एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग सहावा

Submitted by अजय चव्हाण on 15 June, 2020 - 01:47

भाग सहावा - प्रोमिस.

आज शनिवार, सुट्टीचा दिवस. काल रात्रीच मी माझ्या मुंबईतल्या घरी आलो होतो. हल्ली सारखं मला उदास वाटे. जणू काही माझ्यातला आत्माच नाहीसा झालाय. कुठेतरी मनातं काहीतरी बोचतयं आणि त्या बोचणार्या भावनांशी मला नीट लढतादेखिल येत नाहीये.

"कागदाचे पंख लावून नाही उडता येत मनाला..
कुठेतरी ते धडपडतं , पडतं, आदळतं..जखमा होत राहतात..
रक्त भळभळतं आणि उरत फक्त एक स्वप्नहीन मन.."

वरवरून कितीही चांगला वाटतं असलो तरी आतून पुरता खचलो होतो मी. मनातली घुसमट कुणाला तरी सांगावी आणि मन मोकळं करावं अशी एखादी व्यक्तीही माझ्या इतकीही कुणी जवळ नव्हती आणि असती तरी मला नीट व्यक्त होणं जमलंचं नसतं. कितीही वरवर चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही कुठे ना कुठे "ती" सल दिसतेच ना. कदाचित आईलाही ही जाणिव झाली असेल. आता मला सावरायला हवं. सगळं काही झटकून, मनातलं हे सगळं काढून नीट व्हायलाच हवं. जेव्हा जेव्हा असं काही झटकायचं असतं तेव्हा तेव्हा शब्द माझे सोबत करतात आणि मी डायरीत लिहता होतो. लिहल्यानंतर थोडंफार का होईना हलकं वाटतं.

संपूर्ण दिवस असाच सरला..एखाद्या आजारी असलेल्या म्हातारीसारखाच अस्वस्थ आणि क्षीण. जेवून बिछान्यावर आडवा झालो मी. काही केल्या झोप येत नव्हती. डोळे गच्च मिटले होते पण त्यात थोडी हालचाल होत होती. मनातलं विचारचक्र थांबतच नव्हतं. झोपण्याचा प्रयत्न केला तरीही झोप येत नव्हती.

इतक्यात एक थरथरता मऊ स्पर्श माझ्या कपाळावर झाला. फार फार बरं वाटलं. आईच्या स्पर्शात वेगळीच जादू असते.

"काय झालं पिंट्या (आई लाडाने अजूनही मला पिंट्याच म्हणते)
झोपला नाहीस अजून"

"काही नाही ग थोडा विचार करत होतो" तिचा हात हातात घेत मी म्हणालो..

"कळत मला सगळं ते. तुझी आई आहे मी. कुणाच्या प्रेमात वैगेरे पडलास का आणि त्याच्या आड माझं वचन येत असेल तर आता मोडते मी ते वचन पण तुझ असं हे तळमळणं नाही बघवतं मला.. आल्यापासून तुझं कुठेच लक्ष नाहीये"

आईच्या ह्या व्याकावर मी चाटच पडलो. मला कळेनाच मी काय बोलावे ते -

"अग आई असं काहीही नाही तु उगाच आपले तर्क वितर्क नको लावूस" स्वतःला धक्क्यातून सावरत मी म्हणालो.

"हो का! ही डायरी तुझीच ना? काय लिहलं आहे ह्यात सांग पाहू.."

पुराव्यासकट चोराला पकडल्यावर मी काय बोलणार मी स्तब्ध झालो तसं आईने मला जवळ घेतलं.

"तुला माहीतेय? मी तुझ्याकडून असं वचन का घेतलं ते?"

आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं..

"नाही पण मला खात्री आहे कुठलंही योग्य कारण असल्याशिवाय तु
असं वचन घेतलचं नसतं पण तरीही मला जाणून घ्यायचयं"

आईने एक दिर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरूवात केली -

"मला मोठा भाऊ होता. तुझा मामा हर्ष. त्याने एका गुजराती मुलीशी प्रेमविवाह केला होता. सुरूवातीला सगळंच चांगलं वाटतं होतं दोघांनाही. नंतर नंतर एकमेकांसाठी दोघांनाही अॅडजस्ट करणं कठीण होत गेलं. ती गुजराती आपण मराठी. दोघांची आवड वेगळी, संस्कृती वेगळी. अॅडजस्ट करता करता दोघंही कंटाळली. मग मनातली खदखद बाहेर येऊन भांडण वाढत गेली आणि एकेदिवशी ह्या सार्‍याला कंटाळून आत्महत्या केली त्याने. तो गेल्यानंतर वर्षाभरात तुझा जन्म झाला. तुझ्या मामाची आठवण राहावी म्हणून त्याचचं नाव मी तुला दिलं..तुझं दिसणंही त्याच्यासारखचं. जणू काही माझ्या पोटी तोच पुन्हा जन्माला आला आणि योगायोग म्हणं की दुर्दैव. तुझी आणि मामाच्या कुंडलीतले योग सारखेच आहेत. मी हे सगळं मानत नाही पण तुझी आई म्हणून मला फार फार भीती वाटते. त्याच्याबाबतीत जे घडलं ते तुझ्या बाबतीत घडू नये म्हणुन मी वचन घेतलं होतं तुझ्याकडून"

आई पदराने डोळे पुसत सांगत होती..

"आई मी नाही मोडणार तुझं वचन" तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत मी म्हणालो..

"आणि तुझे अश्रू? सकाळपासून पाहतेय तुला मी. न धड जेवलास.. ना बोललास..तुला असं पाहवतं नाही मला. प्रेम करणं वाईट नाही रे. माझी भिती अनाठायी असली तरी फक्त आई म्हणून ते मी वचन घेतलं होतं. इतर दुसरा कुठलाच विचार मी केला नव्हता. हवी असलेली व्यक्ती आयुष्यात नसली की मग संसार होत नाही. मन मारून केलेली "ती" तडजोड असते. मी केलीय आहे ती तडजोड.. ह्यातून जाणं आणि निभावणं इतकं सोप्पं नाहीये हे. बायको, सून म्हणून मी कधीच स्वतःला कमी पडू दिलं नाही पण तुझ्या पप्पांना अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत संपूर्ण ह्रद्य इच्छा असूनही कधीच देऊ शकले नाही. ह्रद्याचा तो कोपरा नेहमीच राखीव राहीला आणि खरं सांगू ही जी यातना आहे ना ती अशक्य मरणप्राय यातना आहे. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं होता येत नाही आणि आपल्यावर ज्याचं प्रेम आहे त्यांचही होता येत नाही. कळत नकळत आपण स्वतःवर आणि दुसर्यांवरही अन्याय करत राहतो. तु असा स्वतःवर अन्याय करू नकोस. तु आज वचनमुक्त झालास पण त्याबदल्यात अजुन एक वचन दे मला - पुढे तुमचं लग्न झालंचं आणि परिस्थिती कितीही चिघळली तरी तु हर्षमामासारखं काहीही करायचं नाही."

माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, सुखाचे आणि दुःखाचे दोन्हीही आणि त्याच अश्रूभरल्या नयनांनी मी आईला वचन दिलं.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय भाग.
पण अजूनही ही लव स्टोरी सोपी वाटत नाही Happy