमिठीसारखी होती.
ती झटापट करू लागली, सुटण्याच्या प्रयत्न करू लागली...
आणि त्या झटापटीतच त्याने तिचा गळ्यापासून खालीपर्यंत ड्रेस फाडला, आणि तोल जाऊन तो जागीच कोलमडला.
...पर्वणी क्षणभर सुन्नच झाली.
"आता सगळं फाडू दे ना परु," तो हसत म्हणाला.
घळाघळा वाहणारे अश्रू सावरत ती बाहेर निघून गेली.
बाहेर त्याच नेहमीच्या नजरा कुतूहलाने तिच्याकडे बघत होत्या. ती अक्षरशः पळत निघाली.
तिने गाडी स्टार्ट केली, आणि त्या वस्तीपासून शक्य तितक्या वेगाने ती दूर निघाली.
◆◆◆◆◆
पर्वणीने बंगल्याची बेल वाजवली.
...मनूने दरवाजा उघडला!
पर्वणीचा अवतार बघून तो जितका सुन्न झाला नसेल, तितकी पर्वणी त्याला बघून शॉक झाली.
"परू???"
ती आत आली. एक शब्दही न बोलता, व सोफ्यावर शून्यात नजर लावून बसली.
मनू तिच्याजवळ येऊन बसला.
तोही कितीतरी वेळ तिच्याकडे बघत बसला.
"पर्वणी, आठवतय का, एकदा आपण पार्टीला गेलो होतो, आणि दासने तुझ्यावर एक वाईट कमेंट पास केली होती. तेव्हा मी रागाने त्याच्या डोक्यावर बॉटल फोडली होती.
सांगशील हे कुणी केलं? तो पुन्हा तुला जिवंत दिसणार नाही..." मनूच्या आवाजात एक अतिशय खुनशी थंडपणा होता.
पर्वणी अजूनही शांतच होती.
"बोल ना परू. की त्यानेच केलंय हे?"
"मनू... मी नंतर बोलू प्लिज? आय निड रेस्ट."
"ओके. पण उद्यापासून तुला तिकडे जायची गरज पडणार नाही."
"डोन्ट वरी, मी जाईन. तसंही उद्याच तू डिओर्स पेपर साइन करतोय. मग माझं आयुष्य मी जगेन." ती अजूनही शून्यात बघत होती.
"पर्वणी, मी त्याला मारून टाकेन. कळलं... त्याने तुझ्या इज्जतीशी खेळ केलाय परु, पुन्हा. कळतंय का?"
"तू त्याला मारणार नाहीस. बस. तुझा काहीही संबंध नाही या प्रकरणात."
"पर्वणी, आज मी ना, तुझ्यासाठी सर्वात वाईट व्यक्ती ठरेन. पण आज मी हे करायला हवं.
मी तुझ्यासमोर दोन पर्याय ठेवतोय पर्वणी, एकतर आज रात्रीच मी त्याचा जीव घेईन, नाहीतर उद्या मी त्याला शांतपणे भेटेन. एकटा. तुझ्याऐवजी..."
"निवड तुझी आहे, आणि सोपी आहे."
"अति करू नकोस कळलं?" पर्वणी म्हणाली.
"ओके. मी उद्या त्याला भेटेन तुझ्याऐवजी. माझ्या मते हाच पर्याय सोपा आहे."
"मी हे कदापि मान्य करणार नाही."
"पर्वणी, तू मला राक्षस म्हणायचीस खूप पूर्वी, आज तो राक्षस बाहेर पडायच्या आत प्लिज, मला परवानगी दे."
मनूचा आवाज आता घोगरा झाला.
हा आवाज पर्वणीला नवीन नव्हता. हा आवाज फार पूर्वी तिने ऐकलं होता,
अनावर संताप झाला, आणि दाखवता आला नाही, तर त्याची ही अवस्था होत असे.
"जा..." पर्वणी थंडपणे म्हणाली. "पण जाशील तर आपल्या नात्यात मागे फिरून बघायचं नाही. आपण वेगळे होऊयाच. कुठलीही तक्रार न करता.
आणि दुसरी गोष्ट, तू त्याला कुठलीही इजा पोहीचवणार नाहीस..."
"प्रॉमिस. पण तुझ्याऐवजी मी जाईन उद्या."
"जशी तुझी इच्छा... यावेळी मी तुला थांबवलं असं होणार नाही."
"थँक्स..." मनू सुन्नपणे म्हणाला.
दोघेही कितीतरी वेळ एकमेकांशेजारी बसून होते.
युगांचं अंतर असल्यासारखे...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पर्वणी ठार वेडी आहे का? का तिला सेल्फ टाॅर्चर करून घ्यायला आवडतं?

चांगली उत्कंठा वाढविली आहे तुम्ही. कुतूहल वाटायला लागलय तिच्या स्वभावाबद्दल.

@च्रप्स - धन्यवाद.
@ नौटंकी - धन्यवाद. बघुयात कथा कुठे वळण घेतेय ते.
@माझेमन - धन्यवाद. स्टे ट्यून.
@पाफा - धन्यवाद.

या कथेचा उत्तरार्ध आजपासून चालू झालाय, एवढंच मी म्हणू शकेन. Happy

खुप छान .

मनूबद्दल खुप सहानुभूति वाटतेय

अप्रतिम..... आपल्या नात्यांची किंमत ओळखणारा मनू, आणि आपल्यामुळे त्याने कुठल्याही बंधनात अडकू नये अश्या विचाराची पर्णवी.... त्यातही स्वतःच अस्तित्व टिकविण्याची चाललेली धडपड यांची सुंदर शब्दात सांगड घातली आहे..... याही भागातील शेवट उत्कंठावर्धक राहिला आहे.... पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा Happy

छान ... मनू आणि पर्वणीच नातं तुटू नये असं वाटतंय..पण तुमचे कथेतले ट्विस्ट बघून अजून काही तरी वेगळं होईल असं वाटतंय पुलेशु

@आबासाहेब - धन्यवाद!
@तुषारजी - धन्यवाद आपल्या अतिशय सुंदरसा प्रतिसादाबद्दल!
@प्रीतम - धन्यवाद!

कथा अप्रतिम सुरु आहे. पण प्रत्यक्ष जीवनात इतका समजदार जोडीदार खरच शक्य आहे का? उत्सुकता खूप म्हणजे खूपच वाढलिय.

@मनिम्याऊ - धन्यवाद. खूप सुंदर प्रश्न आहे. Happy
अजून फक्त तीन ते चार भाग राहिलेत. नक्कीच सगळी उत्तरे मिळतील.

खूप सुंदर भाग अज्ञातवासी. पर्वणी खरंतर फार भाग्यवान आहे कारण तिच्या सोबत मनू सारखा जोडीदार आहे. पण डिवोर्स साठी ती फार घाई करतेय असं वाटतयं. कथा संपूच नये इतकं ह्या कथेत गुंतायला झालं आहे.

@रुपालीजी - धन्यवाद. मलाही खरंच वाईट वाटेल ही कथा संपवताना.
@स्नेहलता - बेस्ट वे टू एन्जॉय द स्टोरी. धन्यवाद
@अजय - धन्यवाद

चांगली चाललीये कथा. ही पर्वणी सायको आहे का ? का त्या मूर्ख माणसाकडे परत परत जाते? की अजून काही ट्विस्ट येणार. पुभाप्र

त्या परूला फोन करून समुपदेशनाचा सल्ला द्यावा वाटतोय . तिला इतके अपराधी का वाटते आहे ? बाकी तशी खमकी आहे ती.

निःशब्द.
पर्वणी चे विचार अगदी चुकीच्या track वर जाताहेत, पण प्रत्यक्षात पण खरंच असं होतं, आवेशात घेतलेला एखादा निर्णय आयुष्यभर पश्चातापदग्ध करतो

@भाग्यश्री - धन्यवाद.
@धनवंती - धन्यवाद.
@प्रज्ञा - धन्यवाद.
अजून कथा बाकी आहे, एवढंच मी म्हणू शकेन. Happy

छान. उत्कंठा वाढली. अशा कठीण प्रसंगी वडीलधारी मंडळी मोलाची भुमिका बजावतात. सुरुवातीच्या भागात भेटलेल्या अण्णांनी काही मध्यस्ती करावी असं वाटुन गेलं.

@वीरू - धन्यवाद!
हे बाकी खरं आहे, मात्र काही निर्णय या दोघांनाच घ्यावे लागतील.

Fiction बद्दल मला असं बोलता येतच नाही की परूने असे का केले/ मनुने असे का केले/ हेमलकडे का जाते परू इत्यादी Happy !
कारण हे सगळे तुम्ही ठरवता तरीही हा भाग आशयघन आणि उत्कंठावर्धक झाला आहे. पुभाप्र Happy .

आदिश्री+१, तरी
परुची खरच खूप चिड यायला लागलीये आता..

माफ करा अज्ञातवासी, ह्या भागानंतर माझातरी कथेतला उत्साह कमी झाला. परत परत ओरबाडून घ्यायच्या प्रयत्नात असलेल्या माणसाकडे पर्वणी जात रहाते आणि मनु कामाचा व्याप सांभाळुनही तिच्यावरील प्रेमा पायी झुरत रहातो हेच सुत्र गेले दोन तीन भाग जाणवते आहे. आजच्या भागामधे कथा फारशी पुढे गेली असे वाटले नाही, "अरे काय हे" अशी काहीशी प्रतिक्रिया झाली.
हे माझे वैयक्तिक मत आहे. इतर अनेक वाचकांना कथा आवडते आहे हे दिसतेच आहे. मला मात्र तसे वाटले नाही, पण एक प्रामाणिक अभिप्राय म्हणून सांगावेसे वाटले. माझा टिका करण्याचा हेतू नाही.
पु. ले.शु.

@मन्या - धन्यवाद.
@चौकट राजा - धन्यवाद. पुढील भाग येतोच आहे. Happy
सध्यातरी मी एवढंच सांगू शकतो.

स्पष्ट सांगायला गेलं, तर मागच्या भागापुढे हा भाग फिकाच ठरला.
पण बघुयात. पुढचा भाग वाचते.