इकडे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या प्रेमिकेची वाट बघणाऱ्या डासोपंताला काही समजायच्या आत ती गाडी त्याच्या मक्षिकेला घेऊन लांब निघून गेली. त्यानी बिचाऱ्यानी अगदी जीवाच्या आकांतानी त्या गाडीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला....पण शेवटी त्याच्या पंखातलं बळ सरलं....बिचारा.. कोणाला काही सांगूंही शकत नव्हता.... चोरी-छुपे केलेलं प्रेम ते... त्यामुळे मनोमन देवाची प्रार्थना करत तो तिथेच एका खांबावर विसावला.
रस्त्याच्या अल्याड असलेल्या मक्षिकेच्या सखीला तर काय करावं काहीच सुचेना ... तिच्या मनात आलं - 'आपल्या वस्तीत जाऊन सांगावं का सगळ्यांना या घटनेबद्दल ? पण मग सगळे जण हजार प्रश्न विचारतील... कधी, केव्हा , कशी , कोणाबरोबर... नको बाई.... सगळं प्रकरण माझ्यावरच शेकायचं... थोडा वेळ वाट बघते. कदाचित ती स्वतःच येईल परत घरी!' असा सारासार विचार करून ती सखी काही न बोलता चुपचाप आपल्या घरी गेली.
गाडीत अडकून पडलेल्या मक्षिकेला तर काहीच सुचत नव्हतं...ती त्या गाडीच्या मालकाच्या कानापाशी गेली आणि जोरात ओरडली," अहो काका, मला नाही यायचं तुमच्या बरोबर. मी तर पलीकडे चालले होते. काचा उघडा ना गाडीच्या.... मला माझ्या घरी जायचंय!" पण तिच्या त्या ओरडण्याचा उलटाच परिणाम झाला. त्या काकांनी तिच्या दिशेनी जोरात उलटा हात फिरवला.... मक्षिका तशी जात्याच चपळ होती म्हणून बरं.... त्या काकांच्या फटक्याला हुलकावणी देत ती त्यांच्यापासून लांब मागच्या सीटच्या खालच्या जागेत जाऊन लपून बसली. पण एकीकडे तिची विचारचक्र चालूच होती.... 'या काकांचे इरादे काही नेक दिसत नाहीयेत.... माझं अपहरण तर नसेल ना केलं ह्यांनी? हं... मला तर तीच शंका येतीये... जर तसं नसतं तर मला बघितल्याबरोबर लगेच खिडकीची काच खाली करून मला बाहेर काढलं असतं त्यांनी....एकदा शेजारच्या काकू त्यांचा असाच अनुभव सांगत होत्या आईला...आठवतंय मला ! म्हणजे नक्कीच या काकांनी माझं अपहरण केलंय.... पण मला असं पळवून घेऊन गेले तर त्यात त्यांचा काय फायदा ? मी तर असं ऐकलंय की ही माणसं त्यांच्या घरात आलेल्या माशांना हुसकावून घराबाहेर काढतात. मग हे काका मला का घेऊन चाललेत आणि कुठे नेतायत?'
विचार करून करून मक्षिकेच्या नाजूकशा मेंदूला मुंग्या आल्या....'अगबाई, माशीच्या मेंदूला मुंग्या ?? काय मजेशीर कल्पना आहे ... कसं काय सुचतं गं तुला? ' स्वतःच्या शाब्दिक कोटीवर स्वतःचीच पाठ थोपटत मक्षिका म्हणाली. पण पुढच्याच क्षणी स्वतःला दटावत म्हणाली," अगं, इतकं मोठं संकट कोसळलंय तुझ्यावर आणि तू हे असले फालतू विनोद करत बसलीयेस ??? हीच बुद्धी वापर आणि विचार कर की यातून स्वतःची सुटका कशी करावी..."
मक्षिका भानावर आली आणि पुन्हा विचार करायला लागली..'माशी समाजातल्या कोणी या काकांना सुपारी दिली असेल का...मला पळवून आणण्यासाठी ?? पण कशासाठी ?... पैश्यांसाठी ? पण माशांना पैश्यांचा काय उपयोग ? मग कशासाठी असेल ? माझा कोणी आशिक़ वगैरे तर नसेल ना ?? एखादा 'मैं तेरे प्यार में पागल' टाईप चा !! हं, शक्यता नाकारता येत नाही... तसंही घोंगावणे पुरात माझ्याइतकी सुंदर आणि सुशील तरुण माशी दुसरी कोणीच नाहीये.... यात बढाई मारण्यासारखं काहीच नाहीये.…. ही तर फॅक्ट आहे... माझा 'जानू' कायम हेच तर म्हणत असतो..'
मक्षिकेचा 'जानू' म्हणजे आपले 'डासोपंत' ! त्याचं हे असं जुनं पुराणं नाव मक्षिकेला अगदी नव्हतं आवडलं. ती त्याला म्हणाली सुद्धा.." तुझ्यासारख्या आजच्या जमान्यातल्या मॉडर्न डासाला हे नाव अजिबात शोभून दिसत नाही ! मी तर तुला 'जानू'च म्हणणार ... मेरा जानम ; मेरा जानू ..."
जानूचा विचार आला आणि मक्षिकेच्या डोळ्यांत पाणी आलं....ती त्याच्या आठवणींनी अगदी व्याकुळ झाली.. आता तर तिची खात्रीच पटली की-' नक्की आपल्या समाजातल्या कोणीतरी माझं हे अपहरण घडवून आणलंय... त्यांना समजलं असेल आमच्या या जातीबाहेरच्या प्रेमाबद्दल .... दुष्ट कुठले...प्यार के दुश्मन !!'
मक्षिका आपल्या दुःखात इतकी बुडून गेली होती की थोड्या वेळानी ती कार थांबल्याचं देखील लक्षात नाही आलं तिच्या. पण अचानक मागचं दार उघडल्याचा आवाज झाला आणि तिनी दचकून वर बघितलं... ते काका मागच्या सीटवर ठेवलेली त्यांची एक पिशवी काढून घेत होते. मक्षिकेच्या डोक्यातली विचारांची चक्रं आता फुल्ल स्पीड मधे फिरायला लागली...' हाच मौका आहे मक्षे -स्वतःला या कैदेतून सोडवून घ्यायचा... त्या काकांच्या लक्षात यायच्या आधी बाहेर पळून जा.. ' मक्षिकेनी पुढचा मागचा काहीही विचार न करता सरळ कारच्या बाहेर झेप घेतली आणि त्या काकांनी पुन्हा कारचं दार बंद करायच्या आत ती बाहेर निघाली. त्या काकांपासून जितकं लांब जाता येईल तितकं उडत जाऊन शेवटी एका झाडाच्या पानांमधे लपून बसली.
थोड्या वेळानी दम ओसरल्यावर तिनी आजूबाजूला बघितलं.... सगळंच अनोळखी दिसत होतं.... तिनी गोंधळून स्वतःलाच विचारलं, " मैं कहाँ हूँ ??"
क्रमशः
मक्षिकेच्या टपोऱ्या
पुभाप्र!
मस्त आहे ही कल्पना... आवडली..
मस्त आहे ही कल्पना... आवडली...
स्टुअर्ट लिटल, या बग्ज लाईफ यांची आठवण येतेय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.