तुले जानं पळीन

Submitted by Asu on 18 June, 2020 - 03:26

तुले जानं पळीन

आती झालं हासू आलं
कोरोनाचं तं भयच गेलं
आता तुले कोन घाबरीन!
लस सोध्याले तुलेच वापरीन

मरन तं कव्हा बी यीन
आता तुले मी पाही घीन
वाघोबा म्हनलं तरी मारशीन
वाघ्या म्हनलं तं काय करशीन?

लय सोसले चोसले तुह्ये
आता पाहाय धपके माह्ये
मांजर कुढलोंग चूप राहीन
येळ आल्यावर आंगावर यीन

औसद काहाळू लस सोदू
नको तु आवढा गैऱ्हा मातू
नियम पायीन, फिरनं सोळीन
एक दिस तुले जानं भाग पळीन

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.18.06.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अज्ञातवासीजी,
माझ्या 'तुले जानं पळीन' या कवितेवरील आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
सगळ्या बोलीभाषा गोड असतात. तशीच लेवा गणबोली. बोलीभाषा मनात उमलून ओठांवर फुलतात. त्यांना मातीचा सुगंध असतो. शहरी कृत्रिम संस्कार त्यांच्यावर झालेले नसतात. म्हणूनच त्यांची मूळ गोडी कायम असते. माझी 'तुले जानं पळीन' ही कविताही 'लेवा गणबोली' या बोली भाषेतील आहे.
लेवा गणबोली आणि अहिराणी या दोन्ही बोली भाषा गोडच आहेत. दोन्ही मराठी बहिणीच आहेत. पण, बहिणी असल्या तरी त्या एकच नसतात. त्याचप्रमाणे लेवा गणबोली व अहिराणी या दोन्ही अगदी वेगळ्या भाषा आहेत. अशा अनेक बोली भाषांनी मराठी संपन्न झालेली आहे.
प्रामुख्याने जळगांव जिल्हयात चार बोलीभाषा बोलल्या जातात. जळगावच्या पश्चिमेस अहिराणी, उत्तरेकडील सातपुड्याच्या डोंगराळ भागात पावरी तर दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगराळ भागात तावडी व उर्वरित आणि पूर्वेस लेवा गणबोली बोलली जाते.
बहिणाबाईंच्या कवितांबद्दल जो गैरसमज आहे की, त्या कविता 'अहिराणी' या बोलीभाषेतील आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. बहिणाबाईंचे संपूर्ण साहित्य 'लेवा गणबोली'तच आहे. ही प्रामुख्याने लेवा पाटीदारांची भाषा आहे. लेवा गणबोली ही बोलीभाषा असल्याने प्रदेशानुसार उच्चारांचा फरक पडू शकतो.
-असु