मैं कहाँ हूँ (अंतिम भाग)

Submitted by nimita on 7 June, 2020 - 21:30

पुढच्या काही मिनिटांत त्या दोन्ही मधमाशा मक्षिकेला आपल्या बरोबर घेऊन गेल्या. 'आधी या दोघी मला यमदूत वाटत होत्या पण या तर देवदूत निघाल्या,' मक्षिका मनात म्हणाली. आजपर्यंत ती कधीच कोणत्याही मधमाशीला भेटली नव्हती. त्यांच्या वस्तीत कोणालाही मधमाशीचं नुसतं नाव काढायलाही परवानगी नव्हती. तिच्या बाबांना तर खूप राग यायचा त्या मधमाशांचा . त्याबद्दल जेव्हा एकदा तिनी आपल्या आईला विचारलं तेव्हा आई म्हणाली होती," दोन पिढ्याआधी माझ्या आईच्या मावशीनी- म्हणजे माझ्या मावस आजीनी एका मधमाशा बरोबर आंतरजातीय लग्न केलं होतं. सगळ्यांचा विरोध होता तरीसुद्धा ती चक्क त्या मुलाचा पंख धरून पळून गेली होती. इतकी नाचक्की झाली होती सगळीकडे आपल्या समाजाची. तेव्हापासून त्या मधमाश्यांचा आणि आपला संबंध कायमचा तुटला."

आपल्या आईचं बोलणं ऐकल्यावर मक्षुला वेगळीच काळजी वाटत होती...' यांना सगळ्यांना जेव्हा जानू बद्दल कळेल तेव्हा ? मग डासांशी असलेले संबंध पण तोडतील का? ' विचार करूनच मक्षु घाबरून गेली होती....पण ती तरी काय करणार?? 'दिल है के मानता नहीं....'

"पोचलो आपण आमच्या घरापाशी. आता तुला कोणताही धोका नाहीये," एक देवदूत मक्षुला म्हणाली. मक्षुनी समोर बघितलं - एका मोठ्या झाडावर त्या मधमाशांचं घर होतं...'घर कसलं मोठ्ठी gated community आहे ही..' मक्षुच्या मनात आलं. पण काही न बोलता ती त्यांच्याबरोबर गेली. किती दारं खिडक्या होत्या त्या घराला... आणि घरही चक्क चक्क झाडाला लटकलेलं....तिच्यासाठी सगळंच नवीन होतं. त्यांच्या घोंगावणे वस्तीत कोणाचंच घर असं इतकं मोठं आणि प्रशस्त नव्हतं. मक्षुला हे घर खूप आवडलं. ती हळूच त्या घरात शिरली. आत मधे अगणित मधमाशा इकडून तिकडे वावरत होत्या.. 'joint family आहे वाटतं,' मक्षु मनात म्हणाली. तेवढ्यात तिला समोर थोड्या उंचावर एक सुंदर मधमाशी बसलेली दिसली. साधारण तिच्या आईच्याच वयाची असावी. बघितल्या क्षणीच मक्षुला ती खूप आवडली. मक्षुनी स्वतःच तिचं नाव ठरवून टाकलं...'सुंदरी मा(व)शी'.... मक्षुला घेऊन आलेल्या त्या दोन देवदूतांपैकी एकीनी सगळी कहाणी सुंदरी मावशीला सांगितली. काही क्षण विचार करून त्या सुंदरीनी मक्षुला आपल्या जवळ बोलावलं. मक्षु थोडी घाबरतच तिच्या जवळ गेली. मक्षुला आपल्या शेजारी बसवून घेत तिनी चौकशी करायला सुरुवात केली -'तुझे आई वडील कोण आहेत, तू कुठे राहतेस, इकडे कशी आलीस...' वगैरे वगैरे . तिचा तो प्रेमळ स्वभाव, तिचं बोलणं या सगळ्यामुळे मक्षुला पुन्हा आपल्या आईची आठवण आली आणि ती रडायला लागली. रडत रडतच मक्षुनी सुंदरी ला आपल्या आई बाबांचं नाव आणि आपल्या घराचा पत्ता सांगितला. ते ऐकताच तिनी चमकून मक्षुकडे बघितलं आणि ती म्हणाली," म्हणजे तू घोंगावणे वस्तीतल्या माशी समाजातली का?" मक्षुचा होकार ऐकून तिची सुंदरी मावशी खूप खुश झाली. तिनी चक्क चक्क मिठीच मारली मक्षुला....

मक्षुचा गोंधळलेला चेहेरा बघून ती म्हणाली," अगं, म्हणजे तू माझ्या आजोळची आहेस.मी मावशी आहे तुझी...." मक्षु अजून संभ्रमात पडली. त्यावर सुंदरी म्हणाली," अगं, माझ्या आजीचं माहेर होतं घोंगावणे वस्तीत....पण तिनी माझ्या आजोबांशी लग्न केल्यापासून त्या वस्तीतल्या सगळ्यांनी तिच्याशी कायमचे संबंध तोडले.... बेदर्द जमाना....सच्चे प्यार का दुश्मन....पण माझी आजी तरी काय करणार... दिल के हाथों मजबूर थी बेचारी.... किती आठवण यायची तिला त्या वस्तीची आणि तिथल्या माश्यांची.... मी लहान होते तेव्हा रोज रात्री झोपताना ती मला त्या वस्तीतल्या गोष्टी सांगायची. म्हणायची - जर शक्य झालं तर जाऊन ये एकदा तिकडे... तुझ्या आजोळच्या नातेवाईकांना भेटून ये...मला तर कधी जमलंच नाही; ,पण काय योगायोग आहे बघ.. आज तिकडून मलाच कोणीतरी भेटायला आलंय."

बोलता बोलता अचानक काहीतरी लक्षात आलं तिच्या. तिनी तिथून जाणाऱ्या दोन मधमाशांना बोलावलं आणि म्हणाली," आत्ता लगेच घोंगावणे वस्तीत जा आणि मक्षिकेच्या घरच्यांना तिची खुशाली कळवा. सगळे काळजी करत असतील तिची. त्यांना म्हणावं की थोड्याच वेळात मी स्वतः तिला तिकडे घेऊन येईन."

अजून कोणाला तरी सांगून तिनी मक्षुसाठी जेवण मागवलं. तिचा तो एकंदर रुबाब बघून मक्षु तर खूपच impress झाली होती. तिच्याकडे हसून बघत सुंदरीमावशी म्हणाली," अशी काय बघतीयेस ?? अगं, मी इथली head of the family आहे....राणीमाशी !!" मक्षुच्या डोळ्यांतला आदर अजूनच वाढला.

काही क्षणांतच कोणीतरी तिच्यासाठी जेवण घेऊन आले...एक ग्लास भरून मध !!! अहाहा... आज तर एकदम मेजवानीच झाली होती. आपल्या सुंदरी मावशीशी गप्पा मारत मारत मक्षुनी मस्त ताव मारला त्या मधावर ...

पण तिकडे घोंगावणे वस्तीत मात्र सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. संध्याकाळी घराबाहेर पडलेली मक्षिका अजून घरी परत आली नव्हती. "हे सगळं तुमच्यामुळे झालंय..." आपला एक पंख कमरेवर ठेवून आपल्या नवऱ्याच्या अंगावर खेकसत मक्षुची आई म्हणाली ,"उगीच तिचे नको इतके लाड केलेत... आणि म्हणूनच ती अशी आपल्या हाताबाहेर..I mean...आपल्या पंखांबाहेर गेलीये. एक तर पोरीची जात, त्यात इतकी तरुण आणि माझ्यासारखी सुंदर !!" त्यावर मक्षुचे बाबा चिडून म्हणाले," ती तुझ्यावर गेलीये हाच तर प्रॉब्लेम आहे. अशी घरच्यांना न सांगता पळून जायची रीत तुझ्याच माहेरी आहे ; तुझ्या आजीचे कारनामे विसरलीस वाटतं?"

आपल्या नवऱ्याचा हा आरोप ऐकून मक्षुची आई अजूनच चिडली ; आपले पंख सरसावत पुढे येत म्हणाली ," कशी विसरीन? रोज आठवण येते... वाटतं- मी पण तिच्याचसारखं कोणाचा तरी पंख धरून पळून जायला हवं होतं... निदान या नरकातून तरी सुटका झाली असती. मी तर ऐकलंय की माझ्या आजोबांनी आजीला अगदी एखाद्या राणीसारखं ठेवलं होतं.... भलं मोठ्ठं घर, दिमतीला नोकरचाकर ,रोज जेवायला पंचपक्वानं !! नशीब काढलं आजीनी .... नाहीतर मी... माझं मेलीचं नशीबच फुटकं ....आई बाबांच्या सांगण्यावरून तुमच्याशी लग्न केलं आणि जन्मभर या वस्तीत अडकून पडले. कसली मेली हौस नाही की मौज नाही ! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला five star हॉटेलच्या स्वैपाकघरात रोमँटिक candle light dinner ला घेऊन जायचं प्रॉमिस केलं होतं तुम्ही....आठवतंय का? इतकी वर्षं झाली पण कोपऱ्यावरच्या कचरापेटी पुढे मजल नाही गेली तुमची.... आपली ही अवस्था बघून त्या मनुष्य प्राण्यांनी त्यांच्या व्याकरणात एक नवीन म्हण ऍड केलीये म्हणे...'माशीचं उडणं कचरापेटी पर्यंत' !! आता तर त्या शेजारच्या चावरे गल्लीतल्या डासांच्या बायका पण माझी चेष्टा करतात !!"

त्या दोघांची अशी 'तू तू मैं मैं' चालू असतानाच सुंदरी मावशीचा निरोप घेऊन दोन मधमाशा त्यांच्या घरी आल्या. त्यांच्याकडून मक्षुची खुशाली कळल्यावर वस्तीतल्या सगळ्यांच्याच जीवात जीव आला. थोड्याच वेळात सुंदरी मावशी आणि मक्षिका पण येऊन पोचल्या. सगळीकडे आनंदीआनंद झाला. पण सुंदरीचा एकंदर थाटमाट बघून, तिच्या बरोबरचा तो नोकरांचा लवाजमा बघून सगळ्यांच्याच मनात तिच्याबद्दल अचानक आदर निर्माण झाला. नकळत मक्षुच्या घरच्यांचं social status ही कितीतरी पटींनी उंचावलं.

सगळं कसं आलबेल झालं होतं. इतक्या वर्षांपासून वस्तीतल्या माश्यांच्या मनात मधमाश्यांबद्दल जो आकस होता तो नाहीसा झाला. 'आंतरजातीय विवाह' हा विचारही आता सगळ्यांना पटायला लागला होता. अशातच एकदा संधी साधून मक्षु आणि जानू नी सुंदरी मावशी ला त्यांचं secret सांगितलं आणि तिची मदत मागितली. सुंदरी अगदी आनंदानी तयार झाली... तिच्या मध्यस्तीनी शेवटी एकदाचं मक्षु आणि जानूचं लग्न ठरलं....अगदी सर्वसंमतीनी !

मक्षुच्या बाबांनी सगळ्या वऱ्हाडाला five star हॉटेलच्या स्वैपाकघरात पार्टी द्यायचं ठरवलं. सुंदरीनी तिच्या भल्यामोठ्या घरात सगळ्या वऱ्हाडाची सोय करायची तयारी दाखवली. लग्नाच्या आधी सुंदरीनी तिच्या लाडक्या भाचीला विचारलं," तुला माझ्याकडून काय gift हवंय लग्नाचं ?" मक्षु काही क्षण विचारात पडली; पण तेवढ्यात तिला ते गाडीवाले काका काकू आणि त्यांचा तो खिडकीतून दिसलेला रोमान्स आठवला. ती लाजत लाजत मावशीच्या कानात काहीतरी कुजबुजली. ते ऐकून मावशी तिला चिडवत म्हणाली," Naughty girl !! आत्तापासून सुहाग रात ची तयारी !!! "

ठरल्याप्रमाणे अगदी थाटामाटात मक्षु आणि जानूचं लग्न लागलं... सगळे विधी, five star जेवणाची पंगत वगैरे वगैरे !!! आता नवीन जोडप्याला सुहाग रात चे वेध लागले. सुंदरी मावशीनी तिच्या घरातला terrace flat अगदी खास सजवून घेतला होता... एकदम 'हनीमून स्पेशल' !!

शेवटी एकदाचा जानू आणि मक्षुला एकांत मिळाला. सगळी दारं खिडक्या नीट बंद आहेत ना ते चेक करून जेव्हा जानू बेडरूम मधे आला तेव्हा त्याची जानेमन आरशासमोर बसून सर्वांगाला कुठलं तरी क्रीम लावत होती. "कसली तयारी चाललीये₹" लाडात येत जानूनी विचारलं. त्यावर लाजत लाजत मक्षुनी त्याला ते क्रीम आणि काका काकूंबद्दल सगळं सांगितलं आणि म्हणाली," म्हणूनच मी मावशीला सांगून मुद्दाम हे ब्युटी क्रीम मागवून घेतलं. आता रोज रात्री मी हे लावीन आणि मग...." पुढच्या नुसत्या कल्पनेनीच मक्षु लाजली आणि तिनी आपल्या पंखात आपला चेहेरा लपवून घेतला. तिच्या या अशा जीवघेण्या अदांवर फिदा होत जानू पुढे सरसावला....पण पुढच्याच क्षणी उलट्या पावली परत फिरला आणि दारापाशी जाऊन उभा राहिला. त्याचं हे असं विचित्र वागणं बघून मक्षु गोंधळात पडली. त्याच्या जवळ जात म्हणाली,"काय झालं? असा दूर दूर का जातोयंस ? आणि काही बोलत पण नाहीयेस....का रे दुरावा, का रे अबोला...अपराध माझा..."

आपल्या जवळ येणाऱ्या मक्षुपासून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत जानू ओरडला...." अगं अवदसे.... तू सर्वांगाला जे चोपडलंयस ना ते ब्युटी क्रीम नाहीये.... odomos आहे odomos !!!"

------------------- समाप्त----------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Odomos Lol

इतकी वर्षं झाली पण कोपऱ्यावरच्या कचरापेटी पुढे मजल नाही गेली तुमची.... आपली ही अवस्था बघून त्या मनुष्य प्राण्यांनी त्यांच्या व्याकरणात एक नवीन म्हण ऍड केलीये म्हणे...'माशीचं उडणं कचरापेटी पर्यंत' !!
—->>€ हाहाहा

अप्रतिम कथा रंगली. मस्तच....
बादवे ओडोमॉस लावल्याने डास चावत नाही, हा सार्वत्रिक गैरसमज आहे. Lol (स्वानुभव)