©संततधार - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 28 May, 2020 - 11:30

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

पुढील भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवार, दिनांक ३१ मे रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

भाग १ - https://www.maayboli.com/node/74824

अडीच वाजले तरी तिचा डोळ्याला डोळा नव्हता.
डोक्यात विचारांचा इतका कल्लोळ माजला होता, की तिला अक्षरश: डोकं फोडून घ्यावंस वाटत होतं.
"मनू! मनू असं बोलूच कसं शकला?
त्याला सगळं कळलं तरीसुद्धा..."
तेवढ्यात तिच्या विरुद्ध बाजूचा नाईट लॅम्प लागल्याची तिला जाणीव झाली.
तो उठला. तिने घट्ट डोळे मिटून घेतले.
तो तिच्या दिशेने येत असल्याची तिला जाणीव झाली.
तो तिच्या अंगावर झुकला.
त्याने तिचं ब्लॅंकेट नीटनेटकं केलं, आणि तो बेडरूमच्या बाहेर पडला.
पर्वणीच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. अचानक तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती मूकपणे उशीत तोंड खुपसून रडू लागली.
उशी ओलिचिंब झाली होती. बऱ्याच वेळाने पर्वणीला याची जाणीव झाली.
ती उठली. तिने स्वतःला सावरलं.
अश्रूंबरोबर तिच्या मनावरच ओझं वाहून गेल्यासारख तिला वाटलं...
ती उठली. बाथरूममध्ये जाऊन तिने तोंड धुतलं, आणि बेडरूममधून बाहेर आली. तिला स्टडी रूमचा लाईट दिसला.
'मनू, वाचत बसलाय की काय?'
ती स्टडी रूमच्या दिशेने निघाली. दाराजवळ पोहोचताच तिला जाणवलं की तो वाचनात प्रचंड गर्क झालेला होता. अतिशय एकाग्रतेने तो वाचत होता.
ती दोन मिनिटे त्याच्याकडे बघतच होती.
"झोप येत नाहीये का? मालिश करून देऊ???" तिने न राहवून विचारले.
त्याने हळूच मान वर केली.
"तू कशी जागी झालीस? सॉरी, मी लाईट लावल्याने तुझी झोपमोड झाली असेल."
"नाही नाही, मी थोडी आधीच जागी होते."
"अच्छा. बरं विचारते आहेसच तर मालिश करूनच दे. कामाने डोकं गेलंय आज."
ती बेडरूममध्ये आली. तिने एका ड्रावरमधून जेलची बॉटल काढली, आणि ती स्टडी रुम मध्ये पोहोचली.
त्याने तिला एक खुर्ची दिली, व तो खाली बसला.
तिने थोडंस जेल हातात घेतलं, व त्याच्या डोक्यात हात घातला.
'खूप गरम लागतंय... खूप...
अति विचार करतोय मनू तू! तसं काहीही नाहीये.'
कितीतरी वेळ ती त्याला मालिश करत होती.
"थँक्स... आता खरंच बरं वाटतंय. तू जाऊन झोप. मी काही पाने वाचून येतो."
ती उठली, आणि तिने सहज टेबलावरच्या पुस्तकाकडे बघितले.
'ययाती!'
––––––
रात्री विचार करता करता तिला केव्हा झोप लागली, कळलंच नाही.
सकाळी नऊ वाजता तिला जाग आली.
असं कधीच झालं नव्हतं.
संपूर्ण अंग जडावलेलं वाटत होतं... डोकंसुद्धा जड झालं होतं.
कालची रात्र काळरात्रीसारखी गेली होती. जडावलेल्या अंगानेच ती बाथरूममध्ये शिरली. तिला आता पटकन आवरायला हवं होतं.
तिने पटापट आवरलं, व ती खाली आली.
घर पूर्णपणे मोकळं दिसत होतं.
काहीही आवाज येत नव्हता! स्मशानशांतता.
'कुहू!'
त्या आवाजाने तिची तंद्री भंगली. एक जिवंतपणाची खूण!
"अनुराधा," तिने आवाज दिला.
प्रतिसाद नाही.
ती हळूहळू खाली उतरली.
"अनुराधा..." तिने आवाज दिला.
प्रतिसाद नाही.
किचनमधून बांगड्यांची किणकिण ऐकू येत होती.
ती हळूहळू किचनकडे गेली
अनुराधाला पोळ्या लाटताना बघून तिच्या जीवात जीव आला.
"अनुराधा!!" ती जोरात ओरडली
"जी मॅडम." अनुराधा दचकून मागे वळली
"केव्हाचा आवाज देतेय.ऐकू येत नाही का? आपण दोघीजणी या घरात एकट्या असतो. उद्या उठून कुणी चोरी करून गेला तरी तुला कळणार नाही."
"नाही मॅडम पोळ्या करताना जरा लक्ष नव्हतं इतकंच."
ती इतकी का चिडली होती, ते तिलाच माहिती नव्हतं.
तिला फक्त घडाघडा बोलायचं होतं. मन मोकळं करायचं होतं.
"बरं ते जाऊदे मी आज नाश्ता नाही डायरेक्ट जेवणच करेल."
"ओके मॅडम पण साहेबांनी आठवण द्यायला लावली होती."
"काय?" तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"तुमचं सगळं आवरून झाल्यावर ऑफिसला बोलावलंय."
पर्वणी तू विसरलीस!!
"हो हो, आहे, माझ्या लक्षात. तू पोळ्या बनव. मी आता ऑफिसलाच निघते. दुपारी मनू आणि मी बरोबरच जेवण घेऊ."
अनुराधाला सूचना देऊन ती पुन्हा एकदा बेडरुमच्या दिशेने वळली. बेडरूममधल्या भल्यामोठ्या आरशात तिने स्वतःला निरखून बघितले.
डोळ्याखाली हलकीशी बारीक वर्तुळे पडायला सुरुवात झाली होती. आधी तुकतुकीत वाटणारी त्वचा आजकाल काळवंडत चालली होती. जमेची बाब म्हणजे अजूनही ती जाड झालेली नव्हती.
दोन तीन चुकार पांढऱ्या बटा इकडेतिकडे मिरवत वयाची साक्ष काढत होत्या.
सदतीस! चाळीशीला तीन वर्षे उरलीत!
आणि मनू, तीन वर्षांपूर्वी त्याने तिशी पार केली होती.
दोघांचं वयाचं अंतर दिलं इतकं प्रकर्षाने जाणवेल, अस तिला कधीही वाटलं नव्हतं!
तिने पुन्हा एकदा एक हलका मेकअप चढवला. नेहमी ती मिटिंगच्या वेळी साडी किंवा पंजाबी ड्रेस वर असायची, व खाली तिला कम्फर्टेबल वाटणारे कॅनवास शूज.
आता मात्र ती संपूर्ण वॉर्डरोब धुंडाळू लागली.
बऱ्याच वेळाने तिला जे हवं ते सापडलं.
पांढरा फॉर्मल टॉप. त्यावर ब्लॅक ब्लेझर आणि ब्लॅक ट्राउजर, आणि मीडियम हिलचे सँडल!
तिने पटकन कपडे बदलले. स्वतःच बदललेलं रूप बघून ती स्वतःच सुखावली.
आणि ती बंगल्याबाहेर पडली...
भरधाव वेगाने गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. तिला प्रचंड उशीर झाला होता. मात्र म्हणून यावर मनू तिला काही बोलणार नव्हता हेही तिला माहिती होतं.
तिला भीती होती ऑफिसमधल्या बाकीच्या लोकांच्या नजरांची!
तिच्या जगात ती कितीही हुशार असली, तरी ऑफिसमध्ये मनुची बायको म्हणूनच तिला स्थान होतं!
कित्येक लोकांना तर ही कंपनी तिने व त्याने एकत्र मिळून चालू केली होती हेही माहिती नव्हतं!
फक्त मालकाची बायको म्हणून सगळी डिसिजन मेकिंग अथॉरिटी तिच्याकडे आहे असं सगळ्यांना वाटत होतं!
बराचसा स्टाफ म्हणजे नवीन लोकांची भरती झाली होती. डिझाईन सेक्शन मध्ये तर सगळ्या मुलीच होत्या.
कंटेंट डिपार्टमेंटमध्येसुद्धा मुलींची संख्या जास्त होती.
स्नेहल... कंटेंट टीमचीच लीडर ना?
मनुबरोबर सगळ्यात जास्त वेळ हीच असते ना ऑफिस मध्ये? आजकाल जास्तच कौतुक ऐकतोय मनूकडून तिचं...
एखाद्या नागाने कडाडून चावा घ्यावा, अशी तिची अवस्था झाली.
पर्वणी, मनू आहे तो!!!
तिने सगळे विचार झटकले व गाडीचा वेग वाढवला.
गाडी ऑफिसच्या दिशेने भरधाव निघाली.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>शीट, पर्वणी तू विसरलीस!!

एक सल्ला आहे, राग मानु नका! 'शीट' हा शब्द ह्या सुंदर कथेचा रसभंग करतो, असे वाटते.

@minal - धन्यवाद!
@नौटंकी - धन्यवाद. पुढील भाग रविवारी रात्री ९ वाजता येईल.
@सुमेधा - अहो राग कसला? धन्यवाद. तो शब्द वापरताना मीसुद्धा थोडा साशंक होतो. आता काढलाय.

निरर्थक वाटला भाग.. ययातीचा संदर्भ असेल तर तेवढंच.. थोडे मोठे भाग टाका. विनंती समजा, टीका किंवा सूचना नाही.

गोष्ट आवडतेय ...
दोघांचं वयाचं अंतर दिलं इतकं प्रकर्षाने जाणवेल, अस तिला कधीही वाटलं नव्हतं! - इथे दिलं च्या ऐवजी तिला हवं होत का ?

वाचतेय..
उत्सुकता पुढील भागाची..

अरेच्चा!! काल रिप्लाय द्यायचा राहून गेला वाटतं...

छान झालाय भाग.. उद्या आठवणीने पुढचा भाग पोस्ट कर म्हणजे झालं.. Happy

@उर्मिला - धन्यवाद
@ अजिंक्यराव - धन्यवाद. एक सांगतो, राग मानू नका. विनंतीच समजा.
या कथेचे पुढचे अनेक भाग प्रचंड रटाळवाणे होतील. किंबहुना कथा तिथेच गोल गोल फिरतेय असं वाटत राहीन. निरर्थकसुद्धा होतील. तुम्हाला लेखकाला शिव्यासुद्धा घालाव्याशा वाटतील Lol म्हणून तुम्हीच निर्णय घ्या, भ्रमनिरास नको व्हायला.
आणि हे मी रागाने बिलकुल नाही सांगत. पण मला माझ्या ह्या कथेच्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. Happy
पुढचे भाग नक्की मोठे होतील.
@रूपाली विशे पाटील - थँक्स
@मन्या - थँक्स
@श्रद्धा - धन्यवाद. बदल केला आहे!!!
@आसा - धन्यवाद. नक्किच पुढचे भाग मोठे टाकतो
@अस्मिता - धन्यवाद. आणि हो, आयडी नेम बदलेललं आधीच लक्षात आलं होतं... (बादवे मला आदीश्री अस्मितापेक्षा भारी वाटलं. Happy
@अथेना - धन्यवाद
@अनामिका - धन्यवाद
@अजय - धन्यवाद. नक्कीच आज भाग टाकतो
@cuty - धन्यवाद.

ज्यांचं लेखन आवडतं, त्यांनाच स्पष्ट प्रतिसाद दिले जातात. तुमच्या प्रतिक्रियेवरून तुम्हाला माझा प्रतिसाद आवडला नाही असं दिसतंय. असो, यापुढे फक्त चांगले प्रतिसाद देईन. लिहीत रहा

अजिंक्यराव, कुणाच्याही सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नका. राग वगैरे काहीच नाही... जस्ट स्पष्ट बोललो इतकंच. Happy
काडी टाकण्यासाठी काही आयडी फेमस आहेत, हे तुम्हालाही लक्ष्यात येऊ नये Lol