कर्ता - २

Submitted by ऑर्फियस on 29 May, 2020 - 12:42

walkers-486583_640_0.jpg

राजेंनी निश्वास सोडला आणि ते खिडकी बंद करून आत आले. सेमिनार रुममध्ये सर्वजण आल्याचं नयनाने कळवलं. सात पैकी आता पाचच जण असणार. देसाई आणि नायर तर गेलेच. शिवाय आपली सेक्रेटरी म्हणून नयनाची हजेरी असेल. राजेंनी सेमिनार रुमकडे जातानाच सर्वांसाठी कॉफी पाठवून देण्यास सांगितले. "आणि बाबुरावला सांग नख चावत सेमिनाररुममध्ये येऊ नको म्हणून. इतक्यांदा सांगितलंय. बरं दिसत नाही." राजेंनी नयनाला हे मुद्दाम आठवणीने सांगितले. या बाबुरावच्या काही सवयी म्हणजे डोक्यात अगदी तिडीक आणतात. पण आता बाबुराव महत्त्वाचा नव्हता. सेमिनाररुम ऐसपेस होती. चारजण चिंताग्रस्त मुद्रेने बसले होते. राजेंनी थेट मुद्द्यालाच हात घातला. "आपल्याकडे काय घडतं आहे ते तुम्ही जाणताच आहात. याला उपाय म्हणून एका प्रायव्हेट डिटेक्टीव एजेंसीला कन्सल्ट करावं असं मला वाटतंय. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी मी ही मिटिंग बोलावली आहे. कारण फाईल गहाळ झाली तेव्हापासून हे सुरु झालं. त्या फाईलचा, त्या रिसर्चचा काही संबंध या घटनांशी असेल कदाचित. मला शक्यता पडताळून पाहायचीय". इतकं बोलून राजे थांबले.

सर्वजण एकमेकांकडे चकीत होऊन पाहु लागले. ते काही वेगळ्याच अपेक्षेने आले होते आणि राजे काहीतरी भलतंच सांगत होते. शेवटी डॉ. जोशींनी धीर केला. "सर, तुम्ही थट्टा करीत नाही ना आमची? अजूनही तुम्हाला वाटतंय की घडतंय ते सर्व नॉर्मल आहे? अहो आम्ही सर्वजणांनी अनेकदा तुम्हाला सांगितलं सायन्समध्ये याला उपाय नाही मिळणार. हे काहीतरी अमानवी आहे आणि त्याला उपायही तसेच करावे लागणार आहेत. अजून किती बळी गेले की तुम्हाला कळणार आहे हे?" "डोण्ट टॉक नॉनसेन्स जोशी" राजे चिडलेच. "अहो केमिस्ट्रीत पोस्ट डॉक्टरेट केलंय तुम्ही याचं तरी भान ठेवा. आणि काय करायचं? तुमच्या त्या वास्तुवाल्याला बोलावून बाथरुम तोडायचं आणि तिथे ऑफीस करायचं? आणि ही आपल्या मालकीची बिल्डींग नाही हे विसरलात? आपण ते बदल कसे करणार? त्याने ज्या वस्तु ठेवायला सांगितल्या होत्या त्या ठेवल्या की आपण प्रत्येकाच्या टेबलवर. कुठे काय फरक पडला? पैसे मात्र गेले." जोशी गप्प बसले. खरं तर त्यांना आणखी एक जालिम उपाय कुणीतरी सुचवला होता.पण तो बोलण्याचा त्यांना लगेच धीर झाला नाही. "सर मी काय म्हणतो" स्टॅटीस्टीक्सचे साळवी बोलु लागले.

"आपल्याला पलिकडचं दिसत नाही म्हणजे पलिकडे जग नसतं असं नाही" हे बाळबोध वाक्य ऐकून राजेंचा पारा आणखी चढला. "साळवी पलिकडच्या जगाचं तुम्ही मला सांगताय? तुमच्या ज्योतिषाने काय दिवे लावले? आय कान्ट विलिव्ह धीस की मी हे सारं इथे चालु दिलं. पण तुमच्या आग्रहाखातर म्हटलं तुमचं समाधान होऊ देत. त्याने सर्वांच्या पत्रिका बनवल्या आणि संस्थेत येऊन सर्वांच्या नावे शांत केली. काय झालं? एका महिन्याने भातखंडे गेला." राजेंनी टेबलवर मूठ आपटली. "नो. आय वोण्ट अलाव धीस एनिमोर. खरं तर मी हे आधीच करायला पाहिजे होतं." पुन्हा चौघेजण एकमेकांकडे पाहु लागले. राजेंच्या लक्षात आलं की हे चौघेही काहीतरी ठरवून आले आहेत. "तुम्हाला काही सांगायचंय? असले काही फडतूस उपाय असतील तर मला संस्थेचे पैसे वाया घालवायचे नाहीत हे आधीच सांगून ठेवतो." इतक्यात सेमिनार रुमचे दार उघडले. बाबुराव कॉफी घेऊन आला होता. त्याने अदबीने प्रत्येकाकडे येऊन कॉफी दिली आणि रिकामा ट्रे घेऊन जात असताना एका हाताने तो नखं चावू लागला. ते पाहूनच राजेंचे डोके भणभणु लागले. नयना तोंड लपवून खिस्सदिशी हसली. बाबुराव जाईपर्यंत राजे गप्प बसले. आणि तो गेल्यावर त्यांनी इतरांना बोलण्यास खुणावले. पुन्हा जोशींनीच सुरुवात केली.

"पैसे खर्च करावे लागणार नाहीत." जोशींनी आधीच सांगून टाकले." या डॉ. गोडबोल्यांचे गुरु आहेत. ते आणतील त्यांना आपल्या संस्थेत. या वास्तूत आल्यावर त्यांना लक्षात येईल काय प्रॉब्लेम आहे ते. आणि तेच आपल्याला उपायसुद्धा सांगतील. निरिच्छ संत आहेत. पैसे घेत नाहीत." जोशींनी गोडबोलेंकडे पाहिले. "यस सर" आता गोडबोले बोलु लागले. " माझे गुरु त्रिकालज्ञानी आहेत. नक्की उपाय सांगतील. नाही म्हणू नका प्लिज. त्यांना आणण्याची जबाबदारी माझी." राजे त्या चौघांकडे पाहातच राहिले. आत फक्त चौधरीच बोलायचे राहिले होते. पण त्यांचा चेहरा पाहून या सगळ्याला त्यांची संमती आहे हे स्वच्छ दिसत होते. आपापल्या क्षेत्रात एक उंची गाठलेली माणसे ही. राजेंना त्यांची कीव कराविशी वाटली. अशा लोकांच्या हातात आपली संस्था आहे याची खंतही त्यांना वाटली. पण पैसे जाणार नव्हते. राजेंचे हिशेबी मन म्हणू लागले करु देत यांना काय करायचं ते. पण यावेळी आपणही आपल्याला हवं ते करायचंच. "ठीक आहे" राजेंनी अगदी नाईलाज झाल्यासारखा चेहरा केला. "मला तुमचे उपाय मान्य नसतात हे तुम्हाला माहित आहेच. पण आपण संस्थेत लोकशाहीचे तत्त्व पाळतो. यु गो अहेड गोडबोले. पण एका अटीवर. मी ही माझा उपाय करणार. त्या डिटेक्टीव एजेंसीच्या माणसांना सर्वांनी कोऑपरेट करायचं. कबूल?" आता चेहर्‍यावर नाईलाज दाखवण्याची पाळी चौघांवर आली होती. त्यांनाही राजेंच्या निर्णयासमोर मान तुकवावीच लागली.

गोडबोलेंचे गुरु बरोबर पंधरा दिवसांनी येणार होते. राजेंनी मात्र लगेचच डिटेक्टीव एजेंसीला संपर्क करून या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली. जुनी सरकारी खात्यातील ओळख या कामी उपयोगी पडली. संस्थेत गुप्तपणे चौकशी सुरु झाली. बाबुरावची तर कसून चौकशी झाली. बिचारा पार घाबरून गेला होता. राजेंसमोर येऊन गयावया करु लागला होता. "साहेब मी नाही हो काही केलं. प्लिज त्यांना सांगा ना. मला फार त्रास देतात ते." राजेंनी सरळ दुर्लक्ष केलं. काहीही करून या प्रकरणाच्या मूळाशी जायचंच असं त्यांनी ठरवलं होतं. इथे मोठमोठे डिग्री घेतलेले लोक चौकशीतून सुटले नव्हते तर बाबुराव कोण कुठला फडतूस माणुस. किस झाड की पत्ती. राजेंच्या मनात वेगळेच काही सुरु होते. बाबुराव नसला तर दुसरं कोण असेल यामागे? आणि संशोधन फार महत्त्वाचं होतं हे खरंच. पण त्याचा या सगळ्या माणसांच्या मरण्याशी काय संबंध असेल? कि एकदा फाईल मिळाल्यावर आपल्या संस्थेतल्या कुणी त्यावर पुढे कधीही काम करु नये म्हणून काही घातपात झाला असेल? पण त्यावर तर एकटा देसाईच काम करीत होता. नायर आणि भातखंडेचा काय संबंध? आणि तांदळेबाईचं काय? तिचा तर दुरूनही संबंध नाही. अचानक राजे भानावर आले. नयना काहीतरी सांगत होती...."सर गोडबोल्यांचे गुरु आलेत. त्यांना सेमिनार रुममध्ये बसवलंय."

ऑर्फियस (अतुल ठाकुर)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगेच पुढचा भाग दिलात.... Happy खूप खूप आभार.

आता पूर्ण कथा हवी लवकर.... उत्कंठा वाढलीय खूप..

मानवी मन काय विचित्र असते.. जीवावर बेतले की कशावरही विश्वास बसतो... मग कुठली केमिस्ट्री आणि कुठले फिजिक्स... बहुतेकांचा तोल जातो. राजेंसारखे फार थोडे. त्यांना यश लाभो.

दोन्ही भाग एकदम वेगवान आणि उत्कंठावर्धक आहेत... मस्त!!
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहोत.
शुभेच्छा Happy