पागेचे दिवस

Submitted by ज्येष्ठागौरी on 29 May, 2020 - 09:43

..........पागेचे दिवस...........
मराठीतील प्रसिद्ध लेखक कै. श्री.ज जोशी यांनी "हुजूरपागेतल्या मुली" हा संपूर्ण लेखच आम्हा हुजूरपागेच्या सुशील कन्यांना अर्पण केला आहे..ते म्हणतात "आमच्या घरासमोर हुजूरपागेच्या मागच्या बाजूची अुंचच अुंच भिंत होती, अेखाद्या किल्ल्याच्या तटासारखी ती गूढ भासे. आमचा रस्ता पुरातन जीर्णशीर्ण घरांचा पण सकाळी दहा साडेदहा वाजता या रस्त्यावरून हुजूरपागेकडे जाणाऱ्या अैटबाज मुलींचे घोळके जायला लागले की त्या परिसरात वसंत ऋतू अवतरे.मी त्या परिसरात वाढलो पण मला ती नेहमी अज्ञात धूसर राहिली.कोणत्याही पुरूषाला आत जायला बंदी होती. पुराणात कामरुप देशाचं वर्णन आहे तशीच हुजूरपागा होती.पुरुषाची सावलीदेखील न चालणारी.अेखाद्या अुंच बुरुजावर कुणी राक्षसानं लावण्यवती राजकन्येला बंदिस्त करुन ठेवावं त्याप्रमाणे ती मला वाटे."
हा स्वातंत्र्यपूर्व काळ असावा पण त्यांनी वर्णन केलेल्या आणि पंच्याहत्तर ते चौऱ्यांएेशी या काळामधे असलेल्या हुजूरपागेच्या बाह्यरुपात काही फरक नव्हता. श्रीजंनी खरंतर बाह्यरुपाबद्दल लिहिलंय पण अंतरंग फारच धमाल आणि कमाल होते.श्रीजंनी केलेलं वर्णन आपलं कसं काय असावं?अैटबाज आणि आपण?आहे तो Uniform अतिशय बावळट आहे असं आमचं मत होतं कारण पांढरा ब्लाअुज तोही निळ्या स्कर्टच्या वर, निळा स्कर्टही खालच्य बाजूनं शाअी पुसायच्या कामी आलेला , काळ्या रिबीनीनं करकचून वर बांधलेल्या दोन घट्ट वेण्या त्यात भर म्हणून की काय बुटाची सक्ती नसल्यानं पायात चपला असा अवतार असायचा.
खरं तर हा गणवेश बदला अशी सतत मागणी आम्ही करायचो पण शाळा तसूभरसुद्धा हलायची नाही. मग तह म्हणून ब्लाअुज In करायला परवानगी देण्यात यावी अिथपर्यंत आम्ही खाली यायचो पण तरीही शाळा बधायची नाही. तोच युनिफॉर्म तसूभरही बदल न होता दहावीपर्यंत वापरला. आणि आता त्याच uniform मधले फोटो गोड वाटताहेत!असो. पण नंतर आयुष्यात कधीच निळा आणि पांढरा असं combination वापरलं नाही.शाळेच्या शेवटच्या दिवशी तो skirt आअीच्या ताब्यात दिला आणि वर "त्याच्या कृपया पिशव्या शिवू नकोस "अशी धमकीही दिली कारण तिला त्या घट्टमुट्ट आणि मळखाअु कापडाच्या पिशव्या शिवण्यात फार अानंद मिळायचा..
आणि अशा अवतारातल्या आपल्याला लोक अैटबाज समजायचे?Then it must be the "Attitude" Brand हुजूरपागा !अजूनही नुसत्या नजरेनी आपण पागेचं product अोळखू शकतो.
हुजूरपागेत शिकतेय म्हणल्यावर बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर अेक वेगळेच भाव अुमटायचे पण घरच्यांना मात्र या आगाअु मुलीला योग्य ठिकाणी पाठवलीये याची खात्री होतीच.
पेठांमधली मुलं नूमवि मध्ये आणि मुली पागेत ही सरळ विभागणी होती. भावांच्या मित्रांच्या बहिणीही पागेतल्याच असायच्या त्यामुळे ज्यादा शहाण्या मुलींनाच पागेत घेतात शिवाय पागा म्हणजे घोड्या बांधायचं ठिकाण याबद्दल सर्व भाअु लोकांचं अेकमत होतंच.
पण नूमवि आणि पागा शेजारीशेजारी असल्यानं मुद्दाम शाळांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवलेल्या होत्या........ संभाव्य अपघात टाळण्यासाठी..
ही गोष्ट खरीच आहे की कोणत्याही पुरुषाला आत यायला बंदी होती.staff मध्ये चित्रकलेचे जोशीसर,PT चे मुंगसे सर,नाटक बसवायला येणारे मालेगावकर सर,फार लवकर गेलेले भवाळकर सर, शुभ्र स्टार्चच्या कपड्यातला दशरथ,आणि Basketball शिकवायला येणारा अमृत पुरंदरे.अेवढीच काय ती पुरुषवस्ती!त्यावेळी वैशाली कट्टा परिसरात विनोद पसरला होता की पागेतल्या मुली अमृत पुरंदरेला "अमृतसर" म्हणतात.
बाकी सर्व कारभार हा बायकांच्या हातात आणि तोही सुचारु पद्धतीने चाललेला...........
देठेबाअी दाणीबाअी गुंडीबाअी अशी आडनावांपुढे त्यांच्या पदनामांची परंपरा होतीच तर कुठे शपा, शोपा, आजोबा अशा shortforms ची चलती होती ,मोठ्या बापट, छोट्या बापट अशी चढती अुतरती भाजणीही होती या सर्व जणी मिळून पुण्यातली अेक नंबरची शाळा अुत्तम चालवायच्या कुठल्याही पुरुषी मदतीशिवाय!हात न चालवता केवळ डोळ्यांच्या मोठेपणावर आणि जिभेच्या ताकदीवर आणि "शहाण्याला शब्दाचा मार"या अुक्तीवर!
मुलींचं वर्तन चांगलं असावं म्हणून अेक वर्तनपत्रिका नावाचा महाखतरनाक प्रकार होता. वर्तनात काही चुकलं अुदा अुशीर होणे ,वेणी वर बांधलेली नसणे वह्या पुस्तकं हरवणे, न आणणे या सारख्या गुन्ह्यांची तारीखवार नोंद व्हायची .तीन तारखा पडल्या की अेक मार्क वजा व्हायचा , पण ती वर्तनपत्रिकाच मी अितक्या वेळेला हरवून घरच्यांना शोधायला लावली होती की आअीनं आता मीच त्याच्यावर तारीख घालीन अशी धमकीच दिली होती.
असंच काहीसं तर्कहीन वर्तन नळाला हात लावून पाणी प्यायचं आणि अोंजळीतून आणून अेका दगडावर टाकण्यात होतं.छोट्या सुट्टीला गच्चीपाण्याची सुट्टी म्हणण्यात होतं.
मुलींना अभ्यास ,खेळ ,कला- कौशल्यात तरबेज करायचा विडाच शाळेनी अुचलला होता. आजही शुदधलेखनातली चूक दाताखालच्या खड्यासारखी खटकते, spelling चुकत नाही ,व्याकरण बिघडत नाही..हे अुपकार विसरण्यापलीकडचे.
प्रत्येक खेळ खेळावाच लागायचा .शिवणकाम करावंच लागायचं.नाडीच्या झबल्यापासून ते आपल्या मापाच्या ब्लाअुजपर्यंत!बरं ते माप सर्वांना समान ....त्या मापानं बेतून शिवलेल्या नमुन्यात आमच्यासारख्या सुदृढ मुलींचे श्वास कोंडल्यागत व्हायचं.शिवणकामाच्या पाटणकरबाअी शिवण न येणाऱ्यांचा भलताच पाणअुतारा करायच्या.पण हळुहळू शिवण जमलं.कार्यानुभव करता करता शाळेच्या गच्चीवर कुंडी भरण्यापासून ते टोमॅटो येअीपर्यंतचा विकास डोळ्यांनी पाहिला आणि हातांनी अनुभवला आणि कामाचा कंटाळा येअुनही मनात हिरवा कोपरा जागवला.गर्ल्स गाईडच्या कधी मनापासून तर कधी कंटाळून केलेल्या खऱ्या कमाअीने, डोळे अुघडायचं कामही केलं.Homescience च्या गोडबोले बाअींच्या हाताखाली कोबीची पचडी शिकून बऱ्याच मुली GKD गृहकृत्यदक्ष झाल्या.
काही झालं तरी ती वर्षं पुसली जाणार नाहीत.अभ्यासात अतिशय हुशार मुली, बोर्डात येणाऱ्या मुली, काठावर पास होणाऱ्या,खेळाडू, कलाकार, अेकमेकींच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या,, वेगवेगळ्या जातीधर्माच्या , वातावरणातल्या लेकी अिथं मनसोक्त वावरायच्या अगदी बिनधोक.अिथंच कौतुकं झाली, अिथंच बोलणी खाल्ली.वाचनाची आवड, शास्त्रीय दृष्टिकोन,सर्व कलांची तोंडओळख अिथंच तर झाली.अिथल्या प्रत्येक वास्तूशी मनातून जोडल्या गेलो.प्रत्येक कानाकोपऱ्यात सुखावणाऱ्या आठवणी आहेत.
शाळेबाहेरची चिंचा विकणारी आजी आणि काळ्या पांढऱ्या गोळ्या आणि Bobby मिळणारं दुकान,शनिवार सकाळच्या शाळेसाठीचा ग्रीन बेकरीचा cream roll आणि लता मंगेशकरांचं" मोगरा फुलला", प्ले शेड, तासाचे टोल, भांडणं, रडारडी,खोखोच्या ग्राअुंडवर पडणारा वेडा पाअुस,हातावरच्या jolly मुळे घरीदारी खाल्लेली बोलणी, प्रयोगशाळेत येणारे चमत्कारिक वास आणि सांगाडे आणि तिथून येतानाचा घसरगुंडीचा जिना,लेझीम,गॅदरिंगची नाटकं,अमृतमहोत्सव,अिंदिरा संचयिका ,off तास , बालिकादर्श, library मधली गूढ शांतता , काळ्यावरची पांढरी अक्षरं..folk Dance, वाऱ्याबरोबर येणारे गाण्याचे सूर , मोठी लाकडी कंपासपेटी,गणू शिंदेचं icecream,अेकबोटे टायपिंग,पृथ्वीचा गोल,बुचाची फुलं अन् अशोकाच्या बिया,विनाकारण मैलभर हसणं आणि डोळ्यातलं पाणी ,गरवारे हॉलसमोरचं जंगलजिम,व्हर्नियर प्रमापी आणि स्क्रू प्रमापी ,शाळेच्या मागच्या बाजूची नेपाळ्यांची वस्ती, मधल्या सुट्टीच्या आधी अुद्दीपित होणाऱ्या रुचीकलिका . . . पावसाळ्यात तिघीत मिळून अेक रेनकोट डोक्यावर घेअुन मुद्दाम भिजत जाणं, सायकलीवरुन पाय टेकवून गप्पा मारणं या सगळ्यावर मालकी हक्क होता आणि हे सगळं किती खरं होतं,पहिल्या पावसासारखं स्वच्छ आणि सुगंधी !
परंपरा,वास्तू ,वस्तू ,शिक्षण, कला यापलीकडे अिथं काहीतरी होतं.साधी आयुष्यं. दहा मिनिटात शाळेत पोहोचता येणारी घरं.आणि त्यातून झालेल्या मैत्रिणी . कुणीसं म्हणलं आहे तशी आमच्या आणि आयुष्याच्या मधे शाळा कधीच आली नाही, खरं तर पागेनी अेक पूल बांधला आम्हाला आणि आयुष्याला जोडणारा, तिथं तोंड द्यायला अुपयुक्त अशी कौशल्यं आणि निर्व्याज मैत्रीचे हात हातात देअुन निरोप दिला.
कालांतरानी रस्ते अलग झाले पण सामाजिक आणि आर्थिक स्तरांपलीकडचं मैत्र घट्ट घट्ट टिकून राहिलं.हे सख्य कित्येक नात्यांपेक्षा जास्त जवळचं आहे कारण ते खरं आहे.आता प्रत्येकीच्या आयुष्यातल्या पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे.काहींच्या डोक्यावरचे आशीर्वाद देणारे हातही विरले आहेत. पण हे कोवळे क्षण परत अेकदा कानात वारं शिरलेल्या वासरागत हुंदडणाऱ्या बिनधास्त विश्वात घेअुन जातात जिथे निरागस भावनांनी आपल्याला जपलं.आयुष्यभर पुरेल अेवढं पांथेय पागेनी दिलं.
खरंतर प्रत्येकाच्या मनात "पागेचे दिवस" रुणझुणत असतात.पागेच्या अैवजी नाव वेगळं असेल कदाचित पण तिथं असतं अेक खोडकर शैशव आणि खट्याळ तारुण्य.पण शाळेशी नातं तेच अनाघात आणि आशयही तोच.ते दिवस म्हणजे अेखाद्या जुन्या दागिन्यांच्या डब्यात असलेल्या चुकार बकुळफुलासारखे.फुलाचा सुगंध दागिन्यांना आणि दागिन्यांचा दिमाखदार सहवास फुलाला असणारे..पागेचे दिवस..
श्रीजंनी त्यांच्या लेखाचा शेवट करताना म्हणलं आहे "सगळ्या शाळांमधल्या मुली सारख्या असल्या तरी माझ्या मनातली हुजूरपागा वेगळीच आहे. अेखादं सोनचाफ्याचं फूल बाटलीत घालून हवाबंद करावं त्याप्रमाणे माझ्या मनानं हुजूरपागा जपलेली आहे.तिला वार्धक्य येणार नाही.ती नेहमी हवीहवीशी राहील.
ज्येष्ठागौरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स्स हाच लेख मी तुमच्या ब्लॉगवर जाउन वाचला परवा. दशरथ, बूचाची फुले, गच्चीपाण्याची सुट्टी, चण्यामण्या बोर, चिंचा विकणार्‍या आज्या, गणू शिंदे. गुंडी बाई, दाणी बाई.
ओह माय गॉड्ड्ड!! यु नेलड इट.
पण तुम्ही महादू माळी विसरलात बहुतेक. त्याच्यापाशी झाडांना पाणी घालण्याकरता लावणारा लकडा, मधोमध ठेवलेले ढब्बे बेडूक Happy
.
आहाहा!!! क्या दिन थे वोह यार!!! काय बहारीचे दिवस होते. माझ्या मैत्रिणीला हा लेख पाठवला आहे. ती आणि मी शाळेच्या मधल्या सुट्टीत, इतक्या चकरा मारत गप्पा मारायचो.

खूप मस्त लिहीलयत.

खूप मस्त वाटलं वाचून....मी पण हुजुरपागेची....भयंकर नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.....भलमोठ शांत ग्रंथालय...तिथल्या librarian Bai ...कायम दोन वेण्या घालायच्या त्या.... वर्तनपत्रिका....सोनटक्के बाई... दाणी बाई...सोहनी बाई...
महादू काका....दररोज शाळा सुटायच्या वेळेस बिल्वाच्या आवाजातल वंदेमातरम.....
सुंदर दिवस....

एकदा ड्रिल ची प्रॅक्टिस करून बाहेर पडताना आम्ही काही मैत्रिणी प्ले ग्राउंड वरून कारण नसताना ग्रंथालयाच्या शेजारच्या जिन्याने वर चढलो...आणि काळे बाईंच्या ऑफिसच्या समोरच्या जिन्याने खाली उतरलो...शनिवार होता बहुतेक...११ वी १२वी चे वर्ग चालू आहेत हे डोक्यातच नाही आलं..आमच्या जोरजोरात गप्पा आणि हसणं चालू होत...
काळे बाईंनी अशी परेड घेतली आमची की बस रे बस... वर्तनपत्रिका पण जप्त केल्या....दुसऱ्या दिवशी वर्गाच्या बाइंचा पण ओरडा बसला आणि घरी पण....
वर्तनपत्रिका दिल्या परत पण पुढे होणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या एकूण मार्कांतून ५ गुण वजा करावेत असा शेरा लिहून...

तुम्ही म्हंटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या मर्मबंधात "शाळा आणि सवंगडी "अशी ठेव असतेच असते !
फर सुंदर शब्दांकित केलीत तुम्ही ती.
रच्याक :
आमच्या वाड्यातली एक मैत्रीण हुजूरपागेत होती. तिला आम्ही "पागेतली शिश्ठ मुलगी" म्हणायचो.. अशीच काहिशी प्रतिमा होती समकालीन मुलांमधे!

मी पण हुजुरपागेची.. खूप मस्त वाटलं वाचून.... एकदम जुन्या दिवसांमधे नेऊन ठेवलतं....

@ अश्विनी : किती सालची बॅच ?? मी ९९ ची पास आऊट आहे..

मी खूप आधीची गं, १९८४ :)पण तुम्हालाही आपला वाटला म्हणजे काही गोष्टी कधीही बदलू नयेत असं वाटणाऱ्या गोष्टींमध्ये शाळा आहे हे निश्चित!