ढासळला वाडा

Submitted by पाषाणभेद on 29 May, 2020 - 10:20

संदर्भ:- ढासळला वाडा - कविता

ढासळला वाडा

नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे.

असाच एकदा नागपूरला आलो असता या वेळी मात्र मुद्दामच गावी चक्कर मारावी लागली. एका नातेवाईकाच्या मुलीसाठी स्थळ सोधण्याचे काम होते. ते गाव आमच्या मुळ गावाच्या नदीच्या पलीकडे एक किलोमीटर अंतरावर होते. मी नागपूरला आलेलोच होतो. पुढे दोन दिवस गुडफ्रायडे, शनिवार, रविवार अन माझी रजा अशी पाच एक दिवसाची सुट्टी होती. त्याच्या मुलीला पहायला आलेल्या मुलाच्या स्थळाची चौकशीसाठी त्याला गावी जाणे भाग होते. मी त्याच भागातला असल्याने माझी झालीच तर मदतच होईल अशा अर्थाने त्याने मला तिकडे येण्याविषयी त्याने आग्रह धरला होता. मी तयारच होतो. वेळ मिळाला तर गावाकडच्या घराकडे चक्कर मारता येईल असा विचार होताच. त्याचे काम झाल्यावर मी स्वतंत्रपणे नागपूरला येईल असे त्याला सांगितले. सकाळीच आम्ही नागपूर सोडले अन त्याच्या खाजगी कारने गावी निघालो.

गावी आता फार काही राहीले नाही आमचे. एक मोठा वाडा आमच्या कुटूंबाचा होता. लहाणपणी माझे वडील, त्यांचे सख्खे चार भाऊ, तिन बहिणी, त्यांचे दोन चुलत भाऊ त्या वाड्यात राहत असत. वाडा भला थोरला दोन मजली होता. बाजूलाच त्यांचा सावत्र चुलत भाऊ अन त्याचा परिवार राहत होता. झालेच तर नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक असे सारे त्या गावात होते. गावी आमच्या समाजाच्या नावाची गल्लीच होती. मध्यवर्ती असल्याने मुख्य बाजार आमच्याच गल्लीत भरायचा. समाजाची मालकी असलेल्या लाकडी कोरीव काम असलेल्या मोठ्या विठ्ठल मंदीरात लग्न कार्ये होत.

लहाणपणी काय असेल ते असो पण मोठ्या माणसांतली भाऊबंदकी आणि त्यावरून होणारी भांडणे मला समजायची नाही. एकतर माझ्या वडीलांचीही बदली होत असे. त्यामुळे गावी वाड्यावर जाणे अन राहणे हे शालेय सुट्या अन काही कार्य असेल तरच होई. इतर वेळी आम्ही त्यांच्या बदलीच्याच गावी राहत असू. नाही म्हणायला गावातून कोणी आमच्या घरी आले तर ते शेतातले धान्य, भाज्या किंवा तत्सम वस्तू आणत. तेवढाच गावाचा संबंध. बाकी गावाची शेती वडील आणि त्यांच्या भावांच्या एकमेकातल्या भांडणात, चुलत भावांच्या व्यसनाधीनतेत कमी कमी होत गेली. मी, माझे चुलत भाऊ नोकर्‍यांमुळे गावातून बाहेर पडलो होतो. वडिलांची पिढी खपल्यानंतर गावाच्या जमीनीचा वारस कोण किंवा वाडा आहे की पडला याचीही काही खबरबात मला नव्हती. एकप्रकारे गावापासून मी तरी नोकरीमुळे तुटलो होतो. नाही म्हणायला अधून मधून गावाकडून एखादी लग्नपत्रीका किंवा कुणी नातेवाईक गेल्याची बातमी यायची. तेवढाच गावाशी संबंध.

ड्रायव्हरने रस्त्यात चहा पिण्यासाठी गाडी रस्त्यात एका हॉटेलपुढे थांबवली अन मी माझ्या जुन्या विचारांतून बाहेर पडलो. आता यापुढील रस्ता कच्चा असल्याने स्थळ असलेल्या गावी पोहोचायला कमीत कमी एक तास तरी लागेल असे त्याने बोलून दाखवले. आम्ही सार्‍यांनी नाश्टा चहा घेतला अन निघालो. उरलेल्या प्रवासात मला छान झोप लागली. साधारण अकराच्या सुमारास आम्ही नातेवाईकाच्या स्थळाच्या गावी पोहोचलो. चहा पाणी होईपर्यंत बोलण्यातून आमची ओळख निघाली. जुने संदर्भ, धागे जुळले. बरोबरच्या नातेवाईकाने मुलाची चौकशी केली. त्यांचे पुढे एकदोन बैठका घेण्याचे ठरले अन जेवण करण्याची वेळ झाल्याने आम्ही तेथेच जेवणे केली. नातेवाईक तेथे थोडा वेळ अजून थांबणार असल्याने मी सर्वांचा निरोप घेवून मी गावी जाण्यास निघालो.

मधली नदी अन त्यावरील पुल ओलांडला की लगेचच माझ्या गावी पोहोचणे होणार होते. केवळ एखाद किलोमीटरचा प्रश्न होता. परंतु तेवढ्या अंतरासाठीही प्रवासी रिक्शा तेथे हजर होत्या. वास्तविक हा पुल आणि रस्त्याचा हा भाग म्हणजे माझ्या गावाच्या मागचा भाग होता. गावाच्या समोरून जाणारा व तालूक्याला जोडणारा रहदारीचा मुख्य रस्ता बरोबर या पुलाच्या विरूद्ध दिशेला होता. तिकडेच बस स्टॅंड होता. मी जर बसने गावी गेलो असतो तर मला त्या बाजूलाच उतरावे लागले असते. पण एका बस स्थानकाभोवती जशी गर्दी असते तशी वाहन-दुकानांची गर्दी या पुलाकडच्या रस्त्यावर झालेली होती.

मला आठवते, आता असलेला हा पुल पूर्वी नव्हता. नदी काही बारोमास वाहणारी तेव्हाही नव्हती आताही नाही. तेव्हा मात्र पावसाळा अन हिवाळा असे दोन ऋतू तरी नदीला पाणी असायचे हे नक्की. माझ्या चुलत भावंडांबरोबर मी नदीला पाणी असतांना त्यात खेळलोही होतो. मला पोहोता येत नसल्याने काठावर असलेल्या थोड्या पाण्यात मी पडून राही. गावातल्या स्त्रीया नदीवर घुणे धुत. नदीत दगड वगैरे असे काही नव्हते. मऊशार वाळूच वाळू होती. तेव्हा नदीतून वाळू काढण्याचे प्रकार होत नसत. नदीचे सर्व पात्र पावसाळ्यात पाण्याने भरलेले असे. त्या नदीपात्रातच गावाची यात्रा भरत असे. उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही त्या पात्रात पाणी नसल्याने पतंग उडवणे किंवा क्रिकेटचा डाव आदी खेळत असू. आताच्या काळासारखे त्या काळी क्रिकेटचे प्रस्थ नव्हते. गावातल्या सोनार कुटूंबात असलेल्या मुलाकडे क्रिकेटची बॅट होती. त्यामुळे त्याला खेळात घेतले जाई. काहीच खेळ जरी नसला तरी केवळ भटकायला म्हणून आम्ही लहान मुले नदी किंवा आसपास फिरत असू.

मी पुलावरून चालत गेलो. नदीला अर्थातच आताही पाणी नव्हते. आजूबाजूचा बराचसा भाग पूर्वीपेक्षा जास्त रखरखीत, भकास वाटला. रस्त्यातील शेतं, त्यातली घरे, विहीरी यांची पूर्वीची ओळख पुसल्यासारखी झाली. दोन गावाच्या जवळील रस्ता असल्याने आजूबाजूला आता घरे झाली होती. पूर्वी याच भागात शेते किंवा खळे होती. रस्ता सुनसान असायचा. आमच्या गावाला येण्यासाठी नदीतून वर चढावे लागे. त्या चढावाच्या रस्त्यावर बैलगाडी चढतांना बैलांची दमछाक होत असे. आता मी पुलावरून आमच्या गावात शिरलो तेव्हा त्या चढाचे नामोनिशाणदेखील राहीले नव्हते. अगदी सपाट रस्त्याने काहीही श्रम न पडता मी गावात शिरलो होतो. गावात शिरतांना लागायचे ते वडाचे झाड होते तसेच होते. मात्र त्या खाली आता टपर्‍या अन हातगाड्यांनी वेढा दिला होता. माझ्या लहाणपणी तेथे सायकल रिपेअरचे मुसलमान चाचाचे केवळ एकच दुकान होते. मला आठवते, त्या दुकानातून आम्ही भावंडे लहान सायकली तासावर भाड्याने घेत असू. भाड्याने देण्यासाठी असलेल्या इतर मोठ्या सायकली देखील रांगेने तेथे लावलेल्या असत. गावातील गरजू किंवा फिरते विक्रेते अशा सायकली भाड्याने घेत. त्या दुकानाचा बहुदा मालक किंवा वरीष्ठ असलेला तो पांढरी दाढीधारी चाचा एका साधूप्रमाणे डोळे झाकून स्वस्थ बसलेला असे. केवळ पैसे घेणे-देण्याचेच काम तो करी. सायकली दुरूस्त करणारे त्याचे भाऊबंद त्याला ओरडून गिर्‍हाईकांचे किती पैसे घ्यायचे ते सांगत. आता ते दुकान होते त्या पेक्षा छोटे झालेले दिसले. भाड्याने देण्याच्या मोठ्या सायकली दिसल्या नाहीत. मोटरसायकलींच्या जमान्यात आजकाल कोण सायकल अन ती सुद्धा भाड्याची असलेली वापरणार? गल्यावर बसणारे दाढीधारी चाचा काही दिसले नाहीत. अर्थात ते केव्हाच निवर्तले असावे. ते तेथे असण्याची अपेक्षाच चुकीची होती. मध्ये पन्नास एक वर्षांचा कालावधी गेलेला होता. जुन्या ओळखीच्या खुणा बदलल्या असणारच.

वडाच्या झाडाखाली बकाल परिस्थिती झालेली दिसली. तेथली हॉटेले, हातगाड्या, कटिंगची दुकाने आदी सारे सारे इतर गावांच्या सुरूवातीला असते तसे वातावरण तयार करत होते. त्या देखाव्याला एकजिनशीपणा म्हणाल तर होता किंवा नव्हता. नव्हता अशा अर्थाने की तेथेल्या टपर्‍या अन दुकानांमुळे नदीकाठाच्या माझ्या मनात असलेल्या दृष्याला कोठेतरी तडा गेल्याचे मला जाणवले. वडाच्या झाडाच्या आजूबाजूला बरेच मोकळे वातावरण पूर्वी होते. तेथून चारशे पाचशे मीटर अंतरावर एका साधूच्या समाधीचे मंदीर आधी होते त्या पेक्षा मोठे केलेले दिसले. आधीचे मंदीर लाकडी अन छोटेखानी होते. आता ते आधूनिक पद्धतीने विटा-सिमेंटमध्ये बांधलेले होते. मंदीरावरील कळस, कंपाऊंडची भिंत लांबूनही दिसत होती. त्या मंदीराच्या बाजूला एक मोठी विहीर होती. आताही असावी. तिचे पाणी त्या महात्म्याच्या पुण्याईने कधी न आटणारे समजले जाई. पण एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो असता ती विहीर कोरडी पडल्याचे मी पाहीले होते.

तेथून जवळच एका मोकळ्या जागी ग्रामपंचायतीने तयार केलेली व्यायामशाळा तेव्हा होती. तेव्हाची ती बैठी खोली तेथेच होती पण तिची बरीच पडझड झालेली दिसली. तेथे त्या काळी लहान असलेले पिंपळाचे झाड मात्र मोठे झालेले दिसले. थोडे पुढे आल्यानंतर माझ्या मोठ्या चुलत्यांच्या मित्राचे ‘उपाध्ये हॉटेल’ आणि त्यांचे घर असलेली इमारत लागे. त्या इमारतीपासूनच खरे गाव सुरू होत असे. हॉटेलीत पेढे बनवतांना जो कुंदा तयार होत असे तेव्हा माझे चुलते आम्हा लहानांना तेथे नेत असत. आम्ही सारे लहान भावंड डुगडुगणार्‍या टेबल बाकड्यांवर बसून तो गरम कुंदा खात असू. काका तसे हौशी होते. यात्रेत सर्कस पाहण्यास तेच नेत. निरनिराळी खेळणी मागीतली असता त्यांचा नकार आलेला कधी पाहीला नव्हता. फार लवकर गेले बिचारे. आताही ते हॉटेल तेथे होते. रस्ता आता उंच झाल्याने ते हॉटेल असलेली इमारत खुजी दिसत होती. हॉटेलची पाटी जुन्याच पद्धतीने ऑईल पेंटमध्ये रंगवलेली पत्र्याची होती. आधूनिक फ्लेक्सच्या जमान्यात ती अगदीच विजोड वाटत होती. दुकानाची रयाही गेलेली दिसली. माडीवर लोखंडी ग्रील टाकून इमारत विभागली गेलेली दिसली. एका बाजूला लाकडी जीना होताच पण दुसर्‍या बाजूने लोखंडी जीना तयार केलेला दिसला. वाढत्या संसाराबरोबर उपाध्यांच्या वारसांनी इमारतीची वाटणी केल्याचे पाहताक्षणीच समजत होते. हॉटेलात जावून जुनी ओळख वगैरे दाखवावी हा विचार मनात होता. पण का कोण जाणे एकप्रकारे अनोळखी किंवा अलिप्त राहत गावात जे जे पहायला मिळेल ते ते पहावे असा विचार बळकत होत गेला आणि मी तेथे न थांबता पुढे निघालो.

पुढे एक शाळेची इमारत होती. तेथे बाजूलाच बैठ्या खोलीत त्या काळी दहा बारा विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय संस्थेने केलेली होती. आता त्या शाळेच्या इमारतीच्या वर एक मजला चढवून त्यावर पत्रे टाकलेले दिसले. खाली जुने दगडी बांधकाम आणि वरचा मजला वीटकामातला अशी ती इमारत डोळ्यांना अजिबात चांगली दिसत नव्हती. त्यातच वीटकामाला साधे प्लास्टरही केलेले नव्हते. शाळेसमोर मोठे मातीचे पटांगण होते त्या काळी. लहाणपणी तेथे खो-खो चे खांब रोवलेले आणि कबड्डी साठीचे मातीचे रेखीव मैदान होते. आता तेथे आजूबाजूला घरे आली. पटांगणात तर वाळू, वाहनतळ समजून पार्क केलेल्या गाड्या अन छोटे टेंपो यांची गर्दी झालेली होती. रस्त्याच्या बाजूने चार पाच दुकानांसाठी गाळे काढून ते भाड्याने देऊन संस्थेने कायमस्परूपी उत्पन्नाची सोय केलेली दिसली. एकुणच समाजसंस्था व्यावसायीक झाल्याचे ते द्योतक होते. वास्तवीक आहे तीच इमारत छान बांधता आली असती. मैदानाची देखभाल करून राखून ठेवता आले असते. संस्थेने सरकारी अनुदान कल्पकतेने वापरले पाहीजे होते.

त्याच्याच पुढे जिल्हा परिषदेने बांधलेली वर्ग एक ते चारची कौलारू इमारत आहे तशीच होती. आताचा दिसणारा बदल म्हणजे शाळेच्या आजूबाजूला बांधलेले दगडी कंपाऊंड. माझे चुलत भावंड याच शाळेत शिकून मोठे झाले होते. एक दोन भावंडांना मी मोठा म्हणून त्यांना शाळेत सोडायला देखील गेलेलो होतो. का कोण जाणे पण मला ती शाळा कधीच आवडलेली नव्हती. त्या भावंडांना शेण गोळा करून शाळा सारवायला देखील लागे. बदलीच्या गावी माझी शाळा या शाळेपेक्षा कितीतरी पटींनी चांगली होती. लहाणपणी शाळेची तुलना करायचो तशी तुलना आताही माझ्या डोक्यात होत होती.

डाव्या हाताला वळून आता मी गावाच्या मुख्य भागाकडे वळलो. सुरूवातीलाच होत्या त्याच जागी ग्रामपंचायतीची इमारत आता सिमेंट मध्ये बांधलेली दिसली. इमारतीच्या वरतीच तलाठी कार्यालायाचादेखील फलक लावलेला दिसला. माणसांच्या गर्दीने ती इमारत व्यापलेली होती. आजूबाजूला एक दोन हॉटेल आणि किराणा दुकान होती. झेरॉक्स काढून मिळेल अशा अर्थाचे पिवळे बोर्ड उन्हात नजरेला त्रास देत होते. एका अर्थाने माझे हे गाव आजूबाजूच्या पंचक्रोषीत मोठे अन टुमदार होते. नदीच्या पाण्याने आजूबाजूला बागायती होती. गावाच्या ग्रामपंचायतीला आजूबाजूची चार एक खेडीही जोडलेली होती. शेतीमाल, भाजीपाला अन अन्यधान्य यांनी शनिवारी भरणारा आठवडी बाजार गजबजून जाई.

आठवडे बाजाराचे मैदान सोडून मी सरळ निघालो अन आमचा वाडा असणार्‍या गल्लीत शिरलो. गल्ली खूपच बदलेली दिसली. सुरूवातीच्या दोन घरांमध्ये असलेले शिंपीकामाचे दुकान आता तेथे नव्हते. त्या काळी हे दुकान खूपच उंचावर होते. लाकडी पायर्‍या चढून आत शिरावे लागे. माझ्या आजोबांच्या काळात मला एकदा तेथूनच शाळेचा गणवेश शिवला होता. आता केवळ ते दुकानच नव्हे तर सगळी गल्लीच बुटकी वाटायला लागलेली होती. खूप दिवसांनंतर एखादी वस्तू पाहील्यावर ओळख पटेनाशी होते तसे माझे झाले होते. त्या घराशेजारीच आमच्या एका नातेवाईकाचे घर होते. त्या काळी ते नातेवाईक गावचे मोठे प्रस्थ होते. शेतजमीन भरपूर असल्याने त्यांच्या लाकडी इमारतीच्या दर्शनी भागात धान्याने भरलेल्या पोत्यांच्या थप्या लागत. इमारत देखील गेरू अन चुन्याच्या रंगाने रंगवलेली दिसे. आता आहे त्या इमारतीला गेल्या कित्येक दिवसांत रंग तर सोडाच पण तेथे झाडलेले देखील जाणवत नव्हते. पुर्वीची लाकडी दारे जावून आता तेथे लोखंडी दरवाजे दिसत होते. त्या सलग चार एक खोल्या होत्या. कधी काळी मी त्या खोल्यांमध्ये गेलोही होतो. आता तेथे जाण्याचे काहीच कारण नव्हते.

लांबून पाहीले असता आमची गल्ली तिरपी तिरपी पुढे गेल्याचे तुम्हाला आढळेल. पूर्वी गाव वसेल तसे वसत असे. ज्याची जशी जागा आणि ऐपत तसे बांधकाम ज्याने त्याने केलेले असे. आताही पूर्वी होते तेच घरे, वाडे कुणी सांभाळले होते किंवा पडले, लक्ष न देता आले म्हणून बख्खळ सोडले होते. पूर्वी होत्या त्या घरांसमोरील सांडपाण्याच्या गटारी होत्या तशाच होत्या. फक्त त्या वेळचे मातीचे रस्ते जाऊन आता सिमेंटचे रस्ते आलेले होते. त्या रस्त्यांच्या भर टाकण्यामुळे आहे ती घरे रस्त्याच्या खाली गेलेली होती. आधी घरांत शिरतेवेळी कमीतकमी तिन चार पायर्‍या चढाव्या लागत. आता पायर्‍या चढणे दुरच उलट काही घरात शिरण्यासाठी खोल पायर्‍या केलेल्या आढळल्या. एका मोकळ्या जागी पाण्यासाठी हातपंप त्या वेळी होता. आता तेथे हातपंप काढून जलपरी असलेली मोटर लावून ते पाणी नळाद्वारे पुढे नेलेले दिसले. बहूदा नळाच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीने तेथूनच केलेली असावी. पुढे आलो असता आमचा पडका वाडा दिसला. वाड्याची सद्यस्थिती पाहून नकळत डोळ्यात आसवे दाटून आली.

एकेकाळी याच वाड्यात आम्ही राहीलो, खेळलो होतो. वर्षाचा दिवाळीसारखा सण सारे काका चुलते, भावंड एकत्र साजरे करत असू तेव्हा गल्लीत आमच्यासारखी शोभा कुणाचीच नसे. मोठ्या काकांना फटाके फोडण्याचा मोठा शोक. त्या काळीही ते हजार हजार रुपयांचे नव्या फॅशनचे फटाके निवडून निवडून आणत. आमच्या वाड्याच्या एका तुळईला दोर्‍याचे एक टोक अन थोडे पुढे असलेल्या रस्त्यावरील विजेच्या खांबाला दुसरे टोक बांधून त्यावर आगगाडी असलेला फटाक्याचा प्रकार ते लावत. ती आगगाडी असलेला फटाका या टोकापासून सुरू होवून समोरील विजेच्या खांबाला धडकून पुन्हा आमच्या वाड्यापर्यंत आला की आम्ही लहानगे जल्लोष करत असू. संपुर्ण गल्ली फटाक्याचा हा प्रकार पाहण्यासाठी आमच्या वाड्यापुढे जमे. त्यामुळे चुलते हा प्रकार सर्वात शेवटी पेटवत. त्या आधी आम्ही लहान मुले लवंगी आणि लक्ष्मी फटाके फोडत असू. एके दिवाळीला चुलत्यांनी फुलझाड असणारा नविन प्रकार आणला होता. एका नळकांड्यच्या आकाराचा तो फटाका आधी फुलझाड म्हणून पेटे आणि ते फुलझाड संपले की त्याचा फटाक्यासारखा स्फोट होई. त्या ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी तसले एक दोन फुलझाड व्यवस्थित पेटले अन फुटले. चौथा फटाक्याचे फुलझाडही पेटले पण फुलझाड संपत आले तेव्हा त्या फटाक्याचे नळकांडे आडवे झाले आणि त्याचा पुढचा प्रकार असणारा फटाका जोरात फुटला. तो जसा फुटला त्याच्या ठिणग्या समोरील घराच्या व्हरंड्यात खेळणार्‍या लहान मुलीच्या नव्या फ्रॉकला भिडल्या. फ्रॉकने पेट घेतला. आम्ही लहान तर घाबरलोच. लगोलग इतर चुलते, त्या मुलीचे पालक पळत गेले आणि त्यांनी ती आग विझवली. त्या मुलीला काही इजा झाली नव्हती म्हणून अगदी थोडक्यात निभावले. त्या वेळेपासून काकांनी असले नव्या प्रकाराचे फटाके आणणे बंद केले.

आता त्या वाड्यात दिवाळी साजरी करणारे कुणीच उरले नसल्याचे माझ्या लक्षात आले. उमाळा येवून तेथेच रडे फुटते काय असा भास मला झाला. मी स्वत:ला सावरले. काळ किती निष्ठूर असतो याची प्रचीती मला येत होती. तिन पिढ्या आनंदाने नांदवणारा वाडा आता पोरका झाला होता. त्याची देखभालदेखील करणारा आता कुणीच उरला नव्हता. चुलत भावडांपैकी आता कुणीही त्या वाड्यात राहत नव्हते. प्रपंच चालवण्यासाठी शेतावरील घरात राहणे त्यांना भाग होते. भावकीच्या वाटणीत माझ्या वडीलांच्या वाट्याला काही न आल्याने, पर्यायाने मी तेथला कागदोपत्री वारस नसल्याने तो एवढा मोठा वाडा मला असून नसल्यासारखा झाला होता. वाड्याचा वरचा मजला कधीच पडलेला असावा. होते ते सागवान लुटल्या गेलेले दिसले. जर होता तोच वाड्याचा साठा निट उतरवला असता तर कुणी त्या लाकडाला खरेदीदारही भेटला असता. परंतु भाऊबंदकी फार वाईट. मला मिळाले नाही तरी चालेल पण इतरांना मिळू देणार नाही ही वृत्ती त्या भरलेल्या वाड्याच्या नाशाला कारणीभूत ठरली होती. वाड्याचा दर्शनी भाग थोडाफार शाबूत होता. मुख्य दरवाजाला कुलूप जरी लावलेले दिसत असले तरी बाजूच्या भिंती पडक्या होत्या. मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या खोलीला देखील कुलूप होते. परंतु त्या खोलीत चुलतभावांचा वावर असावा. बाहेर एक सायकल उभी होती. झालेच तर झोपण्यासाठीची एक खाटही तेथे होती. वाड्याच्या आतमध्ये मात्र बरीच पडकी माती, घराचे काही भाग तसेच एक बाभळीचे झाडही होते. कधी काळी माझ्या आजोबा आजीने वाड्यासाठी कष्टाने उचलेले दगड भिंतीतून निखळले होते. काही दगडांचीही उनपाऊस खाऊन माती झाली होती. होती ती लाकडे कुजली होती. जळणासाठी चोरून नेण्याच्याही लायकीची ती उरली नव्हती. कधी काळी लग्न कार्यात शे-दोनशे पाने उठवणारा वाडा आज सुना झालेला होता. कित्येक वेळा शेतातली गडी माणसे रात्रीच्या वेळी आधार म्हणून वाड्यात मुक्कामाला राहीली होती त्याच वाड्यात आता उंदीर घूस यांनी घरे केली होती. वाड्याचा साठाच तुटका झाला होता. ज्या कोनाड्यांमध्ये दिवाळीच्या पणत्या तेवल्या होत्या तेथे काजळीचा अंधार पसरला होता. एक भग्न वास्तू पाहून मन विषण्ण होत होते. तिकडे न पाहताच तेथून निघून जाण्याचे मन करत होते. डोळ्यात आसवे साठलेलीच होती. ती खळ्ळकन गालावर कधी आली ते मलाच समजले नाही. कमीतकमी एक विधवा आत्या तरी तेथे असावी अशी माझी अपेक्षा फोल ठरली होती. एकटी बाईमाणूस या पडक्या पसार्‍याला कोठे पुरे पडणार होती? ती देखील आता या वयात या वाड्यासारखीच विदिर्ण, उध्वस्त झाली असावी. तो वाडा म्हणजे एक सांधता पुल होता. जुन्या-नव्या पिढीला सांधणारा. तो तर कोसळलाच होता. आमच्यासारखी नोकरी करणारी भावंडे पांगली गेली होती. आपुलकीचे वस्त्र असणारे आठवणींचे धागे उसवले होते. वेळीच सावरायला कुणीच कसे पुढे आले नाही याची खंत मनात होती. वाडा लयाला जाण्यामागे प्रत्येकाचे संसार- पाश, भांडण, कमाईचे स्त्रोत कमी होत जाणे, शारिरिक दुखणी, त्यापायी होणारा खर्च, एकमेकांतला दुरावा आदी कारणे निश्चितच कारणीभूत होती. आता कितीही ठरवले तरी तो वाडा उभा राहणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे नव्या नातवंडांच्या पिढीला ते आवश्यकही नव्हते. जे जुन्या पानावर आहे तेच पुढल्या पानावर चालू ठेवणे हेच सध्याच्या घडीला हितकारक ठरू पाहत होते. उगाचच फुकाचा बडेजाव करण्यात काही अर्थ नव्हता. तरी पण एखाद्या जीवंत माणसाप्रमाणेच तो वाडा आता खंगून खंगून कणाकणाने मरत होता. वास्तूमध्येही जीव असतो असे म्हणतात. खरेच असावे ते. कारण वाड्याच्या कण्हणे जणू मला ऐकू येत होते.

त्या वाड्यासमोर मी किती वेळ उभा होतो याचे मला भान नव्हते. एवढ्या उन्हात दुपारच्या वेळी कुणी बाहेर नव्हते म्हणून बरे झाले. मलाही माझी ओळख करवून द्यायची इच्छा नव्हती. मनाचे पाश तोडून मी तेथून पुढे निघालो. थोडे दुरवर असलेल्या चुलत भावाच्या घराकडे नजर टाकली. तो तेथेच राहत असावा अन त्याचे एकूण बरे चालले असावे. घराबाहेर एक मोटरसायकल होती. एक पाळणाही हालत असल्याचा आवाज येत होता. आजूबाजूची घरेही एका वेगळ्याच तंद्रीत असल्यासारखी ढेपाळली होती. एक दोन घरांना नवा रंग दिला जरी असला तरी घरांची ठेवण काही वर्षे मागची होती. कुणी आहे त्याच खोलीचे दोन भाग केले होते. कुणाचा आहे तो जीना पाडून दुसरा लोखंडी जीना तयार केला होता. काही घरे पडीक झालेली होती तर ज्यांची ऐपत होती आणि गरज होती त्यांनी जुनी घरे पाडून नवी केलेली होती.

मनात विचारांची जंत्री चालू होती. आठवणींचे कढ बाहेर पडत होते. येथे आलो नसतो ते बरे झाले असते असे एक मन सांगत होते. मला थोडे थकल्यासारखे झाले होते. चुलत भावाच्या घरी जाऊन ओळख काढून पाणी तरी प्यावे असे वाटत होते. पण न जाणो ते घर त्याने भाड्याने दिले असेल अन तो स्वत: शेतात राहत असेल असाही विचार माझ्या मनात आला. मी थोडा मानसिकदृष्ट्या स्थिरावलो आणि त्या शांत गल्लीच्या दुसर्‍या टोकाने मी बाहेर पडलो.

आता त्या लहानशा गावात फिरण्यात काही अर्थ नव्हता. एकतर ऐन एप्रिल महिन्यातील उन्हाळ्याचे दुपारचे उन आता चांगलेच जाणवू लागलेले होते. त्यात मी किमान अडीच एक किलोमीटर तरी चाललो असेल. मुख्य म्हणजे मनानेही मी खचलो होतो. कोठेतरी थांबण्यापेक्षा सरळ बसस्टॅंडकडे जावे असा विचार केला. मुख्य बाजारपेठेत दुकानांची गर्दी होती. पुढे दुकान आणि मागे घर अशी प्रत्येक खेड्यात असते तशी रचना येथेही होती. शहरात असतात तसलेच फ्लेक्सवर छापलेले दुकानांचे बोर्ड वर लावलेले होते. तेथेच एक सहकारी आणि एक राष्ट्रीयकृत बॅंकही होती. एखाद्या बॅंकेत जावून विश्रांती घेण्याचा मोह मी टाळला. तेथून बसस्टॅंड जवळच होता. बसस्टॅंडवर पोहोचताच एका फळविक्रेत्याकडून नारळपाणी प्यायला घेतले. थोडे बरे वाटून अंगात हुशारी आली. नागपूरला परत जाण्यासाठी तालूक्याच्या गावाला जाणार्‍या बसची वाट पाहत बसस्टॅंडवर एका बाकावर बसलो.

एका अर्थाने माझे एक दुखरे स्वप्न संपले होते.

- पाषाणभेद
२९/०५/२०२०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन. महाराष्ट्रातली बहुतेक सर्वच गावे चाळीस वर्षांपूर्वी जी निद्रावस्थेत गेलीत ती अजूनही उठलेली नाहीत.