मराठी संगीत - तुम्हाला काय वाटते?

Submitted by mansmi18 on 29 April, 2009 - 13:42

नमस्कार,

(मराठी) सा रे ग म प आजचा आवाज एक सामान्य प्रेक्षक म्हणुन पाहताना काही विचार मनात आले म्हणुन लिहित आहे. (काहीच्या काही लेखन असा विभाग नसल्याने "ललित" मधे टाकत आहे Happy (अ‍ॅडमिन, इथे योग्य वाटले नाही तर कृपया योग्य जागी हलवाल का?)

बर्‍याच वेळा हे कार्यक्रम पाहताना असे वाटते हाच कार्यक्रम आज पासुन ३० वर्षानी झाला समजा तर हे लोक कुठली गाणी म्हणतील? नेहमीचीच यशस्वी खळे, मंगेशकर, फडके , देव, लता, आशा इ इ?
यांची गाणी सदाबहार आहेत यात शंकाच नाही पण म्हणुन यांच्या तोडीचे सध्या नवीन काहीच चांगले तयार होउ नये? मी ऑनलाईन कुठल्याही साईट वर गेलो की नकळत मी याच नावांकडे ओढला जातो, नवीन चांगले असे माझ्या पाहण्यात/ऐकण्यात फार कमी आलेले आहे.

पूर्वीच्या काळच्या बर्‍याच कलावंतांची आर्थिक परिस्थीती तितकीशी चांगली नव्हती. त्याना झगडुन बरच काही मिळवावे लागले होते. आता या नवीन कलाकाराना बरीच चांगली परिस्थिती असतानाही असे काही छान काम करता येउ नये?
बर्‍याच लोकांचा भर जुनी प्रसिद्ध गाणी गाणे किंवा जुन्या गाण्याना रीमिक्स करणे इतपतच आहे.
(संदीप खरे/सलील कुलकर्णी यांच्या चाहत्यानी मला क्षमा करावी..त्यानी ओरिजनल काम केले आहे, मी त्यांचेही अल्बम ऐकलेले आहेत पण मनाला भिडेल अस मला स्वतःला काही वाटले नाही).

कदाचित नवीन असे काही सुंदर काम झाले असेल तर मी miss केले बहुतेक. (अगबाई अरेच्चा! मधली काही गाणी हा सन्माननीय अपवाद! पण असे अपवाद फारच कमी आहेत.)
तुम्हाला काय वाटते? असे चांगले काम आता होतय का? मला असे चांगले नवीन "original" ऐकण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला माहित असेल तर मला सांगाल का?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बेधुंद' अल्बममधला गायक स्वप्निल बांदोडकर, सावली चित्रपटातली गाणी ही बरीच दर्जेदार वाटली. तसंच अशोक पत्कींचं संगीत सुद्धा चांगल आहेच. अर्थात बरीच नवीन कलाकार मंडळी आहेतच पण ह्यांची पटकन आठवण झाली.

गजेंद्र अहिरे चा एक नवीन सिनेमा येतोय त्यातली गाणी केलीयेत राहुल रानडे ने. मस्त झालीयेत. फिल्मचं नाव, कधी येणार इत्यादी काही मला माहीत नाही. पण शूट पुरं झालंय असं ऐकतेय.
----------------------
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे

मानस्मी, माझे तुला अनुमोदन आहे. माझ्या मनात पण हा विचार बर्‍याचदा येतो. प्रतिभावान लोक नवीन पिढीत कमी आहेत असे मुळीच नाही, पण कदाचित आजकाल कमर्शियलायझेशन जास्त झाले आहे, त्यामुळे क्वालिटीपेक्षा जे जास्त लोकप्रिय होईल ते बनवण्यात बर्‍याचजणांचा जास्त कल असावा. बर्‍याचदा ते संगीत/काव्य १-२ महिने गुणगुणले जाते, आणि नंतर त्याचा विसर पडतो. उपासने म्हट्ल्याप्रमाणे सावलीची गाणी मलाही आवडली. अशी अधून मधून इतर चांगली गाणी कानावर पडतातही, पण जेवढया संख्येने हवी तेवढी नाही. लता, आशा, ह्रदयनाथ, फडके, खळे, भट इत्यादींची जागा जरी कोणी घेऊ शकत नसले तरी, जो आनंद त्यांनी आपल्या आधीच्या पिढीला, आपल्याला दिला आहे तसाच आनंद आपल्या पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी अजून जास्त प्रतिभा/प्रयत्न यांची गरज आपल्या कलाकारांकडून (/कवी/साहित्यकार) हवी असेल!

जो आनंद त्यांनी आपल्या आधीच्या पिढीला, आपल्याला दिला आहे तसाच आनंद आपल्या पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी अजून जास्त प्रतिभा/प्रयत्न यांची गरज आपल्या कलाकारांकडून (/कवी/साहित्यकार) हवी असेल!
--------------------------------------------------------------
मो, मला हेच म्हणायचे होते.. इतक्या नेमक्या शब्दात सांगता आले नाही Happy

पण तुम्ही म्हणता तसे का होत असावे?
पुर्वीच्या काळी वेब साईट्स, टीवीचा एवढा प्रसार नव्हता. मग या कलाकृती इतक्या काळ कशा जिवंत राहिल्या? मला खुप अचंबा वाटतो.
सा रे ग म प मध्ये पंडीतजी बोलत असताना मी अवाक होतो. त्यांच्या कलाकृतीच्या मागे किती संशोधन, किती सखोल विचार आहेत. लता, आशा यांच्यामागे किती प्रचंड साधना/मेहनत आहे हा विचार आपल्या नवीन पिढीने नक्कीच करायला हवा. आणि मी हुबेहुब लता/आशा सारखे गाणे म्हणते यापेक्षा " मी माझे स्वतःचे स्थान निर्माण करीन" हा विचार त्यांच्या मनात यायला हवा.

मला वाटते पालक या नात्याने थोडी जबाबदारी आपण पालकावरही आहे की मुलाना जर अशी आवड असेल तर त्या गुणांची जोपासना करायला हवी आणि त्याना प्रोत्साहन द्यायला हवे (फक्त स्पर्धा जिंकण्यापुरते नव्हे तर काहीतरी सुंदर निर्माण करण्यासाठी).

धन्यवाद.

मनस्मी, 'मराठी संगीत' म्हणजे काय? संगीत ही स्वत:च एक भाषा (mode of communication) आहे. त्यात असा भेद करू नये असं मला वाटतं. एक मराठी 'भावगीते' हा प्रकार कमीजास्त प्रमाणात वापरला गेला यावरून ना संगीताचा दर्जा ठरतो ना काव्याचा. मराठीत आजही दर्जेदार काव्यही लिहिलं जातंय आणि संगीताला तर अजिबातच मरण नाही. देशात आणि परदेशातही त्याची आनंदाने धुरा वाहणारे लोक आहेत. Happy

मला संगीतातले अजिबात काही कळत नाही, पण जाणत्या लोकांनी सांगितले की गाणे सुरात असले, थोडक्यात त्याला कुठल्यातरी रागाचा पाया असला की ते कानाला गोड लागते, लोकांना आवडते, चिरकाल टिकून रहाते.
नाहीतर जुनी हिंदी व मराठी गाणी इतकी का लोकप्रिय व्हावीत? अजूनहि आ जा रे परदेसी (बागेश्री), तू गंगा की मौजमे, जमुनाका तारा(भैरवी), अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा (माणिक वर्मा, भीमपलास), धुंद मधुमति (लता मंगेशकर, मालकंस) ही गाणी लोकांना का आवडावीत?

संदर्भ (इ-प्रसरण)

संदीप खरे/सलील कुलकर्णी यांच्या चाहत्यानी मला क्षमा करावी..त्यानी ओरिजनल काम केले आहे, मी त्यांचेही अल्बम ऐकलेले आहेत पण मनाला भिडेल अस मला स्वतःला काही वाटले नाही >> सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण त्यांनी नविन पिढीमध्ये मराठी गाण्यांची आवड निर्माण करण्यात खुप हातभार लावला आहे.

कदाचित १५-२० वर्षांनी ही आणी आजकालची बाकी गाणीही अजरामर वाटतील. प्रत्येक पिढीनुसार हे निकष बदलत जातील.

स्वाती,

मी "मराठी संगीत" हे उदाहरणादाखल घेतले आहे. आणि इथे मी माझ्यासारखा अगदी सामान्य प्रेक्षकाच्या बाजुने विचार करत आहे. त्यामुळे भावसंगीत किंवा चित्रपट संगीताबद्दल लिहिले आहे.
(शास्त्रीय संगीत मी फारसे ऐकले नाही त्यामुळे त्याबद्दल मी काहीच लिहिले नाही.)

संगीताच्या दर्जाबद्दल लिहावे एवढे मला कळत नाही. पण काळाच्या प्रवाहात हरवुन न गेलेले आणि पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटावे ते चांगले संगीत अशी आपली माझ्यापुरती माझी व्याख्या आहे. (आणि असे नवीन संगीतात मला तरी फार आढळले नाही..कदाचित माझा दोष असेल तो).

आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी संगीताची अजिबात काळजी करत नाही Happy मला आयुष्यभर पुरेल एवढी इस्टेट या दिग्गज लोकानी ठेवलीच आहे Happy फक्त मला पुर्वीसारखे सुंदर नवीन काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे. त्यासाठी इथे पोस्टले.

धन्यवाद.

कदाचित १५-२० वर्षांनी ही आणी आजकालची बाकी गाणीही अजरामर वाटतील. प्रत्येक पिढीनुसार हे निकष बदलत जातील.
--------------------
नात्या,
बरोबर!

मला असं वाटतं की, गाणं हा एक संवाद आहे जो कवी, संगितकार, गायक आणि ऐकणारे ह्यांना जोडतो.
तो संवाद चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. अगदी ऐकणार्‍यांचीही. किंबहुना काही काही बाबतीत ऐकणार्‍याची जास्तं.

एखादं वेगळं काहीतरी सांगणार्‍याची धडपड ऐकणार्‍याच्या आतपर्यंत पोचायला, ऐकणार्‍याने स्वतःला आणि सांगणार्‍यालाही थोडा अधिक वेळ द्यायला हवा.
त्याचबरोबर सांगणाराही, ऐकणार्‍याला अगदीच न पचणारं देत असेल तर, त्याच्याकडे ते पचनी पडेपर्यंत थांबायची तयारी हवी.
हृदयनाथांची गाणी त्यांच्या निर्मितीच्या कितीतरी नंतर लोकांना भावली आहेत.

एका विशिष्टं "पद्धतीचं" संगीत बराच काळ ऐकलं की, त्याचे संस्कार इतके दृढ होतात की दुसरं, वेगळं पटत नाही, आवडत नाही. आपलं मराठी भावगीत हा त्यातलाच एक प्रकार. हृदनाथांनी दिलेल्या चाली लोकांना पहिल्यांदा पचल्याच नाहीत.
अजून एक सांगते. श्रीनिवास खळेंनी दिलेल्या तुकारामांच्या अभंगांच्या चाली "पारंपारिक" पासून इतक्या वेगळ्या होत्या, की त्यावर टिका झाली होती. आज 'सुंदर ते ध्यान' म्हटलं की तीच यमन मधली चाल आठवते.

(अशीच सुंदर चर्चा चालू राहुदे.)

एका विशिष्टं "पद्धतीचं" संगीत बराच काळ ऐकलं की, त्याचे संस्कार इतके दृढ होतात की दुसरं, वेगळं पटत नाही, आवडत नाही.
------------------------------------------
माझे काहीसे असेच झालेय बहुतेक.
इतर गोष्टी आवडुन घ्यायचा मी प्रयत्न करतो पण तुम्ही म्हणता तसे ते "आतपर्यंत" पोहोचत नाही!. उदा. मी आधी लिहिलेय तसे संदीप खरे/सलील कुलकर्णी यांचे गीत्/संगीत बर्‍याच लोकाना आवडते त्यात नक्की काहीतरी असेल म्हणुन मी सी डी आणुन ऐकल्या पण मला ते भावलेच नाही.
तुम्ही म्हणता तसे वेळ द्यायला हवा कदाचित..

दाद,
फारच छान विचार! तुमच्याकडे हृदयनाथ्/खळे यांच्या संगीताविषयी आणखी माहिती असल्यास कृपया शेअर कराल का?

इथे लिहिण्यासारखं काही आठवलं तर जरूर लिहीन, मनस्मी.
अजून एका गोष्टीचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.

पूर्वी जितकं गाणं 'आवर्जून' ऐकलं जायचं तसं आता होत नाही. येता जाता आपण इतक्या विविध पद्धतींनी "संगीताला" सामोरे जातो की, इतकं संगीत आजूबाजूला घडतय ह्याची आपली जाणीव बोथट झालीये. टीव्ही, सीडीज, मोबाईल फोन, एम्पी३... आणि बरच काही.
जे ऐकतोय ते प्रयत्नं पूर्वक, लक्ष देऊन न होता... कानावर पडतय म्हणून... असा एक त्रयस्थंभाव येत चालला आहे. पूर्वी आवर्जून कामगारसभा, संध्याकाळची गाणी, रात्रीचा रेडिओचा नॅशनल प्रोग्रॅम ऐकला जायचा. हल्ली, 'बघू... वाटलं तर सीडी घेऊ नंतर...' असा ही सूर दिसतो.

तसच सध्याची संगीतात काही करू पहाणार्‍यांची पीढी त्यांच्या दोन तरी आधीच्या पिढ्यांबरोबर शर्यतीत आहे. कसं? तर एकाचवेळी पू. मोगूबाई, किशोरीताई, आणि देवकी ची सीडी आपल्याकडे एकाच रॅकवर असू शकते.

जवळ जवळ हीच कथा सुगमसंगीताचीही आहे. हॄदयनाथ, श्रीनिवास खळे जेव्हा काही नवीन देण्यासाठी आले, तेव्हा आपली किंवा आपल्या आधीची पीढी, जुन्या गायकांच्या/गाण्यांच्या फक्तं आठवणीत होते. हाताशी येईल, चटकन तुलना करता येईल असं त्याआधीचं गाणं रेकॉर्डिंगच्या वगैरे रूपात उपलब्धंच नव्हतं. नकळत आपल्या मनाच्या पाट्या अधिक कोर्‍या (दुसर शब्दं सुचत नाहीये) होत्या. आपण अधिक "तयार" होतो, पुढचं वेगळं स्वीकारायला.

एक विचार करा.. (फार वाईट विचार आहे). की, सगळीकडून ह्या प्रस्थापित (पुन्हा वाईट अर्थी वापरला गेलेला शब्दं), कलाकारांचं सगळं पुसलं गेलय, कुठे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही... अशा वेळी पुढची पीढी (आपलीही) ह्या नवोदित संगितातल्यांचं जरा अधिक औत्सुक्याने ऐकून घेईल का नाही? किंचित तुलना होईल. पण त्यातलं सौदर्य टिपण्यासाठी आपण सजग असू, तयार असू.
असो... फार मोठ्ठी झाली पोस्ट.

दाद,
अगदी योग्य मुद्दा लिहीलायस. पूर्वी संगीत ऐकवल जायचं, आजकाल ते कानावर आदळतं. परिणामी अभिरूची थोडी बोथट झाली हे नक्की. आणि याचा एक सार्वत्रिक परिणाम म्हणजे वाईट म्हणणार नाही पण विचित्र संगीत संस्कार कानावर होतात. खर तर आजचा कलावंत आर्थिक दृष्ट्या बराच सक्षम आहे त्यामूळे पूर्वीच्या कलाकारापेक्षा "दर्जा" चा स्तर उंचावलेला हवा (कारण आजच्या कलावंताला तित्कई आर्थिक "धडपड" करावी लागेल से नाही परिणामी वेळ आणि पैसा दोन्ही दर्जेदार निर्मितीसाठी कामी लावता येईल). पण आजकालच्या कलाकाराला आजचं व्यावसायिक गणित संभाळायचं आहे जे बहुतांशी "mass appeal" याच्याशी निगडीत असतं.

दर्जेदार संगीत निर्माण करणारे, मेहेनत करणारे, विचार्पूर्वक संशोधनपर काम करणारे आजही आहेत फक्त व्यावसायिक गणितात बसत नसल्याने बरेच वेळा त्यांची कलाकृती समोर येत नाही असं दिसून येतं. गरज आहे अशा व्यासपीठाची जे आजच्या काळातील दर्जेदार संगीताला वाव देईल, त्याचा प्रसार करेल.

वैयक्तीक हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा असल्याने या अनुशंगाने नुकतेच आम्ही काही जणांनी एक प्रकल्प/उपक्रम हाती घेतला आहे. ज्यात अशा नविन संगीताची समिक्षा, रेटींग, एकंदर गुणदर्शन व कलाकारांची अन कलाकृतिची ओळख अन प्रसार हे करण्याचा हेतू आहे. जसे काम पुढे जात राहील तसे जमल्यास माझ्या रंगीबेरंगी वर त्याबद्दल माहिती देत जाईन. __________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

मला पण हि नविन गाणी आवडत नाहीत, त्यापेक्षा भावत नाहीत. गाण्यांच्या चाली पसरट वाटतात. गाताना वा चालीवर काहि खास कष्ट घेतलेत असे वाटतच नाहीत. मोजके पण दर्जेदार काम करण्यापेक्षा भारंभार काम केल्यासारखे वाटते. काहि गाणी आवडतात, पण लक्षात रहात नाहीत. पूर्वीचा एखादा सिनेमा, उदा घरकूल घ्या, सुवासिनी घ्या, धर्मकन्या घ्या. सर्वच गाणी सुंदर असत.
सीडी विकत घ्यायला गेलो तर बर्‍याच नविन लोकांच्या सीडीज दिसतात, पण परदेशी घेऊन जाताना, मात्र जुने ओळखीचे संगीतच न्यावेसे वाटते.
आणि हो या लोकानी मला हाच काय असलेच तर पुढचे सगळे जन्म पुरतील एवढे काम केलेय.

खूपच छान विषय....

सध्या नविन बरीच चांगली गाणी येत आहेत.. पण ती गाणी प्रसिद्ध न होण्यामागे सध्याच्या पिढीतील निरनिराळ्या कार्यक्रमात गाणार्‍या गायकांचा तसेच श्रोत्यांचा पण तितकाच सहभाग आहे असे मला वाटते...
कोणत्याही कार्यक्रमला गेल्यावर तीच तीच गाणीच ऐकायला मिळतात.. चावून चावून चोथा झालेली..
(जुनी सर्व गाणी ही अवीट गोडीची आहेत आणि ती सगळी सुरेखच आहेत पण काहीतरी नविन गाणी म्हणायला काय हरकत आहे) नविन गाणी म्हणायच्या फंदात कोणी पडतच नाही...

आणि समजा कोणी संगीतकारानी त्याच्या नविन चाली लावलेल्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला तर त्या ऐकायला श्रोतेच पुरेसे जात नाहीत.. त्यामुळे बर्‍याच नविन चाली श्रोत्यांपर्यंत पोहोचतच नाहीत..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

मनस्मी,
छान बीबी. Happy
मला तुमची आणि इतरांची काही मतं अगदी तंतोतंत पटली...
खरंच पुर्वीच्या गायक, गायिका, आणि संगितकारांनी इतकी माया आपल्यासाठी मागे ठेवली आहे की ती डावलून इतर काही सध्या कानाला गोड वाटत नाही. माझ्या वैयक्तिक मतानुसार मराठी चित्रपटातलं संगित हरवून बरीच वर्ष उलटली... उंबरठा, मोहित्यांची मंजुळा सारख्या चित्रपटाचं संगित आठवलं की आजचं मराठी संगित त्यासमोर एकदम फिक्कं वाटतं, अगदी निर्जिव... Sad

दाद यांचं मत ही एकदम पटलं कारण पुर्वी फक्त रेडिओ हेच एक साधन होतं संगिताला सामोरं जाण्याचं. गायक गायिका, संगितकारांना एक्स्पोजरच नव्हतं. लता गायला लागल्या लागल्या थोडेच तिचे फोटो, प्रोमोज घडायला लागले? पुर्वी आवाजाच्या निकषावर सर्व ठरत असे. तुम्ही सांगा आज वैशाली सामंत घालेल जरीची साडी? ती ही दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन? शिवाय दोन लांब पेडाच्या वेण्या घालून राहील का उभी स्टेजवर गायला? पण लताबाई तशाच गायच्या... पण त्यांनी दिलेला ठेवा अनमोल...

अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर, आजकाल आवाज, शब्द, याला फार महत्व दिलं जात नाही... Sad
अन्यथा कोंबडी पळाली, लगिन ठरलंया, बाबा लगिन असली शब्द आणिअर्थशून्य टुकार गाणी कधीच फेमस झाली नसती. महत्व आहे ते लूकला, थोडं फार संगिताला (चाल आणि ठेका) ते पण उडतं असेल तर बचावेल... माझ्या मते तरी खरं सुरेल गाणं कुठेही कसं ही तरतं. त्यासाठी प्रोमो करायची गरज नाही.
आपल्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, आजकाल सतत काही ना काही नविन नविन आपल्या समोर येत जातं. त्यामुळे ही एखाद्या गोष्टीला द्यावा लागणारा वेळ हा इतका अल्प आहे की ती गोष्ट दिर्घकाळ आपल्या स्मरणात राहणं निव्वळ अशक्य आहे. Sad

आजकाल मराठी संगिताला चांगले दिवस यायला लागले आहेत यात दुमत नाही. पण मध्यंतरी जितका श्रोतावर्ग मराठी संगिताने गमवला तो नोंद घेण्याजोगा आकडा असेल. मी ही जुनी मराठी गाणी ऐकायची पण निवेदिता जोशीचं 'र पोरा येऊ नको रंगात....' हे गाणं ऐकल्यावर मला अगदी उबग आला होता.. त्यानंतर ही तशाच प्रकारची गाणी मराठीत वारंवार आली.. Sad त्यामूळे मी त्याकडे पाठ फिरवून फक्त हिंदी संगिताचा कित्ता गिरवला...

निवडक गाणी उदा. मल्हारवारी...संदिप खरे यांच्या कविता अवधुतचं संगित हे मला ही आवडतं पण ते तितकं ठसा उमटवणारं नाही. Sad

सध्य स्थितीत मराठी संगिताला बरे दिवस आलेत पण तरीही पुर्णपणे (पुर्वीप्रमाणे) वर यायला बराच काळ लागेल.

नमस्कार,
खरच फार छान, योग्य मतं मांडली आहेत सगळ्यांनी. पुर्वीचं संगीत एका शास्त्राला धरुन होतं. रागदारी. हेच कदाचित महत्वाचं कारण वाटतं जुनं संगीत चिरतरुण राहण्याचं. प्रतिभेला काळाची मर्यादा असु शकत नाही. सध्याही प्रतिभावान कलाकार नक्कीच आहेत. पण प्रतिभेचे आयाम आणि मित्या बदललेल्या आहेत काळानुसार. त्या समजून घेतल्या तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील.
हे मात्र नक्की की संगीत देताना काही मूलभूत गोष्टींचा विचार व्हावा असं वाटतं.

१. कवितेतून कवीला नेमकं काय सांगायचं आहे
२. कवितेचा अंगभूत भाव काय आहे
३. कवितेतून कुठला रस प्रतीत होतो
४. कुठल्या रागाचा आधार घेऊन गाणं बांधता येऊ शकतं

फक्त इन्स्ट्रूमेंटल संगीत कधीही चिरंतन राहू शकत नाही.

संगीत आणि गीतं...
पूर्वी आधी शब्दं तयार व्हायचे. मग त्या नुसार त्याची चाल बांधली जायची. आता बहुतेकदा उलटं असतं. आधी चाल तयार असते. मग त्यात बसतील असे शब्दं बांधले जातात. अतीशय अतीशय कसलेला कवी असला तरच तो ह्या पठडीत चांगली गीतं देऊ शकतो. (सुधीर मोघे, शांताबाई, इ.)
श्रीनिवासजींनी एक ठिकाणी म्हटलय की, हिंदी चित्रपटात त्यांनी संगीत न देण्याचं कारण हेच की, आधी चाली (भपकेदार, लोकांना एका ऐकण्यात किंवा अर्ध्या-पावच ऐकण्यात झपाटून टाकतिल अशा) बांधायच्या. त्या निर्माता-बिर्माता ऐकून हो/नाही म्हणणार. शब्दं?... त्याची काळजी नको तुम्हाला! ते आपण घेऊ बसवून!
ही पद्धत त्यांना पटलीच नाही.

योग, तुझा उपक्रम सुंदर दिसतोय. मला जरूर वाचायला आवडेल, मदतही करायला आवडेल.

दाद,
नक्की!
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

जुनी गाणी अवीट गोडीची आहेतच..पण नविन गाणी पण छान आहेत.

ज्या गाण्यात वाद्यांच्या गोंगाटापेक्षा गायकाचा आवाज जास्त ऐकायला मिळतो ती गाणी मला परत परत ऐकायला आवडतात. अशी गाणी हल्लीही बनवली जातात पण ती जास्त ऐकायला मिळत नाही.. सगळीकडे एकतर जुनी गाणी नाहीतर मग कोंबडी पळाली टाईप वाद्यांचा गोंधळ ऐकवला जातो....

(मलाही सावलीतील गाणी आवडली होती. पण खरेदी करायला गेल्यावर अनोळखी काहीतरी घेऊन फसण्यापेक्षा ओळखीचे घेण्याकडे माझा कल असतो. रिस्क घ्यायला हवीय..)

सारेगामा..च्या ह्या पर्वात सगळेच व्यावसायिक गायक आहेत. निदान त्यानी तरी जास्तीत जास्त नवीन गाणी गावीत म्हणजे लोकांनाही कळेल नवीन काय बनतेय ते. पण ते गायकही अनोळखी गाणे गाऊन वाहवा मिळवण्यापेक्षा ओळखीचे गाऊन आपणही लता,आशा,फडक्यांइतके चांगले गाऊ शकतो हे सिद्ध करण्याच्या मागे लागताहेत.

मागे एकदा हृदयनाथ म्हणाले की जुने गाणे जसे आहे तसेच गाऊन दाखवण्यापेक्षा आपल्याला त्यात काय कळले,आपला आतला आवाज काय म्हणतोय ते दाखवणेही तितकेच महत्वाचे आहे... मला वाटते की ओळखीचे गाणे जसेच्या तसे म्हणण्यापेक्षा जर या कोणी नवीन गाणे गायले आणि त्याला लोकांची तितकीच दाद मिळाली तर तो गायक म्हणुन जास्त ताकदीचा ठरेल.. कारण अनोळखी गाणे पहिल्याच फटक्यात आवडायला गीत, संगीत आणि गायक तिघेही तितकेच चांगले असावे लागतील..

चांदण्यात फिरताना, तरुण आहे रात्र, रुपेरी वाळूत, समईच्या शुभ्रकळ्या... सगळीच गाणी चांगली पण सगळ्या कार्यक्रमात तीच तीच गाणी किती वेळा ऐकणार????

नवीन चित्रपटांतील -या मराठी गाण्यांवर हिंदी गाण्यांची छाप असते, त्यामुळे मला तरी त्यापेक्षा हिंदी ऐकलेलीच बरी असे वाटते.. अगदी 'मी शिवाजीराजे....' मधले 'राजे हो जी...' हे गाणे ऐकताना मराठी ऐकतोय की हिंदी ते कळत नाही...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

सावली ची तर मी व्हीसीडीच घेतली होती. त्यातली सगळीच गाणी शुद्ध रागात असल्याने छानच आहेत. रागातल्या चीजा इतक्या मनावर ठसल्यात कि कुठेही त्याची झलक ऐकायला मिळाली तरी छान वाटते ( जसे दिल्ली ६ मधे, गुजरी तोडी मधली, भोर भयी तोरी बाट तकत, हि चीज ऐकायला मिळते )
वाद्यांचा गोंगाट का करतात कुणास ठाऊक ? गायक तोकडे पडताहेत का वादक बलवान होताहेत ? जसे सरोज खान आल्यापासुन मागे नाचणार्‍यांची संख्या वाढलीय, तसे होतेय का ?

चांदण्यात फिरताना, तरुण आहे रात्र, रुपेरी वाळूत, समईच्या शुभ्रकळ्या... सगळीच गाणी चांगली पण सगळ्या कार्यक्रमात तीच तीच गाणी किती वेळा ऐकणार????
---------------------------------------------------
अगदी बरोबर!

एखादा असा कार्यक्रम काढायला काय हरकत आहे..ज्यात अट एकच नवीन कधिही न ऐकलेली गाणी सादर करायची. (नवीन गीतकार, संगीतकार) त्यामुळे लोकाना नवीन काहीतरी करायला प्रोत्साहन मिळेल. स्पर्धेसाठी का होईना लोकाना काहीतरी original करायची उर्मी निर्माण होईल.
(मागे एकदा मायबोलीवर एक नवीन गाणे, नवीन संगीतकाराचे, नवीन गायिकेचे कोणीतरी पोस्ट केलेले होते. फार छान वाटलेले. सॉरी नाव विसरलो..)

ते आपल्या जयूचं होतं बहुतेक. आणि मस्त होतं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

हो जयूच होत आणि स्वातीच पण होत.(. सावरीया..). Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

मनस्मी,
स्वातीच्या सुश्राव्य गाण्याचा आस्वाद तुम्हाला हितगुज दिवाळी अंक २००७ मधील "स्वर-चित्रे" या विभागात घेता येईल. तुमच्या सोयीसाठी अंकाचा हा दुवा -
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/index.html

तसेच, मायबोलीने आजवर प्रकाशित केलेले सर्व दिवाळी अंक तुम्हाला "मायबोली विशेष" > "दिवाळी अंक" या पाऊलखुणा वापरून बघता येतील.

- मदत समिती.

पूर्वी गाताना गायकांना थोडी विश्रांती म्हणून मध्ये संगीताचे तुकडे असायचे, आता वादकांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून गायकांना मध्ये मध्ये गायला लावतात असे म्हटले जाते. :p

--------------------------
छुम छनन बोले, झनक झन बोले

देसाईसाहेब, अगदी बरोबर बोललात...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

गजानन सहज आठवले, चांदणे शिंपित जासी मधे जलतरंग आहे, पण कुठेही आशाच्या आवाजाच्या वरचढ झालेला नाही तो. आणि तरिहि तो लक्षात येतो. ऐन दुपारी या गाण्यातले सिनेमातले जे रुप आहे ( या गाण्याचे ध्वनुमुद्रिकेवरचे रुप वेगळे आहे ) त्यातही बराच वेळ ढोलकी आहे, पण तरिही आशाच्या आवाजाशी स्पर्धा नाही.

एक वर्षापूर्वी मी इ-प्रसरणला हीच विनंति केली होती. त्याप्रमाणे त्यांनी एक तास फक्त गेल्या पाच वर्षातील गाणी लावलि होती. त्यांना काय प्रतिसाद मिळाला माहित नाही.

आपल्यात कुणी इ-प्रसारणचे लोक असतील तर त्यांनी सांगावे.

मी पुनः एकदा त्यांना तीच विनंति करतो.

Pages