मुग्धप्रपात

Submitted by अरिष्टनेमि on 12 June, 2020 - 16:48

या वर्षी उन्हाळा म्हणजे नुसताच ‘लांडगा आला रे आला’ झालं. जर्रा उन्हानं डोकं वर काढलं की पावसानं टपली मारलीच. दम खाऊन उन्हानं तडाखा दिला, पण तो येता येताच फुस्स झाला. ८-१० दिवसाच्या वर उन्हाळ्याची सत्ता टिकली नाही. तरी आमच्याकडं ४८ ला टेकून आला पारा.

जसं जसं ऊन वाढू लागतं, तसा पाणवठ्यावर पक्ष्यांचा मुक्काम वाढू लागतो. पक्षीच कशाला, वाघही पाणी सोडून नाही जात. पाण्यात भिजून थंड वाटू लागलं की कोरड्या नाल्याच्या वाळूत पाय ताणून काठाच्या आडोशानं वाघ झोपा काढू लागतात. वाघ पाण्यातून उठला की बाकी जनावरांची पाण्यावर रेलचेल. रगेल रानडुकरं आणि दांडगट गवे इतरांना मोजत नाहीत. पण पाखरांना त्याचं काय? ती तर फार मस्त पाण्यात खेळतात.

पण आपल्याला असं पाणी खेळायला अजून नाही म्हटलं तरी दीडेक महिना असेल, नाही का? आता पाऊस सुरू होईल, मग लागून राहील, झरे-नाले चढतील-गढूळतील, मग उतरून त्यातून निवळ पाणी वाहू लागलं की माणसं येऊ लागतात. पलटणीच्या पलटणी. पावसाळी सहली सुरु होतील. जवळपासचा धबधबा, नदी, धरण शोधून तिथं पाण्यात खेळून उन्हाळ्याच्या हिशोब चुकता करतील.

मी तसा 'पाणभीरू' माणूस. पाण्यात उतरून खेळणं हे आपलं काम नोहे. फक्त काठाशी बसून डोक्यात कुरुकुरु लेखणी चालवणारा मी एक छटाक लेखकू. आणिक म्हणाल तर पाण्याचे फोटो काढण्याच्या कामाचा. अनेक ठिकाणी असे धबधब्यांचे, नाल्यांचे, पाण्याचे फोटो काढले, पण मजा येत नव्हती. पाण्याचे फोटो कसे वाहते, ओघवते, सुळसुळीत रेशमओले हवेत. ते काही होईना. पण पळत्या धावत्या पाण्याचे फोटो काढण्याचं वेगळंच तंत्र असतं, हे समजायला वेळ लागला. ते एकदा कळाल्यावर मी मग सुटलोच. पाणी दिसलं की फोटो, पाणी दिसलं की फोटो. एक असा प्रयोग, एक तसा प्रयोग. सारे प्रयोगच. या प्रयोगशाळेतून मी बाहेर पडलोच नाही. अजून ती अचूक कुरकुरीत रेसिपी हाती आली नाही. पण प्रयोग सुरूच आहेत.

मग झालं काय, की आधी नुसते प्राण्यांचे फोटो होते, आता पाण्यांचे पण फोटो बरेच झाले.

अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर जरा बरा, लोकलज्जा सांभाळून कोणाला दाखवावा असा मी काढलेला धबधब्याचा बहुतेक हा पहिलाच फोटो असावा. हा पुण्याजवळचा एक धबधबा. जुलैमध्ये ऐन तारुण्यात तो धावताना. हा बहर याचा अजून तीन महिने नक्कीच. थंडी सुरु होते. ऊन आक्रसतं, दिवस आक्रसतात. याची धारही आक्रसते. कोरडी पडू लागते. तिकडं थंडीला जालीम धार येते, तेंव्हा हा उदास पडून राहतो, कोरडाच्या कोरडा. निरीच्छ बैरागी. पुन्हा पुढच्या पावसाळ्यात हा गृहस्थाश्रमी येईल. लेकुरवाळा होऊन चोहो कडेखांद्यावर लेकरं घेऊन असाच अनाहत धावत राहील.
1a.jpg

शिलॉन्गमध्ये मस्त हलका हलका पाऊस, अश्शी अश्शी थंडी रे बाबा थंडी!!! चहा २–३-४ किती प्यावेत! इथं अर्थशास्त्राच्या घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत (diminishing marginal utility) कामी आला नाही. इथला हा सुरेख झरा. याचं किती कौतूक! पण ते आपल्यालाच. तिथं कोण त्याच्याकडं पाहणार?
मलये भिल्लपुरंध्री चन्दन तरुकाष्ठमिंधनम कुरुते.

2_2.jpg

हिमालयात अशा झ-यांना तोटा नाही. बर्फाळ हवा. घनगच्च डोंगरउतारावरून धावणारे हे आनंदी जलौघ. आजूबाजूंनी हिरवेगार नेचे. शैवाललंकृत शिळा अन् गर्द वृक्षांच्या राईतून उसळणारे पांढरेधोप निर्झर. किती फोटो काढावेत? मग नुसते बघत राहिलो, मंद कुलूकुलू बोलत वाहणारे हे मंजूळ झरे. सिक्कीमजवळसुद्धा विपुल दिसले. सिक्कीमी गौरांगनेच्या मुक्त रेशमी अनाघ्रात केशसंभारासारखीच नजर याच्यावरही ठरत नाही. हे झरे असेच धावत उतरत हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावून द्वादशदळी रेखीव कमलपुष्पं फुलवतील. शुभ्र हंसपक्षी त्यातून अलगद वेचलेला एक कमलतंतू नाना प्रकारे प्रणययाचना करुन कोमल हंसीणीच्या चोचीत देईल. दोघं सुखे याच झ-याच्या पाठीवर झ-याचीच मंद कुलूकुलू बोली बोलत क्रीडा करतील.

2a.jpg

नदी दुनियेला दान देत समुद्राला अर्पण होते. हा अर्पणभाव नदीला असाच नाही येत. कित्येक तान्हुले गोडुले झरे या अर्पणभावाने येतात. स्वत:च्या अस्तित्वाचा, सौंदर्याचा त्याग करत नदीला बळ देतात. रानाचा प्राण नदीला. नदीचा माणसाला, झाडा-शेताला. पेंच नदीला चिमणदांडगं बळ देणारा हा एक छोटासा बारमाही झरा. उन्हाळ्यात जनावरांचा आधार. रणरण उन्हानं पोळलेला, हुमणदांडगी रानडुकरं लोळलेला. इथं नाचरी रंगीत पाखरं येतात, रात्रीला खुनी घुबडं येतात. गस्तीवरचा वाघ इथंच पाण्याला येतो. काठाच्या करुवर दोहो पंजाच्या नखानं इलाख्याची राजमुद्रा उमटवतो. सांजवेळी पाण्यावर आलेले मोर जेंव्हा वावभर पिसा-याचा सोगा याच्या पात्रातून ओढत रातथा-याला परतू लागतात, तेंव्हा पिसा-याचे सातही रंग थेंब-थेंब याच्या पाण्यात टपटपतात, वसंतात याच्या काठाशी फुलाच्या पाकळी-पाकळीवर मग ते पुन्हा खुलतात.

4_2.jpg

या पेंच नदीच्या काठानं वर वर गेलं की खाली येणारे छोटे झरे, नाले दिसतात. इथं जाताना वाटेत फुरशाच्या नादानं मोर बोरीत अडकला होता. पुढं आडवा आलेला नाला ओलांडायला बूट काढून हाती घेतले अन् नाला ओलांडला तरी बूट घालावे वाटेनात. छान मऊ लोण्यासारख्या चिखलात चालायचा मोह सुटेना. बूट तसेच हातात ठेवले. जेंव्हा समोर कुकरची शिट्टी वाजली अन् बाजूचं गवत नागमोडी करत चार फुटावरुन अस्सा दांडगा घोणस गेला, तेंव्हा मात्र तंतरली.

ही रानाची लेकरं. याची भीती तिथंच सुटते. यांचा आदर करायला शिकलं की ते आपल्याला योग्य रस्ता दाखवतात. रस्ता रानातला, मनातला, आयुष्याचा. तो त्याच्या मार्गे निघाला, मी माझ्या. पुढं जात राहिलो. या नाल्यात उतरलो. निवळलेल्या पाण्याचं रेशमी वस्त्र रानातल्या अनवट माजोरी खडकांना आंजारत-गोंजारत गुदगुल्या करतं. इथं या स्फटीकवत पाण्यात उभं राहिलं की तीच गोड अनुभूती आपल्याला मिळते.

भाग गेला, सीण गेला
अवघा जाला आनंद.

5a.jpg

ताडोबाच्या रानातून इरईला भेटायला निघालेला हा मुग्धप्रपात. या पाण्यानं तृष्णातृप्ती करून निघालेला भुकेला वाघ कुरणाकडं निघतो. कलत्या, कोवळ्या सोनपिवळ्या उन्हात तेंव्हा झाडा-झुडपाचे, गवताच्या तु-याचे शेंडे हळदुले होतात. कुठंतरी वाघ 'आउंघ' करतो. हिरव्या गवताच्या लोभात कळपापासून दूर मागं चरणारा सहा डे-यांचा सांबराचा पोरगेला ढाक दचकून चरायचा थांबतो. कान टवकारून, नाक वर करून पाहतो. हिरव्या-पिवळ्या बांबूच्या रांझीआड उभे काळे-पिवळे पट्टे त्याला दिसत नाहीत. हलणा-या गवतातून रोखलेले दोन पिवळे-लाल डोळे त्याला बोचत नाहीत, गुडघाभर गवतातून पुढं सरकणारा काळ त्याला समजत नाही. त्याची मरणवेळ आली आहे. पण त्याला समजत नाही. हे पाहणारा चितळाचा कळप 'कुक' करून इशारत देतो. पण काळ थांबत नाही, रान थांबत नाही, जन्म-मरण थांबत नाही. झाडांचे शेंडे खाजवत वारा वहात राहतो, पाखरं मंजूळ बोलत राहतात, हरणं चरत राहतात, वाघानं फाडलेल्या सांबराच्या हिश्श्यासाठी टकाचोराची जोडी फांदीवर टपून राहते, प्रपात धावत शेवाळलेल्या खडकांवर उडी मारून या सा-यांना जीवनदान देत राहतो. वाघ पाण्याशी पुन्हा येऊन जातो. झरा त्याला जगवतो आहे. कळपात उरलेली सांबरं तिथंच पाण्यावर येतात. झरा त्यांनाही जगवतो आहे. ती वाघाला जगवत आहेत, रान चालत आहे. झरा धावतोच आहे.

6a.jpg

बाहुबलीमधला जो अथीरापल्ली धबधबा आहे, ती ‘चलक्कुडी’ ऐन पावसाळ्यात अगदी फेसाळत जाते. न्याहारी करताना समोर ‘प्रथम तिज पाहता’ ही वेगवती मोहिनी घालत होती. तिच्या मागे रानाच्या दाट घोंगड्यावर अगदी अडू-पडू झालेले ढगांचे काळे-जांभळे, ढवळे-सफेद लोकरगुंडे. ओल्या झाडाखाली उभं राहून हे सौंदर्य डोळ्यांनी पिताना हातात वाफाळता चहा. हेच ते! हेच ते!! हेच ते!!! बस.

8_1.jpg

याच चलक्कुडीपासून काठाकाठानं जर अजून आत गेलं तर एकतर हत्ती जाम घाम काढतील, नाहीतर हे धबधब्याचं छोटं पिल्लू दिसेल. हत्तीसारख्या जगडव्याळ शिळांच्या अंगा-खांद्यावरून हा उतरत येतो. या शिळांमध्ये खरंच हत्ती उभा राहिला तर आपल्याला दिसावा नाही. पात्रात उतरून अशाच शिळांच्या माथ्यावर आपल्यालाही चढउतार करीत इथं पोहोचावं लागतं. सदरा अंगाशी चिकटून ओला-खारा होतो. डांबरी रस्त्याला चटावलेले बुटाळ नागरी पाय चार ठिकाणी घसरून कोपर-ढोपर थोडं घासून घ्यावं लागतं. याच्या पायी पोहोचून चरणस्पर्श करावा. रानाच्या पाद्यपूजेचं ओंजळभर ओजस्वी तीर्थ घ्यावं. तृप्ती होईस्तोवर प्यावं. कोणत्याच कंपनीच्या बाटलीत हे तुम्हाला कैद करता येणार नाही. इथल्या गोड पाण्यानं तहान भागते. मन भरत नाही. हे सौंदर्यपान करीत इथंच एखाद्या विशाल शिळेवर बसावं. समाधी लागते. सूर्य मावळतीला आला की हत्तीची वर्दळ सुरू होते. मग मन मारून हा मोह सोडून परतण्याऐवजी इतर इलाज काय?

7_1.jpg

दोहों बाजूंच्या उंचनिंच दाटीतून रस्ता काढत धावणा-या कावेरीच्या या डोहाकाठी मी रोज संध्याकाळी येऊन बसायचो. नितळ पाण्याशी बसावं आणि आयुष्य सारं नितळ होऊन जावं. केवळ शरीर धारण करण्यापलीकडे अस्तित्वाचा शोध सुरू व्हावा, पण थांग काही लागू नये. तिथं काहीतरी होतं. ते मला रोज झपाटून टाकायचं. इथं बसून ऐकलेलं संध्यासमयी धास्तावलेल्या भेडकीचं जोरदार भुंकणं. इथं बसून पाहिलेला पाण्याखाली हळूहळू विरघळत जाणारा पिवळा विरोळा. इथं बसून ऐकलेला हत्तीनं वाघावर केलेला चीत्कार. इथं बसून ऐकलेले असंख्य निशब्द क्षण. इथं बसून पाहिलेली शेकडो भिरभिरणारी फुलपाखरं, हातावर, गालावर, कपाळावर उतरणारी. निळी, हिरवी, पिवळी, लाल फुलपाखरं अजून मनात भिरभिरतात, उतरतात. गोड रंग अजून उधळतात. ते रंग कधी शिळे नाही होणार.

12_2.jpg

मेळघाटातल्या गडगा नदीला बम पाणी. ढगातून कोसळणा-या वरुणाच्या सा-या पखाली रित्या होतात. कालिदासाचे निरोपे ढग इथं मनमोकळे सांडतात. गडगेची ओटी भरून पदरापार होते. मग ती ओसांडते. किनारे कवेत घेऊन वाहते. तिला मिळणारे सारेच झरे, नाले उफाळतात. आषाढ सरतो. श्रावणात आश्लेषा, मघेचा उनपावसाचा खेळ सुरू होतो. गावोगावी पोरं इंद्रधनुष्यं पाहतात. मागे ऊन पुढे पाऊस. हा कसा चमत्कार? ‘उन्हात पाऊस पडऽऽऽतो, कोल्हेमामा रडऽऽऽतो.’ पोरं गाऊ लागतात. इथं मेळघाटात तुडूंब वाहून तृप्त झालेला असा एखादा झरा; रस्त्यात दोनदा-चारदा-दहादा येईल. भल्या पावसात वाट अडवून माघारी लावणारा हा झरा आता लाडात येतो. लागट वाहू लागतो. तो पाहून मन भरत नाही. इथं घडीभर टेकावं वाटतं. त्याचा पाहुणचार घ्यावा वाटतो. पाऊस आताच उघडलाय. सूर्य उतरणीला आहे. ढगातून गाळून येणारा त्याचा सोनेरी प्रकाश मोठा उत्साही वाटतो. या अद्भुत प्रकाशात साक्षात्कार होतो. मीच मला सापडतो.

13_0.jpg

मेळघाटाच्या दरीतून वाहणारा हा मडीचा ओढा. दोन तास दरी चढून उतरुन इथं आल्यावर काय वाटतं ते लिहू शकत नाही. या गारव्याला भुलून सारी जनावरं इकडंच येतील नाहीतर काय? उन्हाच्या वेळेला सूर्य डोक्यावर असताना या धारेत घुसावं, तृषार्त आत्म्याला ओंजळी-ओंजळीचा अभिषेक करून शांतवावं. हे मधुर पाणी तडस लागेस्तोवर रिचवावं. अहाहा! सुख, सुख.

9_1.jpg

वर धबधब्यापाशी नुसतं जवळ गेलं तरी तो काही बाही बोलत त्याच्या लक्ष तुषारांनी आपल्या अंगावर शिंपण घालतो. यात धसमुसळेपणा तरीही नाहीच. हे शिंपण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत येणा-या नातवंडांना आवडणा-या दारच्या वेलची केळीच्या रोपाला कोकणातल्या म्हातारीनं शिंपावं असं लाडाकोडाचं. पण हा खळाळ इथंच बरं. पुढं गेलं की इतक्यातच बिचारा अगदी शहाण्यासारखा संथ चालतो. इथं याच्या जवळ गेलं तरी अंगाशी झटत नाही. वाटलं तर दोहों काठांच्या झाडांच्या गच्च सावलीत याच्या शीतल जळात अनवाणी पायानं चालत राहावं. नाही तर यातल्या गोट्यांवर पाय मांडून तारेवर चालणा-या डोंबा-याच्या पोरीसारखे दोन्ही हातांनी तोल सांभाळत आरपार व्हावं. आपल्या सवडीनं.

10_1.jpg

असे शांत आणि राजबिंडे प्रवाह अनेक ठिकाणी दिसतील. मेळघाट उतरुन मध्य प्रदेशाकडं तापीत विलीन होण्यासाठी जाणारा हा प्रवाह. वर कोरडा. खाली मात्र अचानक जमिनीतून अवतरणारा हा साक्षात सरस्वती नदीचाच पुत्र. थोरल्या कहूंच्या झाडांनी याला मानवंदना देत औचित्यपूर्वक मध्यप्रदेशाकडं रवाना केलंय.

11_1.jpg

मेळघाट सा-या ऋतूत पाहिला. कडकड हिवाळ्यात गारगच्च पाहिला, पावसाळ्याचा झरझर झरणारा पाहिला, उन्हाळ्याचा सरसर वाळणारा पाहिला, असहाय्य जळणारा पाहिला, जळून कोळसा होताना पाहिला आणि रानाच्या प्रसववेदना सोसताना पाहिला. नजरेला भावला पावसाळ्यातच. आषाढाच्या आगे-मागे तो बाळंतपणाला माहेरी आलेल्या पहिलटकरणीसारख्या तृप्त ओल्या चेह-याचा दिसतो. अहाहा! नुसता इथल्या रस्त्यांनी प्रवास करणं हा नितांतसुंदर अनुभव असतो. केवळ जात रहावं, निरर्थक जात रहावं. ए.सी.च्या विकाऊ हवेला कान पिरगळून थोपवावं अन् गाडीच्या काचा उघड्या ठेवून रानची ओली हवा छातीत भरून जात रहावं. चालत रहावं. बुटाची ओली कुंडलं उतरवून ओल्या उबदार लोण्यात पाय घोट्यापर्यंत बुडवून जात रहावं. पाना-पानाच्या टोकांवरचे ओघवत्या थेंबांचे गहिरहिरवे पाचू अंगावर गोंदून घ्यावेत, खांद्या-कपाळावर ल्यावेत. केसात माळावेत. चार चुकार थेंबांना केसांतून निथळू द्यावं. खा-या आसवांनी भोगलेल्या गालांवरून कधी या ऊर्जस्वल आनंदगाण्यांचे ओले आलाप झरु द्यावेत. गंगाजल अर्पण करावं. जात रहावं. घशाला कोरड पडली असं वाटलंच तर लहान लेकराच्या मनासारखा नितळ झरा पाहून जमीनीशी उराउरी होऊन ते थंडगार अमृत झ-याला ओठ लावून प्यावं. आपल्या मनातलं हरीण चौखूर होतं की नाही पहावं. एखादा इवलाटिवला नाला ओलांडताना घरा-दाराची चिंता त्याला सोपवून जात रहावं. एखाद्या जांभळीची अवीट फळं मागावीत. "गे बाई, मी आज आश्रित. तुझ्या फळांचा प्रसाद मला चाखू दे. या रानाचा जीवनरस थोडासा माझ्या नसांत वाहू दे. निस्वार्थी, निष्पाप जनावर माझ्यातलंही जागू दे, त्यालाही जगू दे." मग सागाची, कुंभीची चार पानं अलगद सोडवून त्याचा मनाजोगता द्रोण करावा. टपोरी मोत्यासारखी जांभळं खुडावीत. एकदा-दोनदा-तीनदा. त्या कृष्णफळांच्या महाप्रसादानं तृप्त व्हावं. पाय सोडून झ-याशी बसावं. मौनाची कवाडं किलकिली होतील. हे मौन असं इथं आजूबाजूला पसरलेल्या धुक्यागत पांघरून बसावं. चिखलाशी चिखल व्हावं, गवताशी गवत व्हावं, पाखराशी पाखरू व्हावं. सोन्या-रुप्याच्या मासोळ्या येतील. पाठीवर आपला तळवा तोलतील. पायाच्या बोटाशी गुज करतील. ते ऐकू आलं तर तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे. आपल्या मनातलं पाखरू किलबिलत गूढ निळ्या आकाशी रंग शिंपतंय का पहावं. ते दिसलं तर तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे. अशा उरभरल्या वेळी आयुष्याच्या संचिताचा हिशोब अशा झ-याकाठी मोकळा-ढाकळा मांडावा. आयुष्याचा झरा वाहता करावा.

3_2.jpg

वरच्या अवघ्या रानात उगवलेली पुण्याई पिऊन आलेलं सुख या धारेनं आपल्या अपयशी पायाशी येऊन पडतं. तेंव्हा मोठं अपराधी वाटतं. हे सुख भोगायची लायकी नाही आपली. त्या जीवनधारेनं माझ्या या देहाला जोजवावं असं यापाशी काही नाही. ही धार, पुण्यात्मा; साक्षात जीवनाचा खळाळ. मनाशी पहावं तर सारा मतलबी व्यवहार.

देहाच्या प्रपंची
अवघा पापाचा खळाळ

रानाच्या दु:खी कधी जाऊन नाही पाहिलं. माणसाचा जीव जगवताना रानाची लेकरं कशी विसरलो? रानानं भरभरुन दिलं. आम्ही फक्त घेणेकरी. घेता घेता लुटायला शिकलो. पण लुटणारे हात कधी वाटणारे झालेच नाहीत. माणसाचा अपशकुनी पाय रानाला लागला अन् किती हसती-खेळती रानं उध्वस्त झाली! पण त्याच्या शिव्याशापाचा तळतळाट कधी या पाण्यात गवसला नाही. मला नेहमी वाटतं, पहिल्या चार पावसात गढूळलेलं पाणी सारंच वाहून नेतं. खंत, खेद, क्रोध, क्षोभ काही उरत नाही. मागं उरतं ते निखळ प्रेम. सा-यांसाठी......

सर्वकाळ त्या अमृतवाहिनीच्या कुशीत येणा-या जनावरांना, पाखरांना,

डोई-कमरेवर घडे तोलत गावखेड्यातून किलबिल करत पाण्याला येणा-या लेकीबाळींना,

पाखराच्या गोळाभर बच्च्यांच्या घरट्यासकट झाडं तोडून तहानलेल्या तस्करांना,

तापत्या उन्हात महामूर आगडोंब रानात लावून पळून जाताना कोरड पडलेल्या दोन-चार तोंडांना,

बाळासारख्या काजळ-काळ्या डोळ्याच्या हरणाचं नरडं चिरून कातडी सोलण्यासाठी पाण्याशी आलेल्या शिका-यांना,

सापळ्यात अडकलेल्या वाघाच्या घशात भाला खुपसल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या धुणा-या रक्तबंबाळ हातांना,

मुक्या जनावराच्या शिकारीसाठी स्फोटकं खाऊ घालणा-या विकृतांना,

स्फोटकं खाऊन मरणकाळी नदीमायच्या कुशीत हत्तीणीच्या पोटात विझलेल्या वीतभर गर्भाला,

रानं पचवून तुष्ट प्रगतीचा ढेकर देत वीकएंडला आलेल्या स्वार्थांधांना. मला, तुम्हाला, सगळ्यांना.

निखळ प्रेम. बस...............

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर लिहिलंत हो! प्र चि तर एकापेक्षा एक छान आहेत!!
इतक्या सुंदर लेखनाच्या वाचनाचा आनंद घेताना शेवटी मात्र तोंड कडू - कडू झालं. त्या दुर्दैवी हत्तीणीच्या स्मरणाने अजूनही डोळ्यात अश्रू येतात. मुक्या जीवांना, वृक्षवल्लींना इजा पोहोचवणाऱ्या अश्या इतर अनेक घटना आपल्या नकळत घडत असतीलच या विचाराने अधिक हतबल वाटते.

किती किती किती सुंदर लिहिलत. जणू कालिदासच वाचते आहे असं वाटतं..
नदी दुनियेला दान देत समुद्राला अर्पण होते. हा अर्पणभाव नदीला असाच नाही येत. कित्येक तान्हुले गोडुले झरे या अर्पणभावाने येतात. स्वत:च्या अस्तित्वाचा, सौंदर्याचा त्याग करत नदीला बळ देतात. >>>

वाह!

हे प्रयोग आहेत? Uhoh
तुमचे प्रयोग इतके सुंदर आणि काव्यात्मक आहेत कि -^- केल्याशिवाय मन मानत नाही.. Happy

तुमच्या प्रतिभेच्या झ-यात अगदी चिंब झालो. किती हळवं लिखाण...मीही बोललो मनमुराद झ-यांशी, वाघाशी, हरणांशी, पाखरांशी, जंगलाशी स्वत्व विसरून...
असेच छान लेख देत रहा. मायबोलीची तहाण कधीच भागू नये अन तुमची लेखणी थकू नये.

आहाहा , किती सुरेख लिहिलं आहे हे...
प्रत्येक निर्झराच्या जवळच बसले आहे असा अनुभव आला वाचताना.
फोटोही अतिशय सुंदर.
शेवट मात्र दुःखी करून गेला..

अप्रतिम !!! मुग्धप्रपातांसारखेच नितळ, प्रवाही असे लेखन आणि छायाचित्रण...

काय सुंदर लिहिलंत हो! प्र चि तर एकापेक्षा एक छान आहेत!!
इतक्या सुंदर लेखनाच्या वाचनाचा आनंद घेताना शेवटी मात्र तोंड कडू - कडू झालं. त्या दुर्दैवी हत्तीणीच्या स्मरणाने अजूनही डोळ्यात अश्रू येतात. मुक्या जीवांना, वृक्षवल्लींना इजा पोहोचवणाऱ्या अश्या इतर अनेक घटना आपल्या नकळत घडत असतीलच या विचाराने अधिक हतबल वाटते.
+11111

अप्रतिम !!! मुग्धप्रपातांसारखेच नितळ, प्रवाही असे लेखन आणि छायाचित्रण... >>>>> + 99999
तुमच्या लेखनातून जंगलप्रेम, निसर्गप्रेम, वन्यप्राणीमात्रांविषयींचे अकृृृृृत्रिम प्रेम ओसंडून वहातंय... त्याचा काहीबाही लाभ आम्हा वाचकांना होतोय हे महद्गाग्यच....

अरिष्टनेमि,
फार सहीय हे सगळं .. आभार.. _/\_

चंद्रा, मी_अस्मिता, मऊमाऊ, अज्ञातवासी, मनिम्याऊ, वावे, तेजो, हर्पेन, किशोर मुंढे, मन्या, धनवन्ती, दत्तात्रय साळुंके, अजय चव्हाण, मंजूताई, महाश्वेता, रोहिणी चंद्रात्..., चैत्रगंधा, सावली, समई, अनिंद्य, अजिंक्यराव पाटील, किल्लेदार, किल्ली, पुरंदरे शशांक, पाचपाटील

सर्वांचे आभार. आपल्या अशा बलदायी प्रतिसादांमुळं लिहावं वाटतं. कामाच्या धबडग्यात रात्री जागून वेळ काढावा वाटतो. उत्तम खतामुळं बाग फुलावी असे तुमच्या सर्वांच्या प्रतिसादांमुळं लिखाण फुलत जातं.

शेवट कडू असला तरी सत्य आहे. रसभंग झाला असं मलाही वाटलं खरं. त्यासाठी माफ कराल. अर्थात असा शेवट मी जाणून-बुजून नाही केला. हे लिहीण्याच्या ओघात झालं. मूळ लेखाचा डोक्यातला आराखडा धबधब्यांपुरताच मर्यादित होता.

ही एक हत्तीण जगाच्या समोर आली. असे किती प्राणी रोज संपतात, कुठं काही खबरबात नाही. आपण खरंच हतबल आहोत.

या हत्तीणीला अननसात फटाके भरुन खाऊ घातले असं नाही खरं. जंगली जनावराच्या पाण्यासाठी, चा-यासाठी जायच्या - यायच्या वाटेवर शिकारी पीठाच्या गोळ्यात / फळांच्या लगद्यात / रक्तानं माखून गावठी बॉम्ब ठेवतात. जनावराला वाटतं हे खाऊ शकतो. त्यानं तोंडात घेऊन दाढेखाली दाबलं की त्याचा स्फोट होतो. जबड्यासह तोंडाच्या, टाळूच्या चिंधड्या होतात. नाक, डोळा, कान काही नीट रहात नाही. असं जनावर किती धावेल? ते थोडंसं धावून पडतं. लहान असलं तर मरतं नाहीतर तिथंच पडून रहातं. शिकारी तिथं येऊन त्याला मारतात आणि घेऊन जातात.

@ चैत्रगंधा – अगदी योग्य सुचवलं आहे. खूप आधी मी वॉटरमार्क टाकत नव्हतो. लोकांनी हे फोटो वापरायला काही हरकत नव्हती. पण एकदा याचा थोडा कडवट अनुभव आला. त्यानंतर मी अगदी नकळतसे वॉटरमार्क टाकतो. पाहणा-याला खुपू नयेत असे.

Pages