कॅनव्हास !

Submitted by Swati Karve on 18 June, 2020 - 03:47

कॅनव्हास !

कधी कधी वाटतं, आयुष्याच्या कॅनव्हासवर सुंदर चित्र रेखाटणं , अगदीच काही अवघड नसतं,
इंद्रधनुष्या सारखं सुरेख सप्तरंगी आयुष्य जगणं,
अगदी सोपं नसलं तरी अशक्य नक्कीच नसतं.

स्वतः मधलं निरागस लहान मूल जीवापाड जपत,
साध्या साध्या, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद अनुभवणं,
संकटाच्या अंधारलेल्या रात्री, प्रयत्नांची पराकाष्ठा करत,
जिद्दीने लढत राहणं ,
वयाने कितीहि मोठे झालो तरीही,
हक्काने घरातल्या मोठ्या माणसांच्या मायेच्या कुशीत शिरून,
ती संकटाची काळीकुट्ट भयाण रात्र संपून लवकरच,
सुंदर अरुणोदय होणार आह, असा धृढ आशावाद बाळगणं,
मनात काहूर माजविणाऱ्या विचारांना शांत करण्यासाठी,
निर्मळ, निकोप मैत्रीचा आधार घेणं,
मनातली संवेदनशीलता मरु न देता,
लहान थोर साऱ्यांनाच समजून घेणं, सांभाळून घेणं,
आनंदाच्या प्रसंगी, आपल्याला झालेला आनंद,
सगळ्यांबरोबर वाटून तो द्विगुणित करणं ,
आपल्या वाटेला आलेल्या प्रत्येक दिवसासाठी
त्या परमेश्वराचे मनोमन आभार मानणं ,
आणि प्रत्येक क्षण अगदी समरसून जगणं,
मनात कोणाबद्दलही कोणतीही अढि न ठेवता,
निखळ मन मोकळ्या संवादातून सतत वाहत राहणं,
हेवे दावे राग लोभ मत्सर असूया अहंकार यांचे कोणतेही फाजील चोचले न पुरवता,
समाधान, सामोपचार आणि स्वानंदाची कास धरून,
मोहक रंगांची उधळण करत ,
प्रत्येक क्षणी जीवनाचा रंगोत्सव साजरा करणं,
हे सारं खरतर खूप सुखावह असतं.

महत्वाचं असतं ते आपला दृष्टिकोण थोडासा बदलून,
विचार आणि भावनारुपी रंगांची योग्य ती निवड करणं,
आपल्यातला प्रत्येक रंग,
हवा तेवढाच, हवा तिथेच योग्य प्रमाणात वापरणं,
आणि आयुष्याचं चित्र पूर्ण होण्याआधी,
खुबीने रंगांचा अविष्कार करण्याचे ते कसब,
तो वेडा ध्यास आपल्यात खोल खोल रुजवणं !

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users