फिक्शनजगत

Submitted by मंगेश विर्धे on 12 June, 2020 - 13:35

फिक्शनजगत

काही कारणास्तव मला बरीच वर्ष फिक्शन अजिबात आवडायचं नाही. लहानपणी फिक्शन चित्रपट पाहायचो. ‘Finding Nemo’, ‘Madagascar’, ‘Ice Age’ असे अॅनिमेशन किंवा ‘Batman’, ‘Spiderman’ यांसारखे चल-चित्रपट पाहण्यात बालपण गेलं. सुवर्णकाळ वाटायचा तो. पण, जसा मी मोठा होत होतो तसं या फिक्शन जगताबद्दलच्या माझ्या मनातील निरागस कुतूहलाने वैचारिक संशयवादाचं रूप घेतलं आणि या फिक्शनजगतापासून मी दूर झालो ते अगदी परवा पर्यंत.
फिक्शन म्हणजे अशा घटना ज्या कोणाच्या तरी कल्पनेतून जन्म घेतात. त्यांचा इतिहासात घडलेल्या किंवा सत्य घटनांशी कसलाही संबंध नसतो. प्रथमदर्शी पाहता फिक्शन दोन मुख्य भागांत विभागता येईल. यथार्थवादी किंवा वास्तववादी(Realistic) आणि अवास्तववादी(Non-Realistic). वास्तववादी फिक्शन म्हणजे अशा घटना ज्या आपण राहतो त्या जगात ‘कदाचित’ होऊ शकतात. अवास्तववादी फिक्शनकथांचं जग हे आपल्या जगापेक्षा वेगळं असतं.
अलीकडे ‘मार्वल’ आणि ‘डी सी’सारख्या चित्रपट निर्मात्या कंपन्यांनी फिक्शनयुगच सुरु केलंय, असं म्हणायला हरकत नाही. कुठं चार मुलं एकत्र दिसली आणि त्यांच्यात काही वाद चालू असला तर तो गणिताच्या कुठल्या सिद्धांतावर नसून मार्वल चांगलं, की डी सी? अशा कुठल्यातरी विषयावर आहे असं समजावं. माझ्या मित्रांचंही काही वेगळं झालं असतं तर नवलच! अशा वेळी सगळे आपापली मतं ठामपणे मांडत असतांना आपण फक्त हाताची घडी घालून उभं राहणं मला हल्ली अवघड व्हायचं. तेंव्हा मी ठरवलं की आपणही सगळे फिक्शन चित्रपट पहायचे आणि अशा चर्चांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घायचा.
आता नेमकी सुरुवात कुठून करावी ते समजत नव्हतं. कोणाच्यातरी सांगण्यावरून ‘Iron Man’च्या पहिल्या भागापासून मार्वल चित्रपटांना सुरुवात केली. मग त्याचे पुढचे दोन भाग, Thor, Dr. Strange आणि Avengers, मग डी सी; त्यामध्ये Man of Steel, नोलनची Batman Triology हे सगळं पाहिलं. ह्या सगळ्या चित्रपटांचं कथानक हे एका वेगळ्या जगातलं आहे. एक असं जग जिथे बऱ्याच कठीण गोष्टी अगदी सहजतेने घडतात आणि सहज घडणाऱ्या गोष्टींसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. जसं खऱ्या जगात काही लोक असतात ज्यांना हे जग खूप आवडत असतं, तसेच काही लोक तिथेही असतात. ह्या जगासारखं तिथल्या काही लोकांना ते जग आवडतही नसतं. आणि या जगासारखाच बऱ्या-वाईटातला संघर्ष तिकडेही चालूच असतो.
फिक्शन जगातली प्रत्येक गोष्ट खूप महत्वाकांक्षी असते. अर्थात असणारंच; ते जग बनवण्यामागेही मानवी महत्वाकांक्षाच आहेत. सुपरहिरो, सुपरविलनपासून भौतिकीचे नियम मोडण्यापर्यंत किंवा नवीन नियम बनवण्यापर्यंत किंवा त्याहीपलीकडे! लेखकाच्या कल्पनाशक्तीला सीमा नाही. पण कलाकाराच्या प्रत्येक कलेमागे काहीतरी प्रेरणा असते, आणि आयुष्यातले अनुभव कलेत उतरवण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. फिक्शन, ही जर कला मानली, तर यामध्येही लेखकाने आपले अनुभव वापरलेले दिसतात आणि याचमुळे कदाचित फिक्शनजग हे कधीच पूर्णपणे वेगळं वाटत नाही. चित्रपट पाहणारा प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा अंश त्या चित्रपटात शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
नाटक, चित्रपट किंवा कुठलीही कला ही तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब असतं, असं म्हणतात. फिक्शन चित्रपटांच्या बाबतीतही हे पाहायला मिळतं. ते जग भौतिकदृष्ट्या कितीही वेगळं असलं तरी त्यातल्या प्रत्येक पत्राचं भावनिक विश्व आपल्या विश्वाशी बरंच मिळतंजुळतं असल्याचं समजेल. जवळच्यांविषयी वाटणारं प्रेम, गनिमांविषयी वाटणारा राग, द्वेष ह्या सगळ्या भावना जशास तश्या असतात. ‘थॅनोस’चा विजय असो, किंवा ‘आल्फ्रेड’चं ‘Batman’ला सोडून जाणं अशा दु:खद क्षणांना डोळे पाणावतातंच; आवडत्या सुपरहिरोच्या अनपेक्षित येण्यावर आनंद आणि उत्सुकता ही असतेच.
सर्वात महत्वाचं कारण ज्यामुळे आपण फिक्शन पाहतो, माझ्यामते, ते म्हणजे उमेद(Hope). फिक्शन जगतातली प्रत्येक प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या स्वरुपात परिपूर्ण असते. म्हणजे पहा ना, स्टार्कचा ‘जार्विस’, ‘Batman’ची Bat-Mobile, अशा गोष्टी कोणाला नको वाटतील? आणि हेच कारण, की ज्यामुळे आपल्या मनात त्याबद्दल अपार कुतूहल आणि नकळत एक उमेद जन्म घेते. काही काळासाठी का असेना, परिपूर्ण असल्याची जाणीव होते. आयुष्य काही काळासाठी, कल्पेनेतच का असेना, सुखकर होतं. शेवटी आयुष्य सुखकर करण्यासाठीच सगळा खटाटोप चाललेला असतो, नाही का?

- मंगेश विर्धे
(ध्रुव (आवृत्ती 2) - मध्ये प्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे!
Avtar, Interstellar, Kung Fu Panda, The good dinosaur याच्या पलीकडे मी फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत या प्रकारातले. का कुणास ठाऊक, बघावेसे वाटत नाहीत. Game of thrones, lord of the rings हेही नाही पाहिलं कधी.

@वावे अगदी खरं आहे.
कथेत येणारा तोचतोचपणा आणि काही काळानंतर निघून जाणारी तर्कसंगत - ही असं होण्यामागची मुख्य करणं आहेत असं मला वाटतं. पण, उमेद खूप महत्त्वाची आणि या लेखनप्रकाराचा आत्मा असलेली गोष्ट आहे. आणि जोपर्यंत ती कथेत असेल, या प्रकाराची लोकप्रियता टिकून असेल असंही मला वाटतं.