कर्ता - ३ (अंतिम)

Submitted by ऑर्फियस on 30 May, 2020 - 09:15

walkers-486583_640_1.jpg

राजे गोडबोलेंच्या गुरुंना भेटायला सेमिनार रुमकडे निघाले. आत शिरताच दिसले एक सत्तरीच्या घरातले साधासुधे शर्टपँट घातलेले गृहस्थ डोळे मिटून बसले आहेत आणि बाजुला गोडबोले अदबीने उभी आहेत. इतर तिघे त्यांच्याकडे आशेने पाहात आहेत. वातावरणात चिडीचूप शांतता. गोडबोलेंनी राजेंना मोबाईल सायलेंटवर ठेवण्यास खुणावले. राजेंनी मनोमन गोडबोलेंना शिव्या घालत मोबाईल सायलेंटवर ठेवला. काहीवेळ तशीच शांतता राहिली. राजे स्वस्थपणे बसून होते. जोशी न बोलता इतका वेळ बसु शकतात ही देखिल राजेंसाठी नवीनच गोष्ट होती. काही वेळानंतर गुरुंनी हळूवारपणे डोळे उघडून समोर पाहिले. राजेंनी न दिसेल असा निश्वास सोडला आणि आधी मोबाईलचा सायलेंट मोड काढला. संपलं एकदाचं. गुरु थेट राजेंकडेच पाहात होते. "तुमचा विश्वास नाही या सार्‍यावर ठावूक आहे मला." ते किंचित हसले. "पण हे तुमच्या पदार्थविज्ञानासारखंच आहे. एखादा विचार अतिशय तीव्र करून तो माणसावर सोडला की त्या विचाराप्रमाणेच घटना घडते. मात्र हे विचार एकाग्र करता आले पाहिजेत. जसं एखाद्या भिंगातून विखुरलेले सूर्यकिरण एकत्र आले की अग्नी निर्माण करता येतो तसंच." गोडबोले राजेंकडे पाहात होते. गुरुबद्दलचा भक्तीभाव त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहात होता. राजे मनातून तुच्छतेने हसले पण त्यांनी चेहरा निर्विकार ठेवला होता.

"आमच्या शास्त्रात मंत्र, तंत्र आणि काही उपासनांनी हे साध्य करता येतं. क्वचित काहीजणांमध्ये ही शक्ती जन्मजात असते. कित्येकदा आपल्यात ही शक्ती आहे हे त्या माणसांना माहितही नसतं. ही माणसं मनात जे आणतात ते घडतं. पण ते फार दुर्मिळ. बाकिच्यांना कठोर साधना करावी लागते." गुरु किंचित थबकले. इतरांकडे पाहात म्हणाले" तुमच्याकडे असंच काहीतरी झालेलं दिसतंय." आता वातावरणात एकदम गडबड सुरु झाली. सर्वजण एकदम बोलु लागले. नयना तर मोबाईलवर कुठल्यातरी देवाचा फोटो पाहात सारखा सारखा त्या फोटोला नमस्कारच करु लागली. एक प्रकारचा पॅनिक वातावरणात पसरला. त्यात राजेंचा शांतपणा पाहून इतरांचा उतावीळपणा वाढत होता. त्यांना राजेंनीही आपल्यासारखंच एक्साईट होऊन थयथयाट करावा असे वाटत होते. पण राजेंवर काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता. शेवटी जोशींना राहवेना.

"बघा बघा मी म्हटलं होतं ना " जोशी जणू गुरुंना विसरूनच गेले. राजेंजवळ येऊन तावातावाने काहीतरी बोलु लागले. "हे काहीतरी वेगळं आहे". जोशींनी सुरु केल्यावर साळवी मागे राहणे शक्यच नव्हते " राजे सर आता तुम्ही हे थट्टेवारी नेऊ नका. आमचे जीव टांगणीला लागलेत". हे ऐकूनही राजें थंडपणेच बसले होते कारण हे काहीच मानायला त्यांचे मन तयार नव्हते. शेवटी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गोडबोले गुरुंसमोर हात जोडून म्हणाले " महाराज आता यावर उपाय? संस्थेतल्या तीन जणांनी जीव गमावलाय. आणि एक बाई कायमच्या अपंग झाल्या आहेत." राजेंकडे पाहात गुरु उत्तारले "उपाय आहे. हे जे काही चाललं आहे त्याचा कर्ता कोण आहे ते आधी शोधावं लागेल. त्यासाठी मला येथे रात्रभर बसून ध्यान करावे लागेल. तुमचे सर परवानगी देतील? त्यांचा तर विश्वासच नाही यावर."

आता सार्‍यांच्या नजरा राजेंकडे वळल्या. ही माणसे ऐकणार नाहीत याची राजेंना खात्री पटली होती. "ठिक आहे" राजेंनी जोशींकडे पाहात विचारले " रात्रभर यांच्यासोबत येथे कोण राहणार?" "आम्ही तिघेही राहू" राजेंनी इतक्या सहज परवानगी दिली यावर जोशींचा विश्वास बसत नव्हता. त्या आनंदात त्यांनी सर्वांतर्फे त्यांना न विचारता स्वतःच शब्द देऊन टाकला. "उद्या अमावास्या आहे. उद्याच मी येथे येईन." गुरुंनी लगेच दिवसही सांगून टाकला आणि गुरु निघाले.

गुरु निघताना सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. एकट्या राजेंनी साधा नमस्कार केला होता. इतकी नम्रता दाखवतानाही राजेंना त्रास होत होता. पण सर्व कसंतरी पार पडलं आणि राजे आपल्या केबिनमध्ये आले. त्यांनी खिडकी उघडली. छाती भरून भरारणारी हवा शरीरात ओढली. त्यांना बरं वाटलं. इतक्यात मागे कुणाचीतरी चाहूल लागली. बाबुराव नखं खात उभा होता. "काय आहे?" राजेंच्या स्वरात आपोआप तुसडेपणा आला. "साहेब माझा दिवाळी बोनस अजून मिळाला नाही. घरी वहिनीने तगादा लावलाय. काल जेवायलाही घातलं नाही. म्हणाली बोनस नाही आणला तर उद्यापासून जेवायला मिळणार नाही" एकदम पुढे येऊन बाबुरावने राजेंचे पायच धरले. "मला माझे पैसे द्या साहेब पैसे द्या माझे. नाहीतर आज घरी जेवायला मिळणार नाही."

"ए काय करतो? गेटाऊट" राजे त्या ओबडधोबड माणसाकडे पाहून एकदम अस्वस्थ होऊन ओरडले. कुणी असे अजीजीने आजवर त्यांचे पाय धरले नव्हते. ते त्याला दूर करायला धडपडू लागले. चौकशी सुरु झाल्यावर शिक्षा म्हणून बाबुरावचा बोनस रोखून धरण्याची सूचना राजेंचीच होती. ही गरीब फडतूस माणसे. यांना बोलते करायचे म्हणजे यांचे नाक असेच दाबायला हवे. त्यांनी जोरजोरात नयनाला हाका मारायला सुरुवात केली " नयना ए नयना याला आधी बाहेर काढ. दूर कर माझ्यापासून". राजेंचा आरडाओरडा ऐकून नयना घबरीघुबरी होऊन आत आली . तिने जोशींना बोलावले आणि दोघांनी रडणार्‍या बाबुरावला कसेबसे बाहेर नेले. राजेंचा श्वास जोरात चालला होता. ते खिडकीची कड पकडून कसेबसे उभे राहिले होते. इतक्यात मोबाईल वाजला. फोनवर मिश्रा होता. डिटेक्टीव एजेंसीचा प्रमुख. राजेंनी स्वतःला सावरले "बोलिये मिश्राजी क्या खबर है?"

"राजे साहब सबकुछ फोनपर नही बता सकता लेकीन सिर्फ खास खास बात बताता हूं..आपके देसाई, नायर और भातखंडे तिनों ने आपका रिसर्च एक कंपनी को बेचा था. उसके लिये हर एक को पच्चीस लाख रुपिया दिया गया. पार्टी नायर ने लायी थी, रिसर्च देसायीने दिया और बाकी पेपर्स पहुचाना, डिटेल्स समझाने का काम भातखंडे करता था..आपके तांदले मॅडमने रिसर्चसे रिलेटेड सब फायनानशियल डिटेल्स उनको दिये थे...." राजेंच्या हातून मोबाईल गळून पडला. "लेकीन राजे साहाब उन तिनोंकी मौत नॅचरल हुई है..उसमें कोई फाऊल प्ले नजर नाही आया..तांदले मॅडमका अ‍ॅक्सेडेंटभी." मिश्राची पुढची वाक्य राजेंना ऐकू येत नव्हती. डॉ. देसाई? डॉ. नायर? यांनी असं केलं? राजेंना अचानक दरदरून घाम सुटला. आणि भातखंडे? किती काकूळती केली होती त्याने या जॉबसाठी. राजेंसमोर केबिन गरगर फिरु लागलं. नऊ ते पाच खालमानेने काम करणारी तांदळेबाई? तरीच बाबुराववर आरोप करताना हे चौघेच पुढे आले होते. चौघांनी त्याला शिताफिने अडकवलं होतं. राजेंच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यांच्या नकळत ते खिडकीपुढे झुकले आणि त्यांचा तोल गेला....

बाबुराव डोळे पुसत त्या अडगळीच्या जागेत सर्वांसाठी कॉफी करत पुटपुटत होता "माझे पैसे देत नाही काय....मरशील, बाकीच्यांसारखाच मरशील...खिडकीत उभा राहतोस ना नेहेमी? त्या खिडकीतून पडूनच मरशील"..त्याचे पुटपुटणे सुरु होते....

ऑर्फियस (अतुल ठाकुर)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी!
बाबुराव म्हणजे ऑफिस स्पेस मधला मिल्टन. डिट्टो!

Pages