मैं कहाँ हूँ (भाग १)

Submitted by nimita on 3 June, 2020 - 13:11

मागच्या आठवड्यात एका दुपारी एक हिंदी चित्रपट बघत होते... त्यात एका परिवारातल्या सदस्यांची ताटातूट होते... लहान मुलं त्यांच्या आईपासून आणि एकमेकांपासून बिछडतात... आणि बऱ्याच वर्षांनी सगळ्यांची पुन्हा भेट होते! तोच तो घीसा पिटा फॉर्म्युला.. तेच इमोशनल डायलॉग्स... सगळं तेच ते!

नंतर त्याबद्दल विचार करत असताना मनात आलं -' मनुष्यप्राण्याच्या आयुष्यात येणारे हे 'मिलना- बिछडना' सारखे प्रसंग इतर प्राणिमात्रांच्या आयुष्यात पण येत असतील का? झालं... डोक्यात त्या दृष्टीनी विचारचक्रं सुरू झाली..... आणि एक मजेशीर कल्पना सुचली. त्याच कल्पनेचा विस्तार करून आता तुमच्यासमोर मांडणार आहे....

एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक तरुण डास राहात होता... म्हणजे तसे बरेच डास होते त्या नगरात; पण सध्या या एका डासावर लक्ष केंद्रित करू या ! तर हा डास आपल्या आप्तस्वकीयांबरोबर 'चावरे नगर' मधे राहात होता. शेजारच्याच आळीतल्या 'घोंगावणे वस्ती'त राहणाऱ्या एका सुंदर, नाजूक अशा माशीवर त्याचा जीव जडला होता. आणि चक्क चक्क तिलासुद्धा तो आवडायला लागला होता !! मग काय रोज संध्याकाळी आपले 'डासोपंत चावरे' आणि 'मक्षिका घोंगावणे' जवळच्या सिग्नलच्या चौकात एकमेकांना भेटू लागले.... अर्थात, त्यांचं हे प्रेम म्हणजे आंतरजातीय.... म्हणून मग समाजाच्या भीतीमुळे अगदी खुल्लमखुल्ला भेटणं तर शक्यच नव्हतं.... त्यामुळे मग लांबूनच इशारों इशारों मधे प्रेमाच्या आणाभाका घ्यायला सुरुवात झाली.

अशाच एका संध्याकाळी दोघंही त्या चौकात रस्त्याच्या अल्याड पल्याड उभे राहून एकमेकांना बघत, प्रेमाचे कटाक्ष टाकत 'उडत' होते. पण लोकांच्या आणि वाहनांच्या त्या गर्दीत त्यांचे ते प्रेमकटाक्ष इच्छित स्थळी पोचतच नव्हते....मधेच कुठेतरी हरवून जात होते. तेवढ्यात मक्षिकेची खास सखी तिला म्हणाली," अगं, किती दिवस असं लांबून लांबून इशारे करणार ? त्याच्या जवळ जाऊन काय ते स्पष्ट बोलून टाक ना एकदाचं !" मक्षिकेला पण सखीचं बोलणं पटलं आणि ती अगदी जोशात डासोपंत च्या दिशेनी निघाली. पण इतक्या वाहनांच्या गर्दीत आणि ते देखील सिग्नल च्या चौकात....रस्ता क्रॉस करायला जमतच नव्हतं तिला! जिथे बघावं तिथे गाड्या - अगदी bumper to bumper ! त्या चक्रव्यूहातून मार्ग शोधत असतानाच मक्षिकेचं लक्ष एका कारकडे गेलं. कारच्या मालकानी खिडकीच्या सगळ्या काचा खाली केल्या होत्या.... 'हे बरं झालं,' त्या कारच्या दिशेनी उडताना मक्षिका म्हणाली-' नाहीतर आजकाल सगळे लोक आपापल्या गाड्यांच्या काचा अगदी पूर्ण बंद ठेवतात.. देवानी माझ्यासाठीच या माणसाला अशी बुद्धी दिली असावी. याच्या गाडीतून रस्ता क्रॉस करते... लवकर पोचीन त्या बाजूला...आणि मुख्य म्हणजे कोणाला दिसणार नाही मी त्या बाजूला जाताना.. हो ना... सरळ खुले आम उडत गेले तर नेमकं कोणीतरी बघेल आणि घरी जाऊन बाबांना सांगेल.' विचारांच्या नादात मक्षिका एका खिडकीतून गाडीत शिरली.... दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर जाणार तेवढ्यात तिला समोरच्या काचेपाशी एक आरसा दिसला... तिच्या मनात आलं,'आपल्या प्रियकराला भेटण्याआधी एकदा स्वतःचं रूप बघून घेते... पंख वगैरे ठीक आहेत ना !' हा असा विचार करत ती काही क्षण त्या आरशासमोर रेंगाळली ... स्वतःच स्वतःवर फिदा होत ती म्हणाली," आज काही खैर नाही त्याची.... अगदी 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती' अशीच अवस्था होणार आहे त्याची!" ती लगबगीनी दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर जायला लागली पण ..... तेवढ्यात त्या कारच्या मालकानी सगळ्या काचा बंद करून घेतल्या की ! आणि एवढंच नाही तर सिग्नल हिरवा झाल्यामुळे त्यानी आपली कार पुढे पळवली....

बिचारी मक्षिका.... त्या गाडीच्या आत काचेवर बसून तिच्यापासून दूर जाणाऱ्या तिच्या प्रियतमाला पाहात बसण्याखेरीज तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता !!!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कल्पना! गाणी घाल थोडी! नाव मस्त ठेवली आहेत ++111

इन वादीयोंमें..इन हवाओमें..
ना जाने कहा उड चली मैं..
देखे रस्ता किसका.
जाने किस गल्ली चली मैं.
कभी इधर, कभी उधर
कभी इन फिजोंपर..
जहा जिसने ढूॅढा.
मैं वहाॅ हू .
अफसोस बस मुझे खुद नही पता
मैं कहा हूॅ..