'दख्खनची राणी'

Submitted by पराग१२२६३ on 2 June, 2020 - 15:06

दख्खनची राणी लॉकडाऊनमुळे यार्डातच अडकून पडल्यामुळे तिचा यंदाचा वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा होऊ शकला नाही. गेल्या 90 वर्षांत वाढदिवशी राणी धावली नाही असे पहिल्यांदाच घडले असेल. या वर्षी वाढदिवसापासून राणी नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र लॉकडाऊन वाढल्यामुळे तेही अपूर्णच राहिले असले तरी सध्या या गाडीच्या नव्या डब्यांचे काम सुरू आहे.

मी अलीकडेच मुंबईत सकाळी प्रगतीने पोहचलो होतो. नियमाप्रमाणे प्रगती थोडी उशीराच दादरला पोहचली होती. त्यानंतर दिवसभरात तिथली कामं आटपून सायंकाळी सीएसएमटीवर साडेचारच्या आधीच दाखल झालो होतो. आठ नंबरवर नंदिग्राम लागलेली होतीच, पण 9 नंबरवर राणी अजून आलेली नव्हती. 16.35 ला नंदिग्राम नागपूरकडे निघून गेल्यावर राणी नऊ क्रमांकाच्या फलाटावर आली. आमचा डबा गाडीच्या मध्यभागी असला तरीही मी नेहमीच्या सवयीने फलाटाच्या पुढच्या टोकापर्यंत जाऊन उभा होतोच. कुर्ल्याच्या पिवळ्याधमक डब्ल्यूडीएस-6 शंटर कार्यअश्वाने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि तालबद्ध ठेक्यात राणीला नवव्या फलाटावर आणून उभं केलं होतं. त्याचं आताचं काम संपल्यामुळे त्या कार्यअश्वाचे कपलिंग आणि ब्रेक पाईप आता काढून त्याला राणीपासून वेगळं करून ठेवलं होते. पण या कार्यअश्वाला राणी सुटल्याशिवाय फलाटाच्या या टोकाला थांबून राहावं लागणार होतं.

फलाटावर प्रवाशांची गाडीत जागा मिळवण्यासाठी लगबग सुरू झाली होती. अनारक्षित आणि पासवाले तर फलाटाच्या तोंडावर आमच्या आसपास येऊन थांबले होते. गाडी मागे जात असताना इथूनच जागा पकडण्यासाठी आत शिरण्याच्या तयारीत होते ते सगळे. आमचे आरक्षण असल्यामुळे आम्हाला मात्र इतकी गडबड करण्याची गरज नव्हती. काही मिनिटांतच अजनीचा डब्ल्यूएपी-7 हा गोरापान कार्यअश्व राणीचे सारथ्य स्वीकारण्यासाठी पलीकडच्या ट्रीप शेडकडून फलाटाकडे आला आणि त्याची गाडीशी जोडणी पार पडली. लगेचच असिस्टंट लोको पायलट या कार्यअश्वाची तब्येत तपासून सगळ काही ठीक आहे ना, याची खात्री करून घेत होता. त्याचवेळी लोको पायलटने इंजिनातील रिडींगची आपल्याकडील कागदपत्रांवर नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. त्याआधी त्या दोघांनी इंजिनात येण्याआधीचे नियमाप्रमाणे सर्व चाचण्या आणि सोपस्कार पूर्ण केलेले होतेच. तसेच संपूर्ण मार्गावर सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामांची माहितीही करून घेतली होती. काही वेळातच शेवटच्या डब्यातील गार्डची सही घेतलेले बीपीसी (ब्रेक पॉवर सर्टिफिकेट) घेऊन रेल्वेचा कर्मचारी इंजिनाकडे आला आणि त्या सर्टिफिकेटवर लोको पायलटची सही घेऊन मूळ प्रत त्याच्याकडे देऊन निघून गेला. हे सर्व झाल्यावर आता आम्ही आमच्या डब्याकडे निघालो.

राणीला आता थोड्याच दिवसात अस्टोम/लिंकं होफमान बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे सध्या तरी या गाडीसाठी जुन्या डब्यांची रंगरंगोटी करूनच ते वापरले जात आहेत. आमचा डबाही 1995 मध्ये तयार केलेला होता आणि लवकरच त्याची नियमित पुनर्बांधणी (पीओएच) केली जाणार होती. आता गाडी सुटालयला पाचच मिनिटं राहिली होती. गाडी सुटेपर्यंत डब्यातल्या प्रवाशांची एकाच ओळीत सीट न मिळालेल्यांची ॲडजस्टमेंट सुरू होती – आप वहां पर हमारी सीट पर जायेंगे प्लीज वगैरे विनवण्या ऐकू येत होत्या. ठीक 17.10 ला राणीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

आतापर्यंत सीट ॲडजस्टमेंटसाठीच्या विनवण्या बऱ्यापैकी सफल झाल्या होत्या. सगळ्यांच्या गप्पाटप्पा सुरू असतानाच भोजन यानातून सगळ्या गाडीमध्ये चहा-कॉफीवाल्यांच्या येरझऱ्या सुरू झाल्या होत्या. परळ येईपर्यंत आज राणीनं चांगला वेग घेतला होता. त्यामुळे आज राणीनं काहीतरी वेगळाच अवतार धारण केल्यासारखं वाटत होतं. पाण्याची बाटलीवाला येऊ लागला. 17.21 ला दादर ओलांडलं. त्याच्या पाठोपाठ नाश्त्याच्या ऑर्डरी घेण्यासाठीही एक जण आला. दख्खनच्या राणीमधला नाश्ता म्हणजे काय सांगावं. मी यावेळी लगेच नाश्त्याची ऑर्डंर दिली नाही. त्यावेळी माझ्याबरोबर असलेल्या माझ्या भाच्याला सांगितलं की, यावेळी जरा वेगळा अनुभव घेऊ. या गाडीला जोडलेल्या आणि भारतीय रेल्वेवरील एकमेव असलेल्या भोजन यानात (डायनिंग कार) जाऊन नाश्ता करू. त्याचाही या गाडीचा पहिलाच प्रवास असल्यामुळे त्यानेही होकार दिला. काही वेळाने आम्ही भोजन यानाच्या दिशेने गेलो. या भोजन यानात बसून नाश्ता करण्याचा माझाही तो पहिलाच अनुभव असणार होता, म्हणून मीही एक्साईट होतोच.

IMG-20200128-WA0018.jpg

भोजन यानात एका टेबलावर जाऊन बसलो. मेन्यू कार्डवर नजर टाकली आणि कटलेटची ऑर्डर दिली. दरम्यान, राणीच्या आजूबाजूच्या फास्ट आणि स्लो लाईनींवरून लोकल्स धडाधड पळत होत्याच. आज 17.40 पर्यंत ठाणे ओलांडलं होतं आणि पार्सिक बोगद्यातून काही मिनिटांतच बाहेरही आलो होतो. 17.47 ला दिवा जंक्शन सोडलं. पुढे दोनच मिनिटांत एक मेमू फास्ट अप लाईच्या पलीकडील लाईनवरून पनवेलकडे गेली. त्याचवेळी तिच्या आणि आमच्या मधल्या लाईनवर पनवेलच्या दिशेने जाणारी कंटेनरची मालगाडी डब्ल्यूएजी-9 या शक्तिशाली कार्यअश्वासह उभी होती. मेमूला मार्ग मोकळा करून देण्यासाठी सेक्शन कंट्रोलरने ही गाडी तिथे थांबवून ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर 17.57 ला कल्याण जंक्शन सोडलेही. खरंच आज राणीचा अवतार वेगळाच भासत होता.

IMG-20200603-WA0018.jpg

भोजन यानातील आमच्या टेबलावर अजून कटलेटची ऑर्डर आलेली नव्हती. भोजन यानात तिथल्या तिथेच गरमागरम तयार करून दिले जातात ना. मग थोडा वेळ वाट पाहावी लागतेच. सगळ्या टेबलांवर प्रवासी नाश्ता करत होते आणि प्रत्येकाची फर्माईश पूर्ण केली जात होती. त्याचवेळी केटरिंगवाले इतर डब्यांमध्ये बसलेल्या प्रवाशांसाठीही गरमागरम सामोरे, वडापाव, चहा, वेफर्स वगैरे घेऊन जात होते. मात्र कल्याणनंतर राणी काहीशी हळू पळू लागली होती. पुढच्या काही मिनिटातच आमच्या टेबलावर गरमागरम कटलेट आले आणि त्याचवेळी बाहेर अप लाईनवरून पेट्रोलच्या 50 आणि गार्डच्या 2 अशा एकूण 52 वाघिण्यांची मालगाडी फिकट निळ्या रंगाच्या डब्ल्यूएजी-7 या कार्यअश्वासह कल्याणकडे निघून गेली. आम्ही आमच्या समोर प्लेटमध्ये ठेवलेल्या गरमागरम कटलेटचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली होतीच. त्या मालगाडीने मार्ग अडवून ठेवल्यामुळे मात्र मागच्या सिग्नलला नव्या कोऱ्या एलएचबी डब्यांची आणि अजनीच्या डब्ल्यूएपी-7 या कार्यअश्वासह पुण्याहून आलेली 11008 डेक्कन एक्सप्रेस सिग्नल ऑफ होण्याची वाट पाहत उभी असलेली दिसली.
दरम्यान, उल्हासनगर आलं होतं. कल्याणपासून हळुहळू पळू लागलेली राणी चक्क 1 मिनिट थांबली इथं. मला वाटलं की, कोणतीतरी गाडी वाटेत आहे पुढे मार्गावर. कारण राणीसारखी गाडीही कधी नव्हे ते इथे थांबली होती. आम्ही बसलेल्या भोजन यानाच्या समोर फलाटावर उभ्या राहिलेल्या प्रवाशांपैकी काही जण डाऊन दिशेच्या सिग्नलकडे बघण्याचा प्रयत्न करत असलेले खिडकीतून दिसत होते, दख्खनची राणी इथं थांबल्याचं त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. 18.08 पासून उल्हासनगरला मिनिटाभर थांबून राणी पुन्हा हळुहळू पळू लागली. पुढच्या तीन-चार मिनिटात राणीनं पुन्हा वेग घेतला आणि अप लाईनवरून दोनच मिनिटात एक लोकल कल्याणच्या दिशेने जोरात निघून गेली. पुढे अंबरनाथला प्रवासीगाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी कल्याणच्या दिशेने जाणारी मालगाडी (बीसीएक्ससी वाघिण्यांची) रोखून धरलेली होती. चॉकलेटी रंगातील दोन डब्ल्यूएजी-5 कार्यअश्व त्या गाडीचे सारथ्य करत होते. पुढे दोनच मिनिटांत 22943 पुणे-इंदूर एक्सप्रेसही पांढऱ्याशुभ्र डब्ल्यूएपी-7 या कार्यअश्वासह कल्याणच्या दिशेने धडाडत निघून गेली.

आता आमच्या प्लेटमधील कटलेट संपत आले होते आणि आम्ही गरमागरम चहाची ऑर्डर दिली. चहा किटलीमध्ये तयार करून ठेवलेला असल्यामुळे तो मात्र लगेचच टेबलावर आला. गरमागरम चहा पित असताना 18.21 ला बदलापूर ओलांडले. तेव्हा तिथे कर्जतला जाणारी एक लोकल आमच्यासाठी लूपवर घेतली गेलेली दृष्टीस पडली. हीच ती गाडी जिच्यामुळे राणी कल्याणनंतर रखडत चालली होती. पुढच्या पाच मिनिटांनी कर्जतकडून आलेली एक लोकल कल्याणकडे गेली. एव्हाना आमचाही भोजन यानातील नाश्ता आणि चहापानाचा आस्वाद घेऊन झाला होता, भोजन यानात बसून नाश्ता करण्याच्या पहिल्याच अनुभवाने एक्साईट होऊन आम्ही परत आमच्या आसनांकडे निघालो. तोपर्यंत गरमगरम कांदाभजी आणि टोमॅटो सूपही डब्यांमध्ये येऊ लागले होते. बदलापूरपर्यंत वेळ वाया गेल्यामुळे तो भरून काढाण्यासाठी राणी पुन्हा जोरात धावू लागली होती. आता वाटेत कोणताही अडथळाही नव्हता. काही वेळातच नेरळ जंक्शन गेले होते. त्यानंतर पुढे पुण्याच्या दिशेने निघालेली फिकट निळ्या रंगाची दोन डब्ल्यूएजी-7 इंजिने जोडलेली पेट्रोलच्या टँकरसह एकूण 52 वाघिण्यांची मालगाडी होती. मात्र राणीच्या मार्गात तिचा पुन्हा अडथळा नको म्हणून मुंबईहून सेक्शन कंट्रोलरने ही गाडी भिवपुरी रोडमध्ये लूप लाईनवर उभी करण्यास सांगितले होते. त्याचवेळी कर्जतवरून सुटलेली लोकलही कल्याणकडे गेली. 18.39 ला खिडकीतून सहज बाहेर डोकावले तर वळणावरून कर्जतचा डिस्टंट सिग्नल डबल यलो दिसला. पुढच्या एक-दीड मिनिटात कर्जतचा होम सिग्नल ओलांडला आणि राणी फलाट क्रमांक एकच्या दिशेने पुढेपुढे जाऊ लागली. त्याचवेळी शेजारील छोट्या सायडिंगवर कल्याणचे तीन डब्ल्यूएजी-7 कार्यअश्व (बँकर्स) राणीची वाट पाहत उभे असलेले दिसले. त्यातील दोघे फिकट निळ्या रंगाचे आणि एक निळा-पांढरा-लाल या रंगसंगतीमधला होता. हे त्रिकुटच राणीला लोणावळ्यापर्यंत सह्याद्रीचा खडा चढ चढण्यास मदत करणार होते.

अखेर 18.43 ला राणी कर्जतला काही मिनिटांसाठी विसावली. गाडीचा पहिला डबा फलाटावर आल्याबरोबर लगेचच सुरू होत असलेली ओळखीची..... गरमागरम वडापाव-वडापाव..... अशी दणदणीत साद गाडी सुटेपर्यंत अखंड सुरू होती. कर्जतचे प्रवासी काही उतरले, तर काही चढले. पुन्हा सीटच्या अदलाबदलीवरून थोड्या विनंत्या-विनवण्याही होऊ लागल्या होत्या. स्थानिक चहावाले, पाण्याची बाटलीवाले आणि कानातील-गळ्यातील वस्तू, मोबाईल चार्जरवाले इत्यादी-इत्यादीही गाडीत आले. त्याचवेळी तिकडे मागे कल्याणचे ते तिघे कार्यअश्व गाडीला जोडण्याची प्रक्रिया सुरू होती. शेजारच्या लाईनवर बँकर्सची एक जोडी आणि एक त्रिकूट पुढच्या कर्तव्याचा आदेश येण्याची वाट पाहत उभे होते. हे सर्व 5 मिनिटांत आटोपून राणी लोणावळ्याच्या दिशेने निघाली. कर्जतमधून बाहेर पडत असतानाच डाऊन डिस्पॅच यार्डात पुण्याकडे निघालेली डब्ल्यूएजी-9 जोडलेली एक आणि निळ्या-पांढऱ्या-लाल रंगातील डब्ल्यूएजी-7 जोडलेली एक अशा दोन मालगाड्या स्टार्टर सिग्नल मिळण्याची वाट पाहत उभ्या होत्या. त्यांनाही बँकर्स जोडण्यात येत होते. या मार्गावरील प्रवासीगाड्यांची वर्दळ कमी होईपर्यंत त्यांना अजून थोडावेळ इथेच वाट पाहत थांबावे लागणार होते.

आता बोर घाट चढण्यास सुरुवात झाली होतीच. राणीला जोडलेले पुढचे डब्ल्यूएपी-7 आणि मागे जोडलेले तिघे डब्ल्यूएजी-7 (बँकर) हे चौघेही चांगल्या समन्वय साधत होते. अर्थात यात दोन्ही बाजूंकडील लोको पायलटची कौशल्य अत्यंत महत्वाचे ठरते. घाट चढत असताना काही मिनिटातच मधल्या लाईनवरून फक्त बँकर्सचे त्रिकूट खाली कर्जतकडे गेले. लोणावळ्यात अतिरिक्त झालेले बँकर्स होते ते. त्यामुळे ते खाली कर्जतला पाठवलेले होते. अखेर 19.19 ला राणी लोणावळ्यात पोहचली. फलाट क्रमांक एकवर थांबलेली असताना मागे जोडलेले इंजिनांचे त्रिकूट वेगळे केले गेले. कारण त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आता पूर्ण झाली होती. इकडे गाडीतील गर्दीही कमी झाली होती. लोणावळ्यात राणी आज मिनिटभर जास्तच थांबली.

लोणावळ्यातून बाहेर पडत असतानाच पुणे-लोणावळा लोकल अप लाईनवरून गेली. तेवढ्यात डाऊन डिस्पॅच लाईनवर फिकट निळ्या रंगाच्या डब्ल्यूएजी-7 कार्यअश्वासह पुण्याकडे निघालेली बीसीएन वाघिण्यांची मालगाडी राणीसाठी रोखून धरलेली दिसली. पुढच्या दोनच मिनिटांत कल्याणच्या डब्ल्यूडीपी-4 डीसह धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस लोणावळ्याकडे धडाडत गेली. तिच्यापाठोपाठ आठ मिनिटांत केसीआर बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेसही गेली. आता वाटेत कोणताही अडथळा वाटेत नसल्यामुळे राणीचा वेग बराच वाढला होता. संपूर्ण प्रवासात तसा तो लोणावळा-पुणे दरम्यान जास्त असतोच. 19.47 ला देहू रोड ओलांडत असताना शेजारच्या डाऊन लूपवर चॉकलेटी रंगाच्या 2 डब्ल्यूएजी-5 इंजिनांसह पुण्याकडे जाणारी बॉक्सएन वाघिण्यांची (एकूण 59 वाघिण्या) मालगाडी रोखून धरलेली नजरेस पडली. पुढे खिडकीतून बाहेर बघत असतानाच आकुर्डीचा होम सिग्नल डबल यलो दिसला. त्यामुळे राणीचा वेग कमी होऊ लागला होताच. आकुर्डीचा स्टार्टर सिग्नलही पिवळा होता. इथे रुळांचे काम सुरू होते. त्यामुळे तिथे 20 किलोमीटर वेगमर्यादा दर्शवणारा फलक लावलेला होता. म्हणूनच राणीने आकुर्डी नेहमीच्या वेगाऐवजी हळुहळू ओलांडले होते. थोड्या अंतराने ही मर्यादा संपल्याचे दर्शवणारा फलक गेल्यावर राणीने परत वेग घेतला. तेवढ्यातच डब्ल्यूएजी-7 इंजिन जोडलेली एक मालगाडी शेजारच्या अप लाईनवरून धडाडत लोणावळ्याकडे गेली. 19.57 ला चिंचवड ओलांडले, तेव्हा तिथे लोणावळा-शिवाजीनगर लोकल राणीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी तिथे बाजूला उभी करून ठेवलेली होती. दरम्यान, गाडीत नाश्ता, चहा करून झालेले, गप्पा मारून झालेले प्रवासी शिवाजीनगर येण्याची वाट बघत होते. हळुहळू एकेक जण उतरण्यासाठीची पूर्वतयारी करण्यात मग्न होते. पिंपरी आणि कासारवाडी गेल्यावर दापोडीचा स्टार्टर सिग्नल डबल यलो होता. ते पाहून म्हटले हे काय आता, पुन्हा खडकीत थांबतेय की काय राणी. पण पुढे खडकीच्या होम सिग्नलवर रूट सिग्नलही ऑफ दिसला आणि लक्षात आले की, गाडी थांबणार नाही आहे, तर लूपवरून जाणार आहे. डाऊन मेन लाईनवर मालगाडी असावी असे वाटले. त्याप्रमाणे 20.05 ला खडकी लूप लाईनवरून ओलांडत असताना तिथे डाऊन मेन लाईनवर पुण्याकडे जाणारी एक मालगाडी दिसली. संपूर्ण प्रवासात मधल्या स्टेशनच्या मास्तरांबरोबर होत असलेली सिग्नलची देवाणघेवाण पाहण्याची काही वेगळीच मजा असते. अखेर 20.11 ला शिवाजीनगरमध्ये राणी पोहचली आणि मीही तिथे उतरलो. तेव्हा एक नंबर फलाटावर पुणे-लोणावळा लोकल उभी होती. आज राणी फक्त 3 मिनिटे लेट होती. नेहमीप्रमाणेच शिवाजीनगरमध्ये बरीच गर्दी उतरली होती.

डायनिंग कारच्या पहिल्याच अनुभवामुळे हा प्रवास खरंच वेगळा वाटला. IMG-20200128-WA0018.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! पूर्वी काही वेळा केलेला हा प्रवास या लेखामुळे परत झाला!

८:११ म्हणजे लौकरच आली ना शिवाजीनगरला? पुणे स्टे. ला ८:३५ का ८:४० वेळ आहे येण्याची असे अंधुक आठवते.

आयएचबी डबे लावणार हे वाचले होते. पुश-पुल सुद्धा करणार असेही. पुणे-मुंबई प्रवासाला लागणारा वेळ तीन तासांपेक्षा कमी करण्याचे प्रयत्न मधे सुरू होते.

पण डेक्कन म्हंटले की डोळ्यासमोर येते ती डब्ल्यूसीएम इंजिन वाली, एकदम देखणी!

पुलंच्या "साली सा नंबरची ट्राम तरी ठेवायची" प्रमाणे या एका गाडीकरता ते डीसी ट्रॅक्शन तरी ठेवायचे! Happy

Chhan

डेक्कन क्वीनवर आणि गाडीत मिळणाऱ्या कटलेटसवर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे हे वाचायला छान वाटले.

मला दक्खनच्या राणीला लावले जात असलेल्या WCM 5 या 20083 क्रमांकाच्या लोकमान्य इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य लाभले आहे.

मला एक शंका आहे की द्वितीय वर्गाच्या तिकिटावर डायनिंग कार मध्ये बसून चालते का?

कारण एकदाच मी त्यात बसून आम्लेट खाल्ले आणि चहा प्यायलो होतो. पण तेंव्हा मी AC 2 टायर च्या गोवा पुणे तिकिटावर होतो.

सुबक खरे जी, डायनिंग कारमध्ये द्वितीय श्रेणीच्या तिकिटावर आम्हाला जाता आले. तोपर्यंत अशीच शंका मलाही होती.

पूर्वी ऐकले होते की फक्त पहिल्या वर्गातील लोकांना जाता येते डायनिंग कार मधे. या गाडीचा इतरांपेक्षा वेगळा २ बाय २ वाला पहिला वर्ग मस्त असे. एक दोन वेळाच गेलो त्यातून आणि मग पहिल्या वर्गा ऐवजी एसी चेअर कार्स आल्या.

सुबोध खरे म्हणत आहेत ते "लोकमान्य" इंजिन तेव्हा पुणे मुंबई प्रवास केलेल्या अनेकांना आठवत असेल. इथे क्लिप बघा. याच्यासारखीच दिसणारी WCM कॅटेगरीतील अनेक इंजिने तेव्हा पुणे मुंबई व इगतपुरी लाइन वर वापरत. पण ती बरीचशी ब्रिटिश होती - इंग्लिश इलेक्ट्रिक या कंपनीची. मग जेव्हा चित्तरंजन च्या कारखान्यात भारतीय बनावटीची इंजिने बनवली, त्यातले हे पहिले - असे वाचले आहे.

डेक्कन च्या आणखी दोन क्लिप्स

ही १९९५ सालची. ज्यानंतर लगेच ही इंजिने वापरातून काढली. वरच्या इंजिनापेक्षा हे थोडे वेगळे दिसेल नीट चेक केले की
https://www.youtube.com/watch?v=-e4PRpcdRwk

१ जून ला वाढदिवसाच्या दिवशी दादर स्टेशन मधून दणाणत जाताना. नंतरचा रूळांचा आवाज जबरी नॉस्टॅल्जिक करतो. यातले इंजिन हे साधारण १९९६ ते मागच्या वर्षीपर्यंत वापरत. मग नुकतेच WAP टाइपचे वापरू लागले, वरती पराग यांनी लिहीलेले.
https://www.youtube.com/watch?v=ZIaX235auao

xtreme roads channel ( vaishali seta) गाड्यांच्या प्रवासाचे विडिओ बरे आहेत.
मुख्य म्हणजे तिला ते छान जमतं.
-------
200journeys चानेलवरही आहेत पण ते कंटाळवाणे वाटतात.

मस्त लिहीलंय.

पावसाळ्यात खंडाळ्याच्या घाटातून जाताना डायनिंग कारमधे कटलेट-चहा घेत बसायला कमाल वाटतं अगदी. मागच्या वर्षी गेलो होतो, तेव्हा डायनिंग कारमधे जाताना कुठलं तिकीट आहे ते चेक नव्हतं केलं कोणीही. त्यामुळे कोणालाही जाता येत असावं डायनिंग कार मधे.

छान लिहिले आहे.

This reminded me that as a very young boy, after growing up, I wanted to become an Engine Driver for Indian Railway Happy

असुफ मग आपण कलीग्ज असलो असतो, कारण मला गार्ड व्हायचे होते Happy

त्यामुळे कोणालाही जाता येत असावं डायनिंग कार मधे. >>> मंदार Happy

WOW! धन्यवाद हर्पेन. गाडी रॉयल दिसते एकदम. आवाजासकट पाहिले तेव्हा "लेडी इन ब्लू" असे ऐकले. म्हणजे तेव्हा निळी लायव्हरी असावी. नंतर सत्तर च्या दशकात निळी-पांढरी व नंतर निळी-पिवळी लायव्हरी आली असावी. एकूणच गाडीचे इण्टिरियर व डब्यातील इतर गोष्टी (कप्स, प्लेट्स, फाइन कटलारी ई) या ब्रिटिश सिरीयल्स मधे गाड्या दाखवतात तसे वाटतात.

मधे एका ठिकाणी मूळ इंजिनाच्या पुढे आणखी एक वेगळे इंजिन दिसते (क्लिप मधे साधारण ४:५० ला). ते जरा त्या जुन्या "खेकडा" शंटिंग इंजिनसारखे वाटले. त्याच्या मागे नेहमीचे WCM लोको आहे. पुण्याहून मुंबईकडे जाताना मुळात जास्त इंजिने लागत नाहीत आणि उलट्या दिशेने जी लावतात ती मागच्या बाजूला लावतात. त्यामुळे हे वेगळे वाटते बघायला.

तेव्हा ७:२५ ला सुटत होती पुण्याहून असे दिसते. नंतर ते सव्वासात कधी झाले माहीत नाही.