©संततधार! - भाग ३

Submitted by अज्ञातवासी on 31 May, 2020 - 11:30

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

प्रस्तावना -

संततधार ही कथा लिहिताना व वाचकांना देताना आनंद होत आहे. खरं सांगायला गेलं तर हा लेखनप्रकार मी जास्त हाताळलेला नाही. पण काहीतरी चांगलं लिहू शकू, असा विश्वास आहे.
ही कथा दोन व्यक्तींची आहे. नवरा बायकोच्या नात्यात असलेल्या, पण हळूहळू समांतर आयुष्य जगत चाललेल्या. त्यात बायको काही गोष्टी नवऱ्यापासून लपून करायला लागते, आणि हळूहळू नात्यातील असलेले दुरावे समोर यायला लागतात. यानंतर पडणारी प्रश्ने आणि त्यांची उत्तरे शोधणारी कथा म्हणजेच संततधार!

पुढील भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार, दिनांक ३ जून रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

भाग २ - https://www.maayboli.com/node/74857

ऑफिसच्या कॉम्प्लेक्स मध्ये खूप जास्त वर्दळ होती. ती मोठ्या मुश्किलीने तिच्या पार्किंगजवळ पोहोचली.
रिजर्व फॉर चेयरपर्सन अँड MD - थिंकलॅब प्रायवेट लिमिटेड!
किती भांडून तिने पार्किंगसाठी ही जागा घेतली होती. गेटपासून सरळ गाडी नेली, की पार्किंग.
आणि महिनाभरात तिने पार्किंग बघितली नव्हती.
महिनाभरापासून आपण ऑफिसलाच आलो नाही?
सहा वर्षांपूर्वी जेव्हा ही कंपनी चालू झाली, तेव्हा अक्षरशः तीने आणि मनूने अनेक रात्रीसुद्धा या ऑफिसमध्ये काढल्या होत्या.
दिवसभर काम करकरून दमायचं, आणि तिथेच एखाद्या कोपऱ्यात सतरंजी अंथरूण झोपायचं...
...मनूच्या कुशीत...
ती क्षणभर जुन्या आठवणींनी सुखावली, मात्र अचानक भानावरही आली.
ती गाडीतून खाली उतरली. पर्स घेतली. साईड मिररमध्ये पुन्हा एकदा स्वतःला बघितलं, आणि ती पुन्हा गाडीत बसली.
पुन्हा एकदा हलकासा टचअप फक्त...
'हं...' तिने निश्वास टाकला.
आजपर्यंत कधीही तिला ऑफिसला असं अवघडल्यासारखं झालं नव्हतं.
'हे माझं ऑफिस आहे. हे माझं ऑफिस आहे...' ती स्वत:ला बजावत होती.
ती गाडीतून उतरली, आणि सरळ कॉम्प्लेक्सच्या दिशेने निघाली.
लिफ्टकडे जाताना ऑफिसमधल्या काही मुलामुलींचा घोळका तिच्या दिशेने येताना तिला दिसला.
'हॅलो मॅडम,' म्हणून त्यांनी तिला अभिवादन केले व तिच्याकडे लक्ष न देताच ते आपल्या धुंदीत निघून गेले.
आज तिला पहिल्यांदा हे वागणं खटकत होतं. मी यांच्या कंपनीतील सर्वोच्च अथोरिटी आहे, आणि हे त्यांच्या गणतीतही नाही?
ती लिफ्ट मध्ये घुसली व तिने पाचव्या मजल्यावर चे बटन दाबले.
लिफ्ट हळूहळू वर जाऊ लागली तसतसं तिच्या मनावरचं दडपण वाढू लागलं.
लिफ्टचा दरवाजा उघडला. समोरच रिसेप्शनिस्ट तिला बसलेली दिसली.
"हॅलो मॅम," ती उठून उभी राहिली.
पर्वणीचा आत्मा सुखावला. कमीत कमी कोणाला तरी मी ऑफिसमध्ये कोणीतरी आहे याची जाणीव आहे, असं तिला मनोमन वाटलं.
ती सरळ तिच्या केबिनच्या दिशेने निघाली. जॉईंट केबिन! मनू डाव्या बाजूला, आणि ती उजव्या. पण कितीतरी दिवस झाले तिने त्या केबिनमध्ये पाऊल ठेवलं नव्हतं.
ती केबिन मध्ये पोहोचली तिला मनू कुठेही दिसत नव्हता.
ती तिच्या खुर्चीवर बसली, आणि तिने मान मागे टेकवली, क्षणार्धात तिला पेंग आल्यासारख झालं.
"टायर्ड हं?" त्या आवाजाने ती भानावर आली.
स्नेहल तिच्या समोर उभी होती.
"नो, जस्ट बॅड ट्राफिक..." ती कसनुस हसली.
"पुणे... बाय द वे, आफ्टर लॉंग टाईम."
"येस. इट्स गुड टू बी बॅक!"
"लेडीज, कॅन आय इंटरप्त यु फॉर अ सेक? सॉरी पर्वणी, वी आर ऑलरेडी लेट."मनू आत येत म्हणाला.
"ओके. तुम्ही डिस्कस करा. सी या." स्नेहल बाहेर जात म्हणाली.
"तू कॉफी घेणारेस?" मनूने तिला विचारलं.
"नाही."
"ग्रेट. हे काही पेपर्स आहेत. सगळ्या डिपार्टमेंटने मिळून हा रिपोर्ट बनवलाय. खरं सांगायला गेलं तर तू हा डीपमध्ये वाचायला हवा होतास, पण आता मिटिंगला फक्त अर्धा तास उरलाय. हरकत नाही. गो थ्रू इट. जे काही होईल, ते मिटिंगमध्येच डिस्कस करू. आणि नेहमीप्रमाणे... फायनल डिसीजन तुझा असेल."
"सहा वर्षांपासून हे वाक्य मी कायम ऐकतेय मनू."
"आणि मी पाळतोय, पर्वणी."
"मनू, मी ही मिटिंग वगैरे करायच्या मनस्थितीच नाहीये रे. मला तुझ्याशी बोलायचंय, कसं बोलायचंय तेच कळत नाही."
"जस्ट अ मिनिट." मनू म्हणाला, आणि बाहेर गेला.
"लिसन!" तो जोराने ओरडला.
सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे गेलं.
"पुढचा अर्धा तास माझी चेअरपर्सनबरोबर अत्यंत महत्वाची मिटिंग चालणार आहे. त्यांनंतर सगळे डिपार्टमेंट हेड्स मिटिंग रुम मध्ये मला हवेत. सो, मला यात कुठलाही व्यत्यय नकोय. ज्यांना मराठी कळत, त्यांनी बाकीच्यांना हे ट्रान्सलेट करून सांगा. थँक्स!"
त्याने एका दमात आज्ञा सोडली.
तो मध्ये आला व पर्वणी समोरच्या चेयरवर बसला.
'मला कळतंय, तुला काहीतरी खूप मोठं बोलायचय. मेबी आपलं आयुष्य याने बदलेल. पण एक सांगू? आज ती वेळ नाही. अनेक वर्षांपूर्वी तू माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलं होतंस. ऑफिसमध्ये आपण नवरा बायको कधीही असणार नाही, आपलं नातं फक्त प्रोफेशनल असेन आणि आपण फक्त कंपनीच्या हिताचा विचार करू. घर आणि काम यात गल्लत होता कामा नये, असं तूच म्हणाली होतीस मला."
"हो म्हणाले होते, पण."
नाऊ आय एम जस्ट फॉलोविंग युवर ऑर्डर्स.
क्षणभर एक असह्य शांतता खोलीत पसरली. "आणि डोन्ट वरी. जर तुला वाटत असेल, तर ही मिटिंग पोस्टपोन करूयात."
"नाही... आय विल चेयर."
"थँक्स...एकदा डॉक्युमेंट वाचून घे, आणि त्यानंतर मिटिंग रूममध्ये ये. ओके?"
"हो. सॉरी." पर्वणी स्वतःला सावरत म्हणाली.
"घरचे मॅटर्स घरी डिस्कस करूयात. जर तुझी इच्छा असेल तर..." मनू म्हणाला.
तो उठून उभा राहिला आणि तडक बाहेर गेला.
पर्वणी सुन्नपणे बसून राहिली. थोड्या वेळाने तिने रिपोर्ट हातात घेतला.
मिटिंग रुममध्ये सगळे डिपार्टमेंट हेड्स जमले होते. खरं सांगायला गेलं फायनान्स, मार्केटिंग, कंटेंट डेव्हलपर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मीडिया मॅनेजमेंट, एडमीन असे अनेक डिपार्टमेंट थिंकलॅबमध्ये होते.
एचआर आणि मार्केटिंगची जबाबदारी स्वतः मनू सांभाळत होता.
कंटेंट आणि आर एंड डी स्नेहल सांभाळत होती.
मार्केटिंग, कंटेंट आणि आर एन्ड डी हे कंपनीचे सर्वात महत्वाचे घटक होते!
यु शेपच्या टेबलमध्ये सर्वात मधली खुर्ची रिकामी होती, व तिच्या आजूबाजूला खुर्च्यांवर हेड्स आणि मनू बसलेला होता. मनू त्या खुर्चीच्या अगदी उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला होता. स्नेहल त्याच्या शेजारीच होती.
"मी बोर झालेय मनू... मी बाहेर जाऊ का?" ती मनूच्या कानात कुजबुजली.
"मिटिंग्स बोरिंगच असतात स्नेहल, तू इथे अजयकुमार येऊन डान्स करेल अशी अपेक्षा तर करू शकत नाही."
"बिलकुल नाही. आय हेट हिम."
"तुझ्या बजाजच्या नेक्स्ट एडसाठी मी त्याला अप्रोच करतोस."
"आर यु सिरीयस???" स्नेहल आश्चर्यचकित झाली.
"थिंक बिग..." मनू शांतपणे म्हणाला. आणि तेवढ्यात पर्वणी आत आली, आणि मुख्य खुर्चीवर जाऊन बसली. स्नेहलला मनूच्या शेजारी बघून तिच्या कपाळावर आठी पडली.
"शाल वि स्टार्ट?" मनूने विचारले.
"येस..." ती म्हणाली.
"सो, होप वि आर डूइंग वेल अँड गुड. पुढच्या महिन्यात आपली कंपनी सहाव्या वर्षात पदार्पण करेन, तेव्हा आपली एजीएम होईलच. पण बिफॉर आय वॉन्ट टू डिस्कस सम पॉईंट्स.
१. सरसकट २०% अप्रेजल
२. मॉडेल्सऐवजी सिरीज स्टार्सचा एडसाठी वापर
३. स्नेहलचं डेप्युटी डिरेक्टर लेवलला प्रमोशन
४. नवीन कॅटेगरीसाठी प्रमोशन बजेट
५. फोकस ऑन न्यू कॉर्पोरेट हाऊसेस
हा आपला पाच सूत्री कार्यक्रम असेल. नाऊ आय विल इलाबोरेट वन बाय वन."
मनूने बोलण्यास सुरुवात केली. तो कितीतरी वेळ बोलत होता. अनेक प्रश्नांना उत्तर देत होता.
पर्वणी गप्पच होती. फक्त मान हलवत होती.
"पण हे सगळं असलं, तरीही एजीएमपर्यंत फायनल डिसीजन चेयरपर्सनच घेतील. आता मी दमलोय. लेट्स हॅव टी ब्रेक. आणि कामाला लागा." मनू म्हणाला.
पर्वणी भानावर आली. मिटिंग संपली होती. तिने एकही शब्द न बोलता...
'माझं कंपनीत काहीही उरली नाही?' तिने विचार केला.
ती बाहेर निघाली.
"मी थोडं नंतर घरी येईन. तू जेवण करून घे. आज शांताराम तुझ्या बरोबर येईल, ड्रायव्हर म्हणून."
मनू मागून येत म्हणाला व एवढं बोलून सरळ केबिनमध्ये निघून गेला.
ती निमूटपणे बाहेर निघाली. आज तिचीच कंपनी तिला परक्यासारखी झाली होती.
बाहेर ड्रायव्हर तिची वाट बघत गाडीजवळ उभा होता.
हरल्यासारखी, रिती झाल्यासारखी ती गाडीत बसली...
गाडी निघाली...दूर ऑफिसपासून...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अज्ञातवासी,
. मला ह्या कथेची बांधणी थोडी सुटावलेली वाटते आहे त्यामुळे कथा थोडी आउट ऑफ फोकस होईल. मागील भागाच्या प्रतीसादात तुम्ही म्हणालात ती भीती खरी ठरायला नको.

कथेच बीज 'निमीता' यांच्या 'मन वढाय वढाय' या कथेच्या जवळ जाणार आहे. अस वाटतंय.. कि या कथेचा प्लॉट पुर्णतः वेगळा आहे??

(सॉरी, पण पहिले 3भाग आत्ता परत एकदा सलग वाचल्यानंतर जे जाणवलं तेच प्रतिसादात लिहीलंय)
पुभाप्र!

मन्या + 1

पटापट येऊ द्या पुढचे भाग....

@ पाफा @ आसा @ मन्याS @चरप्स- धन्यवाद!
या कथेच्या निमित्ताने काही मनातलं मांडू इच्छितो.
ही जी कथा आहे, ही माझ्या जुन्या सगळ्या कथांच्या तुलनेत संपूर्णपणे वेगळी आहे. हा जॉनर मी उंबरठा या कथेत हाताळला होता, आणि येस. त्यावरही संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
ही कथा कुठल्याही कथेवर आधारित नाही. यावर काही बोलणं म्हणजे स्पोईलरच म्हणता येईल. पण वर काही गोष्टी प्रस्तावना म्हणून टाकतो, म्हणजे गोष्टी क्लियर होतील.
जस्ट, जर अज्ञातवासीने आजपर्यंत काही चांगलं लिहिलं असेल, तर तो यावेळीही निराश करणार नाही, असा विश्वास वाटतो.

म्हणजे पर्वणी चेयरपर्सन आहे पण तिचे कंपनीत लक्ष नाही .
छोटा भाग आहे पण इंटरेस्टिंग वाटत आहे आता .

मन्या - मन वढाय वढाय कुठे आहे मायबोलीवर असेल तर लिंक देता का ?

आवडतेय.. संथपणा आहे कथेत तो जरा जास्त भावतोय.. अशा कथा म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच..अज्ञा अपेक्षा वाढवून ठेवतोयेस आमच्या.. बघ बाबा .

एवढे कष्ट घेऊन पर्वणी कंपनीसाठी असून नसल्यासारखी... तिची अस्वस्थता, रितेपण छान व्यक्त केलंय..

@अजय - धन्यवाद.
@रुपाली - धन्यवाद
@नौटंकी - धन्यवाद
@उर्मिला - धन्यवाद
@पूर्वी - धन्यवाद

पुढील भाग पोस्ट केला आहे.

शक्य झाल्यास कथा एडिट करून जशी सुरवातीला मागील भागाची लिंक आहे तशी कथेच्या शेवटी पु भा ची लिंक देणे. सलग वाचायला मिळेल.