पश्चाताप

Submitted by सखा on 13 June, 2020 - 23:18

काळोख दग्ध रात्र प्रहरी अवचितच अरण्यात विज चमकावी व तिच्या दिव्य कल्लोळात एखाद्या प्राचीन मंदिराचे भग्नावशेष उजळून निघावे आणि प्रचिती यावी धूमकेतूच्या आदिम उगमाची. तशी काहीशी ही अनुभूती.
प्रात:समयी कसलेल्या योध्या प्रमाणे त्याची तर्जनी चाळवली गेली. सावजाला बघताच जशी चक्र फिरू लागतात हिंस्त्र श्वापदाच्या मेंदूच्या पेशी पेशीत किंवा युद्धभूमीत टारारून फुगते त्या तपस्वी योद्ध्याच्या भव्य माथ्या वरली बाहुबली शीर. तद्वत.
भूतकाळात परत जाता आलं असतं तर त्यानी कदाचित छाटून टाकली असती तळ हाता सह ती शापित तर्जनी स्वतःची. मात्र कालचक्र उलटे फिरवणे फक्त त्या चिरंतन विश्वव्यापी ऊर्जावान स्वयंप्रकाशित अशा परमेश्वराच्या हातात आहे.
जे घडलं ते त्यांनी घडवलं जे घडणार आहे ते तोच घडवणार आहे सगळेच काही ठरलेले आहे तेव्हा आपण फक्त उरतो नाममात्र कचकड्याच्या बाहुल्या.
मग त्याच्याही आयुष्यात तो क्षण आलाच. प्रारब्ध अटळ आहे.
काळ थांबतो. सर्वत्र भीषण शांतता. निर्णय होतो. एखाद्या निर्ढावलेल्या जल्लादाने तिळमात्र करुणा न दाखवता अलगद उडवून टाकावे मस्तक कुणा पामराचे तितक्याच सफाईने तो खट्टा - क कन लाईक करतो सवंगड्यांच्या फेसबुक वरील एका बंडल पोस्टला.
#ललित #लाईक

Group content visibility: 
Public - accessible to all site users