धडपड....... स्फुट

Submitted by अस्मिता. on 9 June, 2020 - 17:11

कसली आहे ही धडपड
कशासाठी आहे ही होरपळ
आयुष्यात राहिले आहे का आयुष्य
का तेच वेचायला नाही राहिला आहे वेळ !!

कारण सगळा काळ या धडपडीने ओरबाडला आहे
आपण एका गाडीत धडपडतोय
आणि आयुष्य बाजूच्याच गाडीतून समोरून निघून गेले
पहातच राहिलो , कळले सुद्धा नाही !!!

अंतहीन बोगद्यातल्या गाडीत अडकलेले हे जीवन
का मृत्यू आलेला नाही म्हणून त्याला जीवन म्हणायचे
का मृत्यूची वाट बघावी लागत नाही म्हणून
त्याला आयुष्य समजायचे !!

का या दिशाहीन, मार्गहीन, अंतहीन आणि अंध धडपडीला
संघर्षाचे प्रभावी नाव देऊन बघू
काय माहिती अहं सुखावेलही जरा वेळ
आणि अजूनही काय करू यासाठी

नंतर मग सकारात्मकतेचा खोटा बुरखा
पांघरून बघावा का काही क्षणं
निदान तेवढा वेळ तरी मी हवीहवीशी वाटेल सर्वांना
जमेल का बरं मला , का तिही एक धडपड होऊन जाईल !!

या अथांग धडपडीत उरते का काही
की रोज रात्री दमून डोळे मिटतात
तसेच एके दिवशी
या आयुष्याचे होईल !!

ही अविरत धडपड का होते आपली
कसले आहे हे अदृश्य ओझे
माझ्या अपेक्षा , मजकडून असलेल्या अपेक्षा
आकांक्षा, ध्येये , स्वप्ने छोटी मोठी !!

या अनेकानेक कामनांचे पोते
मी का वहाते आहे
का या अनिश्चित, अविश्रांत धडपडीकडून
कसली आशा आहे मला !!

की ही धडपड मला सुखान्त देणार आहे कधी
हे आयुष्य जर आपोआप चालणाऱ्या गाडीसारखे आहे
तर मला हे ओझे वाहून चालणे
गरजेचे आहे का खरेचं !!

का फेकून देऊन मोकळे होऊ ,
कर्तव्यं पार पाडायचीत.....ओझे नाही
मी ही होईन निवांत घटकाभर या यत्नांनी कदाचित
तेव्हाच जगता येईल ही औट घटकेची जिंदगी !!!

-----अस्मिता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages