जाळं (भाग६)

Submitted by मोरपिस on 15 June, 2020 - 09:44

जाळं(भाग ५) - https://www.maayboli.com/node/75073

          कॉन्स्टेबलबरोबर सगळेजण धावत डायनिंग हॉलमध्ये आले. डायनिंग रूमची झडती घेतल्यामुळे रूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. एका कॉन्स्टेबलने कोपर्यात असलेल्या कपाटाकडे इशारा केला. त्यामध्ये बहुतेक कटलरी, टेबल क्लॉथ आणि पडदे वगैरे होते. पुढे जाऊन विराजने कपाटाचा एक दरवाजा उघडला. "ओ गॉड!" विराज ओरडला. सगळेजण विराजच्या जवळ जाऊन कपाटाच्या आत पाहू लागले… तिथे नुपूर होती!! तिचे हात-पाय बांधले होते. आणि तोंडावर स्कार्फ बांधला होता. नुपूर! नुपूर! ओरडत संतोष तिच्याजवळ गेला. आणि तिचा स्कार्फ उघडून तिला हाक मारू लागला. विराज नुपुरचे पल्स चेक करत म्हणाला,"डोन्ट वरी संतोष! नुपूर जिवंत आहे. पण तिचा पल्स रेट खूप कमी आहे. ती सध्या बेशुद्ध आहे. हिला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल".
          संतोष आणि विराजने त्या कपाटामधून नुपुरला बाहेर काढलं आणि डायनिंग हॉलच्या कार्पेटवर झोपवलं. इंस्पेक्टरने कॉल करून लगेच अँब्युलन्स पाठवायला सांगितली. आणि म्हणाले,"मला समजत नाहीये कोणी कशासाठी नुपुरला कपाटामध्ये बंद केलं असेल?"
विराज पश्चात्ताप करत म्हणाला,"खरंच! आमच्याकडून खूप मोठी चूक घडली. नुपुरला आम्ही पूर्ण रिसॉर्टमध्ये शोधलं. प्रत्येक रूमच्या कानाकोपर्यात पाहिलं, पण डायनिंग रूमच्या या कपाटात पहायचं लक्षातच नाही आलं".
          थोड्याच वेळात अँब्युलन्स आली. आणि नुपुरला घेऊन संतोष हॉस्पिटलला गेला. सगळेच चिंतेत होते. एकामागून एक घडणाऱ्या घटनांचा सर्वजण विचार करत होते. नुपूर जिवंत आहे ही त्यातल्या त्यात जरा चांगली गोष्ट समजली. तनिष्काच्या बॉडीलासुद्धा पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं. विराजने ती बियरची बाटली आणि तुटलेली हिल फॉरेन्सिक एक्सपर्टकडे सोपवली.
इन्स्पेक्टर रेहानला म्हणाले,"तू या रिसॉर्टचा मॅनेजर आहेस! रिसॉर्टची सिक्युरिटी आणि इथे येणाऱ्या गेस्टवर लक्ष ठेवणं ही तुझीसुद्धा जबाबदारी आहे. लवकरात लवकर रिसॉर्टमध्ये सीसीटीवी बसवून घे. आणि हो! इथे मी दोन हवालदार ड्युटीवर ठेवून जातोय!"
विराज म्हणाला,"इन्स्पेक्टर! तुम्ही नका काळजी करू! मी उद्यापर्यंत सीसीटीवी नक्की लावून घेईन. आम्हाला जर काही समजलं किंवा कोणता पुरावा मिळाला तर लगेच तुम्हाला कळवू".
इन्स्पेक्टर निघून गेले. पोलीस गेल्यानंतर रेहान म्हणाला,"तुम्ही सगळ्यांनी प्लिज थोडा नाश्ता करून घ्या. गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही नीट काही खाल्लेलं नाहीये. मी सगळ्यांच्या रूममध्ये चहा आणि सँडविच पाठवतो".
विनीत आणि गौतम अजूनही दुःखी दिसत होते. म्हणून विराजला त्यांना एकटं सोडणं बरोबर वाटलं नाही. तो रेहानला म्हणाला,"असं कर… तू सगळ्यांचा नाश्ता डायनिंग हॉलमध्येच लाव. तिकडे सगळं अस्ताव्यस्त पडलंय पण थोड्या टेबल - खुर्च्या लावल्या तरी सध्याचं काम होऊन जाईल".
मग गौतम आणि विनीतला म्हणाला,"तुम्ही दोघ अंघोळ करून, कपडे बदलून डायनिंग हॉलमध्ये या! तोपर्यंत आम्हीसुद्धा अंघोळ करून येतो. नाश्ता करताना झालेल्या घटनांवर विचार करू! या चर्चेतून कदाचित आपल्याला कोणतातरी महत्त्वाचा क्लू मिळेल".
          जेव्हा विराज आणि नीरजा त्यांच्या रूममध्ये पोहोचले तेव्हा अचानक विराज निरजाचा हात पकडत म्हणाला,"तुझी एक वस्तू आहे माझ्याकडे!" आणि ती N लेटरवाली अंगठी पाकिटातून काढून निरजाच्या हातात दिली.
नीरजा म्हणाली,"ही अंगठी कुठे मिळाली तुला? मी कालपासून शोधत होते अंगठी? मी तुला संगणारच होते पण तू दिलेली अंगठी मी कुठेतरी हरवली हे कळल्यावर तुला वाईट वाटेल म्हणून भीतीपोटी मी सांगितलं नाही".
विराज तिच्याकडे टक लावून पाहू लागला. "खरंच ही अंगठी निरजाकडून चुकून हरवली असेल का? की या खुनांमध्ये नीरजाचा तर हात नाही ना?"
तेवढ्यात नीरजा रडवेल्या स्वरात म्हणाली, "बहुतेक तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये!"
विराज थंडपणे म्हणाला,"विश्वास? आम्ही पोलीस कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय ना कोणाला दोषी मानत, ना निर्दोष!"
नीरजा म्हणाली,"पण खरं हे आहे विराज की ती अंगठी कशी माझ्या बोटातून बाहेर पडली हे मला माहित नाही! पण जेव्हा मला समजलं की माझ्या बोटातली अंगठी गायब आहे तेव्हापासून मी खूप टेन्शनमध्ये होते".
विराज थोड्या कोरड्या आवाजात म्हणाला,"ओके! सध्यातरी ही अंगठी मी माझ्याकडेच ठेवतो. जा! लगेच अंघोळ करून तयार हो. डायनिंग हॉलमध्ये जायचंय".
          जवळजवळ एक तासानंतर जेव्हा विराज आणि नीरजा डायनिंग हॉलमध्ये आले तेव्हा गौतम आणि विनीत त्यांचीच वाट पाहत बसले होते. दोघांचेही चेहरे दुःखी होते.
रेहानने सगळ्यांना नाश्ता दिला आणि म्हणाला,"मी ऑर्डर दिलेय. आज दुपारपर्यंत सुरू होईल सीसीटीवी रिसॉर्टमध्ये!"
"हेच काम तू याआधी केलं असतंस तर पुढचा अनर्थ टळला असता!"
गौतम रडवेल्या स्वरात म्हणाला,"खरंच! मला खूप अपराधी वाटतंय. कुठे मी बड्डेची तयारी आणि सगळे मित्र एकत्र भेटतील म्हणून आनंदात उड्या मारत होतो आणि आज रुही आणि तनिष्काच्या खुनाचा दोषी मानतोय स्वतःला!'
विनीतसुद्धा रडू लागला. "मीसुद्धा सगळ्या मित्रांबरोबर मजा करायला आलेलो इथे. तेसुद्धा सिंगापूरमधून! नाहीतर मला बीजनेसमधून कुठे वेळ मिळतोय एवढा! विचार केला होता, तनिष्कसुद्धा भारतातल्या माझ्या मित्रांना भेटून खुश होईल. पण मला कुठे माहीत होतं की तनिष्कालाच कायमचा हरवून बसेन मी!" आणि तो परत रडू लागला.
सगळ्यांचे डोळे भरून आले. विराज स्वतःला सांभाळत म्हणाला,"आता जे झालं त्याला काही आपण बदलू शकत नाही. पण आपण त्या खुन्याला जरूर शिक्षा ध्यायची'.
          थोड्या वेळाने सर्वजण नाश्ता करून बाहेर लॉनमध्ये आले. खोलीत सगळ्यांना श्वास कोंडल्यासारखं वाटत होतं. निरजाला खूप बैचेन वाटत होतं. ती विचार करत होती की, "आम्ही जर गोव्याला आलो नसतो तर बरं झालं असतं.जेव्हापासून आलोय तेव्हापासून फक्त खून, खून आणि खून!"
तेवढ्यात विराज अचानक उठत म्हणाला, "एक्स्क्यूज मी! मी जरा कपडे बदलून येतो. या शर्टमध्ये मला खूप अवघडल्यासारखं होतंय". आणि तो आत निघून गेला.
नीरजा म्हणाली,"विराज ना खूप मुडी आहे. त्याला जे कपडे आवडत नाहीत, ते तो मुळीच घालत नाही. ते कपडे कितीही महाग असले तरी!"
विनीत म्हणाला,"आता जवळजवळ प्रत्येकाचीच ही सवय असते. प्रत्येकाला आरामदायक कपडेच घालायला आवडतात. मी स्वतः सिंगापूरला शॉट्स आणि टी शर्ट घालतो".
नीरजा स्मितहास्य करत म्हणाली,"तनिष्का काही बोलायची नाही? जर कधी विराजने शॉट्स घातले तर मी त्याला नेहमी अडवते".
विनीत जोर देत म्हणाला,"तनिष्का! ती कशाला अडवेल मला? मी काय घालायचं ते मी ठरवेन!"
गौतम म्हणाला,"मी नेहमी रुहीच्याच आवडीचे कपडे घालायचो. तू लकी होतास यार…… तुला जे हवं ते तू घालू शकत होतास! तनिष्का खरंच एक आयडियल पत्नी होती".
"आयडियल पत्नी नाही…… आयडियल सेक्रेटरी!!! काय विनीत? आयडियल सेक्रेटरीच होती ना तनिष्का?" विराज कडक आवाजात म्हणाला.
"हे काय बोलतोयस तू विराज?" विनीत स्तब्धपणे विराजला बघत म्हणाला.
"जे खरं आहे तेच बोलतोय!" विराज जोर देत म्हणाला.
नीरजा आणि गौतमने आश्चर्यचकित होऊन विचारलं,"मग काय तनिष्का विनीतची फक्त बायको नसून सेक्रेटरीसुद्धा होती?"
विराज एक-एक शब्द स्पष्टपणे उच्चारत म्हणाला,"तनिष्का विनीतची फक्त सेक्रेटरीच होती! विनीतने अजूनपर्यंत लग्नच केलेलं नाहीये".
"शुद्धीत आहेस ना? काय बोलतेयस विराज तू?" गौतम ओरडला.
विराज जोरात विनीतच्या खांद्यावर मारत म्हणाला,"हे सगळं तुम्ही विनीतलाच विचारा! मी तनिष्काला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला थोडासा संशय आला. पण जेव्हा इथे खुनावर खून होत गेले तेव्हा मी खूप काळजीत होतो. मी इथे असताना एवढे मर्डर……ही माझीच बदनामी होती. शेवटी मी कपडे बदलून येण्याच्या बहाण्याने विनीतच्या रूमची झडती घेतली. त्याच्या बॅगमधली त्याची कागदपत्रं आणि पासपोर्ट पाहून मला हे लक्षात आलं की तो अविवाहित आहे. आणि तेव्हा मला समजलं की तनिष्का ही फक्त त्याची सेक्रेटरी होती".
विनीत अचानक खुर्चीवरून उठत कठोर स्वरात म्हणाला,"हो!बरोबर समजलंय तुला! तनिष्का माझी सेक्रेटरी होती".
"मग तू आम्हाला ती तुझी पत्नी आहे असं  सांगून आमची भेट का करून दिलीस?' गौतम आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.
ते यासाठी कारण तू तनिष्काच्या सुंदरतेच्या जाळ्यात अलगद सापडावा अशी याची इच्छा होती" विराज विनीतकडे टक लावून पाहत म्हणाला.
विनीत टाळी वाजवत म्हणाला,"वा! तुझ्या बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे. मी तनिष्काला इथे माझ्याबरोबर आणलं कारण ती तुला तिच्या जाळ्यात अगदी चुटकीसरशी ओढेल आणि मग मी हे रिसॉर्ट तुझ्याकडून स्वस्तात खरेदी करू शकेन असं मला वाटलं".
"तुला माझंच रिसॉर्ट कशाला हवं होतं?" गौतमने आश्चर्य आणि रागात विचारलं.
विराज म्हणाला,"ते यासाठी की हा विनीत ड्रग्ज स्मगलिंग करतो. याच्या बॅगेच्या तळाच्या कप्प्यात अजूनही ड्रग्ज ठेवलेले आहेत. गोव्यमध्ये जर याला तुझं रिसॉर्ट मिळालं असतं तर याची चांदीच चांदी झाली असती".
विनीत दात-ओठ खात म्हणाला,"बरोबर! पण जेव्हा मी पाहिलं की तनिष्काच्या जादूचा याच्यावर काहिच असर होत नाहीये तेव्हा मी दुसरा मार्ग निवडला. रुहीचा खून करून गौतमला त्यात गोवण्याचा! आणि हो! तुझ्या बायकोची अंगठी मला तनिष्कानेच आणून दिली होती. ती अंगठी मी तिथेच रुहीच्या रूममध्ये फेकली. तुला कन्फ्युज करण्यासाठी! मी पोलिसांना साक्ष दिली असती की गौतमने माझ्या बायकोला मिळवण्यासाठी स्वतःच्या बायकोला मारून टाकलं. आणि जेव्हा गौतम जेलमध्ये जाईल तेव्हा मी त्याच्याकडून हे रिसॉर्ट कवडीमोलाने विकत घेतलं असतं. कारण त्याचे आणखी कोणी नातेवाईकसुद्धा नाहीयेत. तनिष्कालासुद्धा मीच चालकीने मारून टाकलं टेरेसवर. कारण ती गौतमला जे काही घडलं ते सगळं सांगायला त्याच्या रूममध्ये गेली होती. नशिबाने गौतम गाढ झोपला होता. आणि तोपर्यंत मी तिथे पोचलो होतो. मी तनिष्काशी बोलत बोलत तिला टेरेसपर्यंत घेऊन गेलो. तिथे बाटलीने तिच्यावर वार केला.  पण तोपर्यंत मला कुणाचीतरी चाहूल लागली. मी लगेच तनिष्काला घेऊन बाल्कनीत उडी मारली. आणि तिथून तिला खाली फेकून दिलं. आणि स्वतः पाईप उतरून खाली उतरलो. तिथे तनिष्काची सँडल काढून तनिष्काच्या बॉडीला स्विमिंग पुलमध्ये टाकलं. ती सँडल मी गौतमच्या रूममध्ये टाकून निघणारच होतो इतक्यात नुपुरने मला पाहिलं. तिला काही कळायच्या आत मी तिला पकडलं आणि तिचं तोंड बांधलं. मग तिचे हात-पाय दोरीने बांधून डायनिंग हॉलच्या कपाटात ठेवलं. मला वाटलं कपाटात गुदमरूनच तिचा जीव जाईल. मग मी गपचूप माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. आणि थोड्याच वेळात तुम्ही सगळे नुपुरला शोधत माझ्याकडे आलात".
गौतम डोक्याला हात मारत म्हणाला,"अरे देवा! हे सगळं माझ्या रिसॉर्टसाठी!"
"होय! कारण या रिसॉर्टला मी माझं हेड ऑफिस बनवून पूर्ण जगाला ड्रग्जचा पुरवठा करू शकलो असतो. तसंही सिंगापूरचा कायदा दिवसेंदिवस कडक बनत चाललाय" विनीत तिखट स्वरात म्हणाला.
"मी तर पहिल्याच फटक्यात यशस्वी झालो होतो. तनिष्काने गौतमला जाळ्यात ओढलंच होत पण या नालायक विराजने त्याला काय पंढवलं माहीत नाही, पण तेव्हापासून गौतम तनिष्कापासून दूर होत गेला. जर विराज इथे आला नसता तर किती बर झालं असतं!" विनीत हताशपणे म्हणाला.
विराज त्याचे हात जखडत म्हणाला,"आलो कसा नसतो विनीत? तुम्ही गुन्हेगारांनी कितीही जाळं वीणा! आम्ही पोलीस तिथे पोचतोच……ते जाळं तोडण्यासाठी! फक्त वाईट याचंच वाटतं की जर हे आधी कळलं असतं तर निर्दोष माणसांचा असा खून झाला नसता! घ्या, इंस्पेक्टरसुद्धा आले त्यांच्या टीमबरोबर!" रिसॉर्टच्या दिशेने येणाऱ्या गाडीकडे इशारा करत विराज म्हणाला.
"मी इथे येता-येता पोलिसांना फोन केला होता".
          थोड्याच वेळात पोलीस विनीतला जखडबंद करून घेऊन गेले. गौतम पश्चात्तापाने रडत होता. त्याला आधीच विनीतने टाकलेलं जाळं समजलं असतं तर तो रुहीला वाचवू शकला असता. आणि नीरजा…… ती तर कितीतरी वेळ थरथर कापत होती. ती विचार करत होती,"लोक स्वतःच्या फायद्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात"……

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच घाई घाईत केला शेवट.... एकदम झी च्या मालिंकांसारखा ... पोलिसांनी इतके खून झाल्यावर सगळ्यांची झडती आधिच घेतली असती कारण रिसॉर्ट वर त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते.

आसा+1