नागराज!

Submitted by अज्ञातवासी on 11 June, 2020 - 04:25

"नागराज, तू म्हातारा झालास."
जटाभुजंग गडगडाटी हास्य करत म्हणाला.
नागराजाने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. त्याच्या कष्टाने होणाऱ्या शारीरिक हालचाली बघून जटाभुजंगाला समाधान वाटले.
"हजार वर्षे नागराज, हजार वर्षे. नऊ जटाभुजंग तुझ्याशी लढता लढता प्राणाला मुकले. आज हा जटाभुजंग तुला संपवणार. तुझ्या सहस्त्र वर्ष आयुष्याचं वरदान आज संपेल नागराज. तुझ्या प्रत्येक पुनर्जन्माला मी जन्मताच संपवणार. हे सर्पसत्र जोपर्यंत त्यात शेवटच्या सर्पाची आहुती पडत नाही, तोपर्यंत चालू राहील."
त्याने तलवार हातात घेतली, व तो नागराजाकडे निघाला.
हजार वर्षे पुरून उरलेला आपल्या पंथाचा सर्वात मोठा शत्रू असा गलितगात्र पडलेला बघून त्याला अतीव समाधान वाटले.
'नागराजाची हजार वर्षे पूर्ण झाल्यावर मी नसेन, पण त्यानंतर त्याचा पुनर्जन्म होईल. पण त्याआधी तू त्याला मारशील असं मला वचन दे. त्याचा मृत्यू जटाभुजंगाच्या हातूनच व्हायला हवा.'
नवव्या जटाभुजंगाचे त्याला शब्द आठवले...
तो चालत होता.
नागराज शेवटची तडफड करताना त्याला दिसला.
चालताना अचानक त्याच्या पायाखाली काहीतरी चुरा झाल्याचा आवाज आला.
त्याने खाली बघितले.
नागाची अतिशय जुनी अशी संपूर्ण कात त्याच्या पायाखाली पडलेली होती!!!
'लक्षात ठेव, साप मेल्यावर त्याचा पुनर्जन्म होतोच, पण सापाने त्याची संपूर्ण कात टाकणं म्हणजे त्याचा दुसरा पुनर्जन्म मानला जातो.'
त्याला नवव्या जटाभुजंगाचे शब्द आठवले!
...तो आता नागराजाच्या अतिशय जवळ होता. नागराज त्याच्या टप्प्यात होता!
की तो नागराजाच्या?
त्याच्या मणक्यातून एक थंड लहर गेली. त्याने त्रिशूळावरची पकड अजून घट्ट केली...
आता मात्र नागराजाची अतिशय तुकतुकीत, चकाकती कातडी बघून तो गर्भगळीत झाला.
...आणि पुढच्याच क्षणी तो मानसिक धक्क्याने खाली पडला...
कारण निमिषार्धात नागराजाने फणा काढून त्याच्याभोवती गिरकी घेतली होती, व रात्रीच्या अंधारात तो कुठेतरी दिसेनासा झाला होता!
जटाभुजंग खडबडून उठला.
"पुनर्जन्म झालाय जटाभुजंगा..." एका खोल दरीतून यावा तसा फुसफुसत एक मानवी आवाज आला.
'संपलं सगळं.'
जटाभुजंग हतप्रभ झाला. त्रिशूळ खाली टाकून त्याने पद्मासन घातले, आणि शांतपणे तो मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयार झाला.
...दंश होऊन त्याची गात्रे केव्हा शिथिल झाली, त्याचं त्यालाच कळलं नाही!

समाप्त!

माझ्या आगामी 'विषकन्या, नागलोक व हलाहल' या 'काल्पनिक' पुस्तकांच्या ट्रायलॉजीमधून साभार Lol

तळटिपा -
१. जटाभुजंग - जन्मेजयाच्या सर्पसत्रात सर्पाचा विनाश करण्यासाठी एक खास तुकडी नेमण्यात आली होती, पुढे जाऊन त्यांनी स्वतःची वेगळी जमात निर्माण केली, व त्या जमातीला 'सर्पांतक' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा प्रमुख 'जटाभुजंग' म्हणून ओळखला जाऊ लागला. बारा जटाभुजंग खालीलप्रमाणे.
१. भुजंगतुंग
२. निनाद
३. चंद्रशेखर
४. धराधरेंद्र
५. प्रमोद
६. निरुद्धदुर्धर
७. कदंब
८. मदांध
९. भुजंगराज
१०. नायकम
११. विषकन्या नंदिनी
१२. विषकन्या विजृंभणा

२. नागराज - संपूर्ण तक्षक जमातीचा अधिपती. सहस्त्र वर्षाच्या आयुष्याचं वरदान लाभलेला.
दोन नागराज खालीलप्रमाणे

१. नागराज तक्षक (संस्थापक)
२. नागराज अनंदशयनम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीपीनजी धन्यवाद.
ही माहिती संपूर्णपणे काल्पनिक आहे. खरी नाही Happy
>>
पण सर्प सत्र आणि तक्षक हे पौराणिक द्रुष्ट्या खरे आहे.
वासुकीने तक्षकाला वाचवले.

@निलीमा - धन्यवाद! त्या घटनेचा वापर करूनच ही संपूर्ण स्वतंत्र स्टोरी लिहिलेली आहे.
Just like immortals of meluha style.

मस्त!
परिक्षित फुड पॉयझनिन्ग्ने मेला असावा पण त्याचे खापर मात्र सापांवर फोडले गेले असावे.
त्या काळात नुकतीच जंगले साफ केलेलित त्यामुळे शेती करताना सर्पापासुन होणारे मृत्युचे प्रमाण जास्तच असणार.
शेष आणि कालिया याना पण नागराजान्च्या यादीत येता येइल.
कालियाला कृष्णाने मारले नाही तो नक्कीच जिवंत असावा.

हम्म, असंही असू शकतं.
कालियाला कधीही कृष्णाने मारले नाही, उलट त्याला हरवून रमण द्वीपात परत पाठवले. Happy

Pages