काही शब्द हे आपल्या डोक्यात default setting मधे कोरलेले असतात, नाही का ? म्हणजे बघा ना...प्रेमळ आई, शूर सैनिक , रसिक प्रेक्षक.....तसेच हे दोन शब्द -'स्वातंत्र्यवीर सावरकर' ! आणि फक्त आपल्या मनातच नाही तर आपल्या फोन मधे पण...विश्वास नाही बसत ? मग प्रत्यक्ष अनुभव घ्या...मराठी कीबोर्ड वर फक्त 'स्वातंत्र्यवीर' हा शब्द टाईप करा...खाली suggested text मधे 'सावरकर' हा शब्द दिसेल...by default !!आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३७ वी जयंती! त्या वीरपुरुषाबद्दल मी काही लिहावं इतकी लायकी नाहीये माझी.... सलग दोन महिने स्वतःच्या घरात, आप्तस्वकीयांबरोबर सर्व सुखसोयी उपभोगत असताना सुद्धा 'कधी संपणार हा लॉक डाऊन?' असा विचार करणारी मी ..... वर्षानुवर्षे अंदमानच्या त्या काळकोठरीत, इंग्रजांचे अमानवी अत्याचार सहन करत असतानाही आपलं देशप्रेम जपणाऱ्या त्या देवतुल्य व्यक्तिमत्वाबद्दल काही लिहायची पात्रता माझ्या अंगी नाही. पण जेव्हा जेव्हा 'वीर सावरकर' हे नाव ऐकते तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांची ती अंदमान मधे बघितलेली काळकोठडी नजरेसमोर येते आणि आणि स्वतःच्या खुजेपणाची जाणीव बळावते. प्रत्येक देशभक्तानी आयुष्यात एकदा तरी त्या पुण्यस्थळाचं दर्शन घ्यावं - असं माझं प्रामाणिक मत आहे.
२०१५ साली आम्ही अंदमान ला गेलो होतो. पहिल्याच दिवशी cellular jail बघायला गेलो. हो, कारण अंदमान मधल्या 'प्रेक्षणीय' स्थळांमधे या cellular jail चं स्थान सगळ्यात पहिलं आहे. जे स्थान प्रत्येक भारतीयासाठी एक 'श्रद्धास्थान' असायला हवं ते प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत मोडावं ??? माझ्या मते यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.
त्या दिवशी जेव्हा आम्ही त्या अभेद्य अशा जेल च्या मुख्य दरवाजातून आत चाललो होतो तेव्हा खरं म्हणजे मला त्या रस्त्यावर पाय ठेवायची सुद्धा लाज वाटत होती.....मनात विचार आला...त्या पुण्यात्म्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यासाठी सुद्धा त्यांच्याइतकाच मनाचा खंबीरपणा आणि हृदयात तेवढंच जाज्वल्य देशप्रेम असायला हवं! ज्या वाटेवरून कधी काळी वीर सावरकरांसारखा कर्मयोगी चालत गेला असेल त्या वाटेवर डोकं टेकवून त्यांची चरणधुळी आपल्या माथी लावायला हवी... पण आत जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे मनोमन सावरकरांना नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली आणि मी जेल च्या आवारात प्रवेश केला .
आमचा गाईड आम्हांला त्या जेल बद्दल आणि वीर सावरकरांबद्दल अगदी भरभरून सांगत होता. एकीकडे माझे कान त्याचं ते बोलणं ऐकत होते पण नजर मात्र चौफेर फिरत होती. एक आदर्श कारागृह कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे cellular jail ! या बाबतीत मी इंग्रजांना पूर्ण मार्क्स दिले. त्या संपूर्ण इमारतींची रचना, तिची बांधणी आणि या सगळ्यातून दिसून येणारी इंग्रजांची योजनाबद्ध आखणी.... खरंच खूप काही शिकण्यासारखं सापडलं मला या सगळ्यातून.... पण ते सगळं बघून सावरकरांबद्दल मनात असलेला आदर शतपटींनी वाढला.वीर सावरकर यांचं असामान्य अस्तित्व इंग्रज पुरेपूर ओळखून होते. आणि मनातून चांगलेच घाबरूनही होते... आणि म्हणूनच बहुतेक सावरकरांचं देशप्रेम मोडून काढण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. सावरकरांना दुसऱ्या मजल्यावरच्या सगळ्यात शेवटच्या कोठडीत ठेवण्यात आलं. आणि त्या कोठडीतून अगदी सहज डोळ्यांना दिसेल अशा जागी खालच्या पटांगणात कैद्यांना फाशी देण्यात यायची... जेणेकरून बघणाऱ्याचं मनोबल खच्ची होईल! आणि या सगळ्यावर कळस म्हणजे फक्त सावरकरांच्या कोठडीच्या बाहेर अजून एक लोखंडी दार बसवण्यात आलं.... मला तरी हे दुसरं दार म्हणजे इंग्रजांच्या मनातल्या भीतीचं प्रतीकच वाटलं. ज्या कैद्याच्या हातापायात बेड्या ठोकून तुम्ही त्याला एका अभेद्य कोठडीत , कड्या कुलुपात डांबून ठेवलंत... तो कैदी त्या परिस्थितीत देखील निसटून जाईल ही शंका मनात येणं !!! माझ्या मते सावरकरां विरुद्धच्या लढाईतली ही इंग्रजांची खूप मोठी हार होती.
आम्ही जेव्हा त्या कोठडीपाशी पोचलो तेव्हा माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते... देशप्रेम, अभिमान, दुःख, मानसिक संताप.... नक्की काय वाटत होतं ते माझं मलाच कळत नव्हतं.…. पण त्या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम असेल कदाचित - कोठडीच्या आत शिरताना माझ्याही नकळत मी पायातल्या चपला बाहेरच काढून ठेवल्या ! प्रत्येक देशभक्ताला ती जागा एखाद्या मंदिरा सारखीच वाटत असेल !
आत शिरल्यावर बघितलं- सावरकरांनी वापरलेल्या वस्तू तिथे ठेवण्यात आल्या आहेत.... अगदी जपून ! ते सगळं बघून मनात एक विचार आला... जपायचेच असतील तर तो वीर योद्धा जे आदर्श मागे ठेवून गेला ते जपायला हवे ! त्या देशभक्ताच्या आचरणात जे जाज्वल्य देशप्रेम दिसून आलं होतं ते आपल्या स्वतःच्या मनात जागृत करायचा प्रयत्न करायला हवा ! आणि हा मनात साठवलेला , जपलेला देशप्रेमाचा अद्भुत वसा आचरणात आणून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवा !!!त्या दिवशी त्या जेल मधून बाहेर पडताना एक गोष्ट अगदी प्रकर्षानी जाणवली.... त्या वास्तूत प्रवेश करण्याआधी ज्यांना ते फक्त एक प्रेक्षणीय स्थळ वाटत होतं असे बरेच लोक बाहेर पडल्यानंतर मात्र त्याच वास्तूला हात जोडून नमन करत होते !आता त्यांनीही देशप्रेमाचा वसा स्वीकारला होता!!
वि. दा.
Submitted by nimita on 28 May, 2020 - 00:24
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मुळ चे जेल जपान्यानी पाडले ना?
I had visited at Port blare,
I had visited at Port blare, Andman in February 2007. There were originally a cellular Jail comprising of seven petals.i.e. seven three storied buildings having one common security cabin on each floor. By the year 2007, only three buildings are remaining. All the other four buildings were demolished and reconstructed and converted into the Govt. offices. Swa.Veer Savarkar was put in last room ( No. 123) on the third floor. The only one window provided in each cell was at the height of eight feet.
सुंदर सुंदर लेख नमिता
सुंदर सुंदर लेख नमिता
स्वातंत्र्य सैनिकांचे अग्रणी, राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, धर्मसुधारक व समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची आज जयंती. त्यांना कोटी कोटी प्रणाम
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥
हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥
लेख आवडला. ह्यावर्षी अंदमान
लेख आवडला. ह्यावर्षी अंदमान जायचच ठरवलं होतं बघू कधी जमतय ते...
लेख खूप आवडला. माझी मैत्रीण
लेख खूप आवडला. माझी मैत्रीण दोनच महिन्यापूर्वी अंदमानला गेली होती तिला पहिला प्रश्न हाच विचारला होता. सेल्युलर जेल पाहिलेस का ?
Epic channel च्या एकांत या शो मध्ये दाखवले होते. मी तेव्हाच पाहिले. वीर सावरकर आणि त्यांचे बंधू दोघेही तिथे होते व त्यांना दोन वर्षे माहिती नव्हते असे सांगितले त्या शो मध्ये. खूपच गलबलून आले ते बघताना आणि त्याविषयी ऐकताना. कोटी कोटी नमन. दुसरे काय म्हणनार. भाजी चिरताना कापलेले सहन होत नाही आपल्याला. त्यांनी काय काय सहन केले तिथे. केवढे ते जाज्वल्य, केवढा तो त्याग.
वीर सावरकरांना आदरांजली.
धन्यवाद
वीर सावरकरांना आदरांजली.
वीर सावरकरांना आदरांजली.
इतक्यातच त्यांचे एक पुस्तक वाचले (अभिराम दीक्षित संपादित) , हा माणूस एका गाढ झोपेत असलेल्या समाजाला जागे करण्याचा जीवापाड प्रयत्न करत होता पण ह्या समाजाची झोप संपताच नाही ....
सुंदर आणि समयोचित.
सुंदर आणि समयोचित.
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद
शब्दन शब्द खरा आणि त्या कणखर
शब्दन शब्द खरा आणि त्या कणखर -योध्या चे चपखल चित्रं उभं करणारा !
स्वा.वीराना प्रणाम!
सुंदर वर्णन. लेख वाचताना
सुंदर वर्णन. लेख वाचताना प्रत्यक्षच पहात आहोत असेच वाटते.