चक्रीवादळ...

Submitted by aksharivalay 02 on 10 June, 2020 - 17:14

काय झाकावं? काय जपावं?
कशावर होईल नेमका प्रहार
डोळे भरून पाहून घेतलं त्याने
पुन्हा पुन्हा घरदार

समोर उभ्या अकस्मात संकटापूर्वीची
जीवघेणी शांतता
घट्ट राहा पाय रोवून इतकंच सांगणं घराला
गाव सोडून जाता जाता

पिसाळलेल्या जनावरासारखं
सुटलंय ते बेफाट
अल्पजीवी असलं तरी घरादाराला
मातीमोल करेल त्याची एखादी लाट

बायकापोरांशिवाय जास्त काही
बरोबर घेता येणार नाही
उभा असेन मी असाच इथे
अंगणातल्या झाडाने भरली ग्वाही

रोजचा परिचयाचा वारा वादळ होऊन
विक्षिप्त वागला काही क्षण
जणू स्वतःवरच स्वतःचच
सुटलं त्याच नियंत्रण

निर्मनुष्य गावात त्याने
असे घातले थैमान
मंदिर, झाड, घर, वाटा
कसलंच नव्हतं भान

भिंत पडली, कवलं उडाली
संसाराची राखरांगोळी
बायकोला समाधान
अंग झाकायला उरली चोळी

काय उरले? काय विरले?
चहू बाजूना आकांत
घरातून दिसणार आभाळ
पोर पाहत होत शांत

अस्थाव्यस्थ प्रपंच पाहून
उर बडवून व्यक्त केलं दुःख
मधेच एकदा जाणवून गेलं
जिवंत असल्याचंही सुख

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर कविता.
'मधेच एकदा जाणवून गेलं जिवंत असण्याचंही सुख' क्या बात है!
खूपच आवडली कविता. इतकं सुंदर लिहिण्यासाठी अभिनंदन.

क्या बात!
वास्तववादी!
सायकॉन ने कोकणात खूप नुकसान झालं.. आज तिथल्या लोकांच्या मनाची अशीच घालमेल झाली असेल..

छान!

धारदार वास्तव....

मांडणी चांगलीये...

वाचून सुन्न झालं...